Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २८ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेस आक्रमक
मतांच्या निकषावर जास्त जागांवर दावा
मुंबई, २७ जानेवारी / खास प्रतिनिधी

 

गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणूक निकालांच्या आधारे काँग्रेस पक्ष हा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने जागावाटपासाठी नेमलेल्या समितीने घेतली आहे. गेल्या वेळी काँग्रेस २७ तर राष्ट्रवादी २१ जागा लढले होते. हेच संख्याबळ कायम ठेवताना काही जागांमध्ये आदलाबदल करण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे. एकूणच काँग्रेसची आक्रमक भूमिका लक्षात घेता दोन्ही काँग्रेसमध्ये जागावाटपाची चर्चा सरळ व सहज होणार नाही हेच यावरून स्पष्ट होते.
जागावाटपासाठी नेमलेल्या काँग्रेसच्या समितीची बैठक सोमवारी रात्री सह्य़ाद्री अतिथीगृहात पार पडली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग हे उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष ठाकरे व सचिव आशिष कुळकर्णी यांनी समितीला गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षांंमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या जागा, मतांचे प्रमाण व टक्केवारी याचे विस्तृत सादरीकरण केले. राष्ट्रवादीच्या वतीने राज्यात पक्षाची ताकद वाढल्याचा दावा करण्यात येत असला तरी महानगरपालिका, जिल्हा परिषदा व नगरपालिकांमध्ये सर्वाधिक जागा व मते काँग्रेसलाच मिळाल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे राष्ट्रवादीचा दावा चुकीचा असल्याचे सांगण्यात आले. नंदुरबार, धुळे, रावेर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, नांदेड, परभणी, औरंगाबाद, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम, उत्तर-मध्य, दक्षिण-मध्य, दक्षिण मुंबई, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, शिर्डी, लातूर, सोलापूर, सांगली या मतदारसंघांवर दावा करण्याचे काँग्रेसच्या समितीने निश्चित केले आहे. राष्ट्रवादीबरोबर पुढील आठवडय़ात जागावाटपाची चर्चा सुरू होईल तेव्हा उपरोक्त जागांवर दावा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीने मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावर दावा केला असला तरी काँग्रेसने ईशान्य मुंबई मतदारसंघ देण्याची तयारी दर्शविली आहे. उत्तर-पश्चिम व उत्तर-मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांचे म्हणणे आहे.