Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २८ जानेवारी २००९
  नव्या युगातील खेळी
  डिझाइन क्षेत्रातील आकर्षक संधी
  चला सिम्युलेशन्सद्वारे शिकूया
  श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप
  परदेशातील शिक्षणासाठी बँकांचे कर्ज
  उपसमस्यांचे निश्चितीकरण
  अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
  अ‍ॅग्रोटुरिझम
  मी निवडलेल्या क्षेत्रात..
  विकासकाचे अनोखे करिअर..
  पर्यटन क्षेत्रातील करिअर प्रवास

 

ठाणे येथील श्रीकांत वाड हे बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय योग्यतेचे उत्तम बॅडमिंटन खेळाडू घडविणारे अजोड प्रशिक्षक आहेत. मात्र माझ्या मते, त्यांनी प्रशिक्षित केलेला उत्तम बॅडमिंटन खेळाडू अक्षय देवलकर किंवा जिष्णू संन्याल नसून अपंग बॅडिमटनपटू गिरीष शर्मा आहे! अगदी लहान वयातच गिरीषला रेल्वे अपघातात एक पाय गमवावा लागला; परंतु त्याने हिंमत न हारता जिद्दीने प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली कसून मेहनत घेतली आणि दुसऱ्या आशियाई पॅराऑलिम्पिक स्पर्धेत बॅडिमटनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी अशा दोन्हीही गटांत अजिंक्य पदासह सुवर्णपदके मिळवून विक्रम केला. गिरीषच्या खंबीर एकाच पायाच्या पावलावर पावले टाकत मुंबईतील वीस अंध आणि चार अपंगांनी अलीकडेच २५ ते २७ डिसेंबर २००८ रोजी आयोजिलेल्या अंध- अपंगांच्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये ४७ पदके प्राप्त केली. उत्तम खेळाडू तयार होण्यासाठी जिद्द व शास्त्रशुद्ध कसून मेहनत जरुरी असल्याचे या शारीरिक व्यंग असलेल्या पण हिंमतबाज खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले.
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत सुवर्णपदक, सुशीलकुमारने कुस्तीत व वीरेंद्रसिंहने मुष्टी स्पर्धेत पदके मिळविल्यानंतर आतापर्यंत केवळ क्रिकेटमुळे झाकल्या गेलेल्या इतर खेळांमधील नवीन खेळाडूंची कामगिरी व त्या खेळांचे महत्त्व
 
यावर प्रकाश पडू लागला. विश्व बुद्धिबळ पदक त्रिवार विजेता विश्वनाथन आनंद व जागतिक महिला बुद्धिबळ खेळातील दुसऱ्या क्रमांकाची कोनेरू हम्पी, बॅडमिंटनमध्ये जागतिक ज्युनियर चॅम्पियन व जागतिक क्रमांकात महिलांमध्ये १० वा क्रमांक पटकावणारी सायना नेहवाल, भारताचा एकमेव आंतरराष्ट्रीय फॉम्र्युला-एक कार रेस चालक नारायण कार्थिकेयन, आडबाजूच्या गावातील आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला वीरधवल खाडे हा जलतरणपटू या सर्व खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व सोयी-सुविधा नसतानासुद्धा जागतिक स्तरावरील आपली योग्यता सिद्ध केली. क्रिकेट व टेनिस या खेळांतील आर्थिक आकर्षणाने बहुतांश पालक व त्यामुळे त्यांची मुले या खेळांकरिता भरपूर खर्च करतात व मेहनत घेतात यात गैर काही नाही. कारण आताच्या युगात पैशाला महत्त्व आले आहे. मात्र या खेळांशिवाय इतर भारतीय व परकीय खेळांमधूनसुद्धा प्रसिद्धी व आर्थिक प्राप्ती मिळते, इतकेच नव्हे तर कालांतराने स्वत:चा व्यवसायसुद्धा