Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २८ जानेवारी २००९
  नव्या युगातील खेळी
  डिझाइन क्षेत्रातील आकर्षक संधी
  चला सिम्युलेशन्सद्वारे शिकूया
  श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप
  परदेशातील शिक्षणासाठी बँकांचे कर्ज
  उपसमस्यांचे निश्चितीकरण
  अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
  अ‍ॅग्रोटुरिझम
  मी निवडलेल्या क्षेत्रात..
  विकासकाचे अनोखे करिअर..
  पर्यटन क्षेत्रातील करिअर प्रवास

 

जागतिक पर्यटन आणि प्रवास परिषदे (डब्ल्यू. टी. सी.) च्या अहवालानुसार पर्यटन व्यवसायाने भारतात १७.४ दशलक्ष रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. यावरून पर्यटन व्यवसायाचे माहात्म्य लक्षात येते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी पर्यटन व्यवसायाला भारतात चांगलाच वाव आहे. कृषी पर्यटन (अ‍ॅग्रो टुरिझम) ही संकल्पना मूळची ब्राझील, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमधील. आज कृषी पर्यटन संकल्पना चांगलीच रुजू लागली आहे.
कृषी पर्यटनाचा विस्तार व विकास होण्याच्या दृष्टीने ऑगस्ट २००५ मध्ये अ‍ॅग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेची स्थापना झाली. त्या संस्थेने महाराष्ट्रात ५० हून जास्त नवीन कृषी पर्यटन स्थळे जाहीर केली आहेत.
आजच्या हेक्टिक लाईफ स्टाईलमध्ये काही काळ निवांत, शांत, मोकळ्या वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात घालवावेत असे प्रत्येकाला वाटते. पर्यटनासाठी वर्षांतून एकदाच नव्हे तर त्याहून अधिक वेळा जाण्याची प्रथाच जणू पडली आहे. आज देशी, परदेशी अनेक पर्यटन स्थळे चांगलीच विकसित झाली आहेत. पर्यटन वाढावे, लोकांनी त्या स्थळांना भेटी द्याव्यात म्हणून त्यांचे रूपच बदलून टाकले आहे, त्यामुळे त्याला कृत्रिमेतचा स्पर्श आहे.
ऐतिहासिक पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ, पर्यटनाची गाजलेली स्थळे, थंड ठिकाणं पाहून तोचतोचपणा पर्यटनात जाणवतो, त्यामुळे
 
