Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

अग्रलेख

अस्थिरतेचा साक्षीदार

 

व्यावहारिक दृष्टी आणि गुणवत्तेत वरची पायरी, ही माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांची ओळख. परवाच्या प्रजासत्ताक दिनाला कारणीभूत ठरलेल्या राज्यघटनेची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील ज्या समितीने केली, तिचे ते सदस्य होते. व्यंकटरमण राष्ट्रपतिपदी होते, त्याआधी ते उपराष्ट्रपती होते, संरक्षण, रेल्वे, अर्थ अशी आणखीही काही मंत्रिपदे त्यांनी केंद्रात सांभाळली होती. लोकसभेवर सर्वप्रथम निवडून आल्यावर त्यांनी आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत संसदीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. कामगारनेतेपद हे त्यांचे खरे लाडके पद. कामगारांचे प्रश्न सोडवण्यात ते नेहमीच अग्रभागी असत. १९५७ मध्ये ते दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले, पण त्या वेळच्या मद्रास सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारण्यासाठी त्यांनी खासदारकीचा त्याग केला. राज्याच्या कारभाराकडे खासदारकी सोडून जाणारे ते कदाचित पहिले नेते असतील. ते राज्याच्या उद्योग, ऊर्जा आणि सहकार खात्याचे मंत्री होते. दहा वर्षांपर्यंत राज्यात राहिल्यावर ते पुन्हा लोकसभेत परतले. त्यांची अर्थमंत्रिपदाची आणि संरक्षणमंत्रिपदाची कारकीर्द गाजली. व्यंकटरमण हे स्पष्टवक्ते होते आणि कदाचित त्यामुळेच राजकारणी मंडळी त्यांच्यापासून बऱ्यापैकी अंतर राखून असत. व्यंकटरमण हे स्वातंत्र्याच्या चळवळीत वाढले. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना दोन वर्षे कारावास भोगावा लागला. ते कायदेपंडित होते आणि त्यामुळेच १९४६ मध्ये मलाया आणि सिंगापूरमध्ये जपानी सत्तेच्या विरोधात काम करणाऱ्या मूळच्या भारतीयांचा बचाव करण्यासाठी पंडित नेहरूंनी त्यांना तिकडे पाठवून दिले होते. कामगार चळवळीत ते वाढले. मळे कामगारांपासून गोदी कामगारांपर्यंत आणि रेल्वे कामगारांपासून शेतमजुरांपर्यंत त्यांनी अनेकांच्या संघटना बांधल्या आणि त्यांच्यासाठी त्यांनी लढा दिला. आज कामगारांचे प्रश्न नेमके आहेत तरी काय, हे फारच थोडय़ा नेत्यांना माहीत असावे. कामगारांसाठी संघर्षांत उतरण्यापेक्षा जातीपातीचे राजकारण करणे अधिक सोयीचे, असा यातल्या बऱ्याच नेत्यांचा आज समज बनलेला दिसतो. स्वाभाविकच कामगारांचे नेतृत्व करून त्यांना यश मिळवून देईन, असे म्हणणारे फारसे कुणी आढळतच नाही. व्यंकटरमण यांनी कायदाविषयक नियतकालिक काढले आणि ते त्याचे संपादक बनले. पुढे जेव्हा श्रमिक पत्रकारांचे प्रश्न असू शकतात, असे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी श्रमिक पत्रकारांचेही नेतृत्व केले. संघटना बांधायची आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आपल्यासाठी मोटारगाडय़ांची सोय पाहायची, हा प्रकार त्यांनी कधी केला नाही. राजकारणात चिल्लर पक्षांची गर्दी फारच वाढल्याने नवे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे या देशात द्विपक्षीय, फार तर त्रिपक्षीय लोकशाही असावी, यांसारखे विचार त्यांनी राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांनी व्यक्त केले. त्यांच्या या मताशी काँग्रेस पक्ष सहमत असणे शक्य नव्हते. पण इतरही मोठय़ा विरोधी पक्षांनी त्यांच्या या मताला, ‘त्यांचे ते व्यक्तिगत मत आहे,’ अशी पुष्टी देण्याखेरीज काही केले नाही. राजीव गांधींनी ग्यानी झैलसिंग यांच्या वादग्रस्त कारकीर्दीनंतर व्यंकटरमण यांना राष्ट्रपतिपदासाठी निवडले. विश्वनाथप्रताप सिंग, चंद्रशेखर