Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

विशेष

जाऊ दे ना!
जगातल्या सगळय़ा व्यवहारात आपण आपले स्वत:चे मत सोडत नाही. रस्त्यावर भाजी विकणारी बाई आपल्याकडून हमखास जास्त पैसे घेते आहे, याची आपल्याला खात्री असते. त्यामुळे आपण तिच्याशी हुज्जत घालून दोन पैसे स्वस्त भाजी मिळाल्याचा आनंद मिळवत असतो. एखादी वस्तू घेण्यापूर्वी चार दुकाने हिंडून ती कुठे चांगली आणि स्वस्त मिळते, याचा अंदाज घेणारे आजही काही कमी नाहीत. आपले स्वत:चे मत हेच अंतिम सत्य असल्याची आपली खात्री आपल्याला जगण्याचे सारे बळ देत असते. हे मत आपण पूर्वानुभवावरून तयार केलेले असते, असा आपला समज असतो. हा समज निर्माण व्हायला आपणच कारणीभूत असतो, तरीही आपला त्यावर विश्वास असतो. घरातल्या बारीकसारीक गोष्टींपासून ते बॉसपर्यंत सगळय़ा बाबतीत आपलेच नेहमी बरोबर असते. तसे आपण आपल्या खासगी जीवनात बरेच शूर वगैरे असतो आणि हा शूरपणा शक्यतो गुलदस्त्यात राहणे आपल्याला अधिक आवडत असते.

सरकारने आरंभला नवा उसूल
अतिरिक्त महसूल सामान्याकडून सक्तीने वसूल

सरकारी महसुलात वाढ करण्यासाठी बिनशेती कर आकारणीसाठी सरकारने नवा अध्यादेश काढला असून, तो सर्वसामान्यांपासून दूर ठेवून छोटे बिनशेती भूखंडधारकांकडून जबरदस्तीने या अतिरिक्त कराची वसुली तलाठय़ांच्या माध्यमातून करण्यास प्रारंभ केला असल्याने रायगड जिल्ह्यासह कोकणातील सर्व बिनशेती भूखंडधारकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. सरकारने हा दर जास्तीचा म्हणजे कमाल ठेवावा, असे अध्यादेशात कोठेही म्हटले नाही़ सरकारी अधिकाऱ्यांनी या अध्यादेशाचा गैरअर्थ लावून केवळ वार्षिक महसुलाचे इष्टांक पूर्ण करण्याच्या हेतूने सारासार विवेकबुद्धीचा वापर न करता जास्तीचा कर लावून ते मोकळे झाले असल्याची तक्रार गावागावांत ऐकायला मिळते आहे.

‘चाकरमन्यांनू नमस्कार, इल्ला वरक्कूम नमस्कारम्,’ माका ओळखल्यात काय? अरे ओळखूक नाय? मी तुमची कोकण रेल्वे.. ‘हल्ला वरक्कूम नमस्कारम्’ ह्य़ो मल्ल्याळम भाषेत पण तुमका नमस्कार केल्यानी म्हणून तुमका आश्चर्य वाटला की काय? पण खरां आसा चाकरमन्यांनू. काय करतलय माझ्या कानार हल्ली मल्याळीच शब्द जास्त पडतत.. माका त्येचा वायट वाटणा नाय, पण तुमी मालवणी- कोकणच्याच मंडळींनी माझी स्थापना करण्यात पुढाकार घेतल्यानी, पण तुमीच मंडळी माका कमी भेटतात.. पाच राज्यांतून मी धावतय.. गेली एक तप मी न थांबता धावतसय, पण खरा सांगू माका कोकणी माणसाबद्दलच आपुलकी आसा. आता होच माणूस माका कमी भेटता याचा दु:ख होतासा. तसा बघला तर मी असा म्हणणा चुकीचाच आसा, कारण माझी मालकी आसा ती देशाची. या देशाक एकसंघ ठेवण्यात, प्रत्येक नागरिकाक मग तो खयच्याच प्रातांचो, धर्माचो, भाषेचो असानी तेका माझो लाभ मिळून देण्यात आनंदच वाटता..पण काकणभर जास्त प्रेम आसा ता कोकणी माणसारच. कारण या माणसाच्या पुढाकारानं माझो जन्म झालोसा, ह्य़ा मी कधीच विसरुचय नाय. माझ्या जन्माचा पहिला स्वप्न पडलला ता कोकणी माणसाकच. नाना दंडवते, जॉर्ज फर्नाडिस, ई. श्रीधरन या मंडळींनी ह्य़ा स्वप्न प्रत्यक्षात उतरवल्यांनी आणि माझो जन्म झालो. माझ्या दऱ्याखोऱ्यातलो प्रवास तुमका आनंददायी, आल्हाददायी वाटता खरो पण माका तुमका सुखरूप पोचवण्यासाठी किती दक्षता घेवची लागता याची कल्पना आसा की नाय? पण चाकरमन्यांनू गेल्या दशकात मी सर्व अडथळे पार करीत कमीत-कमी अपघात करून मी तुमका सुरक्षित जागेर पोचवण्याची शिकस्त केलीसा.. मुळातच माझो जन्म ज्या दिव्यातून झालोसा तेची दखल जगान घेतली.. माझो कोकण रेल्वेचो जन्म हो अस्सल भारतीय तंत्रज्ञानांनी जगाक घालून दिलेलो धडो आसा. ह्य़ेचो माका गर्व जरूर वाटता.
आता माका आणखी आधुनिकतेची स्वप्ना पडतसत. माझ्या ट्रॅकवरून देशातली सर्वात वेगवान गाडी धावची अशी माझी इच्छा आसा, पण चाकरमन्यांनू तेचेसाठी तुमकाच जोर लावचो लागतलो. आता माका जे एका हातार काम करुक लायतसात ता थांबया आणि माका दुसरोय हात द्या.
म्हणजेच माका दुसरो ट्रॅक दिल्यास माझो बोजो किती कमी जायत. येची कल्पना आसा काय तुमका? एक तप धावल्यावर आता माका आणखी मोठी स्वप्ना पडूक लागलीसत. चाकरमन्यांनू, तुमी माझे जन्मदाते असल्यानी, माझो जास्तीत जास्त फायदो घेवचो असा माका वाटता.
माझ्या प्रत्येक स्टेशनाच्या परिसरात उद्योगधंदे वाढया, म्हणजे स्थानिक लोकांक रोजगार मिळात. मी तुमच्यासाठी कितकोय बोजो उचलून हाडीन. माझो वापर करुचो प्रत्येक नागरिकाक अधिकार असलो तरी माझो सर्वाधिक वापर कोकणी माणसान करून तेच्या घरात समृद्धी येवक होयी, असा माका वाटता.. तुमी तुमचो आंबो, नारळ, काजू माझ्याकडे पाठया, मी तेका जगाचो मार्ग दाखयन. माझा एक म्हणणा आसा माझो वापर या कोकनच्या चाकरमन्यांन पुरेपूर करुचो. यातूनच समृद्धीची बीजा रोवली जाताली. नाय तर माझो उपयोग तो काय?
तर बरा तर चाकरमन्यांनू, आता माझी सुटीची येळ झालीसा.. मी निघतय आता.. माझ्या मनात जा होता ता मी इंजिनातल्या धुरासारख्या तुमच्यापुढे बरगळलय.. माका आता येळ नाय आणि तुमीय येळ दवडू नकात..
प्रसाद केरकर
Prasadkerkar73@gmail.com