Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २८ जानेवारी २००९
  नव्या युगातील खेळी
  डिझाइन क्षेत्रातील आकर्षक संधी
  चला सिम्युलेशन्सद्वारे शिकूया
  श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप
  परदेशातील शिक्षणासाठी बँकांचे कर्ज
  उपसमस्यांचे निश्चितीकरण
  अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
  अ‍ॅग्रोटुरिझम
  मी निवडलेल्या क्षेत्रात..
  विकासकाचे अनोखे करिअर..
  पर्यटन क्षेत्रातील करिअर प्रवास

 

उपसमस्यांचे निश्चितीकरण
संशोधनकार्याला जेव्हा आपण आरंभ करतो तेव्हा असे आढळून येते की, आपण विचार करतो ती एकमेव मुख्य समस्या असते. त्यामध्ये वस्तुत: अनेक घटक समाविष्ट असतात. तुम्ही जर हे घटक-उपसमस्या योग्य प्रकारे हाताळू शकता तर मुख्य समस्येचे उत्तर शोधण्याच्या अचूक मार्गावर आहात असे म्हणावे लागेल.
म्हणूनच मुख्य संशोधन सलग, लहान लहान उपसमस्या संचामध्ये वर्गीकृत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किंबहुना प्रत्येक उपसमस्या पूर्णत: संशोधनाला योग्य घटक आहे याची खात्री पटणे आवश्यक आहे. प्रत्येक उपसमस्या एक प्रश्न आहे व त्या प्रश्नाचे उत्तर,
 
माहितीचे पद्धतशीरपणे संकलन, मापन व विशदीकरण करून शोधायचे आहे हे लक्षात घेणे उपयुक्त ठरेल.
व्यापक संशोधन समस्येच्या संदर्भात उपसमस्या कशा निश्चित करावयाच्या या संदर्भात खालील मार्गदर्शक तत्वे आपणास उपयुक्त ठरतील :
प्रथम, प्रमुख समस्येचे निरीक्षण करा. मुख्य समस्या जर अचूक लिहिली असेल तर अगदी सहजगत्या उपघटक पाहू शकाल.
मराठी व इंग्रजीतील कर्मणी रचना विशिष्ट अर्थ स्पष्ट करतात आणि तो एका संज्ञापनाच्या वैशिष्टय़ाचा भाग असतो. उपसमस्या विभक्त करा आणि प्रश्नाच्या स्वरूपामध्ये कथन करा. खालील उपसमस्या आपणास आढळून येतील :
१) इंग्रजीतील कर्मणी रचनेची वैशिष्टय़े कोणती?
२) मराठी कर्मणी रचनेची वैशिष्टय़े कोणती आहेत?
३) संज्ञापनाची वैशिष्टय़े कोणती आहेत?
समस्येचे स्पष्टीकरण
आतापर्यंत आपण खालील बाबींचा विचार केला आहे :
संशोधनासाठी समस्येचा शोध घेणे. संशोधनक्षम समस्येची वैशिष्टय़े. समस्येची योग्य मांडणी. उपसमस्या.
कोणत्याही संशोधनास सुरुवात करण्यापूर्वी संशोधन आराखडा तयार केला पाहिजे. चांगल्या प्रकारचा संशोधन आराखडा स्पष्टपणे मांडलेल्या संशोधन समस्येतूनच तयार होऊ शकतो. त्यामुळे चांगल्या संशोधन आराखडय़ासाठी संशोधन समस्येचे स्पष्ट वर्णन ही प्राथमिक गरज आहे.
समस्येची मर्यादा
आपल्या मर्यादित जीवनक्रमामध्ये समस्येबाबत प्रत्येक गोष्ट शोधून काढणे शक्य नाही. संशोधकाने समस्येच्या मर्यादा स्पष्टपणे मांडणे ही खऱ्या अर्थाने चांगल्या संशोधनाची सुरुवात आहे. संशोधकाने कोणत्या बाबींचा अंतर्भाव संशोधनात केलेला आहे, हे सांगण्याबरोबरच कोणत्या गोष्टी संशोधक समाविष्ट करणार नाही याचादेखील उल्लेख असावा.