सुरू करता येतो. बडोदे येथे माणिकराव यांनी १८८० मध्ये स्थापन केलेल्या जुम्मादादा व्यायाममंदिर येथे भारतीय व्यायाम व खेळ यांचे प्रशिक्षण येथेच योगसाधना केलेल्या योगाचार्य (कै.) कुवलयानंद ऊर्फ गुणे गुरुजी यांनी लोणावळा येथे स्थापन केलेली व मुंबईत शाखा असलेली कैवल्यधाम प्रशिक्षण संस्था, याच प्रेरणेतून स्थापन झालेले दादर, मुंबई येथील समर्थ व्यायाम मंदिर व त्याचे सध्याचे संचालक उदय देशपांडे ज्यांच्या प्रयत्नांमुळे पुरलेला व दोरीचा (वेताचा) मल्लखांब, कुस्ती यांसारखे भारतीय क्रीडाप्रकार जागतिक स्तरावर पोहोचले आहेत. अलीकडच्या काळात, प्रसिद्ध बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे पुत्र गौरव हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिस प्रशिक्षक व त्याचे तोडीचे बॅडिमटन प्रशिक्षक श्रीकांत वाड, भारतीय व परदेशी व्यायामांद्वारे खेळाडू घडविणारे तळवलकर्स जिम्नॅशियम अशी अनेक नावे नजरेसमोर येतात. मात्र या यशस्वी क्रीडा व्यावसायिकांनी आपल्या उमेदीच्या काळात आवडीच्या खेळांमध्ये घेतलेल्या भरपूर मेहनतीमुळे ते व्यवसायात सुद्धा यशस्वी झाले.
आधुनिक काळात खेळाडूंसाठी प्रशिक्षक, क्रीडा व्यवस्थापक, मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, स्कोअरर कम स्टॅटिस्टिशियन, क्रीडा पत्रकार, क्रीडा वैद्यकीय उपचारतज्ज्ञ अशा विविध व्यावसायिक संधी खुणावू लागल्या आहेत. बदलत्या काळानुसार क्रीडा किंवा खेळ आता केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नसून त्याला ‘इंडस्ट्री’चा अत्याधुनिक दर्जा मिळाला आहे.
प्रशिक्षण वय
प्रगत देशांमध्ये क्रीडा क्षेत्राला राष्ट्रीय दर्जा असल्याने तेथील खेळाडूंना लहान वयापासून अनुदानासहित शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळते. याशिवाय तेथे व अलीकडे चीनमध्ये सुद्धा खेळाडूंना मानधन मिळते. भारतातील वेगवेगळ्या खेळांतील अनुभवी खेळाडू तसेच प्रशिक्षकांच्या मते, साधारणपणे वयाच्या सहा-सात वर्षांपासून प्रशिक्षण सुरू केल्यास पुढे आठ-नऊ वर्षी तो विशिष्ट खेळ त्या खेळाडूला योग्य आहे की नाही याचा अंदाज येऊ शकतो. वयाच्या १४ व्या वर्षी व्यावसायिक खेळाडू होण्याच्या दृष्टीने निर्णय घेणे सोपे जाते. क्रिकेट, हॉकी, टेनिस, फुटबॉल या खेळांमध्ये ११-१२ वय व खो- खो, मल्लखांब, कुस्ती या भारतीय खेळांमध्ये सात-आठ वर्षे हे प्रशिक्षणासाठी योग्य समजले जाते. कोनेरू हम्पी या बुद्धिबळ खेळाडूच्या मते, अलीकडे पाच-सहा वर्षांपासून बुद्धिबळ प्रशिक्षण देणे योग्य समजले जाते. फॉम्प्र्युला कार रेस चालक नारायण कार्थिकेयनच्या म्हणण्यानुसार, अलीकडे चार-पाच वर्षांची मुले- मुली ‘पॉश’ जीममध्ये ‘गो कार्ट’ मध्ये भाग घेऊ लागली आहेत. मात्र पालकांनी या क्रीडाप्रकारात त्यांच्या आवडीचा अंदाज घेणे अत्यंत जरुरीचे आहे व कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर दबाव टाकू नये. कार रेसिंग हा जगातील सर्वात धोकादायक क्रीडाप्रकार असून त्यात एकाग्रता (कॉन्सिन्स्ट्रेशन) व समयसूचकता (अलर्टनेस) या गुणांची आवश्यकता असते.
