Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

नवनीत

हिं दू जीवनदर्शनात प्रजेला असाधारण स्थान आहे. प्रजा म्हणजे लोक, हा स्थूल अर्थ झाला. पण विशिष्ट जाणिवांचा विधायक समूह म्हणजे ‘प्रजा’ होय. केवळ माणसांचा समूह एकत्र आला की ती प्रजा होत नाही. समूहाला सार्थ भान असते. भानातून विधायक शक्ती जन्मते. या शक्तींना चांगल्या विविध वाटा समूह निर्माण करतो. असा समूह गुरू असतो. तो आत्मोन्नतीची साधने चोखाळतो. यातून स्वदेश,

 

स्वधर्म, स्वभाव, स्वाभिमान असे साधनचतुष्टय निर्माण होते. विधायक देवाणघेवाणीतून एकमेकांविषयी आपलेपणा येतो. समूहाचा विकास साधणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीला सांभाळण्यात त्याला स्वारस्य असते. पर्यावरणाचा ऱ्हास त्याच्या हातून हेतूत: होत नाही. तो निसर्गाला पालक मानतो. शेजाऱ्याला सुह्रद समजतो. सामाजिक व्यवहाराचे यथार्थ भान या आसपासच्या भानातून सहज येते. या साऱ्यातून तो समूह एकात्म होतो. एकोप्याच्या जाणिवेतून प्रजासत्ताक राष्ट्र जन्माला येते. सामाजिक सक्तीतून वा विशिष्ट समूह तोडून प्रजासत्ताक निर्माण होत नाही. सामाजिक जाणिवेतून ते जन्मते. ‘समानी व आकुति:। समाना ह्रद्यानि व:। समानमस्तु वो मनो। यथा व: सुसहाति’ (आम्ही सारे विचारासह समान आहोत, ह्रद्य व मन एक होऊन सर्व कार्यात सुसंघटितपणा येवो) ही वेदातली ऋचा या अर्थाने मोलाची आहे. ही जाणीव प्रजासत्ताकाच्या मुळाशी असायला हवी. शपथा घेऊन हे होत नाही. शपथा वाऱ्यावर विरतात. प्रतिज्ञा फोटोमध्ये वाळवी होतात. समाजाच्या मुळाशी अभंग असणारी एकात्मता मोलाची आहे. ‘आत्मा एक आहे’ ही हिंदू धर्मातली आज्ञा आहे. ती ऋषीमुनींनी आचरली. हवा, पाणी, अन्न यांच्याइतकी ती मूलभूत आहे. नेता हा प्रजेचा सेवक आहे, माणसांना तुडवणारा साहेब नाही. प्रभू श्रीराम स्वत:ला अयोध्येचे सेवक समजत. ‘वेळ आल्यास प्रजेसाठी मी घरादाराचा त्याग करीन’ हे श्रीरामांचे उद्गार महत्त्वाचे आहेत.
‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ हे संत तुकारामांचे उद्गार प्रजेच्या वर्मावर बोट ठेवतात. प्रत्यकातले किमान कौशल्य समाजाच्या अभिवृध्दीस उपकारक ठरले पाहिजे, या उद्देशाने प्रवृत्त झालेला समाज प्रजासत्ताक असतो. प्रजेचे सार्वभौमत्व प्रजेच्या सकारात्मक जाणतेपणातून व्यक्त होते. त्यामुळे पाणी तंटा, सीमा प्रश्न, जाती मोर्चे, सवलतींचे स्फोट, इत्यादी निर्माण होत नाहीत. जणिवा पुढे नेणाऱ्या समाजाला ‘प्रजासत्ताक’ म्हणतात. अशा समाजाला मताचे मूल्या कळते, तो ते सांभाळून साऱ्यांना बरोबर घेऊन जातो.
यशवंत पाठक

ताऱ्यांचे रंग त्यांच्या तापमानावर अवलंबून असतात. त्याचप्रमाणे ग्रहांचे रंग हेसुध्दा
ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान दर्शवतात का?