वरील संज्ञापन विभागातील संशोधनाच्या उदाहरणात संशोधन हे कर्मणी रचनेपुरतेच
मर्यादित आहे. तसेच मराठी व इंग्रजी दोन
भाषांतील आधार साहित्याचा विचार त्यामध्ये केलेला आहे. व्याकरणातील इतर विभागांचा विचार त्यामध्ये केला जाणार नाही. ते विभागदेखील भाषिक वैशिष्टय़ांतर्गत येतात तसेच इंग्रजी व मराठी या भाषांव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेचा विचार केला जाणार नाही.
संज्ञांची व्याख्या
संशोधकाने समस्येची रचना करतेवेळी वापरलेल्या विविध संज्ञांच्या निश्चित व्याख्या देणे आवश्यक आहे. आता वर दिलेल्या उदाहरणाचा विचार करा. प्रस्तुतच्या उदाहरणामध्ये संशोधकाने कर्मणी प्रयोगाऐवजी केवळ कर्मणी असा शब्द का वापरला आहे? आता ही रचना मूळचीच आहे की हेतुपुरस्सर केलेली आहे? मूळचीच जर असेल तर संशोधकाने ज्या संज्ञा वापरलेल्या आहेत त्याचा पुरेसा विचार केलेला नाही हे स्पष्ट आहे.
तसेच Language Universalभाषिक विश्व या संज्ञेचा संशोधकाला अभिप्रेत असलेला अर्थ कोणता?
संज्ञांची क्रियात्मक व्याख्या ठरविणे
शब्दांचे अनेकविध अर्थ असतात. संशोधन विषयात विशिष्ट अर्थाचे शब्द व पदे यांचे स्पष्टीकरण करताना त्यांचे सर्व दृष्टीने विवेचन करावयास हवे. म्हणून संशोधकाने जी पदे या संज्ञा वापरावयाच्या आहेत त्यांच्या कार्यात्मक व्याख्या द्याव्यात. कार्यात्मक व्याख्या म्हणजे संज्ञेच्या शब्दकोशातील अर्थ विचारात न घेता ज्या अर्थानं ती संज्ञा अभ्यास विषयामध्ये वापरली आहे तो अर्थ होय.
संज्ञांच्या कार्यात्मक व्याख्या दिल्यानंतर तीन महत्त्वपूर्ण घटकांचा विचार करावयास हवा :
व्याख्या द्यावयाची संज्ञा
संकल्पना ज्यामधून घेतलेली आहे तो सर्वसामान्य गट. व्याख्या दिलेली संकल्पना व इतर संकल्पनांमध्ये फरक करणारी प्रमुख वैशिष्टय़े
स्पष्टीकरणार्थ आपण एक छोटेसे उदाहरण घेऊ, त्याद्वारे प्रक्रिया स्पष्ट होईल.
स्कूटर (संज्ञा) म्हणजे दुचाकी वाहन (सर्वसामान्य वर्ग) तिला लहान चाके (मोटार-सायकलपेक्षा- भेदमूलक गुणवैशिष्टय़े) असतात आणि तिचे गिअर्स हाताने टाकले जातात. (मोटार-सायकलप्रमाणे पायाने नव्हे; भेदमूलक वैशिष्टय़)
गृहितकांची वा धारणांची मांडणी
धारणा ही गृहित धरलेली परिस्थिती असते. संशोधनात संशोधकाने प्राप्त परिस्थितीत अधिक चिकित्सा न करता आधारभूत मानलेली परिस्थिती म्हणजे गृहितक होय. गृहितक हे प्रश्नाच्या स्वरूपात मांडलेल्या समस्येपेक्षा वेगळे असते. संशोधकाने त्यासाठी अभ्यासविषयातील कोणते प्रश्न आहेत व कोणती गृहिते आहेत ते इतरांना स्पष्ट करून सांगितले पाहिजे. अभ्यासविषयात दिलेले प्रमाण मुद्दे हे अभ्यासविषय सत्य घटनांवर आधारलेले असतात हे दर्शविण्यासाठी संशोधकाला प्रवृत्त करतात. उदाहरणार्थ, वर दिलेल्या उदाहरणात वैश्विक संज्ञापन यासारखे काहीतरी आहे. त्यामुळे भिन्न संस्कृतीच्या लोकांना संज्ञापनाच्या विविध साधनांचा अवलंब करून एकमेकांशी संवाद साधण्यास शक्य होते असे आपण गृहित धरतो. संज्ञापनात काहीतरी सर्वसाधारण वा सार्वत्रिक असते. या गृहितकापासून तुम्ही सुरुवात करता. या गृहितकाविषयी उर्वरित अभ्यासामध्ये काही शंका प्रदर्शित होत नाही. उलट गृहितकाला पूरक प्रमाणवाक्ये विकसित केली जातात.