खेळाडू असा घडतो
वेग, चपळता, काटकता व कणखरपणा- खो खो, कबड्डी, कुस्ती अशा भारतीय खेळांमध्ये नैसर्गिकरीत्या निर्माण होणारी ही खेळाडूची वैशिष्टय़े एकूण सर्व देशी- परदेशी खेळांच्या प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग असतो. खेडय़ांतील आदिवासींमध्ये मुळात असलेल्या या नैसर्गिक गुणवत्तेला शास्त्रशुद्ध व तांत्रिक प्रशिक्षणाची जोड दिल्यास ‘यशस्वी खेळाडू’ तयार होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून प्रसिद्ध झालेली राष्ट्रीय पातळीवरील अ‍ॅथलिट कविता राऊत. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाडय़ातील हरसुल गावापासून अंदाजे दहा किलोमीटरच्या अंतरावरील सावरपाडा या लहानशा आदिवासी पाडय़ातील कविता ही विद्यार्थिनी. नाशिक येथील भोसला सैनिकी महाविद्यालयात स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे अ‍ॅथलिट प्रशिक्षक विजयेंद्र सिंह यांनी कविताच्या नैसर्गिक गुणवत्तेला तांत्रिक प्रशिक्षणाची जोड दिल्यानंतर केवळ धावणे माहीत असलेल्या कविताने यंदा हैदराबाद, दिल्ली व पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय अर्धमॅरेथॉन स्पर्धेत ‘सवरेत्कृष्ट भारतीय महिला धावक’ असा बहुमान मिळवला. भारतातील बहुतांशी अ‍ॅथलिटची कामगिरी २५ ते २८ या वयोगटादरम्यान अधिक बहरत असल्याने २४ वर्षांची कविता भविष्यात उज्ज्वल यश मिळवेल अशी अपेक्षा आहे.
शारीरिक क्षमता : बडोद्याच्या दिशांत शहा या १७ वर्षांच्या अकरावीतील विद्यार्थ्यांने आपल्या सहा फूट १० इंच उंचीचा बास्केटबॉलमध्ये अचूक वापर करून भारतीय बास्केटबॉल स्पर्धेत एक अजोड विक्रम केला. केवळ सहा महिन्यांत दिशांतने १६ वर्षांखालील, १९ वर्षांखालील तसेच पुरुष गटातील अशा तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. शिवाय भारतातर्फे सर्वात अधिक गुण मिळविण्याचा व जागतिक स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा उत्कृष्ट बास्केटबॉलपटू ठरण्याचा त्याने बहुमान मिळविला. शीघ्रगतीच्या व दमछाक करणाऱ्या बॅडमिंटनमध्ये भारताच्या नंदू नाटेकर यांनी आपले चापल्य व उत्कृष्ट ‘स्टॅमिना’ यांच्या जोरावर कित्येक वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान राखले. परकीय खेळाडू आपल्या शारीरिक तंदुरुस्ती व ‘स्टॅमिना’ (लवकर न थकणे) यांच्या जोरावर सर्व क्रीडाप्रकारांत भारतीय खेळाडूंपेक्षा सरस ठरतात.
