Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

प्रादेशिक

‘व्हील टू हील’: विनोद पुनमिया यांची दिल्लीपर्यंतची अनोखी सायकल यात्रा
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

‘डेक्कन क्वीन’च्या वेगाशी यशस्वी स्पर्धा करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलपटू विनोद पुनमिया यांनी प्रजासत्ताकदिनी गेट-वे-ऑफ इंडिया येथून मुंबई ते दिल्लीदरम्यानच्या ‘व्हील टू हील’ या अनोख्या सायकल यात्रेला आरंभ केला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली म्हणून शांतता आणि एकात्मतेचा तसेच गांधीजींचा ऊर्जा संवर्धनाचा संदेश देशभर पोहोचविण्यासाठी पुनमिया यांची ही अनोखी सायकल यात्रा आहे.

राज्यातील ६७ टक्के गावांत दलितांच्या स्मशानभूमीचा वाद!
बंधुराज लोणे
मुंबई, २७ जानेवारी

राज्यातील अनेक गावांत स्मशानभूमीचा प्रश्नाने तीव्र स्वरूप धारण केले असून गेल्या काही वर्षांत या प्रश्नामुळे अनेक गावांत तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील किमान ६७ टक्के गावांत दलितांना स्मशानभूमीच नसल्याचे एका पाहणीत आढळून आले असून या प्रकरणी राज्य सरकारने ‘एक गाव-एक स्मशानभूमी’ असा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

जागतिक लोकसंख्येची मर्यादा केवळ दोन अब्ज!
अभिजित घोरपडे
मुंबई, २७ जानेवारी

जागतिक लोकसंख्या सहा अब्जांचा आकडा ओलांडून नऊ ते बारा अब्जांपर्यंत वाढत असली तरी शाश्वत विकास साधायचा असेल तर ही लोकसंख्या दोन अब्जांच्या पुढे असायला नको! ..ऑस्ट्रेलियाचे ख्यातनाम शास्त्रज्ञ आणि हवामानबदल विषयातील तज्ज्ञ प्रोफेसर टिम फ्लेनरी यांनी हे मत व्यक्त केले आहे. सध्याची लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसंपत्ती वापरण्याचा वेग पाहता लवकरच संसाधनांची भयंकर टंचाई उद्भवण्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला. फ्लेनरी सध्या भारतभेटीवर आहेत.

‘जेजेच्या डॉक्टरला सेंट जॉर्जेसमध्ये पाठविणे ही बदली नव्हे’
मुंबई, २७ जानेवारी/प्रतिनिधी

मुंबईतील जे.जे. आणि सेंट जॉर्जेस ही दोन्ही सरकारी रुग्णालये ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असल्याने एखाद्या डॉक्टरला जे.जे. रुग्णालयाऐवजी सेंट जॉर्जेस रुग्णालयात काम करण्यास सांगणे ही बदली ठरत नाही. असे स्थानांतरण हा कार्यालयीन सुविधेसाठी केलेला कामातील बदल आहे व त्यास बदल्यासंबंधीचा कायदा लागू होत नाही, असा निकाल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट)ने दिला आहे.

दुहेरी खुनाबद्दल झालेली जन्मठेप अपिलात रद्द
मुंबई, २७ जानेवारी/प्रतिनिधी

वरळी येथील ठाकरसी चाळीत राहणारी आशा अशोक दुबे ही गृहिणी व सन्नी या तिच्या १० महिन्यांच्या मुलाचा चाकूने भोसकून खून केल्याबद्दल शंकर पाटील या आरोपीस सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात रद्द केली असून शंकरची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली आहे.
आशा दुबे व त्यांच्या मुलाचा खून ९ मार्च १९९९ रोजी दुपारी त्यांच्या घरात झाला होता व त्याबद्दल दोषी ठरवून सत्र न्यायालयाने शंकर पाटील यास जन्मठेप ठोठावली होती.

आणखी २५ किलो हेरॉईन जप्त
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

जम्मू व काश्मीर कॅडरचा आयपीएस अधिकारी साजी मोहन याने दिलेल्या माहितीवरून राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नायगाव येथून आणखी २५ किलो हेरॉईन जप्त केले. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे ३९ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोनशे कोटी रुपयांच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘प्राइस वॉटरहाऊस कूपर’कडून विक्रीकर खात्याच्या संगणकीकरणाकडे दुर्लक्षच!
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

राज्यात मुल्याधारित कर म्हणजेच वॉट लागू झाल्यानंतर राज्यातील विक्रीकराची वसुली जोमाने व्हावी या एकमेव हेतुने ‘प्राईस वॉटरहाऊस कूपर’ या कंपनीची तेव्हा नियुक्ती करण्यात आली असली तरी या कंपनीने या खात्याचे संगणकीकरण करण्याचे जे मूळ कार्य करणे अपेक्षित होते ते आता चार वर्षे उलटल्यानंतरही केले नसल्याचे दिसून येत आहे.

