Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

पिंपरीत करवाढीस आयुक्तांचे समर्थन; सर्वपक्षीयांचा विरोध
प्रशासन-लोकप्रतिनिधींना नागरिकांनी विचारला जाब
पिंपरी, २७ जानेवारी / प्रतिनिधी
पिपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रस्तावित करवाढीस नागरिकांनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला. मात्र, आयुक्त आशिष शर्मा यांनी करवाढीचे जोरदार समर्थन करीत नागरी सुविधांसाठी थोडी करवाढ सोसावी, असे आवाहन केले. करवाढीसह, बीआरटी, पाणीप्रश्न, वाहनतळ, घरकुल योजना आदी विषयावरून नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. याबाबतचा निर्णय पालिका सभेत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दामदुप्पट पैसे देण्याच्या बहाण्याने खडकीत चाळीस जणांना ५० लाखांचा गंडा
खडकी, २७ जानेवारी/प्रतिनिधी

अवघ्या एकवीस दिवसांत पैसे दामदुप्पट करून देतो, असे सांगून खडकी येथील एका वकील महिलेसह ४० जणांची तब्बल ५० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा गुन्हा खडकी पोलिसांनी नोंदवला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी मुंबईतील चार भामटय़ांना अटक केली आहे.

‘पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली’
पं. सुरेश तळवलकर यांना मधुरिता सारंग स्मृती सन्मान प्रदान
पुणे, २७ जानेवारी/प्रतिनिधी
मधुरिता सारंग यांच्या नावाचा पुरस्कार हा मोठा सन्मान असून, त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांनी केले. मधुरिता सारंग स्मृती सन्मान स्वीकारताना ते बोलत होते. ज्येष्ठ नृत्यांगना कुमुदिनी लाखिया आणि पं. तळवलकर यांना यंदा हा सन्मान मिळाला. ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर आणि ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सहकाऱ्याच्या छळाला कंटाळून पोलिसाची आत्महत्या
पुणे, २७ जानेवारी/प्रतिनिधी

लष्कर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या नंदकुमार महादेव मुसळे (वय ४३) या पोलीस शिपायाचा रुग्णालयात उपचार घेत असताना रविवारी रात्री मृत्यू झाला. सहकाऱ्याच्या छळाला कंटाळून मुसळे यांनी आत्महत्या केली, असा आरोप मुसळे यांच्या कुटुंबीयांनी केला. मुसळे (रा. १३६८, कसबा पेठ) यांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजले नसून, त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. मुसळे यांचा व्हिसेरा फरासखाना पोलिसांनी पुढील तपासासाठी राखून ठेवला असून, या प्रकरणी ‘आकस्मिक मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे.

लोणावळ्यात राजमाची ते कुणेगाव रोप-वे होणार
पुणे, २७ जानेवारी / खास प्रतिनिधी

सह्य़ाद्रीची उत्तुंग डोंगररांग, आकाशाला भिडू पाहणारे टोकदार सुळके, पावसाळ्यात उंचावरून कोसळणारे धबधबे, खोल दऱ्या आणि हिरवे गर्द जंगल.. लोणावळ्यातील निसर्गाचे हे अनोखे रुप आता राजमाची ते कुणेगाव या दरम्यान होणाऱ्या ‘रोप-वे’मधील चित्तथरारक प्रवासातून पाहता येणार आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी लोणावळा नगर परिषदेने रोप-वे चा प्रकल्प हाती घेतला आहे. एक किलोमीटर लांबी, साडेबारा हेक्टर क्षेत्रावरील प्रकल्प आणि ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वानुसार बांधण्यात येणारा हा जिल्ह्य़ातील पहिलाच रोप-वे प्रकल्प ठरणार आहे.

दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक;वीस गुन्हे उघडकीस
पुणे, २७ जानेवारी/प्रतिनिधी

दुचाकी चोरणाऱ्या टोळीला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी काल रविवारी सायंकाळी अटक केली. या टोळीने शिवाजीनगर, वानवडी, कोंढवा, चतु:शंृगी व पिंपरी भागात केलेले वीस गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले आहेत.शाहीद रज्जाक शेख (वय २२, रा. कोंढवा खुर्द), सलीम मुनीर शेख (वय १९, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता) आणि विजय जयकुमार सोनीग्रा (वय २१, रा. गणेशनगर, निगडी) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मॉडेल कॉलनीत घरफोडीत पावणेनऊ लाखांचा ऐवज लंपास
पुणे, २७ जानेवारी / प्रतिनिधी

शिवाजीनगर येथे मॉडेल कॉलनीमधील घराच्या खिडकीचे गज कापून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण पावणेनऊ लाख रुपयांचा ऐवज चोरटय़ाने चोरून नेला. पुरुषोत्तम अपार्टमेंट येथे शनिवारी दुपारी तीन ते काल रात्री नऊ या कालावधीत हा प्रकार घडला.डॉ. जितेंद्र बाबुलाल पारिख (वय ५९) यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला. पारिख हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत अलिबाग येथे फिरावयास गेले असता ही घटना घडली.

छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये लवकरच एकेरी वाहतूक पद्धत
पुणे, २७ जानेवारी/प्रतिनिधी

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या भाजी मंडईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच एकेरी वाहतूक पद्धती राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी आज सांगितले.मार्केट यार्डमध्ये सध्या छोटी व मोठी वाहने कर्मचारी तसेच भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या उद्भवत आहे. या संबंधी आडते, हमाल व तोलणार यांच्याबरोबर बैठका घेण्यात आल्या आहेत. एकेरी वाहतूक पद्धतीचा आराखडा तयार करण्यात आला असून, तो राबविण्यासाठी लवकरच पावले उचलली जाणार आहेत. भाजी मंडईतील गाळ्यांसमोर किरकोळ विक्रीबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना देशमुख म्हणाले की, बाजार आवारात गाळ्यांच्यासमोर पंधरा ते वीस फूट पांढरे पट्टे मारून त्यामध्येच माल विकण्याची सक्ती केली जाईल. याबाबत भुसार व भाजीबाजार या दोन्ही विभागांमधील आडते, हमाल व तोलणार यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले, विलास भुजबळ उपस्थित होते.