Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

राज्य

गोदापात्रातील अतिक्रमणांना दबाबतंत्राचा आसरा
नाशिक, २७ जानेवारी / खास प्रतिनिधी

गोदावरी नदीवर पूररेषा आखण्याकामी नाशिक महापालिकेकडून होणाऱ्या दिरंगाईमागे काही बिल्डर्सचे गुंतलेले हितसंबंध हे एकमेव कारण असल्याचे आता उजेडात येवू लागले आहे. गेल्या १९ सप्टेंबरला गोदावरीच्या महापुराने नाशिकला मगरमिठी मारली आणि त्यात कोटय़वधीची वित्तहानी झाली ती केवळ पूररेषा अस्तित्वात नसल्यामुळे हेही लपून राहिलेले नाही. त्यानंतरही काही मुजोर मंडळींकरवी नदीपात्रात वा पात्रालगत प्रचंड मोठय़ा प्रमाणात मातीचे भराव टाकण्याचे काम होत असून थेट पूररेषेत ही अतिक्रमणे होत असताना ती नियमित व्हावीत म्हणून याच मंडळींकरवी विविधांगी दबावतंत्राचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती बाहेर आली आहे.

५०० एकर जमिनीबाबत हातघाईवर आलेल्या
महसूल यंत्रणेला पंतप्रधान कार्यालयाचा चाप

सोपान बोंगाणे
ठाणे, २७ जानेवारी

तारापूर अणुउर्जा केंद्राची सुरक्षितता व सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून पालघर तालुक्यातील सुमारे ५०० एकर जमीन कवडीमोल दराने एका खासगी उद्योगाला बहाल करण्यासाठी हातघाईवर आलेल्या महसूल यंत्रणेला केंद्रीय अणुउर्जा विभाग व पंतप्रधान कार्यालयाने चाप लावला आहे. त्यामुळे या जमीनप्रकरणी अडचणीत आलेल्या राज्यसरकारची परस्पर सुटका करण्यासाठी खुद्द अर्जदार कंपनीनेच आता ‘ही जमीनच नको’ असा मानभावी पवित्रा घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

काँग्रेसमधील गटबाजीमुळे मुख्यमंत्र्यांचा चंद्रपूर दौरा रद्द
चंद्रपूर, २७ जानेवारी/ प्रतिनिधी

कार्यक्रम आयोजित करण्यावरून काँग्रेसच्या दोन गटात जबरदस्त रस्सीखेच झाल्याने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आजचा दौराच रद्द झाला. आता या मुद्यावरून पक्षात पत्रकबाजी सुरू झाली आहे.
नागपुरात ‘एनएसयुआय’च्या अधिवेशनाचे उद्घाटन करून मुख्यमंत्री दुपारी चंद्रपूर जिल्हय़ाच्या दौऱ्यावर येणार होते. काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस समितीने त्यांचे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

लोकशाहीला पाठिंबा आणि राजकारणाला विरोध ही विसंगती -डॉ. भोळे
वर्धा, २७ जानेवारी / प्रतिनिधी

राजकारणाबाबत पूर्वग्रहदूषित भावना हे एक मोठे आव्हान आहे. राजकारण हे चांगल्या माणसाचे काम नाही, असेच जो तो म्हणतो पण लोकशाही हवी राजकारण नको, हे शक्य नाही. राजकारणानेच सर्व शक्य आहे. त्याविषयी अढी नको. अपप्रवृत्ती टाळून राजकारणाद्वारेच सर्व बदल शक्य आहे. लोकशाही म्हणजे फ क्त निवडणुका असे चित्र बदलायला हवे, असे प्रतिपादन डॉ. भा. ल.भोळे यांनी केले.
डॉ. भा.ल. भोळे यांचे ‘आजच्या भारतासमोरील आव्हाने’ या विषयावर येथे व्याख्यान झाले.

लोक बिरादरी प्रकल्पातील शिबिरात २४३ शस्त्रक्रिया
भामरागड, २७ जानेवारी / वार्ताहर

डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्प रुग्णालयात नि:शुल्क शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले. या शिबिरात २४३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा, रोटरी क्लब नागपूर आणि महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने हेमलकसा येथील लोक बिरादरी रुग्णालयात आयोजित शस्त्रक्रिया शिबिरात महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातली ३०० आदिवासी, गोरगरीब रुग्णांनी नोंदणी केली.