नीतू मांडके यांच्या स्वप्नातील रूग्णालयाला रिलायन्सने दिला आकार
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी
प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नीतू मांडके यांनी पाहिलेल्या भव्य रूग्णालयाचे स्वप्न अनिल व टिना अंबानी यांच्या प्रयत्नाने अखेर सत्यात उतरले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी या रूग्णालयाचे मोठय़ा दिमाखात उद्घाटन झाले. ‘कोकीळाबेन धिरूबाई अंबानी’यांच्या नावाने हे रूग्णालय मंगळवारपासून खुले झाले आहे. रूग्णालयातील हृदयचिकित्सा विभागाला डॉ. नीतू मांडके यांचे नाव देण्यात आले आहे.

साळसकरांची एके-५६ रायफल का काढून घेण्यात आली?
स्मिता साळसकर यांचा संतप्त सवाल

मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या काही महिने आधीच माझे पती विजय साळसकर यांच्याकडील एके-५६ रायफल तडकाफडकी काढून का काढून घेण्यात आली, असा सवाल साळसकर यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांनी आज एका कार्यक्रमात उपस्थित केला.

माजी नगरसेवक रुस्तम तिरंदाज यांचे निधन
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

दादर येथील पारसी कॉलनीचे पालिकेत प्रतिनिधत्व करणारे माजी नगरसेवक रुस्तम तिरंदाज यांचे आज सकाळी निधन झाले. ते ६८वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे लढाऊ वृत्तीचा कार्यकर्ता हरपला या शब्दात अनेक पक्षांच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. आज सकाळी नेहमी प्रमाणे तिरंदाज दादर येथील इराणी हॉटेलात पाव आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी अनेक मित्रांशी गप्पा मारल्यानंतर ते घरी परतले आणि अचानक हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने खाली कोसळले. त्यांना तात्काळ त्यांच्या डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. तिरंदाज एक प्रामाणिक आणि धर्मनिरपेक्ष विचाराचे कार्यकर्ते म्हणून परिचित होते. पालिकेत ते १९७३ ते १९७८ या काळात जनसंघाच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर अनेकदा त्यांनी दादर येथील पारसी कॉलनीचे पालिकेत प्रतिनिधीत्व केले. पारसी पंचायतीवरही ते निवडून आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्थानिक खासदार एकनाथ गायकवाड, कामगारमंत्री नवाब मलिक, माजी नगरसेवक बाबूभाई भवानजी यांच्यासह अनेकांनी त्यांच्या पारसी कॉलनीतील निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

रॉय यांची नेमणूक; निकाल राखून ठेवला
मुंबई, २७ जानेवारी/प्रतिनिधी

राज्य सरकारने अनामी रॉय यांची पोलीस महासंचालकपदी केलेली नेमणूक सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश सिंग प्रकरणात ठरवून दिलेल्या निकषांवर वैध आहे की नाही याविषयीचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला. सर्वजीत सिंग विर्क या महाराष्ट्र कॅडरच्या सर्वात ज्येष्ठ ‘आयपीएस’ अधिकाऱ्याचा विचार न करता रॉय यांची नियुक्ती बेकायदा ठरवून केंद्रीय प्रशासकीय न्यायादिकरणाने गेल्या ऑक्टोबरमध्ये ती रद्द केली होती व विर्क, जीवन वीरकर आणि सुप्रकाश चक्रवर्ती या तीन सर्वाधिक सेवाज्येष्ठ अधिकाऱ्यांमधून महासंचालकांची नेमणूक महिनाभरात नव्याने करावी, असा आदेश दिला होता. याविरुद्ध रॉय व राज्य सरकार यांनी केलेल्या रिट याचिकांवरील गेले तीन महिने तुकडय़ा-तुकडय़ांनी झालेली सुनावणी आज मुख्य न्यायाधीश न्या. स्वतंत्र कुमार व न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे पूर्ण झाली. या याचिका दिवाळीच्या सुट्टीपूर्वी शेवटच्या दिवशी प्रथम सुनावणीसाठी आल्या होत्या त्यावेळी न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशामुळे रॉय गेले साडेतीन महिने महासंचालक पदावर कायम राहिले आहेत.

