Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

सांगलीत पश्चिम विभागीय घोषनाद शिबिरांची सांगता
रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी मानवंदना दिली तिरंगा ध्वजाला!
संघाचा ध्वज क्रीडांगणावर फडकविला नाही
गणेश जोशी
सांगली, २७ जानेवारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत कार्यक्रमात स्वयंसेवकांनी राष्ट्रध्वजाला केलेला प्रणाम पाहण्याचा अलौकिक क्षण सांगलीकरांना प्रजासत्ताकदिनी पाहायला मिळाला. निमित्त होते, संघाच्या पश्चिम विभागीय घोषनाद शिबिराचे! छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुमारे ६०० घोषवादकांनी बहुधा प्रथमच संघाच्या भगव्या ध्वजाऐवजी राष्ट्रीय तिरंग्याला मानवंदना दिली.

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी ६८ कोटींची योजना- हर्षवर्धन
कोल्हापूर, २७ जानेवारी / प्रतिनिधी

पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी ६८ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाने आपल्या शिफारशींसह केंद्र सरकारकडे पाठवला आहे, अशी माहिती सहकारमंत्री व कोल्हापूर जिल्हय़ाचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे दिली.शिवाजी पेठेतील सरदार तालीम व मरगाई तालमीचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज होते.

अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे सांगली स्थायी समिती सभा तहकूब
सांगली, २७ जानेवारी / प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या मंगळवारच्या स्थायी समितीच्या सभेस २७ पैकी केवळ सहाच अधिकारी उपस्थित राहिल्याने संतप्त झालेले सभापती हरिदास पाटील यांनी गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्याचे आदेश देत ही सभा तहकूब ठेवली. विशेष म्हणजे गैरहजर अधिकाऱ्यात खुद्द आयुक्त दत्तात्रय मेतके यांचाही समावेश असल्याने त्यांना नोटीस कोण बजाविणार? अशीच चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

जातींचे विच्छेदन म्हणजेच आंबेडकरवाद- माने
सातारा, २७ जानेवारी / प्रतिनिधी

जातीचे विच्छेदन म्हणजेच आंबेडकरवाद हे लक्षात घेऊन कृती केली तरच खरे परिवर्तन घडेल असे मत पद्मश्री लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले. येथील परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने लक्ष्मण माने यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महामाता भीमाबाई आंबेडकर स्मारकस्थळी संबोधी प्रतिष्ठानेचे अध्यक्ष आचार्य अण्णासाहेब होवाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष शंकरराव सोरटे होते. भन्ते दिपंकर भटके विमुक्त संघटनेचे सरचिटणीस नारायण जावलीकर या वेळी उपस्थित होते.

सुशीलकुमारांच्या कानपिचक्या अन् काँग्रेसजनांचे आत्मपरीक्षण
सोलापूर, २७ जानेवारी/प्रतिनिधी

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक चांगल्या योजना सोलापूर जिल्हय़ात आणूनही त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात काँग्रेस कार्यकर्ते कमी पडल्याची काँग्रेसचे नेते, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेली खंत व दिलेल्या कानपिचक्यांच्या पाश्र्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेसच्या बैठकीत आत्मपरीक्षण करण्यात आले.

गावात आलेला गवा विहिरीत पडून मृत्युमुखी
शाहूवाडी, २७ जानेवारी / वार्ताहर

शिंपे (ता.शाहूवाडी) येथे गावच्या हद्दीत सोमवारी दोन गवा रेडय़ांचे आगमन झाले आणि एकच हाहाकार माजला. गवे पाहण्याची जिज्ञासा, उत्सूकता आणि पळापळ यात एका गव्यास प्राणास मुकावे लागले तर धावपळीत अमोल मारुती पाटील (वय १३) पडून त्याचा हात मोडल्याने तो जखमी झाला आहे. दरम्यान यातील एक गवा विहीरीत पडला होता. त्यामुळे व हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

एक दशकाच्या लढय़ानंतर वीज ग्राहकाला न्याय
ग्राहक मंचाकडून ‘महावितरण’ ला दंड
इचलकरंजी, २७ जानेवारी / दयानंद लिपारे
दिवस ग्राहकराजाचे आणि राज्य बळीराजासाठी असल्याचे म्हटले जाते, पण ही अशी कल्याणकारी भूमिका महाराष्ट्र शासनाला आणि त्यातही महावितरण व वनखात्याला पटते की नाही कोणास ठाऊक? उस्मानाबाद जिल्हय़ातील गजेंद्र नागटिळक आणि सात कुटुंबांना शेतीसाठी वीज हवी होती, पण तब्बल एक दशकभर त्यांना अडेलतट्टू नोकरशाही आणि लालफितीला अडसर याच्याशी तन, मन, धन अर्पण करून लढावे लागते. अखेर

कोल्हापूर, २७ जानेवारी / विशेष प्रतिनिधी
येथील दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक कै. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पत्नी इंदिरादेवी यांचे सोमवारी दुपारी वार्धक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ‘पुढारी’चे संपादक प्प्रतापसिंह जाधव, सहा मुली, जावई, नातू योगेश जाधव, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. इंदिरादेवी जाधव या गेले काही महिने आजारी होत्या. अखेरीस सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागाळा पार्क येथील इंदिरा निवास या त्यांच्या निवासस्थानी कोल्हापूरच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज, जिल्हय़ाचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सदाशिवराव मंडलिक, निवेदिता माने, कोल्हापूरचे महापौर उदय साळोखे, जि.प. अध्यक्ष नानासाहेब गाठ आदींनी अंत्यदर्शन घेतले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात पालकमंत्र्यांना घेराव
सोलापूर, २७ जानेवारी/प्रतिनिधी

मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना शासकीय विश्रामगृहात सुमारे अर्धा तास ‘घेराव’ घालण्यात आला. सोमवारी दुपारी एक कार्यक्रम आटोपून श्री. मोहिते-पाटील हे शासकीय विश्रामगृहात आले तेव्हा मोटारीतून उतरताना जिजाऊ ब्रिगेडच्या सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून घेराव घातला. तेथून विश्रामगृहात या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी श्री. मोहिते-पाटील यांना निवेदन देण्यात आले. या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. कसलीही कल्पना नसताना अचानकपणे जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातल्यामुळे विश्रामगृहाच्या परिसरात गोंधळ माजून पोलिसांचीही तारांबळ उडाली.

मोफत शेतीपंप देण्याची सुरवात सोलापूर जिल्ह्य़ापासून
सोलापूर, २७ जानेवारी/प्रतिनिधी

देशातील शेतकऱ्यांना त्यांचे जुने शेतीपंप बदलून नवीन शेतीपंप मोफत देण्याचा उपक्रम केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने देशात सोलापूर जिल्ह्य़ातील मंगळवेढा तालुक्यात येत्या १ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरवात १ फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथे केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. प्रारंभी ही योजना सोलापूर जिल्ह्य़ातील मंगळवेढय़ासह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या चार तालक्यात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने देशभर ही योजना सुरू करण्यात येणार आहे.केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या शेतीभार व्यवस्थापनांतर्गत शेतकऱ्यांकडील जुने झालेले व अकार्यक्षम असलेले पंप बदलून तेथील नवीन पंप देण्याची ही योजना आहे. नवीन पंपामुळे जुन्या पंपाच्या तुलनेत निम्म्या वेळेत पाण्याचा उपसा करता येणार आहे. त्यासाठी विजेची मोठी बचत होणार आहे. यासाठी वीज वितरण कंपनीस पुरेशा दाबाने सुरळीत वीज पुरवठय़ासाठी उच्च दाबाच्या विद्युत प्रणालीची उभारणी करावी लागणार आहे. यासाठी ब्रह्मपुरी गावाजवळच ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्री चव्हाण हे करणार असल्याचे सांगण्यात आले.

सुळगावकर यांना राष्ट्रपतिपदक
कोल्हापूर, २७ जानेवारी / प्रतिनिधी

कोल्हापूर पोलीस दलाकडील सहायक फौजदार अनिल पांडुरंग सुळगावकर यांना पोलीस खात्यातील उत्तम कागिरीबद्दल राष्ट्रपतिपदक घोषित झाले आहे. सुळगावकर हे सध्या उजळाईवाडी विमानतळावर नेमणुकीस आहेत. ३० वर्षांच्या पोलीस सेवेत त्यांनी उत्कृष्ट तपासकार्याबद्दल १९६ बक्षिसे पोलीस प्रमुखांकडून मिळवली आहेत. अनिल सुळगावकर हे मूळचे चिक्कोडी तालुक्यातील सुळगाव या गावचे रहिवासी असून १९७९ साली ते रत्नागिरी येथे पोलीस दलात भरती झाले. देवगड व इतर पोलीस ठाण्याकडे नोकरी केल्यानंतर त्यांची कोल्हापूर पोलीस दलात बदली झाली. गारगोटी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच विशेष पथक या ठिकाणी काम करणाऱ्या सुळगावकर यांनी आत्तापर्यंत चार दरोडे, २५ घरफोडय़ा, ५५ चोऱ्या तसेच बनावट नोटा प्रकरण उघडकीस आणले आहे. त्यांना आज केंद्र शासनाने राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर केल्याबद्दल त्यांचे पोलीस दलातून अभिनंदन होत आहे.

आमचा गाव, आमची ग्रामपंचायत, आमचा विकास
सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचा कारभार हाकण्याची संधी दलित समाजासही वेळोवेळी मिळाली आहे. २० सप्टेंबर २००० ते १८ मार्च २००२ या कालावधीमध्ये दादासाहेब बापू मोरे, दि. १९ मार्च २००२ ते १८ सप्टेंबर २००३ या कालावधीत नंदकुमार सदाशिव रास्ते यांनी, तर १९ सप्टेंबर २००३ ते १३ नोव्हेंबर २००४ या कालावधीत विठ्ठल सखाराम गायकवाड यांनी मागील सरपंचांची विकासाची धोरणे पुढे अवलंबीत ग्रामस्वच्छता अभियान यशस्वीपणाने राबविले. या त्यांच्या कार्याची दखल घेत सोलापूर जिल्हा स्तरावरील बक्षिसेही या कालावधीत मिळाली. गावातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, शाळांच्या खोल्या आदी कामांना प्राधान्य देत अकलूजची विकासाची परंपरा कायम राखण्यात या सरपंचांचाही मोलाचा वाटा आहे. गावातील अनेक कार्यकर्ते विविध संस्था, संघटनांवर पदाधिकारी असून ते यशस्वीपणे आपली कारकीर्द चालवीत आहेत.
७ नोव्हेंबर २००८ रोजी लोकसत्ता वृत्तान्तमध्ये ‘आमचा गाव, आमची ग्रामपंचायत, आमचा विकास’ या सदरात वरील तीनही सरपंचांच्या नावांचा व कार्याचा उल्लेख अनवधानाने राहून गेला होता.
- निवासी संपादक