आवड, जिद्द व कठोर परिश्रम : आपल्या आवडीच्या क्रिकेटसाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने आपले बालपण विसरून अकराव्या वर्षांपासून कसून मेहनत घेतली व आपला अभ्यास सांभाळून सोळाव्या वर्षी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविले. सचिनने ऑस्ट्रेलियन क्रिकेट महर्षी सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांची बरोबरी (नंतर अधिक शतके) करण्याचा विक्रम केला, इतकेच नव्हे तर ब्रॅडमन यांच्या आदरणीय ‘स्वच्छ प्रतिमा’ याचे अनुकरणसुद्धा केले. यश, संपत्ती व मान प्राप्त झाले तरी विशेषत: तरुण वयात खेळाडूने गर्विष्ठ व उद्धट होऊ नये व आपल्या तडाखेबंद खेळाने टीकाकारांना ‘मूँहतोड’ उत्तर द्यावे असा अनुकरणीय आदर्श ‘मास्टर (जंटलमन) ब्लास्टर’ सचिन याने घालून दिला आहे. प्रत्येकाला जरी ‘सचिन तेंडुलकर’ होता आले नाही तरी केलेल्या मेहनतीमुळे व शास्त्रशुद्ध प्रशिक्षणामुळे ‘उत्तम खेळाडू’ नक्कीच होता येईल. आवड, जिद्द व कठोर परिश्रम या गुणांच्या जोरावर बडोद्याच्या १७ वर्षीय छोटय़ा चणीच्या सुखदा परळीकर हिने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्यपदक पटकावले तर गिर्यारोहणाच्या अवघड क्षेत्रात बडोद्याच्याच प्रार्थना (१९ वर्षे) व प्राची (१५ वर्षे) या वैद्य भगिनींनी राष्ट्रीय पुरस्कार, गुजरात राज्याचा सवरेत्कृष्ट गिर्यारोहक पुरस्कार मिळवला व त्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडून प्रत्यक्ष भेटीत कौतुकाची थाप मिळविली.
मनोनिग्रह (डिटरमिनेशन) : उत्तम खेळाडू होण्याची गुणवत्ता असलेली व्यक्ती आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महान ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांचे आहे. ब्रॅडमन यांनी आपल्या व्यक्तिगत कौटुंबिक दु:खांवर मात करून क्रिकेट फलंदाजीतील कौशल्य विकसित केले याची फारच थोडय़ा लोकांना कल्पना आहे. १९३६ मध्ये अवघ्या २४ तासांतच पहिल्या अपत्याच्या मृत्यूचा आघात, दुसरा मुलगा जॉन हा पोलिओग्रस्त व मुलगी शेर्ली अर्धागवायूने पीडित होती. ब्रॅडमन यांच्याशी १९६७ पासून परिचित असलेले सुप्रसिद्ध ऑस्ट्रेलियन समीक्षक माईक कॉवर्ड यांनी वरील माहिती देताना पुढे सांगितले की, ‘‘सर डॉन यांनी या व्यक्तिगत दु:खावर मात करून क्रिकेटमधील आपले कर्तृत्व सिद्ध करण्यात त्यांच्या स्वत:च्या मनोनिग्रहाबरोबरच त्यांची पत्नी जेसी हिची अजोड साथ महत्त्वाची होती. जेसी केवळ त्यांची पत्नीच नव्हे तर प्रेरणा, मैत्रीण व आत्मविश्वास होती.’’ अपंग बॅडमिंटन खेळाडू गिरीष शर्मा तसेच इतर शारीरिक व्यंग असलेल्या अंध, मूक व बधिर खेळाडूंनी याच मनोनिग्रहावर आपल्या व्यंगांवर मात करून आपले क्रीडाकर्तृत्व सिद्ध केले.
