Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

लोकमानस

धर्मवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि आतंकवाद

 

हल्ला करणारे विशी-तिशीतले हे तरुण इतके क्रूर कसे व का झाले? कशासाठी त्यांनी स्वत:च्या जिवावर उदार होऊन माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य केले? त्यांचा व त्यांच्या या कृत्याचा निषेध करीत असतानाच या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सर्वानीच केला पाहिजे.
टोकाचा विद्वेष माणसाच्या सद्विवेक बुद्धीचा ताबा घेत असतो व त्याची परिणती हीन कृत्य करण्यात होत असते. विशिष्ट धर्माचा एकांगी विचार दुसऱ्या धर्माबद्दलच्या विद्वेषाला जन्म देत असतो. याचे असंख्य दाखले इतिहासाने नोंदवून ठेवले आहेत. माझ्या धर्माव्यतिरिक्त दुसरा धर्म चांगला असूच शकत नाही, असा विचार माणसे करू लागतात तेव्हा त्यांच्या मनात धर्माबद्दलच्या मूलतत्त्ववादाची लागण झालेली असते.
धर्माचा संकुचित विचार विद्वेषाला जन्म देतो. हाच संकुचित विचार माणसाला असहिष्णू, क्रूर बनवितो. काही बिलंदर मंडळींनी धर्मातील या विकृतीला सांस्कृतिक राष्ट्रवादाची फोडणी देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे संकुचित धर्माचे उघड भौगोलिक रूप! संकुचित धर्माप्रमाणेच त्यांत मानवतेच्या वैश्विक विचारांचा लवलेशही नसतो. धार्मिक विचारसरणी नेहमीच सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उद्घोष करीत असते व मानवतेचे बळी घेत असते. याचे अलीकडील उदाहरण म्हणजे लालकृष्ण अडवाणींची रक्तरंजित रथयात्रा. या रथयात्रेने देशभर धार्मिक विद्वेषाची पेरणी केली. त्याची परिणती ६ डिसेंबर, १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात झाली. ‘भारतीय विद्वेषाचे जनक’ म्हणून इतिहास अडवाणींची निश्चितच नोंद करेल. या विद्वेषाचे बक्षीस त्यांना सत्तेच्या रूपाने मिळाले खरे. परंतु सगळ्या देशाला त्यांनी या विद्वेषाच्या आगीत होरपळत ठेवले आहे. (मुंबईवरील हल्ला हा बाबरी मशीद पाडल्याचा सूड आहे हे कसाब या अतिरेक्याने मुंबई पोलिसांना नुकतेच सांगितले आहे.) आता तर हेच अडवाणी या सेक्युलर भारताचे पंतप्रधान होण्यासाठी विंगेत वाट पाहत थांबले आहेत.
यापूर्वी देशात दंगेधोपे झाले नव्हते असे नाही. बॅ. मोहम्मद अली जिना यांना इस्लामचे सोयरसुतक नसताना त्यांनी धर्माच्या नावाखाली देशाची फाळणी घडवून आणली तेव्हा भीषण धार्मिक दंगली उफाळून आल्या. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांत स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू असताना नौखालीत महात्मा गांधी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता विद्वेषाची आग विझवत होते. मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर अडवाणी-मोदी मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियांसमोर विद्वेष भडकवणारी भाषा करीत होते. मालेगावात बॉम्बस्फोट घडवून आणणारे हिंदू अतिरेकी आतंकवादी नाहीत परंतु मुस्लिम अतिरेकीच केवळ आतंकवादी ही त्यांची भाषा सर्वसामान्यांना समजत नाही असे त्यांना वाटते काय? नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत दिल्ली व राजस्थानमध्ये मतदारांनी त्यांना चांगलीच चपराक दिली आहे. धर्मवादाला, सांस्कृतिक राष्ट्रवादाला व आतंकवादाला जनता पराभूत करू शकते हेच या निकालांवरून सिद्ध होते.
आमच्या धर्मात सगळे चांगले आहे, वाईट काही नाही असेच प्रत्येक धर्माचे धुरीण सांगत आहेत व ते आपल्या अनुयायांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. धर्मावरील कर्मकांडांची, वाईट चालीरीतींची पुटे खरवडून काढायला हे धर्मधुरीण तयार नाहीत. धर्म चिकित्सा करणाऱ्यांना एक तर ते अनुल्लेखाने, नाही तर जीवे मारतात. परंतु धर्मचिकित्सा जेव्हा थांबते तेव्हा विवेकाचा ऱ्हास होऊन धर्मवाद, आतंकवाद जन्माला येतो. कोणताही विचार मानवजातीच्या कल्याणासाठी असला पाहिजे. धर्म आंधळा होणार नाही व आतंकवादाला जन्म देणार नाही याची काळजीही आपण सर्वानी घेतली पाहिजे. असे केले तर जीना, अडवाणी, मोदी, ओसामा आदी मंडळी आपोआपच बाद होतील व मानवतेचा वैश्विक विचार विजयी होईल.
प्रा. जयप्रकाश म्हात्रे, मुंबई

