Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २८ जानेवारी २००९
  नव्या युगातील खेळी
  डिझाइन क्षेत्रातील आकर्षक संधी
  चला सिम्युलेशन्सद्वारे शिकूया
  श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप
  परदेशातील शिक्षणासाठी बँकांचे कर्ज
  उपसमस्यांचे निश्चितीकरण
  अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
  अ‍ॅग्रोटुरिझम
  मी निवडलेल्या क्षेत्रात..
  विकासकाचे अनोखे करिअर..
  पर्यटन क्षेत्रातील करिअर प्रवास

 

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला अमीर खानचा ‘तारे जमीन पर’ हा सर्वागसुंदर चित्रपट आपल्यापैकी बऱ्याचजणांनी पाहिला असेलच. अत्यंत नाजूक व अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घालणारी कथा आणि दर्शिल सफारी या बालकलाकाराचा डोळ्याचे पारणे फिटवून टाकणारा उत्तुंग उंचीचा अभिनय आणि साहजिकच अमीर खानसारख्या ‘परफेक्शनिस्ट’ कलाकाराचे पाठबळ यामुळे या चित्रपटाला मिळालेले अफाट यश हे वादातीतच आहे. परंतु या चित्रपटामध्ये जो विषय हाताळला गेला तो विषयच इतका जबरदस्त होता की, एक शैक्षणिक ज्वलंत समस्येची जाणीव संपूर्ण भारतवर्षांतील पालक, शिक्षक, प्रशासक यांची मानसिकता बदलण्यास नक्कीच कारणीभूत ठरला, असा हा चित्रपटाचा विषय होता. अध्ययन अक्षमता (Learning disability) कित्येक सामान्यजनांना तर हा विषय ऐकूनदेखील माहीत असण्याची शक्यता जवळजवळ शून्यच होती. या सिनेमातून मिळालेला संदेश सर्वच पालकांनी, शिक्षकांनी आणि प्रशासकांनीसुद्धा लक्षात
 
घेण्यासारखाच आहे. तो म्हणजे अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांचे वेगळेपण लक्षात घेऊन त्यांना योग्य वागणूक व योग्य अध्यापन पद्धतीचा वापर केला तर त्यांच्यामध्ये असलेल्या उपजत क्षमतेचा व बुद्धिमत्तेचा वापर करून ते निवडलेल्या क्षेत्रात उत्तम यश मिळवून स्वत:चे करिअर इतर सर्वसाधारण मुलांप्रमाणे घडवू शकतात. म्हणून या विद्यार्थ्यांना पालक, शिक्षक व इतरही समाजातील जबाबदार घटकांनी सर्वतोपरी मदत करून त्यांना त्यांच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यास, आयुष्य घडविण्यास प्रोत्साहन द्यायलाच हवे, नव्हे तो त्यांचा हक्कच आहे. युनिसेफने प्रसिद्ध केलेल्या ''Rights of the child'' या पुस्तिकेतील कलम २३ नुसार मान्यच करण्यात आलेले आहे की, शारीरिक अथवा मानसिकदृष्टय़ा अपंग मुलांनाही स्वावलंबी व मानाचे आयुष्य जगता यावे व समाजात मिसळता यावे तसेच अशा मुलांची विशेष काळजी घ्यावी, हा त्यांचा हक्कच आहे.
अध्ययन अक्षमतेचा इतिहास असे सांगतो की, प्रथम अध्ययन अक्षमता असलेल्या व्यक्तीला ‘रीडिंग ब्लाइंडनेस’ आहे असे म्हटले जाई. तद्नंतर १८८७ मध्ये डॉ. बर्लिन यांनी त्या आजाराला ‘डिस्लेशिया’ असे नाव दिले. डिस्लेशिया याचा अर्थ ‘शब्दाच्या बाबतीत अडचण निर्माण होणे’ असा होता. पुढे १८८८ मध्ये एका मुलामध्ये ही अडचण आढळून आली. त्या मुलाची शिक्षिका म्हणत असे की, ‘जर याला सर्व सूचना तोंडी दिल्या व त्याने तोंडी उत्तरे दिली तर तो वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी ठरतो.’ डॉ. पिंगले मॉर्गन यांनी प्रथम ही समस्या ओळखली. १९२५ मध्ये डॉ. सॅम्युअल यांनी यामध्ये मेंदूच्या वाढीशी निगडित समस्या मांडल्या व बऱ्याच नवीन शिकवण्याच्या पद्धतींचा शोध लावला. पुढे १९८१ मध्ये इंग्लंड व स्कॉटलंडमध्ये अशा मुलांसाठी विशिष्ट व्यवस्था पद्धती अवलंबण्यासाठी विशेष कायदा करण्यात आला. १९९५ मध्ये भारतामध्ये ‘पर्सन विथ डिसएबिलिटी अ‍ॅक्ट’ अमलात आला. मात्र यामध्ये अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांचा समावेश नाही.
