Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २८ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; कोणताही अनुचित प्रकार नाही
पुणे, २७ जानेवारी / विशेष प्रतिनिधी

 

शहर व जिल्ह्य़ात ६० वा प्रजासत्ताकदिन सोमवारी मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. विविध शासकीय, निमशासकीय, सामाजिक, शैक्षणिक, वित्तीय, औद्योगिक, सेवाभावी संस्था व संघटनांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. शिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानावर झालेल्या शासकीय कार्यक्रमात जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, विभागीय आयुक्त दिलीप बंड, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वर्धने, महापौर राजलक्ष्मी भोसले, िपपरी-चिंचवडच्या महापौर अपर्णा डोके आदी या वेळी उपस्थित होते.
विविध राजकीय पक्षांच्या वतीनेही शहरात काल ध्वजारोहणाबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात सेवादलाचे मुख्य संघटक रवि म्हसकर यांनी समरगीते म्हटली. पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश बागवे, महिला अध्यक्षा नीता रजपूत, वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर दत्ता गायकवाड, दीप्ती चवधरी आदी उपस्थित होते.
पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवाजीनगर येथील कामगार पुतळा वसाहतीत हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुंबईच्या अतिरेकी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून महिलांना भांडय़ांचे वाटपही या वेळी करण्यात आले. नीता रजपूत, वंदना थोरात, बायडाबाई पवार आदी या वेळी उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस कसबा विधानसभा मतदार संघात काल खाऊ वाटप, आरोग्य शिबिर, चष्मेवाटप, निबंध स्पर्धा, वृक्षारोपण असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अशोक राठी, संजय पाचरेकर, शैलेश चव्हाण, गणेश नलवडे, पंडित कांबळे आदी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पर्वती व जनता वसाहत येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष सचिन तावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सुमारे दोन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
काँग्रेस (एस) च्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रांत कार्याध्यक्ष एम. रशिदखान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पावणेचारशे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले गेले. शहर अध्यक्ष अजय पैठणकर, विजय ओंबळे आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर कार्यालयात आमदार गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सरचिटणीस योगेश गोगावले, अनिल शिरोळे, मदन डांगी, किरण सरदेशपांडे, उज्ज्वल केसकर, सुरेश नाशिककर, जयंत भावे आदी उपस्थित होते. कसबा मतदार संघ व लायन्स क्लब ऑफ पुणे औंध-पाषाण यांच्या वतीने नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. या वेळी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्या वतीने ८०० जणांना मोफत चष्म्यांचेही वाटप करण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट विभागाच्या वतीने भोपळे चौकात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले. शशि पुरम, प्रवीण जाधव, शैलेस उग्राल आदी या वेळी उपस्थित होते. अल्पसंख्याक मोर्चा पुणे शहरतर्फे मोमिनपुरा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या दोनशे तेवीस व्यक्तींचा काल सत्कार करण्यात आला. या वेळी आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सत्कारार्थीमध्ये अंजुमन इत्तेहाद तांबोळीयन जमात पुणे शहरचे अध्यक्ष हाजी नजीरभाई तांबोळी यांचाही समावेश होता. शब्बीरभाई दाऊदभाई तांबोळी, दुबई येथील आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेतील विजेती सिमरन गवळी यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने नेहरू स्टेडियमवर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला शिलेदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. शिक्षण मंडळाचे प्रमुख सुधाकर तांबे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्ष महेश लडकत आणि उपाध्यक्ष अप्पासाहेब रेणुसे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. विरोधी पक्षनेते विकास मठकरी यांचेही या वेळी भाषण झाले. ध्वजारोहणानिमित्त फ्लॅगमार्च, संचलन, शोभायात्रा, साक्षरता रथ, वृक्षसंवर्धन रथ आदी कार्यक्रमात महापालिका शाळेतील आठ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. भाजपच्या अल्पसंख्याक सेलतर्फे मोमिनपुरा येथे आयोजित कार्यक्रमात मुस्लीम बांधवांनी दहशतवादविरोधी शपथ घेतली. अल्पसंख्याक मोर्चाचे महासचिव सलिम शेख या वेळी उपस्थित होते. उपाध्यक्ष समीर शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोलापूर बझार बौद्ध पंच मंडळाच्या वतीने सारनाथ बौद्ध विहारामध्ये प्रवीण गाडे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.
भवानी पेठ व्यापारी मंडळ ट्रस्टच्या वतीने डावरे चौकात खडक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नंदकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला तसेच पंधरा विद्यार्थिनींना या वेळी शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. सचिन चिंचवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शिवाजी मराठा सोसायटीच्या व्यवस्थापन शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला काल मोठा प्रतिसाद लाभला. या वेळी इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष माणिकराव सातव-पाटील यांनी हस्ते ध्वजारोहण केले. बिझनेस स्टफ या उद्योगपत्रिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, बहुजन हिताय संघ व विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सुरुवातीस डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. समाज कल्याण विभागाचे विभागीय अधिकारी उमाकांत कांबळे यांनी या वेळी संविधानाच्या २०० प्रतींचे वाटप केले. समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शनही पुणे विभागीय समाजकल्याण अधिकारी कार्यालयामार्फत भरविण्यात आले होते.
अखिल महाराष्ट्र सगर समाज संघ व लायन्स क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने काल मोफत आरोग्य तपासणी व दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. राजेश खाबडे, डॉ. सोहेल खान, भारती विद्यापीठाच्या दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक यांनी त्यासाठी सहकार्य केले.
राष्ट्रीय जनता दलाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेश कार्याध्यक्षा साधना तुरखिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरेगाव पार्क वसाहतीतील बालकांना खाऊचे वाटपही करण्यात आले. प्रा. विजय वीरकर, राज शर्मा, देवेंद्र जैन, विवेक गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
अखिल महाराष्ट्र कुणबी समाज सेवा संघाच्या वतीने गोखलेनगर येथील मुख्यालयात काल ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी दहशतवादविरोधी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम कोलगे होते.
येरवडा येथे विद्यार्थी युवा परिषदेच्या वतीने अस्वच्छ कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष सुधीर जानजोत, हुलगेश चलवादी, किशोर राठी आदी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
येरवडा येथील संजीवनी फाउंडेशनच्या उर्दू व इंग्रजी माध्यमातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी काल देशाला महासत्ता करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पानशेत रस्त्यावरील मणेरवाडीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सिमेंट काँक्रिटच्या ध्वजस्तंभाची भेट देण्यात आली. आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींचे शिबिर मणेरवाडी येथे झाले होते. या वेळी तेथे कायमस्वरूपी ध्वजस्तंभ नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी व हाजी गुलाम मोहंमद ट्रस्टच्या वतीने हा स्तंभ भेट देण्यात आला.
घोरपडे पेठ जनता दल (धर्मनिरपेक्ष) शाखेतर्फे काल यशोधरा विकास मंडळाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. भगवानराव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक शरद दाभाडे यांच्या हस्ते सेनापती बापट रस्ता येथील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. अधीक्षक अभियंता श्रीहरी चौधरी, बाबासाहेब जाधव तसेच इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. लोकशाही प्रजासत्ताक भारत या पत्रकांचे वाटप करून आंबेडकरी बौद्ध समाजातर्फे काल प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आंबेडकरी बौद्ध समाजाचे निमंत्रक युगानंद साळवे याच्या हस्ते ही पत्रके वाटण्यात आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारनगर येथील सभागृहाचे नामकरण मधुकर द. जोशी सभागृह असे करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी उपस्थित होते.
माजी सैनिक संघाच्या वतीने दिवंगत सैनिकांना ससून चौकातील युद्ध स्मारकापाशी श्रद्धांजली वाहण्यात आली. या युद्धस्मारकास पुष्पचक्र वाहण्याचा मान मीनी ग्रँटे यांना देण्यात आला. नम्रता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी नगरसेवक रामभाऊ गणपुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुवर्णज्योती महिला व युवती मंचाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘जरा याद करो कुर्बानी’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अ‍ॅड. वंदना चव्हाण, वृषाली दाभोलकर, मंदा शिंपी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुणे विकास मंचच्या वतीने कसबा पेठेतील कुंभार वाडा चौकात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश भोकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोंढवा येथील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम काल मोठय़ा उत्साहात पार पडले. भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाच्या वतीने काल संविधान रॅलीचे आयोजन केले होते. शहर उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश कांबळे यांनी रॅलीचे नेतृत्व केले. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने विभागीय व्यवस्थापकांच्या कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने ससून क्वॉर्टर्स येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