अधिवेशन फेब्रुवारीतच घ्या
महाराष्ट्र विधिमंडळाचे अंदाजपत्रकीय अधिवेशन १६ मार्चपासून सुरू होणार आहे; परंतु लोकसभेच्या निवडणुकाही १५ मार्चपासून घेण्याचे निवडणूक आयोगाने ठरवले आहे. लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली की अधिवेशन बरखास्त करावे लागणार आहे. यापेक्षा अधिवेशन १५ फेब्रुवारीपासून करणे योग्य होणार आहे. अधिवेशन बरखास्त करण्याची संधी मिळावी याकरिताच अधिवेशनाची तारीख ठरविण्यात आली. निवडणुका त्या दरम्यान होणार हे सर्वाना माहीत होते. अधिवेशन १५ फेब्रुवारीपासून पूर्ण महिनाभर घ्यावे अशी मागणी जनतेने केली पाहिजे. तिचा तो हक्क आहे. रयतेने कासरा खेचला तर सरकार कामाला लागेल.
विधिमंडळ आणि लोकसभेच्या वर्षभरात १०० बैठका व्हाव्यात असा नियम आहे; परंतु दोन्हींच्या बैठका साधारण ५० होत आहेत. २० वर्षांपूर्वी अधिवेशने १०० दिवस चालायची. महाराष्ट्राची जनसंख्या २० वर्षांनंतर दुप्पटीपेक्षा जास्त झाली आहे. त्यापेक्षा जास्त प्रमाणात लोकांच्या समस्या, प्रश्न, अन्याय, भ्रष्टाचार वाढला आहे; परंतु अधिवेशनाचे कामकाज दरवर्षी कमी दिवस होत आहे. प्रश्नोत्तराचा महत्त्वाचा एक तास रद्द करून चर्चा होण्याचे प्रमाण वाढत आहे. वेळेअभावी अनेक लक्षवेधी सूचनांवर चर्चा होत नाही. विधेयके, मागण्या यांच्यावरही पुरेसा वेळ चर्चेला दिला जात नाही. विधिमंडळाची अधिवेशने कमी दिवसांत, गोंधळात गुंडाळल्यामुळे लोकांचे असंख्य प्रश्न, भ्रष्टाचाराची प्रकरणे, विकासांच्या समस्यांचा निर्णय लागत नाही. मौनी आणि गोंधळी आमदारांना अशी अधिवेशने सुखाची असतात. विधिमंडळ हे लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. तोच असा धोकादायक बनत असेल, तर त्यामुळे लोकांचे स्वातंत्र्य, सुरक्षितता, मूलभूत हक्क यांना चूड लावली जात आहे. यासाठी अंदाजपत्रकीय अधिवेशन फेब्रुवारीत आणि पूर्ण महिनाभर झालेच पाहिजे.
जयप्रकाश नारकर, ग्रँटरोड, मुंबई

‘ठेविले म्हाडाने तैसेची राहावे’ का?
म्हाडाने निवासी घरकुल योजनेअंतर्गत जाहिरात दिली आणि जागतिक मंदीच्या काळातही त्याला जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळाला. एकंदर अर्ज वाचला असता म्हाडाने पात्रतेचे जे नियम दिले आहेत ते पाहता म्हाडा कोणत्या युगातवावरत आहे हा प्रश्न पडतो. म्हाडा नियमात म्हणते की पतीच्या नावे मालकी हक्काचे घर किंवा म्हाडाने वितरित केलेले घर असेल तर पत्नी घरासाठी अपात्र आहे. याउलट आपली राज्यघटना स्त्रियांना संपत्तीचा अधिकार देते. यानुसार कोणतीही विवाहित अथवा अविवाहित स्त्री जंगम किंवा स्थावर मालमत्तेचा आपला अधिकार अबाधित ठेवते. म्हाडा या सरकारी यंत्रणेला अशा नियमांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ते पुढे जाऊन म्हणतात की जे स्वत:च्या मालकीच्या घरात राहत आहेत तेसुद्धा अर्ज करण्यास अपात्र आहेत. समजा एखाद्या व्यक्तीला पूर्वीची जागा कुटुंब विस्तारामुळे अपुरी वाटत असेल तर त्याने दुसरी जागा न घेता ‘ठेविले म्हाडाने तैसेची राहावे’, असे म्हणत गप्प राहावे का?
अ‍ॅड. अ. ल. तावडे, घाटकोपर, मुंबइ

जनतेच्या हिताचाच निर्णय
नांदेड येथे नवीन महसूल आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाआधी औरंगाबाद येथे जाण्या-येण्यासाठी मराठवाडय़ाच्या जनतेस साधारण तीनशे कि. मी.च्यावर प्रवास करावा लागत होता. यामध्ये वेळेबरोबरच प्रवासासाठी येणारा खर्च हीसुद्धा महत्त्वाची बाब होती. मराठवाडय़ातील गोरगरीब जनतेसाठी ही बाब म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. ज्या जिल्ह्य़ासाठी हा निर्णय घेतला गेला, त्यांच्या दृष्टीने ही घटना अतिशय चांगली आहे. भौगोलिक दृष्टीने पाहिल्यास नांदेड हे ठिकाण परभणी, हिंगोलीपासून हाकेच्या अंतरावर असल्यासारखेच आहे. लातूर हे ठिकाण या सर्व जिल्ह्य़ांना खूपच दूरवर आहे. लातूरसह परभणी, हिंगोलीसाठी नांदेड अतिशय सोयीचे नैसर्गिक असे ठिकाण आहे.
राजकीय मंडळींनी सदर निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. जनतेचे हित कशात आहे हा विचार केला तर हा निर्णय घेण्यास आपण खूपच विलंब केला असे वाटते.
किशन शिंदे, नेरूळ, नवी मुंबई