आणि पी. व्ही. नरसिंह राव अशा तिघांना राष्ट्रपती व्यंकटरमण त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ दिली. दोन वर्षांमध्ये तीन पंतप्रधान त्यांच्या कारकीर्दीने पाहिले. राजीव गांधींनंतरचा कालखंड हा काँग्रेसेतर असंतुष्टांचा ठरला. देशातही त्यामुळे अस्थिरता वाढली. कदाचित त्यामुळेच असेल, अविश्वासाचा ठराव मांडणाऱ्या पक्षाने आपला नेता कोण ते त्या ठरावातच जाहीर करायला हवे, असे व्यंकटरमण यांनी सुचविले होते. अशा तरतुदीने सरकार पाडायचे प्रयोग एकसारखे होणार नाहीत, असे त्यांचे मत होते. विशेष म्हणजे हाच काळ हा कोणत्याही एका पक्षाला बहुमत न देणारा, असा होता. अधांतरी संसदेमुळे समविचाराच्या राजकीय पक्षांना एकत्र येऊन सत्तेवर दावा करायची पद्धतही त्यांच्याच राष्ट्रपतिपदाच्या काळापासून सुरू झाली. सार्वत्रिक निवडणुकीत मिळणाऱ्या खंडित निकालाने केंद्रात राष्ट्रीय सरकार बनवावे, असाही विचार त्यांनी मध्यंतरी बोलून दाखवला होता, पण त्याचे कुणीच स्वागत केले नाही. भारतीय जनता पक्षाला जेव्हा बहुमत मिळण्याची शक्यता नव्हती, त्या काळात त्या पक्षाचे नेते अधूनमधून तसा विचार बोलून दाखवायचे, पण जेव्हा त्यांनाही अन्य पक्षांच्या साहाय्याने बहुमत मिळवता येते हे लक्षात आले, तेव्हा त्यांनी केंद्रात राष्ट्रीय सरकार असावे, या मागणीला पाठिंबा दिला नाही. भारतीय जनता पक्षाशी सुरुवातीला सहानुभूत होत होत पुढे भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार अशी चिन्हे दिसू लागताच व्यंकटरमण यांनी आपल्या विचारांचा रंग भगवा करायला सुरुवात केली. राजीव गांधी यांनी श्रीलंकेत भारतीय शांतिसेनेला पाठवायचा निर्णय घेतला. राजीव गांधी यांच्या श्रीलंका भेटीत कोलंबोत त्यांच्यावर एका श्रीलंकन सैनिकाने बंदुकीच्या दस्त्याने हल्ला केला. राजीव गांधी तो हल्ला चुकवण्यात यशस्वी झाले. त्यानंतर मायदेशी परतलेल्या राजीव गांधींच्या स्वागताला सर्व राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून व्यंकटरमण स्वत: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित राहिले. मनाचा मोठेपणा दाखवणारे राष्ट्रपती, या शब्दात त्यांना त्यावेळी गौरविण्यात आले होते.तामिळ कवी आणि प्रखर राष्ट्रवादी तत्त्वज्ञ कवी सुब्रह्मण्यम भारती यांच्या विचारांनी ते भारावले होते, इतके की आपल्या अर्थसंकल्पातही ते सुब्रह्मण्यम भारती यांच्या काव्याचा समावेश करीत. राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ हे ब्रीद पाळले. ‘माय प्रेसिडेन्शियल इयर्स’ या आपल्या आत्मचरित्रात (खऱ्या अर्थाने राष्ट्रपतिपदाच्या काळाच्या वर्णनपर चरित्रात) त्यांनी वादग्रस्त ठरतील, अशी विधाने केली असली, तरी ती त्यांनी ओढून ताणून केली असल्याचे दिसत नाही. राजीव गांधींवर राजकारणाने अन्याय केला, असेही त्यांनी त्यात म्हटले आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या तीस वर्षांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळालेली नाही. तामिळनाडूचे राजकारण, या काळात व्यंकटरमण म्हणतात, त्याप्रमाणे द्विपक्षीय पद्धतीने चालले असले, तरी तिथे राज्याचा विकास म्हणावा त्या गतीने झालेला नाही. व्यंकटरमण हे त्या राज्यात मंत्रिपदी असताना तामिळनाडूने खऱ्या अर्थाने प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली होती. राज्याच्या विकासाचे प्रणेते म्हणून ते ओळखले गेले. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्यलढय़ाशी संबंधित एक दुवा निखळला आहे. पुढल्या वर्षी त्यांनी शंभरीत पदार्पण केले असते, पण तत्पूर्वीच त्यांना काळाने नेले आहे.