Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २८ जानेवारी २००९
  नव्या युगातील खेळी
  डिझाइन क्षेत्रातील आकर्षक संधी
  चला सिम्युलेशन्सद्वारे शिकूया
  श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप
  परदेशातील शिक्षणासाठी बँकांचे कर्ज
  उपसमस्यांचे निश्चितीकरण
  अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
  अ‍ॅग्रोटुरिझम
  मी निवडलेल्या क्षेत्रात..
  विकासकाचे अनोखे करिअर..
  पर्यटन क्षेत्रातील करिअर प्रवास

 

सिम्युलेशन्स म्हणजे एखादी प्रतिकृती किंवा मॉडेल- ज्याच्या आधाराने आपल्याला मूळ वस्तूचे ज्ञान संपादन करता येते. सायन्सच्या प्रयोगशाळेत ठेवलेली मनुष्याची प्रतिकृती किंवा सापळा, एखाद्या इमारतीचं मॉडेल किंवा एखाद्या गुंतागुंतीची रचना दाखवणारी प्रतिकृती. ज्ञान देण्यासाठी पुस्तक वाचणं, गृहपाठ करणं किंवा कोणीतरी शिकवणं ही नित्याची साधने आहेत. याव्यतिरिक्त जेव्हा आपल्यासमोर त्या वस्तूचं मॉडेल ठेवून प्रत्यक्ष पाहणीचा, अवलोकनाचा अनुभव मिळतो- तेव्हा जे ज्ञान मिळते, ते केवळ पुस्तकी नसते. आपण सखोल अंतरंगात शिरून ते स्वत: पाहत असतो. प्रत्यक्षात पडताळून पाहत असतो. थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल हे खूप शिकवणारं, शिकलेलं अधिक काळ संस्मरणात ठेवणारे असते.
शिक्षण क्षेत्रामध्ये सिम्युलेशन्स तंत्राचा वापर करणं हे अगदी पूर्वापार आहे. तंत्रज्ञानातील अवघड गुंतागुंत शिकण्यासाठी, युद्धशास्त्रातील- शस्त्रांमधील बारकावे जाणून घेण्यासाठी हे तंत्र वापरलं जायचं. पहिल्या महायुद्धाच्या काळात लाकडी यांत्रिक घोडे तयार करण्यात आल्याचे दाखले आहेत. जेव्हा एखादी किमती वस्तू, यंत्र किंवा शस्त्र प्रत्यक्षात हाताळायला देणं जोखमीच्या दृष्टीने
 