सेवायोजन कार्यालयाची जागा अल्पसंख्याक आयोगाला देण्याचा घाट
मुंबई, २७ जानेवारी/ खास प्रतिनिधी

नोकरी मिळो की न मिळो पंरतु लाखो बेरोजगारांचे आशास्थान असलेल्या चर्चगेट येथील सेवायोजन कार्यालयच आता पश्चिम उपनगरात हलविण्यात येणार असून सेवायोजन कार्यालयाची मोक्याची जागा अल्पसंख्याक आयोगाच्या कार्यालयासाठी देण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. भाजपने याला कडाडून विरोध केला असून प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे राज्य सरचिटणीस व आमदार विनोद तावडे यांनी दिला आहे.
हजारो बेरोजगार युवक दररोज नोकरीच्या आशेने सेवायोजन कार्यालयात नाव नोंदविण्यासाठी येत असतात. या सर्वासाठी चर्चगेट येथील सेवायोजन कार्यालय हे सोयीचे असतानाही हे कार्यालय पश्चिम उपनगरात हलविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे. तावडे यांच्या म्हणण्यानुसार ही जागा अल्पसंख्याक आयोगाला कार्यालयासाठी देण्यात येणार असून हा निर्णय लक्षावेधी बेरोजगारांवर अन्याय करणारा आहे. एकीकडे राज्यात नोकऱ्या नसल्यामुळे वर्षांनुवर्षे सेवायोजना कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स फारसे मिळत नाहीत. जवळपास ४० लाख बेरोजगारांची नावे या कार्यालयात नोंदविण्यात आली असून पूर्व उपनगरात अथवा शहरात राहणाऱ्यांसाठी पश्चिम उपनगरात कोठेतरी दूरवर जाणे, हे खर्चिक व त्रासदायक ठरणारे आहे. सेवायोजना आयुक्तालय हे नवी मुंबईत असून हे कार्यालय शहरात असावे, असा आमचा प्रयत्न असून हे कार्यालय उपनगरात हलविल्यास भाजप आंदोलन करील, असे तावडे यांनी सांगितले.

म्हाडा घरांच्या योजनेला ७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

सामान्यांना परवडतील अशी घरे असल्याचा दावा करीत म्हाडाने जारी केलेल्या तीन हजार ८६३ घरांच्या योजनेला आठवडाभर मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अर्ज विक्रीची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी तर अर्जस्वीकृतीची अंतिम तारीख ७ फेब्रुवारी २००९ अशी असणार आहे. पूर्वी ही मुदत अनुक्रमे ३० व ३१ जानेवारी अशी होती. आतापर्यंत सहा लाख ९१ हजार ७३९ अर्जांची विक्री झाली असून त्यापैकी एक लाख १६ हजार ४५२ अर्ज दाखल झाले आहेत, असे म्हाडाच्या प्रवक्त्या वैशाली संदानसिंग यांनी सांगितले.आज दिवसभरात १५ हजार ३३८ अर्जांची विक्री झाली तर ३४ हजार २२ अर्ज दाखल झाले. एचडीएफसी बँकेच्या २२ शाखांमध्ये अर्जस्वीकृतीसाठी चार काऊंटर उभारण्यात आली असली तरी अर्ज दाखल करणाऱ्यांच्या मोठय़ा रांगा दिसून येत होता. घर योजनेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहूनच मुदतवाढ करण्यात आल्याचे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी एच. के. जावळे यांनी सांगितले. कोणीही निराश होऊ नये वा ठराविक मुदतीत प्रचंड गर्दीमुळे अर्ज सादर करता आला नाही, अशी पाळी येऊ नये यासाठीच मुदतवाढ करण्यात आल्याचेही जावळे यांनी स्पष्ट केले. संपूर्ण पारदर्शक पद्धतीने या घरांसाठी सोडत काढली जाईल. लोकांनी दलालांकडे जाऊन स्वत:ची फसगत करून घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

संजय राऊत यांना अटक आणि सुटका
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

सहार येथील ‘हॉटेल इंटरकॉन्टिनेन्टल’ या पंचतारांकित हॉटेलवर भारतीय कामगार सेनेच्या सुमारे ४०० कार्यकर्त्यांसह हल्लाबोल करून त्यांच्याकरवी हॉटेलची लॉबी आणि किचनची तोडफोड केल्याचा आरोप ठेवून खासदार संजय राऊत यांना आज सहार पोलिसांनी सकाळी अटक केली. त्यानंतर दुपारी अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांनी राऊत यांची पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. भाकासेचे पदाधिकारी आणि सदस्य असल्याच्या कारणास्तव इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलच्या व्यवस्थापनाने २५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. तसेच अनेक बैठकांनंतरही त्यांना कामावर घेण्यास नकार दिला होता. व्यवस्थापनाच्या या भूमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली कामगार सेनेच्या सुमारे ४०० कार्यकर्त्यांनी २१ जानेवारी रोजी इंटरकॉन्टिनेन्टलवर मोर्चा नेला. सुरूवातीला त्यांनी हॉटेलसमोर तीव्र निदर्शने केली व काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याची मागणी केली. मात्र व्यवस्थापनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने निदर्शनाला हिंसक वळण मिळून संतप्त कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले व त्यांनी तोडफोड केली होती.

