Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

अश्वशर्यतींचा हंगाम चार महिने विलंबाने
प्रतिनिधी

‘इक्विन इन्फ्लुएंझा’ हा आजार सर्वसामान्यांना माहिती असण्याचे काहीच कारण नाही. पण याच आजारामुळे गेले चार महिने महालक्ष्मी रेसकोर्सचा परिसर सुनासुना झाला होता. ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास पुण्यातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआरटीसी) तबेल्यातील सुमारे एक हजार घोडय़ांना या संसर्गजन्य रोगाने ग्रासले. त्याचा परिणाम मुंबईतील शर्यतींवर झाला. आता मात्र बहुतेक घोडे या आजारातून बरे झाले असून गेले जवळपास चार महिने लगाम बसलेल्या मुंबईतील घोडय़ांच्या शर्यती येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होत आहेत.

‘जादा पैसे द्या आणि म्हाडाची घरे घ्या’
दलालांकडून घरांची हमखास खात्री
प्रतिनिधी
दलालांपासून सावध रहा वा दलालांशी केलेल्या व्यवहाराला म्हाडा जबाबदार असणार नाही, दलालांना पकडून द्या असे म्हाडाकडून वारंवार जाहीर केले जात असले तरी दलालांनी आपली मोर्चेबांधणी सोडलेली नाही. वर्सोव्यात लोखंडवाला संकुलात घर हवे असल्यास १५ लाख तर उर्वरित घरांसाठी दोन ते सात लाख रुपये दिल्यास हमखास घर मिळवून देण्याची ग्वाही दलालमंडळी देत आहेत. मुंबईत ४२ ठिकाणी असलेल्या तीन हजार ८६३ घरांसाठी ‘न भूतो, न भविष्यती’ असा प्रतिसाद लाभला आहे.

समस्या प्राणिमित्र, पालिका आणि भटक्या कुत्र्यांची!
कुत्रा हा कितीही इमानी प्राणी असला तरी मुंबईकरांनी त्याचा धसका घेतलेला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी मुंबईकरांमध्ये दहशत निर्माण केली आहे. रात्री-अपरात्री रस्त्यावरून जाताना अंगावर भुंकणाऱ्या आणि कधी कधी हल्लाही करणाऱ्या या भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याशिवाय पर्याय नाही, अशी मुंबईकरांची खात्री झाली आहे. परंतु काही प्राणीमित्रांमुळे या भटक्या कुत्र्यांना अभय मिळालेले आहे. आजघडीला मुंबईत ७४,९२६ भटके कुत्रे मुंबईत वावरत आहेत.

जागा खाली करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांचा संस्थेवर दबाव
संस्थेची पोलिसांत तक्रार

प्रतिनिधी : गोरेगाव येथील पालिकेच्या सिद्धार्थ इस्पितळाच्या इमारतीमधील सन्मित्र ट्रस्ट या संस्थेचे कार्यालय रिक्त करावे म्हणून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर गजभिये यांनी काही शिवसैनिकांसह संस्थेच्या कार्यालयात येऊन पदाधिकाऱ्यांना धमकाविल्याची तक्रार या ट्रस्टने पोलिसात केली आहे. ही घटना २१ जानेवारी रोजी घडली. विशेष म्हणजे या संस्थेने या जागेबाबत पालिका आयुक्तांकडे दाद मागितली असून आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. असे असतानाही अतिरिक्त आयुक्त जागा रिक्त करण्यासाठी दबाव टाकत आहेत, असे या संस्थेच्या प्रमुख प्रभा देसाई यांचा आरोप आहे.

धनगर समाजाच्या एकजुटीसाठी मधू शिंदे यांची चळवळ
प्रतिनिधी : निवृत्त पोलीस अधिकारी मधू शिंदे यांनी आता धनगर समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक व राजकीय चळवळ उभी करण्याचा संकल्प केला आहे. राज्यात तब्बल दीड कोटी लोकसंख्या (पंधरा टक्के) असलेला धनगर समाज सामाजिक, आर्थिक व राजकीयदृष्टय़ा मागासलेला आहे. अनेक समस्यांच्या पेचात अडकलेल्या या समाजाच्या उत्थानासाठी आपण उर्वरीत आयुष्य समर्पित करणार असल्याचा निर्धार शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.

बुधवारपासून ‘घराणा फेस्टिव्हल २००९’
शास्त्रीय संगीतातील घराण्यांची आगळी मेजवानी

प्रतिनिधी : ज्या घराणा पद्धतीवर भारतीय शास्त्रीय संगीताची मेढ उभी राहिली ती परंपराच आज क्षीण होते की काय, अशी परिस्थिती आहे. आजही या घराणा आणि गुरू-शिष्य परंपरेतील अनेक मान्यवर गुरू आणि त्यांचे शिष्य यांचा दरारा शास्त्रीय संगीतात कायम आहे.