खिलाडूवृत्ती (स्पोर्टस्मनशिप) : खेळाडूमधील खिलाडू वृत्तीमुळे त्या खेळाडूचा उमदा स्वभाव लक्षात येतो, तसेच स्पर्धेमध्ये चैतन्य येते व खेळाची शान वाढते. क्रिकेट कसोटी सामन्यात पंचांनी चुकीने बाद दिलेल्या फलंदाजाला परत बोलावणारा कर्णधार विश्वनाथ जसा लक्षात राहतो तसाच विरुद्ध संघातील फलंदाजाने विश्वविक्रम करू नये म्हणून मैदान सोडून चक्क पळून जाणारा सौराष्ट्र रणजी क्रिकेट संघसुद्धा त्याच्या अखिलाडू वृत्तीमुळे लक्षात राहतो. १९४८-४९ च्या रणजी क्रिकेट मोसमात महाराष्ट्रातर्फे सौराष्ट्र संघाविरुद्ध खेळताना भाऊसाहेब निंबाळकर यांनी प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक नाबाद ४४३ धावांची खेळी केली. या सामन्यात तिसऱ्या दिवशी उपाहारास खेळ थांबला तेव्हा सर डॉन ब्रॅडमन यांचा तत्कालीन विश्वविक्रम (नाबाद ४५२) निंबाळकर यांच्यापासून केवळ नऊ धावांनी दूर होता. मात्र निंबाळकरांनी तो विश्वविक्रम करू नये म्हणून सौराष्ट्रचा रणजी क्रिकेट संघ टॅक्सी मागवून चक्क पळून गेला!
पोर्ट फोलिओ (नैपुण्याचा आलेख) : धावपळीच्या आधुनिक जेट युगात ‘रेडिमेड पोर्ट फोलिओ’ म्हणजे दोन मिनिटांत खेळाडूचे व्यक्तिमत्त्व व नैपुण्य याचे दर्शन घडविणारा आरसा असतो. ‘पोर्ट फोलिओ’मध्ये मुखपृष्ठावर खेळाडूचे छायाचित्र, आकर्षक मथळा, खेळाडूचे नाव, पत्ता, जन्मतारीख, राष्ट्रीयत्व, शाळा/ कॉलेजातील वैशिष्टय़पूर्ण प्रगती, खेळामधील खेळाडूचा वर्षांनुरूप (क्रोनॉलॉजिकल) अल्प परिचय, तत्संबंधित वर्तमानपत्रे, मासिकांतील कात्रणे, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धेमधील सहभाग तसेच विजेतेपद, गौरव आणि पुरस्कारसंबंधित प्रमाणपत्रांच्या प्रती अशी माहिती थोडक्यात पण आकर्षकरीत्या संकलित केलेली असते. केवळ एका नजरेत खेळाडूचे नैपुण्य सांगणारा ‘पोर्ट फोलिओ’ ही आधुनिक गतिमान काळाची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू
अ‍ॅथलिट पी. टी. उषा : पद्मश्री पुरस्काराने गौरविलेल्या पी. टी. उषा प्रारंभीच्या काळात रेल्वेमार्गाच्या बाजूने धावण्याचा सराव करत असत. धावण्याच्या स्पर्धेत वेग, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी नजर कुठे असावी, उभे राहताना पायाचा विशिष्ट कोन असावा या गोष्टींना त्या महत्त्व देतात. खो खो, हँडबॉल, कबड्डी या खेळांचा प्रशिक्षणात समावेश असला तर अ‍ॅथलिटना त्याचा फायदा होतो व त्यातून उत्तम खेळाडू निवडण्यास मदत होते, असा पद्मश्री उषा यांचा अनुभव आहे.
बुद्धिबळ खेळाडू विश्वनाथन आनंद व कोनेरू हम्पी : त्रिवार विश्वविजेता विश्वनाथन आनंद व महिला प्रथम क्रमांकाची विश्वविजेती कोनेरू हम्पी यांच्या जागतिक स्तरावरील यशामागे संगणक (लॅपटॉप), डेटाबेस व सॉफ्टवेअर या आय.टी. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आहे. बुद्धिबळ हा कमी खर्चिक क्रीडाप्रकार असला तरी देश-परदेश स्पर्धामध्ये भाग घेण्यास पुष्कळ खर्च येतो, असा या दोघांचा अनुभव आहे.
नेमबाज (शूटर) अभिनव बिंद्रा : बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव जरी श्रीमंत कुटुंबातील असला तरी खेळाडू म्हणून आपल्या आवडीच्या शूटिंगमध्ये त्याने भरपूर माहिती मिळविली तसेच कसून सराव केला. तंत्रज्ञानावर आधारित शूटिंगमध्ये शक्यतो परदेशी बनावटीची एअर रायफल/ एअर पिस्तोल व सराव करण्यासाठी शूटिंग रेंजची आवश्यकता असते.
