Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २८ जानेवारी २००९
  नव्या युगातील खेळी
  डिझाइन क्षेत्रातील आकर्षक संधी
  चला सिम्युलेशन्सद्वारे शिकूया
  श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप
  परदेशातील शिक्षणासाठी बँकांचे कर्ज
  उपसमस्यांचे निश्चितीकरण
  अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
  अ‍ॅग्रोटुरिझम
  मी निवडलेल्या क्षेत्रात..
  विकासकाचे अनोखे करिअर..
  पर्यटन क्षेत्रातील करिअर प्रवास

 

‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येतसे फार’ या काव्यपंक्ती ऐकलेल्या असोत वा नसोत, प्रत्येकाच्या मनात देशाटन करण्याची जबरदस्त इच्छा ही असतेच. लहान मुलांना शाळेला सुट्टी लागली की धुरांच्या रेषा हवेत काढीत मामाच्या गावाला नेणाऱ्या आगीनगाडीची स्वप्नं पडायला लागतात. ट्रिप, पिकनिक, सहल हे शब्द शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात उत्साहाचं वारं भरतात. तरुणाईची तर गोष्टच निराळी. कोणाला पर्वतराज हिमालयाचं आकर्षण असतं तर कोणाला ताडोबाच्या जंगलात भटकंती करावयाची असते. विवाहेच्छूंच्या बाबतीत तर लग्नाच्या कार्यालयाच्या बुकिंगपाठोपाठ हनिमूनसाठी काश्मीर, उटी नाहीतर गेला बाजार महाबळेश्वर, माथेरान इथल्या हॉटेलचं बुकिंग केलं जातं. आग्रा येथील ताजमहाल, अजंठा-वेरूळची लेणी, म्हैसूरचा राजवाडा, कोणार्कचं सूर्यमंदिर यांसारख्या अनेक पर्यटनस्थळांचा विचार कौटुंबिक सहल आखताना केला जातो. घरातल्या आजी-आजोबांना एकदा काशी-मथुरेत जाऊन तिथल्या देवळात डोकं टेकवायचं असतं. आजकाल उच्च मध्यम वर्गीयांच्या हातात बराच पैसा खुळखुळायला लागतो. जोडीला बँकांच्या पर्यटन कर्ज योजना आहेत.
आपल्या देशात केंद्र सरकारनं पर्यटन व्यवसायाचं महत्त्व ओळखून गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वकरीत्या पर्यटन स्थळांचा विकास करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. राज्यपातळीवर पर्यटन विकास महामंडळे स्थापन झाली आहेत. पर्यटन स्थळी उत्तम दर्जाची हॉटेल्स
 