अंध कलाकारांनी गाजविले गाणे प्रकाशाचे!
प्रतिनिधी : टिंबाची जादूई भाषा, त्यातून निर्माण होणारे ६३ वेगवेगळे आकार आणि हे आकार सामावून घेतात जगभरातील सर्व भाषांना..ही जादू आहे ब्रेल लिपिची..ही जादू अनेक ठिकाणी सध्या अंध कलाकार सादर करीत आहेत. उत्तरा मोने यांच्या मिती क्रियशन या संस्थेने गाणे प्रकाशाचे हा कार्यक्रम तयार केला आहे. नुकताच हा कार्यक्रम राज्य सरकारच्या संप्तरंग या कार्यक्रम मालिकेत सादर करण्यात आला. त्यावेळी रसिकांनी याला चांगलाच प्रतिसाद दिला. ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या द्विजन्मशताब्दी समारोपानिमित्त हा कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. गाणी आणि नृत्य या माध्यमातून अंध विद्यार्थी आपली कला सादर करतात. मिती क्रिएशनच्या वतीने या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आलेली आहे. माजी नगरसेवक पराग अळवणी यांनीही १० हजार रुपये मदत दिली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी जमलेल्या प्रेक्षकांनीही या मुलांना मदत दिली. मदत म्हणून जमलेले १३ हजार ८०० रुपयांपैकी काही निधी दादर येथील कमला मेहता अंध विद्यालयाला देण्यात येणार आहे तर काही निधी या कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यामुळे गाणे प्रकाशाचे
ही संकल्पना केवळ सांस्कृतिक कार्यक्रमापुरतीच मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीचा एक भाग बनली आहे, अशी प्रतिक्रिया मोने यांनी व्यक्त केली. यावेळी अंध मुलांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात करिअर फेअर
प्रतिनिधी : बदलत्या जागतिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेकविध संधींची ओळख करून देण्याच्या उद्देशाने वाशी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने (मॉडर्न महाविद्यालय) नवी मुंबईत ३० व ३१ जानेवारीला प्रथमच करिअर फेअर २००९ चे आयोजन केल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरूंगले यांनी सांगितले. करिअर फेअरमध्ये तब्बल ३५ ते ४० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, पॅरा-मेडिकल, एमबीए, हॉस्पीटॅलिटी, अ‍ॅनिमेशन, अ‍ॅव्हिएशन, स्पर्धा परीक्षा, क्लिनिकल रिसर्च यांसारख्या अभ्यासक्रमांची माहिती या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळू शकेल. शैलजा आंबेकर (अ‍ॅव्हिएशन), शैलजा मुळे (व्यावसायिक शिक्षणातील नवीन क्षितीजे), बी. पी. सहानी (हॉस्पीटॅलिटी आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील संधी), दीपा देसाई (परदेशी शिक्षण) या मान्यवरांची यावेळी व्याख्याने होणार आहेत. करिअरविषयक विविध पुस्तकेही यावेळी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. येत्या ३० व ३१ जानेवारी रोजी हे करिअर फेअर होणार आहे. ३० जानेवारीला सकाळी ८.३० वाजता दूरदर्शनचे वृत्तनिवदेक नितीन सप्रे यांच्या हस्ते करिअर फेअरचे उद्घाटन होणार आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिल पाटील, विक्रीकर उपायुक्त राजेंद्र कुऱ्हाडे आदी उपस्थित राहणार आहेत. स. १० ते सायं. ६ या वेळेत करिअर फेअर सर्वासाठी खुले असेल. अधिक माहितीसाठी डॉ. दीपक ठाकरे यांच्याशी ९८६९५३६६६० यावर संपर्क साधावा.

व्हीजेटीआयमध्ये जिजाबाई जयंती साजरी
प्रतिनिधी : वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूटमध्ये (व्हीजेटीआय) नुकतीच जिजाबाईंची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ‘वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान दिना’चे आयोजन करण्यात आले होते. मुंबई आयआयटीचे संचालक डॉ. देवांग खखर यावेळी उपस्थित होते. जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण बदल होत असल्यामुळे निरंतर संशोधनावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी संशोधन करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांना प्रोत्साहन द्यायला हवे, असे प्रतिपादन डॉ. खखर यांनी यावेळी केले. शिवाजी महारांजांना घडविणाऱ्या जिजाबाईंचे नाव असलेली ही संस्था खरोखर नावाप्रमाणेच चांगल्या व्यक्ती घडविण्याचे काम करीत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. संस्थेचे संचालक के. जी. नारायणखेडकर म्हणाले की, जिजाबाईंनी जसे शिवबांना थोर मराठा राज्यकर्ता बनविले तसेच व्हीजेटीआयनेही थोर माणसे घडविली आहेत. यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रसिद्ध केलेल्या व्हीजेटीआयमथील शिक्षकांना गौरविण्यात आले. एस. जी. वाव्हळ, एस. पी. बोरकर, के. के. सांगळे, एच. ए. मंगळवेढेकर, एन. एम. सिंग, प्रा. जयलक्ष्मी चांदले, एस. वाय. म्हस्के या सात प्राध्यापकांचा गौरवमूर्तीमध्ये समावेश आहे.