बॅडिमटन खेळाडू साईना नेहवाल : जागतिक ज्युनियर चॅम्पियन व जागतिक महिला गटात १० व्या क्रमांकावर असलेल्या नेहवालच्या यशामागे वयाच्या आठव्या वर्षांपासून रोजचे पाच ते आठ तासांचे प्रशिक्षण, सकाळचा सराव, संध्याकाळी शारीरिक कसरत असे कठोर परिश्रम आहेत. या भरगच्च कार्यक्रमात अभ्यासावरसुद्धा परिणाम होतो. मात्र क्रीडा क्षेत्रात तुम्ही नाव कमावल्यानंतरच सरकारी सहाय्य सुरू होते, असा नेहवालचा अनुभव आहे.
क्रीडा व्यवसाय
आयुष्याच्या महत्त्वाच्या वर्षांमध्ये खेळामधील यशस्वी कारकीर्दीवर लक्ष केंद्रित केल्यानंतर योग्य वेळी आपल्या पुढील आयुष्याचा आर्थिकदृष्टय़ा व्यावसायिक विचार करणे अत्यावश्यक आहे. प्रगत देशांमध्ये तसेच चीनमध्येसुद्धा खेळाडूंना सरकारतर्फे मासिक मानधन मिळण्याची सोय असल्याने सर्वोत्तम खेळाडू निर्माण होण्यास मोलाची मदत होते. अलीकडील भारतीय खेळाडूंना आपल्या भविष्यकाळातील व्यावसायिक दूरदृष्टी असल्याचे खालील क्रीडा व्यवसायावरून दिसून येते.
प्रशिक्षक (कोच) : अलीकडे सर्टिफाईड संस्थांद्वारे प्रशिक्षक घडविले जात असल्याने योग्य प्रशिक्षक तयार होतात. अनुभवानुसार या व्यवसायात आकर्षक मानधन असते. प्रशिक्षणार्थी खेळाडूकडून मेहनत व आत्मविश्वासपूर्वक सहकार्य मिळविणे यात प्रशिक्षकाचे कसब असते. अलीकडच्या क्रीडाप्रकारांत तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणावर विशेष भर असतो.
प्रशिक्षण केंद्र (अ‍ॅकेडमी) : प्रशिक्षक व्यवसायाचे पुढचे पाऊल म्हणजे स्वत:ची प्रशिक्षण संस्था सुरू करणे. संबंधित खेळांमधील तुमचे नैपुण्य, अनुभव, शारीरिक क्षमता व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण सोयी-सुविधा या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. योग्य खेळाडूला अ‍ॅकेडमीकरिता पुरस्कर्ते मिळू शकतात.
समालोचक (कॉमेंट्रेटर) : आताच्या ज्येष्ठ नागरिकांच्या पिढीने ए.एफ.एस. तल्यारखान या पारशी कॉमेंट्रेटरच्या समालोचनातून क्रिकेट ‘पाहिले’! उत्कृष्ट इंग्रजी शब्दांची अचूक फेक, स्पष्ट शब्दोच्चार तसेच क्रिकेटविषयीची आवड व इत्थंभूत माहिती हे त्यांचे वैशिष्टय़ होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील ‘एएफएसटी कॉलम’ हे वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांवरील त्यांचे सडेतोड भाष्य त्या काळी बहुसंख्य क्रीडाप्रेमींचे आवडते सदर होते. रेडिओवरील समालोचन गाजवणाऱ्या तल्यारखान यांच्यानंतरच्या अलीकडील पिढीतील हर्ष भोगले यांनी देशी-परदेशी टी.व्ही. वाहिन्यांवर आपल्या उत्कृष्ट व माहितीपूर्ण समालोचनाद्वारे या व्यवसायाला अधिक उंचीवर नेले आहे. क्रिकेटमध्ये सुनील गावसकर यांचे खेळाडू ते उत्कृष्ट समालोचक असे आवर्जून नाव घ्यावे लागेल. क्रीडा स्पर्धा व टी.व्ही. वाहिन्यांच्या वाढत्या प्रसारामुळे योग्य समालोचकांना सतत मागणी असते.
