Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

मंदीच्या काळातही महापालिका मुख्यालयाची कोटींची उड्डाणे!
जयेश सामंत

ठाणे-बेलापूर रस्त्याच्या वादग्रस्त कंत्राटदारास तब्बल ५२ कोटी रुपयांची वाढीव रकमेची खिरापत वाटण्याचा धक्कादायक प्रस्ताव तयार करून सर्वानाच तोंडात बोटे घालावयास लावणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता आपल्या मुख्यालयाच्या कामासाठी तब्बल १२३ कोटी रुपयांच्या अव्वाच्या सव्वा दराने आलेल्या एका कंत्राटास हिरवा कंदील दाखविण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. ‘पामबीच’ मार्गास बेलापूरच्या बाजूस लागूनच असलेल्या एका मोठय़ा भूखंडावर हे मुख्यालय उभारण्यात येणार आहे. या बांधकामासाठी सुमारे ७४ कोटी रुपयांची अंदाजित रक्कम अभियांत्रिकी विभागाने ठरविली होती, मात्र निविदाप्रक्रियेनंतर तब्बल ६४ टक्के जादा दराने आलेले हे कंत्राट स्थायी समितीपुढे रेटण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर यामुळे नवे वादंग निर्माण होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

पालकमंत्र्यांचे पुन्हा एकदा ‘करवाढ मुक्त’ नवी मुंबईचे कार्ड
नवी मुंबई/प्रतिनिधी

नवी मुंबईकरांच्या कोणत्याही करात पुढील २५ वर्षे वाढ होऊ नये, अशी आपली इच्छा असून यासाठी आपण यापुढेही सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी घोषणा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी तुर्भे येथे केली. साधारण साडेतीन वर्षांंपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत करवाढ मुक्त महापालिकेच्या अजेंडय़ावर नाईक यांनी एकहाती सत्ता आणली होती. लोकसभा- विधानसभा निवडणुकांना काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना या घोषणेचा पुनरुच्चार करीत नाईक यांनी एकप्रकारे निवडणुकांचे रणशिंग फुंकल्याचे जाणकारांचे मत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुर्भे परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमानिमित्ताने गणेश नाईक यांनी ही घोषणा केली. देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची दिल्ली असो वा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुंबई असो, या दोन्ही महानगरांना आजही पुरेसा पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईच्या बहुतेक उपनगरांमध्ये २४ तास पाणीपुरवठा सुरू करून आम्ही मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले. साधारण तीन-साडेतीन वर्षांंपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत नाईक यांनी पुढील २० वर्षे नवी मुंबईकरांवर कोणत्याही स्वरूपाची करवाढ लादणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र निवडणूक आयोगाने नाईक यांच्या या घोषणेवर हरकत घेताच २० वर्षांंऐवजी त्यांनी पाच वर्षे करवाढ लादणार नाही, अशी घोषणा केली.
नाईक यांच्या या घोषणेस नवी मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास नवी मुंबईत एकहाती सत्ता दिली. या पाश्र्वभूमीवर लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत नाईक यांनी आपल्या जुन्याच घोषणेचा पुनरुच्चार करीत पुढील २५ वर्षे नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादणार नसल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबईतील झोपडपट्टी भागातील नाईक यांचे ‘ट्रम कार्ड’ म्हणून ओळखले जाणाऱ्या सुरेश कुलकर्णी यांच्या प्रभागातील कार्यक्रमात नाईक यांच्या हस्ते स्थानिक महिलांना ५८ शिलाई मशिन, ३० पापड मशिन, १४ घरघंटय़ांचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे शाखाप्रमुखांच्या मेळाव्यास मिळालेल्या तुफान प्रतिसादाच्या पाश्र्वभूमीवर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास तुर्भे भागातील झोपडपट्टीवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी नाईक यांनी या भागातील महिला बचत गटांना १० लाखांचा धनादेश सुपूर्द केला.

उरणच्या आगरी-कोळी महोत्सवात मुग्धा वैशंपायन हजेरी लावणार
उरण/वार्ताहर

उरण येथे तीन दिवसांचे आगरी- कोळी- कराडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाप्रसंगी सारेगम लिटिल चॅम्प व लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन उपस्थित राहणार असल्याची माहिती महोत्सव कमिटीचे आयोजक जे. डी. जोशी यांनी दिली.
आगरी- कोळी महोत्सवाचे लोण आता उरणपर्यंत पोहोचले आहेत. आगरी, कोळी, कराडी महोत्सव कमिटीने रायगड जिल्हा ओबीसी सेलच्या माध्यमातून ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान या महोत्सवाचे आयोजन केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणातून आगरी- कोळी- कराडी संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्याच्या हेतूने हा महोत्सव उरण येथील वीर सावरकर मैदानात आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी बालानृत्य, कोळीनृत्य, माळी नाच, भजन स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक लोकनृत्य, गोंधळ, जागर आदी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे. यावेळी खाद्यपदार्थाचे ५० स्टॉल लावण्यात येणार आहेत. या स्टॉलवर आगरी- कोळी- कराडी समाजातील चवदार खाद्यपदार्थ ठेवण्यात येणार आहेत. या महोत्सवात आगरी- कोळी- कराडी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविले जाणार असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करू इच्छिणाऱ्या हौसी कलाकारांनी आगरी- कोळी- कराडी महोत्सव कमिटीकडे नावे नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.