Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २८ जानेवारी २००९
  नव्या युगातील खेळी
  डिझाइन क्षेत्रातील आकर्षक संधी
  चला सिम्युलेशन्सद्वारे शिकूया
  श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप
  परदेशातील शिक्षणासाठी बँकांचे कर्ज
  उपसमस्यांचे निश्चितीकरण
  अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
  अ‍ॅग्रोटुरिझम
  मी निवडलेल्या क्षेत्रात..
  विकासकाचे अनोखे करिअर..
  पर्यटन क्षेत्रातील करिअर प्रवास

 

अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
नुकतीच अलाहाबाद बँकेतर्फे अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर लगेचच अलाहाबाद बँकेतर्फे लिपिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ग्लोबलायझेशनच्या या युगात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत. वेळीच आपणासाठी योग्य असणारी नोकरीची संधी ओळखून त्यानुसार वाटचाल करायला हवी. राष्ट्रीयकृत बँकांतर्फे बऱ्याच पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध होत असताना जे पात्र उमेदवार आहेत असे उमेदवार जर नोकरीपासून वंचित राहिले तर दुर्दैवीच समजावेत. म्हणून या दुर्दैवी जनतेत आपली गणना होऊ द्यायची नसेल तर या स्पर्धा परीक्षांचा व्यवस्थित अभ्यास करून त्याद्वारे नोकरी मिळवायला हवी.
अलाहाबाद बँकेतर्फे लिपिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून, ती परीक्षा १५ मार्च २००९ रोजी घेण्यात येणार आहे.
परीक्षेचा अभ्यासक्रम व तयारी
परीक्षेसाठी चार विषय असून, ही परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. यात (१) टेस्ट ऑफ रिझनिंग (२) न्युमरिकल अ‍ॅबिलिटी टेस्ट (३) क्लेरिकल अ‍ॅप्टिटय़ुड टेस्ट (४) इंग्रजी हे चार विषय आहेत. यात पैकी इंग्रजी भाषा ही गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत अवलंबिण्यात येणार आहे.
टेस्ट ऑफ रिझनिंग
या घटकांत एकूण ५० प्रश्न असून, त्यासाठी ७५ गुण आहेत. यात शाब्दिक बुद्धिमापन चाचणी, तसेच अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी या घटकांत आकृतीशी निगडित प्रश्न विचारले जातात. यात आकृतींची मालिका
पूर्ण करणे, समान संबंध असणारी आकृती पर्यायातून निवडणे, दिलेल्या आकृतींपैकी विसंगत आकृती शोधणे, आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायांतून निवडणे, आकृतीची पाण्यातील प्रतिमा पर्यायांतून निवडणे, समान-संबंध असणारी आकृत्यांची जोडी पर्यायांतून निवडणे, एखादा कागद ठराविक ठिकाणी घडी घालून पुन्हा उघडल्यास तो पर्यायांतील कोणत्या आकृतीप्रमाणे दिसेल?
शाब्दिक बुद्धिमापन चाचणी या घटकांत वर्णमालिका, संख्यामालिका, दिशाविषयक प्रश्न, नातेसंबंध, विसंगत घटक ओळखणे,
 
कंसातील संख्या शोधणे, आकृतीतील गाळलेल्या जागी पर्यायातील योग्य संख्या लिहिणे, अक्षरांची लयबद्ध रचना, बैठक व रांगेतील प्रश्न, तुलनात्मक प्रश्न, माहितीचे पृथक्करण, आकृत्यांची संख्या ओळखणे, वेन-आकृत्या विधाने- अनुमान कार्य- कारण भाव या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असतो.
न्युमरिकल अ‍ॅबिलिटी टेस्ट
यात संख्या व संख्याप्रणाली, लसावि आणि मसावि, सरळरूप द्या, केचाभागुबेव (इडऊटअर) नियमावर आधारित प्रश्न, बैजिक राशींवर व सूत्रांवर आधारित प्रश्न, शतमान-शेकडेवारी, सरासरी गुणोत्तर- प्रमाण, भागीदार, नफा-तोटा, काळ-काम व वेग, अंतरवेग व वेळ, नळ व हौद, आगगाडीवरील उदाहरणे, बोट व प्रवाहावरील उदाहरणे, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ, मिश्रणावर आधारित प्रश्न आलेखावर आधारित प्रश्न, पृष्ठफळ व घनफळ, समांतर रेषा, भूमिती या घटकांवरील प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
या घटकाच्या अभ्यासाकरिता दररोज किमान ५० उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा. अभ्यासात सातत्य राखणे फार गरजेचे आहे. या घटकात एकूण ५० प्रश्न असून, त्यासाठी ७५ गुण ठेवण्यात आले आहेत.
क्लेरिकल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट
या घटकांत एक नाव व पत्ता दिलेला असताना त्याच्याशी तंतोतंत जुळणारा नाव व पत्ता पर्यायातून शोधायचा असतो. त्याचप्रमाणे या घटकांत बुद्धिमापन चाचणी या घटकाशी निगडित काही प्रश्नांचा समावेश केलेला असतो. यात शब्दांची रचना शब्दकोशाप्रमाणे करणे, सांकेतिक भाषेवर आधारित प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो. या घटकांत एकूण ५० प्रश्न असून, यासाठी ५० गुण ठेवण्यात आले आहेत.
इंग्रजी भाषा
या घटकांत ५० प्रश्न असून, त्यासाठी ५० गुण आहेत. या विषयात पास होणे आवश्यक आहे, तसेच हा विषय गुणवत्ता यादीसाठी मोजला जात नाही. यात व्याकरणविषयक प्रश्नांचा समावेश असतो. यात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, वाकप्रचार व म्हणी, उताऱ्यावरील प्रश्न, गाळलेल्या जागी योग्य शब्द पर्यायातून, काळ ओळखून पर्यायांतील योग्य पद निवडणे, शब्दांची पुनर्रचना करून लिहिणे, अशा प्रश्नांचा या घटकांत समावेश केलेला आहे.
इंग्रजी या विषयाच्या अभ्यासाकरिता जी. डी. मोरे लिखित मेथॉडिकल इंग्लिश ग्रामर हे पुस्तक उपयोगी पडते. तसेच अवांतर वाचनाची ही सवय आपणास गुण वाढविण्यास मदत करते. लक्षात ठेवा! यश एका रात्रीत मिळत नाही त्यासाठी अथक परिश्रम, योग्य दिशेने अभ्यास, नियोजनपूर्ण सराव, चिकाटी व नोकरी मिळविण्यासाठी जिद्द या सर्व गोष्टींचा संगम म्हणजेच नोकरी मिळविण्यासाठी असणारा राजमार्ग आहे.
नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. आता संगणक ज्ञानाला पर्याय उरलेला नाही एवढेच नव्हे तर संगणकाचे ज्ञान हे बँकेत काम करण्यासाठी अत्यावश्यक आहे. आता जवळपास सर्व बँका या संगणकीकृत झाल्या आहेत. तसेच आज आपण फक्त अर्ज ऑन-लाइन करतो आहोत कदाचित काही वर्षांनंतर परीक्षादेखील ऑन-लाइन द्यावी लागेल. म्हणूनच नवीन शिकण्याचा ध्यास करतानाच या बँकांच्या परीक्षेची योग्य प्रकारे तयारी करून नोकरी मिळवा. तुमच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा.
प्रा. संजय मोरे
फोन : ९३२२३५०४६६