क्रीडा व्यवस्थापक (स्पोर्टस् मॅनेजर) : खेळांविषयी आवड, खेळाडूमधील कौशल्याचा अंदाज घेऊन त्याला प्रसिद्धी देणे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, संवादचातुर्य, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता या वैशिष्टय़ांवर पुरस्कर्त्यांसमोर खेळ व खेळाडू याविषयी दूरदृष्टीने अचूक चित्र उभे करणे असे या व्यवसायाचे स्वरूप असते. तसेच नामांकित खेळाडूंना प्रसिद्धी, वाढते ‘मॉडेलिंग’ क्षेत्र व तत्संबंधित आर्थिक व्यवहार याचा अनुभव नसल्याने व त्यासाठी वेळ नसल्याने संबंधित संस्था व व्यक्तींशी व्यवहार करण्यासाठी क्रीडा व्यवस्थापकाची जरूरी असते. पुरस्कर्त्यां कंपनीने केवळ वर्तमानपत्रे किंवा टीव्हीवरील आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीवर विसंबून न राहता खेळ/ खेळाडू व उत्पादन यातील साम्य लक्षात घेऊन आर्थिक गुंतवणूक करावी. क्रीडा आणि मार्केटिंग याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेली कित्येक वर्षे विंबल्डन येथील टेनिस कोर्टावर टिकटिकणारे रोलेक्स या नामांकित कंपनीचे घडय़ाळ आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट : अलीकडेच झालेल्या विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे सुयोग्य आयोजन करण्यात इव्हेंट मॅनेजमेंटचा मोठा हातभार लागला. इतर क्रीडा स्पर्धा आयोजनातसुद्धा या व्यवसायाला मागणी येऊ लागली आहे. केवळ भव्य व देखणे क्रीडा सामन्यांचे आयोजन करणे एवढय़ापुरतेच या क्षेत्राचे कार्यक्षेत्र नसून गुणवत्तेवर (क्वॉलिट) भर देऊन आमंत्रित प्रेक्षक, खेळाडू व पुरस्कर्ते यांना समाधान देणारे उत्कृष्ट आयोजन करणे हे या व्यवसायाचे यश आहे.
क्रीडा पत्रकार : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार (कै.) के. एन. प्रभू यांनी आपल्या दर्जेदार व माहितीपूर्ण क्रीडा वृत्तान्ताने या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिली. पत्रकारिता पदवीधारकांना क्रीडा टीव्ही वाहिन्या तसेच वर्तमानपत्रे/ मासिके यांच्या क्रीडा सदरांकरिता वाढती मागणी असते. व्यावसायिक क्रीडा पत्रकारांना नामांकित खेळाडू, क्रीडा संस्था यांच्या सतत संपर्कात राहता येते तसेच विनाखर्च (स्वत:चा) देशातील व परदेशातील स्पर्धाना हजर राहता येते.