कडक बंदोबस्तात शहरात प्रजासत्ताक दिन साजरा
दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्तात प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. शहरात कोठेही अनुचित प्रकार न घडता प्रजासत्ताकदिन शांततेत पार पडल्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त दिलीप बंड, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी आदी यावेळी उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर व्यवस्था करण्यात आली होती.
गुप्तचर यंत्रणांकडून इशारा मिळाल्यावर पोलिसांनी संपूर्ण शहरात दक्षतेचा इशारा दिला होता. लष्करी संस्था, चित्रपटगृह, मॉल, रेल्वे व बसस्थानके तसेच शैक्षणिक संस्थांना सतर्क राहण्याचे पोलिसांकडून सूचित करण्यात आले. त्याचबरोबर, शहरातील सर्व भागांमध्ये असलेले हॉटेल, लॉज यामध्ये पोलिसांनी कसून तपासणी केली होती. प्रमुख रस्त्यांवरील नाकेबंदीसह उपनगरांमध्ये भाडय़ाने दिलेल्या सदनिका व घरांचीही पोलिसांनी तपासणी केली. शहर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्टय़ा व रजा सतरा जानेवारीपासून रद्द करण्यात आल्या होत्या.
शहरात सुरू असलेली ही तपासणी मोहीम व नाकेबंदी प्रजासत्ताकदिनानंतरही तीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.