Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २८ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मंदीमुळे ७० हजार नोकऱ्यांवर गदा
‘मायक्रोसॉफ्ट’मधील भारतीय कर्मचारीही संकटात
शिकागो, २७ जानेवारी/पी.टी.आय.

 

अमेरिकेतील मंदीचा फास आणखी आवळला जात असून अमेरिका आणि युरोपातील सहा बडय़ा कंपन्यांनी ‘कॉस्ट कटिंग’चा भाग म्हणून आपल्या ७० हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा आज केली. या नोकरकपातीने गेल्यावर्षीपासून नोकरी गमावणाऱ्यांची संख्या आता २० लाखांवर गेली आहे.बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक यंत्रे बनविणारी ‘कॅटरपिलर’, औषध क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून ओळखली जाणारी ‘फायझर’, दूरसंचार क्षेत्रातील ‘स्प्रिंट नेक्स्टेल’, घरगुती उपकरणे तयार करणारी ‘होम डेपो’ यांचा त्या सहा कंपन्यांमध्ये समावेश आहे. या कंपन्यांनी आज एका दिवसात मोठय़ा प्रमाणावर नोकर कपातीची घोषणा केली. मंदीमुळे गेल्या संपूर्ण वर्षांत जगभरातील २० लाखांहून अधिक नोकऱ्यांमध्ये कपात करण्यात आली असून १९४५ नंतर झालेली ही सर्वात मोठी कपात मानली जात आहे.
कॅटरपिलरने आपल्या २० हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे जाहीर केले असून, सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वातावरणात तगून राहणे मोठे आव्हान असल्याचे, म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या अखेरच्या तिमाहीतच ही कंपनी १५ हजार कर्मचारी कमी करण्याच्या विचारात होती. आता ही कपात आणखी पाच हजारांनी वाढली आहे. फायझर आपल्या एकूण पाच उत्पादन केंद्रांमधील १० टक्के कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार असून या कंपनीमध्ये एकूण ८१, ९०० कर्मचारी काम करीत आहेत. ‘स्प्रिंट नेक्सेल’ कंपनी मार्चअखेपर्यंत ८ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.
दरम्यान, अमेरिकेतील प्रख्यात ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने पाच हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केल्यानंतर, नोकर कपात करताना केवळ परदेशी कर्मचाऱ्यांचा विचार केला जावा अशी मागणी अमेरिकेचे आयोवा येथील सिनेटर चक ग्रासली यांनी कंपनीकडे पत्राद्वारे केली. नोकरीवरून कमी करताना अमेरिकन नागरिकांऐवजी ‘एच-वन बी’ व्हिसावर आलेल्या नागरिकांचा प्रथम विचार केला जावा, असे ग्रासली यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. हा व्हिसा मिळवणाऱ्या भारतीय तंत्रज्ञांचा मायक्रोसॉफ्टमध्ये मोठय़ा प्रमाणावर समावेश असल्याने त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती निर्माण झाली आहे. ‘एच-वन बी’ व्हिसावर असणाऱ्या ३११७ परदेशी तंत्रज्ञांचा मायक्रोसॉफ्टमध्ये २००७ साली समावेश करण्यात आला होता. त्यात भारतीय तंत्रज्ञांचाही भरणा होता. आर्थिक मंदीच्या फटक्यामुळे अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी नोकर कपातीचा निर्णय घेतल्याने ‘एच-वन बी’ व्हिसावर आलेल्या कंत्राटी कामगारांचा पहिल्यांदा घरी पाठवले जावे, अशी मागणी होत आहे.