Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २८ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अमेरिका मुस्लिम राष्ट्रांच्या विरोधात नाही
वॉशिंग्टन, २७ जानेवारी/पी.टी.आय.

 

परस्परांबद्दल आदर आणि एकमेकांचे हित यावर आधारलेला नवा स्नेहभाव अमेरिका सर्व मुस्लिम जगताबरोबर निर्माण करू इच्छिते असे सांगतानाच अमेरिकेचे नवे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मुस्लिम जगताने अमेरिकेला आपले शत्रू राष्ट्र असे समजून चालू नये असे आवाहन नुकतेच केले. अध्यक्षपदाची धूरा स्वीकारल्यानंतर दुबई येथील अल-अरेबिया या टीव्ही वाहिनीला प्रथमच मुलाखत देताना अमेरिकेचा मुस्लिमांविषयी असलेला उदारमतवादी चेहरा दाखविण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ४७ वर्षीय ओबामा यांनी यावेळी आपल्या कार्यकालाच्या पहिल्या १०० दिवसांतच एखाद्या मुस्लिम राष्ट्राच्या राजधानीमधून मुस्लिम जगताशी संवाद साधण्याचा आपला इरादा असल्याचे स्पष्ट केले. हे मुस्लिम राष्ट्र अद्याप निश्चित झाले नसले तरी सीएनएन वाहिनीच्या मते ज्या इंडोनेशियामध्ये ओबामा यांनी बालपण घालविले आहे त्याच राष्ट्रामधून ओबामा आपला संवाद साधतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
माझ्या कुटुंबामध्ये मुस्लिम धर्मीय सदस्य आहेत. मुस्लिम देशांमध्ये मी स्वत: काही काळ राहिलो आहे. मला मुस्लिम जगताला या क्षणी एवढेच सांगायचे आहे की अमेरिकेला त्यांनी आपला मुख्य शत्रू असे समजून चालू नये, असे ते म्हणाले. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील प्रश्न सोडविण्याचा ठाम इरादा व्यक्त करणाऱ्या ओबामा यांनी हा काळ अमेरिकेने अटी लादण्याचा नसून इतरांचे म्हणणे ऐकून घेण्याचा आहे, असे म्हटले आहे. ओसामा बिन लादेन आणि आयमान अल जवाहिरी यांचे सर्व विचार आता मृतप्राय झाले आहेत. त्यांनी केलेल्या कार्यामुळे मुस्लिम राष्ट्रातील एखाद्या लहान मुलाला उत्तम शिक्षण वा उत्तम आरोग्याच्या संधी मिळाल्या आहेत, असे कोणीही म्हणू शकणार नाही. तुम्ही जे निर्माण करता त्यावर ओळखले जाता. तुम्ही जे काही नष्ट वा उद्ध्वस्त करता त्यावर ओळखले जात नाही. सध्या मुस्लिम जगताला आपण ज्या मार्गावरून चालत आहोत तो आपल्याला कुठेही घेऊन जाणार नाही याची जाणीव झाली आहे. या मार्गाने आणखी काही मृत्यू आणि हिंसाचार होईल असेच त्यांना सध्या वाटत आहे. शपथ घेतल्यानंतर आपण जे पहिले वहिले भाषण केले यात हाच मुद्दा प्रकर्षांने मांडला होता याकडेही ओबामा यांनी या मुलाखतीत अंगुलीनिर्देश केला.
दरम्यान, पाकिस्तानातील अल् कायदाच्या दहशतवाद्यांविरुद्ध अमेरिका क्षेपणास्त्र हल्ले चालूच ठेवणार असल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री रॉबर्ट गेटस् यांनी आज सांगितले.