अशक्य असते, सुरक्षेच्या कारणाने हाती दिली जात नाही, तेव्हा त्याची नक्कल मॉडेलरूपाने, प्रतिकृती करणे हेच इष्ट असते. केवळ कागदावरती चित्र किंवा तपशीलवार आराखडा काढूनदेखील ते समजणं तितकं सहज नसतं, तेव्हा प्रतिकृती करणंच अपरिहार्य ठरतं.
यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रशिक्षण देताना सिम्युलेशन्सचा वापर एक आवश्यक बाब ठरलेली आहे. लुटुपुटूची लढाई करणं, त्याकरिता व्यूहरचना करणं हे जसं शिकवले जाते, तसे खेळ, तीच पद्धत आधुनिक शिक्षण प्रणालीत वापरली जात आहे. प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या सिम्युलेशन्सचे ढोबळमानाने तीन प्रकार आहेत-
१) लाईव्ह- ज्यात शिकणारी मंडळी डमी प्रतिकृतीद्वारे प्रशिक्षण घेतात.
२) व्हच्र्युअल- ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी प्रतिकृतीऐवजी आभासात्मक पद्धतीने म्हणजे संगणक, छोटा पडदा यावरती जे मॉडेलचे प्रत्यक्ष चित्र/ चित्रीकरण दिसेल, ते पाहून शिकतात.
३) कन्स्ट्रक्टिव्ह- या प्रकारात वरील दोन्ही प्रकारांचा वापर न करता टेबलावर किंवा एका मोठय़ा बोर्डवर प्रत्यक्षात युद्धभूमीचं वातावरण तयार करून त्यावरती सैनिक, युद्धसाहित्य शस्त्रे यांची मांडणी करून व्यूहरचना, हालचाली याचे प्रात्यक्षिक केले जाते. प्रत्यक्षात होणाऱ्या घटनांची ही जणू रंगीत तालीमच असते.
अलीकडे व्यवस्थापनशास्त्रातील प्रशिक्षणामध्ये तसंच संगणक शिक्षणात सिम्युलेशन्सचा वाढता वापर होतो आहे. ज्यांना मॅनेजमेंट गेम्स किंवा बिझिनेस सिम्युलेशन्स असं म्हटले जाते. व्यापार-व्यवसायातील प्रत्यक्ष उदाहरणांवरून केस स्टडीज तयार केल्या जातात. त्याचप्रमाणे बिझिनेस सिम्युलेशन्सचा उपयोग करून प्रशिक्षणार्थीना तयार केले जाते.
फिजिकल सिम्युलेशन्स - ज्यामध्ये एखाद्या वास्तवातील यंत्र किंवा उपकरणात एखादी कृत्रिम वस्तू वापरली जाते. मूळ वस्तूचा वापर करणं हे महागडं किंवा जोखमीचं असल्याने असा कृत्रिम वस्तूचा पर्याय रास्त वाटत असावा. ज्याच्या वापराने मूळ यंत्र, त्यातील गुंतागुंत समजणं सुलभ होऊ शकते.
इंटरअ‍ॅक्टिव्ह सिम्युलेशन्स - हा एक वरील सिम्युलेशन्सचाच विकसित प्रकार म्हणता येईल. ज्यात यंत्र, त्यातील उपकरणांसोबत मानवी सहभागाला तितकेच महत्त्व असते. फिजिकलच्या बरोबरीने इंटरअ‍ॅक्टिव्हचा वापर केल्यास तंत्रज्ञान समजण्यास मदत होते. अशा प्रकाराला ड्रायव्हिंग सिम्युलेटर किंवा फ्लाईट सिम्युलेटर असेही म्हटले जाते.
कॉम्प्युटर सिम्युलेशन्स - संगणक क्रांतीनंतर कॉम्प्युटरवरती सिम्युलेशन्स करणं हे आता अधिक प्रचलित झालेलं आहे. एखादं वास्तववादी उदाहरण घेऊन, प्रतिकृतीचे दर्शन घेता-घेता त्याचा अभ्यास करता येतो. कॅमेऱ्याद्वारा सूक्ष्म भागांचे चित्रीकरण पाहता येते. व्यवहारातील केसेसचा वापर करून ही सिम्युलेशन्स अधिक वास्तव केली जातात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी याबरोबरीने इकॉनॉमिक्स व सोशल सायन्सेस शिकताना त्याचा प्रभावी उपयोग होऊ शकतो. इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर्सप्रमाणे व्यवस्थापनशास्त्र यात सिम्युलेशन्सचा वापर चांगल्या प्रकारे होतो आहे. क्लिनिकल हेल्थकेअर क्षेत्रात सिम्युलेशन्सचा वापर उपर्युक्त ठरतो आहे. मिलिटरी, हवाई, मरिन इंजिनीअरिंग, वाहतूक क्षेत्रात सिम्युलेशन्समुळे खूप मदत होते आहे.
बँकिंग सिम्युलेशन्स - व्यवस्थापन क्षेत्राप्रमाणे बँकिंगमध्ये ग्राहकांना अधिक प्रभावी सेवा देण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी सिम्युलेशन्स तंत्राचा उपयोग होतो आहे. ट्रेनिंगमध्ये याचा विशेष वापर होतो आहे. बँकांतील विविध कामे, कार्यस्थळे, ग्राहकांचे अनुभव यांचा समग्र विचार करून हे वास्तवदर्शी सिम्युलेशन्स तयार केले जातात. प्रशिक्षण घेणारे बँक स्टाफ अशा रीतीने अभ्यास करून सुसज्ज होतो आणि कार्यानुभवाला समर्थपणे सामोरा जाऊ शकतो.
ई-लर्निग पद्धतीमध्ये वेगवेगळ्या सिम्युलेशन्सचा वापर हा वाढतच जाणार यात शंका नाही. त्यासाठी कागदी किंवा काडबोर्डच्या मॉडेलऐवजी संगणकीय- इंटरअ‍ॅक्टिव्ह वापरण्याची मानसिकता आपल्यात असायला हवी; तरच नवे बदल आपल्याला सुसह्य ठरू शकतील!
राजीव जोशी
rjoshi@gurukulonline.co.in