Leading International Marathi News Daily                                बुधवार, २८ जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

व्यापार - उद्योग

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेस आक्रमक
मतांच्या निकषावर जास्त जागांवर दावा
मुंबई, २७ जानेवारी / खास प्रतिनिधी
गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणूक निकालांच्या आधारे काँग्रेस पक्ष हा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने जागावाटपासाठी नेमलेल्या समितीने घेतली आहे. गेल्या वेळी काँग्रेस २७ तर राष्ट्रवादी २१ जागा लढले होते. हेच संख्याबळ कायम ठेवताना काही जागांमध्ये आदलाबदल करण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे. एकूणच काँग्रेसची आक्रमक भूमिका लक्षात घेता दोन्ही काँग्रेसमध्ये जागावाटपाची चर्चा सरळ व सहज होणार नाही हेच यावरून स्पष्ट होते.

राणे -पवार यांची पुण्यात गुप्त भेट
पुणे, २७ जानेवारी/खास प्रतिनिधी

काँग्रेसमधील पुनर्वसन खोळंबल्याने नारायण राणे यांनी आता आपली चूल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मांडण्याची तयारी चालवली असून, ‘राष्ट्रवादी’चे नेते शरद पवार यांची त्यांनी पुण्यात काल गुप्तपणे भेट घेतल्याचे विश्वसनीय गोटातून सांगण्यात आले. या भेटीदरम्यान राणे यांच्या ‘राष्ट्रवादी’तील आगामी राजकीय वाटचालीवर चर्चा झाल्याचेही समजते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्ह्य़ाची राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी पवार गेले तीन दिवस पुण्यात तळ ठोकून आहेत. तसेच नारायण राणे हेसुद्धा आपल्या कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यासाठी पुण्यातील ‘करिश्मा’ सोसायटीतील निवासस्थानी आले होते. उरळीकांचनमधील कार्यक्रमानंतर पवार हे पुण्यातील मोदीबागेत काही काळ थांबले होते. त्याचवेळी राणे यांनी पवार यांची भेट घेतल्याचे अंतस्थ गोटातून सांगण्यात आले. कदाचित काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी राणे यांनी ही खेळी केली असावी, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास विलंब होत असल्याने राणे अस्वस्थ आहेत, तसेच आपल्या चिरंजीवांचे राजकीय भवितव्य हासुद्धा त्यांच्यासमोर काळजीचा विषय आहे. या पाश्र्वभूमीवर राणे यांनी पवार यांची काल पुण्यात घेतलेली भेट चर्चेचा विषय झाली आहे. राणे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मुंबई, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात चांगले बळ मिळू शकते. त्यामुळे राणे यांना ‘राष्ट्रवादी’ने पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिले असल्याचे या सूत्रांकडून सांगण्यात आले.

मंदीमुळे ७० हजार नोकऱ्यांवर गदा
‘मायक्रोसॉफ्ट’मधील भारतीय कर्मचारीही संकटात
शिकागो, २७ जानेवारी/पी.टी.आय.
अमेरिकेतील मंदीचा फास आणखी आवळला जात असून अमेरिका आणि युरोपातील सहा बडय़ा कंपन्यांनी ‘कॉस्ट कटिंग’चा भाग म्हणून आपल्या ७० हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा आज केली. या नोकरकपातीने गेल्यावर्षीपासून नोकरी गमावणाऱ्यांची संख्या आता २० लाखांवर गेली आहे.बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक यंत्रे बनविणारी ‘कॅटरपिलर’, औषध क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून ओळखली जाणारी ‘फायझर’, दूरसंचार क्षेत्रातील ‘स्प्रिंट नेक्स्टेल’, घरगुती उपकरणे तयार करणारी ‘होम डेपो’ यांचा त्या सहा कंपन्यांमध्ये समावेश आहे. या कंपन्यांनी आज एका दिवसात मोठय़ा प्रमाणावर नोकर कपातीची घोषणा केली. मंदीमुळे गेल्या संपूर्ण वर्षांत जगभरातील २० लाखांहून अधिक नोकऱ्यांमध्ये कपात करण्यात आली असून १९४५ नंतर झालेली ही सर्वात मोठी कपात मानली जात आहे.