ताऱ्यांप्रमाणे ग्रहांचे रंग ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान दर्शवत नाहीत. तारे व ग्रह यातील मूलभूत
फरक म्हणजे तारे ऊर्जा निर्माण करतात, तर ग्रह त्याच्या पितृताऱ्याची उर्जा परावर्तित करतात.
बुध, पृथ्वी व मंगळ वगळता इतर ग्रहांचे रंग त्यांच्या फक्त वातावरणातील घटकांवर अवलंबून
आहेत. पृथ्वी व मंगळ यांचे वातावरण दृश्य प्रकाशाला पारदर्शक असल्याने या दोन ग्रहांचा रंग
वातावरणातील बाष्प, बर्फ आणि इतर घटकांबरोबर त्यांच्या पृष्ठभागाच्या स्वरुपावरही अवलंबून
आहे. मंगळाचा लाल रंग प्रामुख्याने मंगळाच्या पृष्ठभागावरील लोहाच्या, ऑक्साईडच्या विपुलतेमुळे
येतो. पृथ्वीच्या वातावरणातील नायट्रोजन व प्राणवायू हे वायू सूर्यप्रकाशातील निळा प्रकाश अधिक प्रमाणात विखरित असल्यामुळे पृथ्वी अंतराळातून नीळसर दिसते.
शुक्राचा पिवळसर पण अतितेजस्वी रंग हा शुक्राच्या अत्यंत घनदाट वातावरणामुळे व मुख्यत:
या वातावरणातील सल्फ्युरिक आम्लकणांमुळे येतो. हे कणपदार्थ शुक्रावर येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा
६५ टक्के भाग परावर्तित करतात. गुरू व शनी या वायुरूप ग्रहांच्या वातावरणातील अमोनिया व
तत्सम संयुगांमुळे तेथे वैशिष्टय़पूर्ण रंगसंगती दिसते. तसेच हे ग्रह स्वत:भोवती अत्यंत वेगाने भ्रमण
करत असल्याने, छोटय़ा-मोठय़ा स्वरुपाची अनेक वादळे तिथे उठतात. वादळांमुळे या ग्रहांवर
अत्यंत सुंदर पट्टे निर्माण झालेले दिसतात. युरेनेस आणि नेपच्युनाचा निळसर रंग हा तिथल्या
वातावरणातील मिथेनमुळे येतो. ग्रहांच्या विलोभनीय रंगांमुळे, दुर्बिणीतून ग्रह बघताना आपण हरखून
जातो. पण त्यामागील कारणमीमांसादेखील तेवढीच विलोभनीय व गंमतशीर आहे. रसायनशस्त्रात
रस असणाऱ्यांकरीता हा विषय औत्सुक्यपूर्ण ठरतो.
अभय देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

अवकाश उड्डाणाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी नासाने ठरवलेला दिवस होता २५ जानेवारी
१९८६.. सात अंतराळवीरांना घेऊन चॅलेंजर त्यादिवशी उड्डाण करणार होते, पण खराब
हवामानामुळे तारीख पुढे ढकलावी लागली होती.. शेवटी २८ तारीख ठरली. फ्रॅन्सिस स्कोबी,
मायकेल स्मिथ, एलिसन ओनिझका, ज्युडिथ रेन्सिन, रोनाल्ड मॅकनायर, ग्रेगरी जाव्‍‌र्हिस आणि ख्रिस्ता
मॅक औलिफ हे सात जण सहभागी झाले.. २८ जानेवारीला सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी चॅलेंजर
अवकाशात झेपावले, पण क्षणार्धात कानठळ्या बसवणारा प्रचंड आवाज झाला, चॅलेंजर अ‍ॅटलांटिक
महासागरात कोसळले आणि सातही अंतराळवीर क्षणात ठार झाले.. रीगन यांनी ही राष्ट्रीय आपत्ती
असल्याचे म्हटले आणि नासाची सारी उड्डाणे तपभर लांबली.
संजय शा. वझरेकर