ठाण्यात सराफाला लुटण्याचा प्रयत्न; गोळीबार
ठाणे, २७ जानेवारी/प्रतिनिधी

कोपरीतील सिद्धार्थ टॉवरमधील एम. के. जैन सराफाचे दुकान बंद करून घरी निघालेल्या केवल रमाणी यांना सशस्त्र इसमांनी लुटण्याचा प्रयत्न केला. दोघा रिक्षा चालकांनी लुटारूंना पकडण्याचा प्रयत्न केला. लुटारूंनी केलेल्या गोळीबारात एकजण जखमी झाला. दोघे लुटारू पळून गेले तर एकाला रिक्षाचालकांनी पकडले.

मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

तांत्रिक बिघाडामुळे रावळी जंक्शन येथे रात्री साडेआठच्या सुमारास मालगाडी बंद पडल्याने मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा बोऱ्या उडाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. इंजिनमधील ‘एअर प्रेशर डाऊन’ झाल्याने सदर मालगाडी नादुरुस्त झाली होती. तिला रुळांवरून हटविण्यात सुमारे पाऊण तासांचा अवधी गेला. तोपर्यंत हार्बर मार्गावरील वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला होता. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरू झाली.

ऋतिकच्या मनगटाला किरकोळ जखम
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

अभिनेता ऋतिक रोशन याच्या मनगटाला काच लागून तो आज किरकोळ जखमी झाला. अंधेरी येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्याच्या जखमेवर औषधोपचार करून त्याला घरीपाठविण्यात आले. एका चित्रपटाच्या चित्रिकरण प्रसंगी त्याच्या मनगटात काचा घुसल्याने तो जखमी झाला. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फिल्मीस्तान स्टुडिओत ‘काईट्स’ या चित्रपटाच्या चित्रिकरण प्रसंगी एकासाहस दृश्याचे चित्रिकरण सुरू असताना हा प्रकार घडला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यापूर्वीही ‘धूम-२’ आणि ‘क्रिश’या चित्रपटाच्या चित्रिकरण प्रसंगी ऋतिकच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

भरती प्रकरणात मुंबई विद्यापीठ दोषी
चौकशी अहवाल सादर
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक, व्याख्याते व प्र-पाठक या पदांच्या भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. भरती प्रक्रियेत विद्यापीठ दोषी असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या प्रकरणी अपर्णा लांजेवार, डॉली सनी, सुधा श्रीवास्तव व रेणू मोदी या चार महिलांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती. हितसंबंधी उमेदवारांची वर्णी लावण्यासाठी विद्यापीठातील एका गटाने नियमबाह्य कृती केल्याची तसेच भरती प्रक्रियेत असभ्य प्रकार घडल्याची गंभीर तक्रार या चार महिलांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी आठवडापूर्वी बैठक घेतली होती. या बैठकीत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची दोन्हीही मंत्र्यांनी खरडपट्टी काढली होती. एवढेच नव्हे, तर उपसचिव अरविंद चौधरी यांना निप:क्ष व पारदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याचेही फर्मावले होते. त्यानुसार चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने हा अहवाल सादर केला आहे.

राष्ट्रपती शौर्यपदकाचे मानकरी
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

राष्ट्रपती शौर्यपदक पदक विजेते- प्रकाश मोरे, बापूराव धुरगुडे, बळवंत भोसले, विजय खांडेकर, जयवंत पाटील, योगेश पाटील, राहुल शिंदे, सदानंद दाते, हेमंत बावधनकर, संजय गोविलकर, भास्कर कदम, अरूण जाधव. पोलीस पदके- इसाक बागवान, विनायक वैताळ, योगेंद्र पाचे, सर्जेराव पवार, अशोक शेळके, विक्रम निकम, शिवाजी कोल्हे, चंद्रकांत चव्हाण, विजय आव्हाड, मंगेश नाईक, संतोष चंदवणकर, सुनील सोहोनी, संजय पाटील, चंद्रकांत कांबळे, रमेश माने, समाधान मोरे, महेंद्र दरेकर, संदीप तळेकर, सचिन राणे, मंगेश चव्हाण आणि अमित तिवारी.

अपघातात बस चालकाचा मृत्यू
मुंबई, २७ जानेवारी / प्रतिनिधी

शीव-चुनाभट्टी मार्गावरील एव्हारार्ड बस थांब्यावर उभ्या असलेल्या बेस्ट बस चालकाला भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलस्वाराने धडक देऊन झालेल्या अपघातात बस चालक जागीच ठार झाला. यशवंत लेंभे (३५) असे या बेस्ट बस चालकाचे नाव असून तो प्रतीक्षा नगर बस आगारात कार्यरत होता. सोमवारी दुपारी लेंभे एव्हरार्ड बस थांब्यावर उभे असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलस्वाराने त्याला जोरदार धडक दिली.