कोणत्याही समाजात जशी शरीराने सुदृढ माणसे असतात, तशीच शरीराने अपंगही असतात. शाळा समाजाची छोटी प्रतिकृतीच आपण मानतो. त्यामुळे शाळेतही जशी हुशार, अपंग, एकपाठी, मंदबुद्धीची, शरीराने सशक्त अशी नानाविध मुले असतात. यामध्ये काहींच्या वेगळ्याच समस्या असतात. सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा काही मुले त्यांच्या विशिष्ट समस्यांमुळे वेगळी असतात. काही वेळा विद्यार्थ्यांच्या या समस्या शिक्षकांना समजतातही, परंतु अनेक वेळा विद्यार्थ्यांची समस्या लक्षात न आल्याने असे विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे पडतात. यामध्ये अध्ययन अक्षमता असलेले विद्यार्थी असू शकतात. शिक्षकांना अशा विद्यार्थ्यांसाठी काही वेगळे प्रयत्न करणे गरजेचे ठरते. या विद्यार्थ्यांच्या समस्या म्हणजे त्यांना वाचनास खूप वेळ लागतो. लेखन-वाचनात सुधारणा लवकर होत नाही, ते गृहपाठ नीट करत नाहीत. वास्तविक ती सर्वसामान्य मुलांप्रमाणेच असतात. या अध्ययनातील अडचणीमुळे ती अध्ययन अक्षमता या प्रकारात मोडतात. ही मुले बाकी बाबतीत तर खूपच समज असलेली दिसतात. त्यामुळे त्यांची समस्या समजणे कठीण जाते. यामुळेच विद्यार्थ्यांवर ‘ढ’ पणाचा शिक्का बसतो. परिणामी त्यांची प्रगती किंवा शैक्षणिक विकास खुंटण्याची जास्त शक्यता निर्माण होते. तज्ज्ञांच्या मते मनोदौबल्य, दृष्टिदोष, वर्तनदोष, आर्थिक समस्या, सांस्कृतिक मागासलेपण, कमी बुद्धिमत्ता, निकृष्ट अध्यापन यामुळे अध्ययन समस्या निर्माण होतात, तर केंद्रीय संस्थेच्या विशिष्ट अकार्यक्षमतेमुळे (मेंदूतील दोषांमुळे) किंवा वातावरणाचा परिणाम झाल्यामुळे, तसेच भावनिक किंवा वर्तनातील बिघाडामुळे अध्ययन अक्षमता निर्माण होऊ शकतात. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांचा बुद्धय़ांक सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो, परंतु तरी समवयस्क मुलांप्रमाणे शैक्षणिक प्रगती करून घेण्यात ती मागे पडतात. मात्र योग्य मार्गदर्शनाने अशा व्यक्ती खूप यशस्वी करिअर घडवू शकतात. विन्स्टन चर्चिल हे अध्ययन अक्षमता असलेले असूनही वाङ्मयाचे नोबेल पारितोषिक विजेते होते. न्यूटन, एडिसन, व्रुडो विल्सन, लिओनार्दो द व्हिन्सी, अल्बर्ट आईन्स्टाईन ही एवढी मोठी माणसे याच अध्ययन अक्षमतेची शिकार होती असे मानले जाते. खरं तर आइन्स्टाईनच्या मेंदूमध्ये ‘परायटललोब’ या मेंदूच्या भागाची वाढ सामान्य लोकांच्या मेंदूपेक्षा जास्त होती. म्हणून त्याच्यात गणिताची आणि स्पेस-अंतराळ समजण्याची क्षमता जास्त होती. त्यामुळे त्याने थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा सिद्धान्त मांडला. आइन्स्टाईनसारखी सहजता प्रत्येकाला शक्य नाही, याचे कारण म्हणजे मेंदूची वाढ व क्षमता होय. मात्र त्यांच्यामध्ये लिहिण्या-वाचण्याची क्षमता कमी होती.