गृहित कृत्यांचे प्रयोजन
गृहित कृत्ये हे तात्कालिक तर्कसंगत अंदाज असतात. गृहित कृत्यामुळे संशोधकाला दिशा प्राप्त होते, परिणामी उत्तरे मिळू शकतात. एकाच प्रकारच्या आधार सामग्रीचे साधम्र्य असणाऱ्या व विशिष्ट हेतूभोवती असणाऱ्या आधार सामग्रीचे संग्रहण करण्यासाठी संशोधकाला गृहित कृत्याचा उपयोग होतो. अन्वेषण प्रश्नाच्या स्वरूपात निर्माण केलेल्या समस्येचे संभाव्य उत्तर मानण्याचे कारण म्हणजे संशोधन पूर्ण होईपर्यंत तेच खरे उत्तर आहे हे आपणास माहीत नसते. संग्रहित माहितीच्या आधारे ते स्वीकृत वा अस्वीकृत ठरविले जाते; परंतु शोध कोणत्याही बाजूचा असो संशोधकाने मात्र नवीन ज्ञान शोधून काढले आहे. स्पष्टीकरणार्थ एक सोपे उदाहरण घेऊ. एखादी व्यक्ती रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी धडपडत आहे. त्याला एक बस दिसते. तो बसचा नंबर पाहतो व गृहित धरतो की, १५ नंबरच्या बसने त्याला रेल्वे स्टेशनला जाता येईल. हे गृहित कृत्ये सत्य आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. बसमधून प्रवास करतेवेळी त्याला असे आढळून येते की, बस रेल्वे स्टेशनवर न थांबता विमानतळाकडे जाते. अशा तऱ्हेने मूळचे गृहितक अस्वीकृत ठरते. याचा अर्थ त्या व्यक्तीचा प्रवास व्यर्थ गेला का? असे होत नाही. त्या व्यक्तीला महत्त्वाचे ज्ञान मिळालेले आहे. दुसऱ्या वेळी त्याला रेल्वे स्टेशनला जाण्याची वेळ येईल तेव्हा तो १५ नंबरच्या बसने जाणार नाही. याउलट त्याला जर विमानतळावर जायचे असेल तर निश्चितपणे तो १५ नंबरच्या बसने प्रवास करील.
अभ्यासविषयाचे महत्त्व
संशोधकाने निवडलेल्या अभ्यासविषयाचे महत्त्व निवेदन करण्याचा सर्वसामान्य प्रघात आहे.
महत्त्व स्पष्ट करण्यासाठी तो संशोधन समस्येकडे व्यापक संदर्भातून पाहत असतो व त्याची व्यावहारिक दृष्टिकोनातून उपयुक्तता समर्थन करण्याचा प्रयत्न करतो. संशोधनासाठी अनुदान प्राप्त करून द्यावयाचे असेल तर संशोधन आराखडय़ातील हा भाग अत्यंत महत्त्वाचा आणि परिणामकारक आहे.
संशोधन प्रक्रियेत संशोधनयोग्य समस्येचा शोध ही पहिली पायरी आहे. एकदा समस्या शोधल्यानंतर व्याकरणदृष्टय़ा अचूक वाक्यात समस्या मांडणे आवश्यक असते. निवड केलेल्या समस्येचे उपसमस्यांमध्ये विभाजन करून आणि समस्येची मर्यादा स्पष्ट करून संशोधन कार्यक्षेत्र मर्यादित करता येते. समस्येचे वर्णन समस्या मर्यादित करून, योजलेल्या संज्ञांची व्याख्या देऊन तसेच गृहितके व गृहित कृत्ये स्पष्ट करून करता येते. संशोधनाचे स्वरूप व्यापक सामाजिक संदर्भात स्पष्ट करणे आवश्यक असते.
रणजित राजपूत
संपर्क- ९९६९००५५५५