शहिदांच्या अभिवादन कार्यक्रमात राडा
मनसेकडून दिलगिरी

नाशिक, २७ जानेवारी / प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनी शहिदांना अभिवादन करण्यासाठी नाशिकस्थित उत्तर भारतीयांकरवी आयोजित कार्यक्रमातील भोजपुरी गीते कानी पडताच तेथे घुसून राडा करणाऱ्या मनसेच्या १८ कार्यकर्त्यांची न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, या हल्ल्यावरून संतप्त पडसाद उमटू लागल्यावर मनसेने हा हल्ला गैरसमजातून झाल्याचे सांगत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तथापि, राज्य शासन मनसेच्या आक्रमक व आक्रस्ताळ्या आंदोलनाविरोधात नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण कर्जमाफीसाठी आदिवासी शेतकऱ्यांचे उपोषण
नाशिक, २७ जानेवारी / प्रतिनिधी

राज्यातील ९३८ आदिवासी सहकारी संस्थांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, शासनाने कर्जमाफी जाहीर करूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी येथील आदिवासी आयुक्तालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला. सहकारी संस्था संघर्ष समितीने उपोषणाची नोटीस देऊनही शासनस्तरावर निर्णय न झाल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांसह हजारो शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी. के. बागूल यांना निवेदन दिले.
उपोषणस्थळी खा. हरिश्चंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत चंद्रात्रे, इगतपुरीचे आ. काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार शिवराम झोले, संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास बोरसे, पदाधिकारी दिगंबर बोरसे आदींसह अनेक नेत्यांनी भेट देऊन पाठींबा व्यक्त केला. याच प्रश्नावर संपूर्ण राज्यातील सुमारे ५० हजार आदिवासी बांधवांचा मोर्चा आ. ए. टी. पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. व्यवस्थापकीय संचालक बागूल व संघर्ष समितीत उपोषण करण्यावरून वाद झाले. पोलीस यंत्रणा व आदिवासी विकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी विनंती करूनही हे उपोषण सुरूच ठेवण्यात आले आहे.

अकोल्यात शनिवारपासून राज्यशास्त्र परिषद
अकोला, २७ जानेवारी / प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन राज्यशास्त्र अभ्यास परिषद ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष मधुकर भावे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण शेळके राहणार आहे, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार वसंतराव खोटरे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, शिक्षण उपसंचालक लक्ष्मीकांत पांडे उपस्थित राहणार आहेत.प्रा. धैर्यवर्धन फुंडकर सिनेट सदस्य संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती हे परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत. समारोप कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम बिडकर, प्रमुख पाहुणे नानाभाऊ पंचबुद्धे शिक्षण राज्यमंत्री माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर मान्यवर हरिदास भदे हे उपस्थित राहणार आहेत.

मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी इंडस् इंड बँकेवर जप्ती
ठाणे, २७ जानेवारी/प्रतिनिधी

तब्बल एक कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी ठाणे महापालिकेने आज इंडस् इंड बँकेवर जप्तीची कारवाई करून संपूर्ण मालमत्ता जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
या बँकेकडून महापालिकेस मालमत्ता करापोटी एक कोटी सात लक्ष २५ हजार ६७९ रुपये थकबाकी येणे अपेक्षित होते. थकबाकी वसुलीचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर पालिकेच्या जकात विभागाने अलिकडेच या बँकेस जप्तीच्या कारवाईची नोटीसही पाठविली होती. मात्र जप्तीच्या कारवाईस स्थगिती मिळावी म्हणून बँकेने न्यायालयात धाव घेतली, परंतु न्यायालयानेही बँकेचा अर्ज फेटाळून लावला.
आज महापालिकेचे कर निर्धारक व संकलक हरिश्चंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मंगल शिंदे यांनी जिजा अपार्टमेंट येथील इंडस् बँकेची मालमत्ता जप्त केली. त्याचप्रमाणे ही मालमत्ता लिलाव करण्यासाठीही पालिकेने बँकेस नोटीस पाठविली आहे. त्यामुळे या बँकेचे धाबे दणाणले आहे.

महाडमध्ये उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा
महाड, २७ जानेवारी/वार्ताहर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा बुधवार, २८ जानेवारी रोजी महाडमध्ये आयोजित करण्यात आली असल्याचे शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख विजयराज खुळे यांनी महाड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांमध्ये होणार असल्याने, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. महाड येथील सभेला कोकणातील बहुतांशी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, कोकणातील ही त्यांची पहिलीच सभा असणार असल्याची माहिती विजयराज खुळे यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेला अधिकाधिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अधीक्षक गजाआड
पालघर, २७ जानेवारी/वार्ताहर

गोवाडे आश्रमशाळेतील दहावी इयत्तेतील मुलीवरील बलात्कारप्रकरणी मनोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चाळीसगावला पळालेले अधीक्षक शिरसाट यांना तेथे जाऊन ताब्यात घेतले.
आश्रमशाळेतील या घटनेची खबर प्रसिद्ध झाल्यानंतर मनसेने तेथे जाऊन हल्लाबोल केला. दरम्यान, मुलीचे आई-वडीलही हजर झाले व त्यांनीच शिरसाट यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. शिरसाट आपल्या चाळीसगाव येथील गावी पसार झाल्याचे समजल्याने मनोर पोलिसांचे पथक त्याचदिवशी चाळीसगावला रवाना झाले व तेथेच त्यांनी शिरसाट यांना अटक केली. आदिवासी विकास विभागाने यासंदर्भात काय कारवाई केली हे समजू शकले नाही.