अमेरिका मुस्लिम राष्ट्रांच्या विरोधात नाही
वॉशिंग्टन, २७ जानेवारी/पी.टी.आय.

परस्परांबद्दल आदर आणि एकमेकांचे हित यावर आधारलेला नवा स्नेहभाव अमेरिका सर्व मुस्लिम जगताबरोबर निर्माण करू इच्छिते असे सांगतानाच अमेरिकेचे नवे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मुस्लिम जगताने अमेरिकेला आपले शत्रू राष्ट्र असे समजून चालू नये असे आवाहन नुकतेच केले. अध्यक्षपदाची धूरा स्वीकारल्यानंतर दुबई येथील अल-अरेबिया या टीव्ही वाहिनीला प्रथमच मुलाखत देताना अमेरिकेचा मुस्लिमांविषयी असलेला उदारमतवादी चेहरा दाखविण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ४७ वर्षीय ओबामा यांनी यावेळी आपल्या कार्यकालाच्या पहिल्या १०० दिवसांतच एखाद्या मुस्लिम राष्ट्राच्या राजधानीमधून मुस्लिम जगताशी संवाद साधण्याचा आपला इरादा असल्याचे स्पष्ट केले.

पाकिस्तानातून स्फोटकांची तस्करी
पंजाब पोलिसांकडून हाय अलर्ट
समर खडस
मुंबई, २७ जानेवारी

पाकिस्तानमधून भारतात सिमेंटच्या नावाने आयात होणाऱ्या काही गोण्यांमध्ये स्फोटके भरून आल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या स्फोटकांद्वारे देशातील रेल्वे स्थानके वा रिफायनरीजवर हल्ला होण्याची शक्यताही पंजाब पोलिसांनी व्यक्त केली असून पंजाबच्या पतियाळा जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी देशाच्या गुप्तचर विभागाला दिलेली ही गुप्त माहिती देशभरातील सर्व राज्यांच्या गृह खात्यांना कळविण्यात आली आहे.मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील अतिरेकी कारवायांबाबतच्या गुप्त माहितीचे सूसुत्रीकरण व एकत्रीकरण करण्याचे काम केंद्रीय पातळीवर वेगाने केले जात आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर पंजाब पोलिसांना पाकिस्तानातून आयात होणाऱ्या सिमेंटच्या गोण्यांमधून मोठय़ा क्षमतेची स्फोटके आल्याची बातमी समजली होती. ही माहिती पंजाबमधील पतियाळा जिल्ह्याच्या पोलिसांना समजल्यावर त्यांनी ती तात्काळ पंजाबमधील सगळ्या पोलीस ठाण्यांना कळवली होती. या स्फोटकांचा वापर रेल्वे स्थानके व रिफायनरीज उडविण्यासाठी केला जाऊ शकतो, अशीही माहिती पतियाळा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पंजाबच्या सगळ्या पोलीस ठाण्यांना ‘हाय अ‍ॅलर्ट’ची सूचना दिली होती. यामध्ये सगळ्या गर्दीच्या ठिकाणांवर काटेकोर लक्ष ठेवणे, रेल्वे स्थानके, बस थांबे, सिनेमा हॉल, मॉल्स आदी ठिकाणची गस्त वाढविण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातील पंजाब पोलिसांना देण्यात आलेल्या या सुचनेनंतर केंद्रीय गुप्तचर विभागाने या माहितीची अत्यंत गंभीर दखल घेतल्याचे गुप्तचर विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. देशभरातील मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, कोलकाता या शहरांना या माहितीनंतर अत्यंत सावधानतेचे इशारेही देण्यात आल्याचे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या माहितीनंतर गुप्तचर विभागाने मुंबई व दिल्ली या शहरांमधील आपले जाळे अधिकच घट्ट केले असून मुंबई पोलिासांनाही गर्दीच्या ठिकाणी अत्यंत काटेकोर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