केस विंचरताना नंदनची नजर भिंतीवरच्या घडय़ाळाकडे गेली. शेखर यायची वेळ झालीच होती.
सुट्टीचा दिवस असल्यामुळे टेकडीपाशी सायकलसाठी नुकत्याच झालेल्या गोलाकार रस्त्यावर
सायकली घेऊन जायचं दोघांनी ठरवलं होतं. गेटपाशी ओळखीची घंटा वाजली. शेखर एक
पाय जमिनीवर टेकवून ऐटीत सायकलवर बसला होता. ‘‘माझी नवी सायकल. काल माझ्या
वाढदिवसाला बाबांनी घेतली,’’ शेखरने सांगितलं. ती चकचकीत ऐटदार सायकल नंदन डोळे
विस्फारून पाहत राहिला,‘‘फारच भारी आहे दोस्ता तुझी सायकल..’’ तो पुढे काही म्हणायच्या
आत आई घाईने बाहेर येऊन म्हणाली,‘‘नंदन, शेखरच्या आईचा फोन होता. आणखी एका तासाने
त्याला डॉक्टरांकडे यायला सांगितलंय.’’
दोघे टेकडीच्या सायकल रस्त्यावर पोचले. शेखरची सायकल फरच मस्त पळत होती. शिवाय
तिला गिअरसुध्दा होते. सायकल चालवताना शेखरला काहीच श्रम होत नव्हते. नंदनला स्वत:च्या
खटारा सायकलची लाज वाटायला लागली. ती सायकल चालवण्यातला सगळा उत्साहच गेला
त्याचा. शेखर मात्र मस्त चकरा मारत होता. तेवढय़ात त्याची आई फाटकातून आत आली, हाक
मारून म्हणाली,‘‘शेखर, चल डॉक्टरांकडे. तुला यायचंय ना?’’
‘‘ए शेखर, तू परत येईपर्यंत मी चालवू तुझी सायकल?’’ नंदननं विचारलं. ‘‘जपून चालवशील
ना? बघ हं नाहीतर.’’ शेखरनं बजावलं आणि तो आईबरोबर गेला. सुंदर निळ्याशार सायकलवर
नंदन घंटी वाजवत चकरा मारू लागला. बाजूच्या पोरांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने सायकलवर
कसरतीही केल्या . . .आणि धाडकन् सायकल थेट फाटकावर वेगात जाऊन आदळली. पोरं हसू
लागली. नंदन गोरामोरा झाला. अंगावरची माती झटकत तो उठला. सायकल धापा टाकत पडली
होती. चाक फिरत होतं. नळावर पोचा आला होता. नंदन घाबरला. सायकल उभी करून तो
स्वत:च्या सायकलवरून पडल्या चेहऱ्याने फे ऱ्या मारू लागला. थोडय़ा वेळाने शेखर परतला. सायकलची अवस्था बघून तो किंचाळला,‘‘अरे काय झालं सायकलला?’’ नंदनने उत्तर दिलं नाही. त्याचा दंड पकडून पुन्हा विचारल्यावर तो म्हणाला,‘‘काही दांडग्या टारगट पोरांनी हा उद्योग केला आणि ते पळून गेले.’’ नंदन खोटं बोलतोय हे शेखरला कळलं. आपला मित्र आपल्याशी असं खोटं वागतोय याचं त्याला वाईट वाटलं. नंदनशी काही न बोलता दु:खी मनाने तो सायकल घेऊन निघाला. मैत्री तुटली आणि सायकलही खराब झाली म्हणून शेखर फार उदास झाला. दुसऱ्याची वस्तू आपण हलगर्जीपणाने वापरतो. आपल्या वस्तूची जेवढी काळजी घेतो तेवढीच दुसऱ्याच्या वस्तूची घ्यायला हवी. आजचा संकल्प- इतरांच्या वस्तू वापरताना मी काळजी घेईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com