समाजात अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांचे प्रमाण १० ते १५% असते. अशी मुले लेखन, वाचन, पाठांतर यात अगदीच मागे असतात. दिशा आणि वेळ यांची नीट जाण नसते. परंतु तांत्रिक काम किंवा कलाकुसरीतील नवनिर्मिती यात ती चांगली गती दाखवू शकतात. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांमध्ये इतरांमध्ये सहसा न आढळणारी प्रतिभा असते, जिला योग्य मार्ग व वळणाची गरज असते. यासाठी शिक्षक व पालक यांनी फार समजूतदार असावे लागते. साधारणपणे आई-वडील सुरुवातीला आपले मूल असे असेल हे मान्यच करत नाहीत. शेवटी नाइलाजाने ते आपल्या मुलाचे हे वैगुण्य स्वीकारतात. आई-वडिलांनी आपले मूल आहे हे एकदा मान्य केले की मग अनेक मार्ग मुलांचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने उपलब्ध होऊ शकतात. अध्ययन अक्षमतेमागील निश्चित कारण सांगता येणे कठीण आहे. मात्र ही अक्षमता आनुवंशिक असू शकते. जन्मत:च अशा मुलांच्या मेंदूच्या पेशींची रचना व करय नेहमीपेक्षा वेगळी असतात. हा दोष मेंदूच्या विकासामध्ये मुळातच असू शकतो. याव्यतिरिक्त जन्माच्या वेळी मेंदूला काही कारणांमुळे सौम्य इजा पोचली, उदा. फोरसेप डिलिव्हरी, आकडी येणे, मूल गुदमरणे किंवा अकाली प्रसूती, इ. कारणांमुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला तर ही समस्या निर्माण होते. निसर्गत:च डाव्या हाताने लिहिणाऱ्या मुलाला उजव्या हाताने लिहिण्याची सक्ती केल्यासही ही अक्षमता निर्माण होऊ शकते, असे मानले जाते.
अध्ययन अक्षमतेचे अनेक प्रकार आहेत. मात्र त्यातील तीन महत्त्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे-
१) डिसलेक्सिया (Dyslexia)- यामध्ये वाचनातील अक्षमता/ लेखन वाचन अक्षमता ज्याचा परिणाम वाचन, स्पेलिंग, बोलणे, ऐकणे व त्यानुसार लिहिणे यावर दिसतो.
२) डिसग्राफिया (Dysgvaphia)- म्हणजे वाचलेले व अभ्यास केलेले लिहिता न येणे. हस्ताक्षर वाईट असते. पेन-पेन्सिल योग्य तऱ्हेने धरत नाहीत. तसेच पेपर आकार व हस्ताक्षर आकार यांचा सहसंबंध ठेवता येत नाही. त्यामुळे लिखाण गचाळ दिसते. साधारणपणे या दोन्ही अक्षमता एकत्र आढळतात. मात्र कधी कधी एखाद्या मुलात यातील एकच आढळते.
३) डिसकॅलक्युलिया (Dyscalculia)- यात गणिती आकडेमोडीत गोंधळ दिसून येतो. गणित सोडविण्यासाठी लागणारी गणितीय विचारशक्ती, कारणमीमांसा करण्याची शक्ती यात अडचण असते. अमूर्त कल्पनांवर आधारित भूमिती, त्रिकोणमिती वगैरे गणित कठीण जाते.