सुरू झाली आहेत. उंच किल्ल्यावर थेट वपर्यंत जाऊ शकतील असे रस्ते बांधले आहेत अथवा रोप वे सुरू केले आहेत. कार्यक्षम पर्यटन संस्था आज प्रवाशांना तत्पर सेवा द्यायला उत्सुक आहेत. इंटरनेटच्या साहाय्याने आज प्रवासाचं संपूर्ण नियोजन, आरक्षण वगैरे करणं शक्य झालं आहे. या सर्वामुळे दूरवरच्या प्रवासाला जाणं आजकाल त्रासाचं, अनिश्चित स्वरूपाचं आणि धोकादायक राहिलेलं नाही. प्रवासाची आवड असणाऱ्या, बोलघेवडय़ा व चतुर व्यक्तींना या पर्यटन क्षेत्रात नोकरी व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. आज पर्यटकांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरवणाऱ्या अनेक खासगी ट्रॅव्हल कंपन्या व्यवसाय करताना दिसून येतात. अशा कंपन्यांमध्ये टूर ऑपरेटर, टूर मॅनेजर, ट्रॅव्हल असिस्टंट, ट्रॅव्हल गाईड या पदांसाठी नोकरी मिळवणं शक्य आहे. या पर्यटन कंपन्या निश्चित प्रवासाच्या ‘कंडक्टेड टूर्स’ जशा योजतात त्याचप्रमाणे पर्यटकांच्या अपेक्षेनुसार ‘पॅकेज टूर्स’चेदेखील नियोजन करतात. याशिवाय रेल्वे-विमान प्रवासाची तिकिटं काढून देणं, पर्यटन स्थळाच्या हॉटेलमध्ये आरक्षण करून देणे, पर्यटकांना त्यांच्या मनातील प्रवासाचं नियोजन करून देणं अथवा आवश्यक महत्त्वाच्या संस्थांचे पत्ते वगैरे देऊन संपूर्ण प्रवासाबाबत मार्गदर्शन करणं इ. कामं या पर्यटन कंपन्या करतात. या सर्व कामांसाठी तज्ज्ञ, प्रशिक्षित व अनुभवी व्यक्तींची नेमणूक केली जाते. खासगी कंपन्यांमध्ये स्पर्धा असल्याने नेहमी नवे प्रयोग केले जातात.त्यामुळे नोकरीच्या विविध संधी कायम उपलब्ध होतात. कामाचं स्वरूप आणि कंपनीची आर्थिक स्थिती यानुसार आकर्षक पगार मिळू शकतात.
सरकारच्या पर्यटन खात्यातदेखील प्रशिक्षित व्यक्ती नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. केंद्र सरकार व राज्य सरकारचे पर्यटन खाते प्रवाशांना आकर्षण वाटेल अशा पर्यटन स्थळांची निवड करून, तेथे प्रवास-निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देते. पर्यटन स्थळांची जाहिरात करणं, टूर्सचं नियोजन करणं, राहण्याची सोय करणं, देशातील पर्यटन उपक्रमांची माहिती पुरवणं इ. कामं या विभागातर्फे केली जातात. पर्यटन कंपनीमध्ये नोकरीचा पुरेसा अनुभव प्राप्त झाल्यावर महत्त्वाकांक्षी व्यक्ती स्वत:ची पर्यटन कंपनी काढू शकते. अनुभवसंपन्न व्यक्ती नियतकालिकातून लेख लिहू शकतात. दूरचित्रवाणीवरच्या विविध वाहिन्यांवरून पर्यटनासंबंधी कार्यक्रम सादर करू शकतात. आपल्या देशात आणि महाराष्ट्रात पर्यटनासंबंधी प्रशिक्षण देणारे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ट्रॅव्हल अँड टूरिझम हा व्यावसायिक अभ्यासक्रम स्वीकारून बारावीची परीक्षा देता येते. अनेक कनिष्ठ महाविद्यालयात हा अभ्यासक्रम चालवला जातो. पुण्यात आपटे प्रशाला, आपटे मार्ग, पुणे-४ येथे हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. १९८३ साली स्थापन झालेली ‘‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट’’ ही संस्था पर्यटन प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे गोविंदपुरी भागात मुख्य कार्यालय असणाऱ्या या संस्थेच्या दिल्ली, लखनौ, कोलकाता, तिरुअनंतपूरम वगैरे शहरांतील शाखांमध्ये पर्यटनविषयक अनेक छोटे-मोठे अभ्यासक्रम चालवले जातात. यामध्ये टूर ऑपरेशन्स सव्‍‌र्हिसेस मॅनेजमेंट’’, ‘टूरिझम मार्केटिंग’, ‘हाऊ टू ओपन अँड ऑपरेट अ ट्रॅव्हल एजन्सी’ इ. अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. परंतु या संस्थेतर्फे चालवला जाणारा सर्वात महत्त्वाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम म्हणजे ‘‘डिप्लोमा इन टूरिझम मॅनेजमेंट’ होय. या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड करताना अखिल भारतीय पातळीवर लेखी परीक्षा व मुलाखती घेतल्या जातात. हा अभ्यासक्रम संस्थेच्या भुवनेश्वर शाखेत चालवला जातो. वर उल्लेख केलेल्या संस्थांशिवाय मुंबईच्या निर्मला निकेतन या संस्थेत ‘डिप्लोमा इन इंटरनॅशनल ट्रॅव्हल अँड टूरिझम’ हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम चालवला जातो. तसेच मुंबईच्या भुलाभाई देसाई मार्गावरील सोफिया कॉलेजमध्ये एक वर्ष मुदतीचा ‘डिप्लोमा इन टूरिझम मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम कोणत्याही पदवीधरांना घेता येतो. या संस्थांशिवाय हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठ, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ यांसारख्या अनेक विद्यापीठांत पर्यटनासंबंधी लहान-मोठे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
पर्यटन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी वर उल्लेख केलेले अभ्यासक्रम विचारात घेणं तर आवश्यक आहेच; पण असा व्यक्तींनी इतिहास- भूगोल या विषयाचे उत्तम ज्ञान प्राप्त केलेलं असावं. आधुनिक युग हे संगणकांचं युग आहे. तेव्हा संगणक वापरावर प्रभुत्व असणंदेखी या ठिकाणी आवश्यक ठरतं. मुळात मोकळा स्वभाव, हिंडण्या-फिरण्याची इच्छा प्रवासाची आवड आणि सर्व प्रकारच्या लोकांशी जमवून घेण्याची तयारी यांची या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यकता आहे. असं हे विलक्षण वेगानं वाढणारं आकर्षक पर्यटन क्षेत्रं. नोकरी व्यवसायाची अनेक स्टेशन्स असलेलं. या क्षेत्राला भेट द्यायची असेल तर प्रसन्न व्यक्तिमत्त्व, संभाषण कौशल्य आणि मुख्य म्हणजे प्रवासाची आवड हवी. निरनिराळ्या देशी-विदेशी भाषांचं ज्ञान, व्यवस्थापन कौशल्य आणि कोणत्याही बिकट प्रसंगाला शांतपणे तोंड देण्याचा आत्मविश्वास असेल तर या क्षेत्रात यशस्वी करिअर करणं नक्की आहे. मग काय विचार आहे? या करिअर प्रवासाची तयारी सुरू करायची आहे?
पुष्कर मुंडले