माजी राष्ट्रपती आर. वेंकटरामन कालवश
नवी दिल्ली, २७ जानेवारी/खास प्रतिनिधी

माजी राष्ट्रपती व जुन्या पिढीतील काँग्रेसचे नेते रामास्वामी वेंकटरामन यांचे आज येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. विविध अवयव निकामी झाल्यामुळे वेंकटरामन यांची आज दुपारी २.३० वाजता प्राणोत्क्रमण झाले, अशी माहिती आर्मी रिसर्च अँड रेफरल इस्पितळाचे प्रशासकीय प्रमुख ब्रिगेडियर ए. के. शर्मा यांनी दिली. वेंकटरामन यांच्या पश्चात पत्नी जानकी आणि तीन मुली आहेत. वेंकटरामन यांच्या निधनावर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्र सरकार तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस व भाजपसह सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून या काळात राष्ट्रध्वज निम्म्यावर उतरविण्यात येतील. वेंकटरामन यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

‘तामिळ अतिरेक्यांबद्दल भारताला सहानुभूती नाही’
नवी दिल्ली, २७ जानेवारी/पी.टी.आय.

श्रीलंकेतील तामिळींची ससेहोलपट होऊ नये, यासाठी भारत आग्रही असला तरी ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम’च्या अतिरेक्यांबद्दल आम्हाला जराही सहानुभूती नाही, अशी स्पष्टोक्ती परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज केली. दहशवादविरोधी लढय़ाला आमचा ठाम पाठिंबा असून कोणत्याही आधारावर होणाऱ्या दहशतवादी कारवायांना आमची सहानुभूती असणे शक्यच नाही, असे नमूद करतानाच ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम’वर तर भारतानेही बंदी घातली असल्याकडे मुखर्जी यांनी लक्ष वेधले. श्रीलंकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात असताना मुखर्जी यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘एलटीटीई’चा मुलैथिवु हा अखेरचा तळ ताब्यात घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर श्रीलंकेत जाणारे मुखर्जी हे पहिले परदेशी नेते आहेत.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा
नवी दिल्ली, २७ जानेवारी/खास प्रतिनिधी

तीन दिवसांपूर्वी तेरा तास चाललेल्या गुंतागुंतीच्या कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरीला यशस्वीपणे सामोरे गेलेले पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत आहे. आज त्यांनी पत्नी गुरुशरण कौर आणि मुलींसोबत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या आयसीसीयूमध्येच सकाळी नाश्ता केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर २४ जानेवारी रोजी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना किमान चार आठवडय़ांची विश्रांती घ्यावी लागेल, असे डॉक्टरांचेही म्हणणे पडले. पण ही शस्त्रक्रिया पूर्ण होऊन विश्रांती घेत असलेल्या पंतप्रधानांच्या प्रकृतीत गेल्या दोन दिवसात वेगाने सुधारणा झाली आहे.

पब हल्लाप्रकरणी आणखी आठजण अटकेत
मंगलोर, २७ जानेवारी / पी.टी.आय.

गेल्या शनिवारी येथील एका पबवर झालेल्या हल्लाप्रकरणी श्रीराम सेनेचा फरारी संस्थापक प्रमोद मुतालिक याच्यासह आणखी आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून अटक झालेल्यांची संख्या २५ झाली आहे. या पबवर हल्ला करून मुलींना बेदम मारहाण करण्यात आली होती. याचे व्हिडिओ चित्रण एका वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आल्यानंतर देशभर याचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे कर्नाटक सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित सर्व हल्लेखोरांच्या अटकेचे आदेश दिले होते. एकूण ४० हल्लेखोरांनी पबवर हल्ला केला होता.

मुंबई विद्यापीठातही ‘मनविसे’ची तोडफोड
मुंबई २७ जानेवारी / प्रतिनिधी

द्वितीय भाषेमध्ये सामाविष्ठ असलेले मराठी, हिंदी, गुजराती, जर्मन, फ्रेंच इत्यादी भाषाविषय परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक करण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाचे आज गंभीर पडसाद उमटले. हा निर्णय ताबडतोब रद्द करण्याची मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कुलसचिव कृ. व्यंकटरमणी यांच्या कार्यालयात घुसून मोठय़ा प्रमाणात तोडफोड केली. कार्यकर्त्यांच्या या हल्ल्यात व्यंकटरमणी यांच्या कार्यालयातील शोभची काच, टेबल, खूर्ची, फोन, दरवाजा, खिडक्या यांची नासधूस झाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर व समतावादी छात्रभारतीचे अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना अटक केली. द्वितीय भाषा ऐच्छिक करण्याचा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कला शाखेच्या अधिष्ठाता पार्वती व्यंकटेशन यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८