वैज्ञानिकांनी या संदर्भात केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, मेंदूच्या कार्यात काही अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे भाषाक्षेत्र व दृष्टिक्षेत्र या दोन भागांत होणाऱ्या संकेतांच्या देवाण-घेवाणीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. उदा. जर ‘लोकसत्ता’ हा शब्द तुम्ही वाचत आहात, तर दृष्टीकडून मेंदूच्या मागच्या भागाला ‘लोकसत्ता’ या शब्दाकडून येणारे प्रकाशकिरण पोहोचतात. दृष्टिक्षेत्र ‘लोकसत्ता’ ही अक्षरे ओळखते. नंतर मेंदूत साठविलेल्या शब्दसमूहातील शब्दांशी ‘लोकसत्ता’ या अक्षरांची तुलना होते. (स्मरणशक्तीचं कार्य) आणि मग ‘लोकसत्ता’ हा शब्द वाचला जातो. जर या क्रिया नीट झाल्या नाहीत तर आपल्याला हा इतका सोपा शब्द वाचायला कठीण जाईल. नेमके हेच ‘डिसलेक्सिया’ असलेल्या मुलांचे होते, त्यामुळे त्यांना वाचा असे सांगूनही वर सांगितलेली प्रक्रिया नीटपणे घडत नसल्याने ते वाचन टाळतात. अध्ययन अक्षमता आहे की नाही हे ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांला प्रथम योग्य प्रशिक्षित तज्ज्ञाकडे तपासणीसाठी पाठवून विद्यार्थ्यांचा संपूर्ण इतिहास, पूर्वपीठिका, झालेले आजार, औषधोपचार, विकासातील टप्पे याची माहिती घेतली जाते. दृष्टिदोष, श्रवणदोष, Neurlogical तपासणी करण्यात येते. मानसशास्त्रीय कसोटय़ांच्या बुध्दयांक काढला जातो. शैक्षणिक मूल्यमापन केले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांची कुवत, अडचणी व उत्तम बाबी लक्षात येतात. लेखन, वाचन, शब्दसंग्रह, एकाग्रता, स्मरणशक्ती, डाव्या - उजव्या मेंदूचा समन्वय वगैरेची परीक्षा घेतली जाते. बालरोगतज्ज्ञ, न्यूरॉलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ व स्पेशल एज्युकेटर आणि पालक अशा सर्वाचा या टीममध्ये सहभाग असतो. या संपूर्ण तपासणीनंतर मुलाला कोणत्या प्रकारची अध्ययन अक्षमता आहे त्याचे प्रमाणपत्र दिले जाते. हे काम मुंबई येथे सायन हॉस्पिटलच्या बालरोग विभागात केले जाते. तसेच मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये देखील आता आणखी एका युनिटची निर्मिती करण्यात आलेली आहे. ‘अध्ययन अक्षमता’ प्रमाणपत्र असलेल्या इ. १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांना शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ घेता येईल. या सवलतींची अधिक माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांकडे किंवा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडे किंवा www.maharashtra.gov.in या वेबसाइटवर मिळू शकेल.
अशा विद्यार्थ्यांना योग्य समुपदेशन, उपचारयुक्त शिक्षण पालक- शिक्षक यांचा भक्कम पाठिंबा मिळाला तर हे विद्यार्थी स्वत:चे उज्ज्वल करिअर निर्विवादपणे घडवू शकतात. डिसलेक्सियामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आयुष्यभर राहतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती उच्च शिक्षणातसुद्धा मिळायला हव्यात म्हणजे त्यांच्यावरील विनाकारणचा ताण कमी होईल व ते आपले पुढील शिक्षण अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतील. याची महाराष्ट्र शासनाने नोंद घेणे आवश्यक आहे. थोडक्यात डिसलेक्सिया हा काही रोग नव्हे की जो आज ना उद्या बरा होईल, तर ती एक मेंदूची घडण आहे. बऱ्याच वेळा ती एक दैवी देणगीदेखील असू शकते. अध्ययन अक्षमता पूर्णत: बरी होत नाही, परंतु त्या मुलाला त्याच्यातील सुप्त गुणांचा विकास साधून, तसेच एकाग्रता वाढवण्यास मदत करून त्याची प्रगती घडवून आणता येईल. अशा मुलांच्या क्षमतांचा विकास वाढीला लावण्यासाठी पालकांनी त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीस लावायला हवा. त्यांचा उत्साह टिकवून ठेवता येईल अशा रीतीने त्यांच्याशी वागणे आवश्यक आहे. शाळेत शिक्षकांनीदेखील या विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्याशी वागले पाहिजे. शक्य तेव्हा वैयक्तिक लक्ष पुरवावयास हवे. त्यांच्यातील आत्मसम्मान जागृत करणे आवश्यक आहे. असे जर झाले तर ही मुले आपल्या करिअरमध्येच 'miracle' घडवू शकतात, बऱ्याचदा असेही होते की योग्य मार्गदर्शनाअभावी, प्रोत्साहनाअभावी हीच मुले मागेदेखील राहतात. न्यूनगंडाने पछाडतात, कोमेजून जातात. त्यांना आवश्यकता असते आपल्या प्रोत्साहनाची, योग्य शब्दांची.. आकाशामध्ये भरारी घेण्यासाठी!
सुहास कदम
suhaskadam11@yahoo.in