Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

धुळे पालिका स्थायी समिती निवडणुकीच्या मोर्चेबांधणीस वेग
वार्ताहर / धुळे

महापालिका स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या निवडीसाठी ३१ जानेवारी रोजी विशेष महासभा घेण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समिती सदस्यांसह महासभेत पाच स्वीकृत सदस्यांचीही निवड करण्यात येणार असल्याने १६ सदस्यांमध्ये कोणाची निवड होईल आणि नवे पाच स्वीकृत सदस्य कोण असतील, या बद्दलची उत्सुकता वाढली आहे. माजी नगरसेवकांनी स्वीकृत सदस्यांच्या हालचालींना वेग दिला आहे.

‘इंडस्ट्रीयल एक्झीबिशन’ की ‘फन फेअर’?
‘निमा इंडेक्स’वर प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी / नाशिक
स्थानिक उद्योजकांची प्रमुख संघटना असलेल्या नाशिक इंडस्ट्रीज् अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) तर्फे आयोजित ‘निमा इंडेक्स’ प्रदर्शनाला यावेळी तीन दिवस आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे नाशिककरांची मोठी उपस्थिती लाभली असली तरी यंदाच्या प्रदर्शनात नेहमीच्या मोठय़ा ‘मॅन्युफॅक्चर्स’ ऐवजी ‘ट्रेडर्स’ची संख्या मोठी असल्याने व प्रदर्शनातील खान-पान सेवेचीच चर्चा अधिक रंगल्याने हे ‘इंडस्ट्रीयल एक्झीबिशन’ की ‘फन फेअर’ असा सवाल उद्योजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

धुळ्यात संविधान बांधिलकी महोत्सव
वार्ताहर / धुळे

प्रजासत्ताकदिन ते महात्मा गांधी स्मृतीदिन या दरम्यान धुळे महानगर संयोजन समितीतर्फे संविधान बांधिलकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात येत असून नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सवाचे निमंत्रक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यवाह अविनाश पाटील यांनी केले आहे. या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी रोजी ठिकठिकाणी ध्वजवंदन, पथनाटय़ बहुभाषिक कवी संमेलन भरगच्च कार्यक्रम झाले. धुळे महानगर नागरी संयोजन समितीतर्फे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मनसेविरोधात माकप-सीटूचा मोर्चा
प्रतिनिधी / नाशिक

प्रजासत्ताकदिनानिमित्त उत्तर भारतीय संघटनांनी येथे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेला भोजपुरी कार्यक्रम उधळून लावणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मंगळवारी मार्क्‍सवादी कम्युनिष्ट पक्ष आणि सीटू संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सातपूर, चुंचाळे परिसरातील उत्तर भारतीय मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

वैद्यक संघटनांनी एकत्रित लढा देणे आवश्यक
‘बोगस डॉक्टर : शोध आणि बोध’, ही लेखमाला ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’ मध्ये अलिकडेच प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आय.एम.ए.) नाशिक शाखेचे सचिव डॉ. शशांक कुलकर्णी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया..

अशा सिटी बस, असे अनुभव..
नाशिक शहरातील बस वाहतूक सेवा महापालिकेने ताब्यात घेण्याच्या प्रस्तावावरून गेल्या काही दिवसांपासून मतमतांतरे व्यक्त होत आहेत. पालिकेने ही सेवा ताब्यात घेऊ नये असा कल बहुतांशाने दिसत असला तरी पालिकेने या सेवेची सगळी जबाबदारी स्वत:च्या अंगावर न घेता सध्याच्या सेवेला पूरक अशी सेवा द्यावी अथवा एस.टी. महामंडळाशी ‘रूट शेअरिंग’चा पर्याय अवलंबावा यासारखे पर्याय देखील ‘वृत्तान्त’च्या व्यासपीठावरून चर्चेच्या निमित्ताने पुढे आले. तसेच महामंडळातर्फे सध्या पुरविली जाणारी सेवा किती सक्षम आहे, लोकांना त्याचे काय अनुभव येतात याबाबीही समोर आल्या. त्या अनुषंगाने ‘लोकसत्ता’च्या एक वाचक स्नेहल विनोद यांनी केलेले अनुभवकथन..

बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा तांदूळ जप्त
वार्ताहर / देवळा

तालुक्यातील फुले माळवाडी येथे रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जात असातना पकडण्यात आला. स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांच्या जागरुकतेमुळे पकडण्यात आलेला हा तांदूळ ज्या स्वस्त धान्य दुकानदाराचा आहे, त्याचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यातील माळवाडी, फुले माळवाडी येथे गेल्या १० ते १५ वर्षांपासून स्वस्त धान्य दुकान सुरू असून गावातील रेशनकार्ड धारकांना नियमाच्या चौकटीत धान्य देवून इतरत्र मात्र शिल्लक धान्य काळ्या बाजारात चढय़ा भावाने विकले जाते, अशा तक्रारी होत्या. या दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात जात असताना फुले माळवाडीच्या ग्रामपालिका सदस्या सुनंदा बच्छाव व उपस्थित ग्रामस्थांनी सदरची गाडी अडविली, तिच्यात तांदूळ असल्याने निदर्शनात आले.

भुसावळमध्ये गुंडाची हत्या
वार्ताहर / भुसावळ

येथील पंचशीलनगरातील रवींद्र पाटील उर्फ ग्यारी या अट्टल गुन्हेगाराची डोक्यात दगड घालून मंगळवारी काही जणांनी हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सहा ते सात जणांना ताब्यात घेतले आहे.
ग्यारी हा त्याच्या गुन्हेगारी कारवायांसाठी ओळखला जात होता. त्याचे अनेक गुन्हेगारांबरोबरही वाद होते. मंगळवारी सकाळी मच्छीमार्केट परिसरातील पीठ गिरणीजवळ त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेतला. डोक्यात डोक्यात दगड घालून ग्यारीची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. बाजारपेठ पोलीस ठाण्यात बाबुराव पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्यारीची हत्या त्याच्या सहकाऱ्यांनीच केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.