लोकांमध्ये वीकेण्ड साजरा करण्यासाठी, छोटय़ा सुट्टय़ांच्या सहलीसाठी निसर्गाच्या कुशीत विसाव्यासाठी चार क्षण घालवण्याची इच्छा वाढू लागली आहे. त्यामुळे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ ही संकल्पना खूप वाढीस लागली आहे आणि या क्षेत्रात स्वयंरोजगाराला प्रचंड वावदेखील आहे. समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे ही जसे पर्यटकांचे हॉट स्पॉट आहेत त्याचप्रमाणे कृषी पर्यटनालासुद्धा प्रचंड वाव मिळू शकतो.
‘कृषी पर्यटन’ हा उद्योग हा शेतकरी ग्रामीण भागातील तरुण करू शकतात. फक्त गरज आहे तो त्या स्थळाचा थोडा विकास करण्याची. भारतीय खेडय़ांमध्ये देशी संस्कृतीचा, वास्तुकलेचा, शिल्पकलेचा, लोक संस्कृतीचा आणि हस्तकलेचा अनोखा ठेवा आहे. देशी-परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कृषी पर्यटन हे पर्यटनाचे चांगले माध्यम होऊ शकते. ग्रामीण संस्कृतीची देशी-विदेशी पर्यटकांना ओळख व्हावी म्हणून मुंबई व अन्य महानगरांमध्ये प्रदर्शने, मेळावे आणि कला महोत्सवाचे आयोजन केले जाते पण ते कृत्रिम वाटते. खेडय़ातील ग्रामस्थांच्या जीवनशैलीचा अनुभव शहरी भागातील लोकांनी घेण्यासाठी तेथे काही दिवस राहून ग्रामीण पर्यटनाचा आस्वाद हा पर्याय होऊ शकतो. लोणावळा, खंडाळा, नेरळ, कर्जत, रत्नागिरी, माथेरान, चिखलदारा, भंडारदारा, भीमाशंकर, महाबळेश्वर या ठिकाणी लोक पर्यटनाला जात असतात अशा ठिकाणी कृषी पर्यटनाची सोय असेल तर पर्यटकाला औरच मजा येईल.
शहरातील लोकांनी गावच्या निसर्गरम्य ठिकाणी जायचं. शेतीची माहिती घ्यायची, मनोसक्त भटकायचं, तिथं राहायचं, शेतावर जेवायचं. तेथील शेतकऱ्याने पर्यटकाने, शेतावरून फिरवून आणायचं, निसर्गाच्या गमतीजमती, वेगवेगळ्या पिकांची माहिती द्यायची. त्यामुळे शहरी जीवनात वाढणाऱ्या मुलांना ग्रामीण भागाची ओळख होईल, तिथे चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती होईल व निसर्गाच्या सान्निध्यात खूप काही शिकता येईल.
कृषी पर्यटन स्वयंरोजगाराचे चांगले माध्यम होऊ शकेल, कृषीवर आधारित इतर उद्योगांपैकी कृषी पर्यटन हा अनोखा उपक्रम आहे. कृषी पर्यटन व्यवसाय करू इच्छिणाऱ्याला पाहुण्यांची जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, त्यांच्यासाठी मनोरंजनाची साधने पर्यटकांना उपलब्ध करून देता येतील.
कृषी पर्यटनातील वेगळेपणासाठी काय, काय करता येईल..
४ विविध प्रकारच्या झाडांची लागवड काही एकरात करता येईल.
४ बहुगुणी वनौषधींची लागवड, विविध फुलांची, निर्यातक्षम फुलांची लागवड करता येईल.
४ पर्यटकांसाठी टुमदार कौलारू घरे, झावळ्यांची घरे बांधता येतील.
४ वनभोजनाचे आयोजन करता येईल,
(पिठलं-भाकरी, कांदा, चटणीसारखं मराठमोळं जेवण इ.)
४ बैलगाडीची सफर करवता येईल.
४ शेळीपालन, कुक्कुटपालनसारखे उपक्रम हाती घेता येतील.
४ शास्त्रीय पद्धतीने मत्स्य उत्पादन करता येईल.
४ योगा सेंटर, ध्यानसाधना केंद्र तिथे सुरू करता येईल.
शेतावर केलेले विविध उपक्रम, वराहपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, ग्रामीण
भागातील धार्मिक, सांस्कृतिक ठिकाण, मंदिर, ऐतिहासिक वारसा, इ. गोष्टींची माहिती टुरिस्ट गाईडप्रमाणे देता येईल, त्यामुळे कृषी पर्यटन हे सुखावह होईल.
झुणका, भाकरी, मिरच्यांचा ठेचा असं काही साधंसुधं जेवणापासून ग्रामीण भागातील सुग्रास पदार्थ असा बेत ठेवून, पायी, बैलगाडीने शेताचा फेरफटका मारायचा. शेतीची माहिती, ग्रामीम कलांचं प्रदर्शन असं खूप काही करता येऊ शकेल.
कृषी पर्यटन आणि पर्यटन उद्योगावर आधारित सेवा उद्योगांसाठी मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे स्थानिक रोजगारसुद्धा निर्माण होऊ शकतो. ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगाराचा एक चांगला मार्ग उपलब्ध होऊ शकेल असं वाटतं. कृषी पर्यटन ही स्वयंरोजगाराची उत्तम दिशा तर होईल पण शेतकऱ्यांना केवळ आर्थिक सुबत्ताच नव्हे तर प्रतिष्ठादेखील प्राप्त करून देता येईल.
सारिका भोईटे-पवार
फोन: ९८१९५९७१३२/ २५३७९९४४.