गुणलेखक व आकडेतज्ज्ञ (स्कोअरर- कम- स्टॅटिस्टिशियन) : कॉमेंट्रेटरचा भरवशाचा सहकारी असलेल्या या व्यवसायाला वाढत्या क्रिकेट स्पर्धामुळे उत्तम मागणी आहे. पूर्वी झालेल्या तसेच चालू स्पर्धाची आकडेवारी व वैशिष्टय़े सतत मिळविणे ही या व्यवसायाची गरज असते. संगणकामुळे ते आता सोपे झाले असले तरी संगणकाचा भारतात वापर होत नव्हता त्या काळात ठाणे येथील सुधीर वैद्य, अहमदाबादचे जगदीश बिनिवाले तसेच बडोद्याचे दिनार व कुंजेश गुप्ते हे पिता-पुत्र यांनी परिश्रमपूर्वक उत्तम माहिती साठविली व आता संगणकाच्या सहाय्याने ती अद्ययावत ठेवत आहे. दिलीप वेंगसरकर जसे ‘कर्नल’ या गौरवपूर्ण नावाने ओळखले जातात तसेच दिनार गुप्ते हे त्यांच्या क्रिकेटमधील जुन्या-नव्या माहितीमुळे क्रिकेट जगतात ‘आजोबा’ या आदरपूर्वक नावाने ओळखले जातात. सर्व विश्वचषक तसेच इतर प्रथम दर्जाच्या क्रिकेट स्पर्धामध्ये जगभरात आपली सेवा देणाऱ्या दिनार गुप्ते यांना कुठल्याही क्रिकेटपटूची विक्रमी धावसंख्या, गोलंदाजाने घेतलेले बळी, विशिष्ट वर्षांतील/ स्पर्धेतील कामगिरी याची तात्काळ माहिती देणे सहजशक्य असते. या अद्वितीय वैशिष्टय़ामुळे सुनील गावसकर दिनार गुप्ते यांना ‘चालता बोलता क्रिकेट माहिती कोश’ (Walking encyclopedia) असे म्हणतात.
पंच (अम्पायर) : प्रत्येक खेळाच्या पंचाकरिता प्रशिक्षण व अधिकृत परीक्षा असतात. सर्व स्तरांवरील स्पर्धामध्ये या पंचांना उत्तम मानधन व खेळाडूंसारख्या सुविधा असतात. कॅरम खेळात स्वत: उत्कृष्ट कॅरमपटू असलेले बडोदे येथील सुनील गुप्ते हे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅरम पंच आहेत.
क्रीडा साधने उत्पादन व विक्री : ठकङए, अऊऊकऊअर या जगप्रसिद्ध क्रीडा सामुग्री उत्पादकांची लोकप्रियता हे या व्यवसायाला असणाऱ्या उत्तम प्रतिसादाचे द्योतक आहे. मुंबईचा द्रुतगती गोलंदाज राजू कुलकर्णी याने आपल्या अकाली निवृत्तीनंतर क्रिकेट सामुग्री तसेच इतर क्रीडा साधनांचे विक्री केंद्र १५-२० वर्षांपूर्वी सुरू केले व आता आणखी शाखा सुरू केल्या. साठच्या दशकात ठाणे येथे सुरू झालेल्या गणपुले स्पोर्टस्ने आता क्रीडा सामुग्री विक्री व उत्पादन सुरू केले आहे. योगसाधनेसाठी मॅट (सतरंजी), स्त्रियांसाठी सोयीस्कर मॅट, जमिनीवर बसून योगासने करू न शकणाऱ्यांसाठी विशिष्ट खुर्ची/ सोफा अशा विविध व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत.
क्रीडा वैद्यकीय उपचार तज्ज्ञ- (उदा. मुंबईचे प्रसिद्ध डॉ. अनंत जोशी) तसेच फिजिओथेरपिस्ट, मसाजिस्ट यांनासुद्धा उत्तम मागणी असते. सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक हर्ष भोगले यांचे युवा पिढीला आवाहन आहे की, त्यांनी विकसित होणाऱ्या क्रीडा व्यवसायाचा फायदा घ्यावा. मात्र त्याकरिता दिलेला शब्द पाळणे (कमिटमेंट), श्रम करण्याची तयारी, बारीक गोष्टींची माहिती, उत्तम संभाषणचातुर्य, तत्परता, विश्वासार्हता या ‘प्रोफेशनल’ तत्त्वांचा आदर करा. व्यवसायाच्या सुरुवातीला मोठय़ा आर्थिक प्राप्तीची अपेक्षा न ठेवता व्यावसायिक अनुभव मिळवा. तुमच्या या मेहनतीला नक्कीच यशस्वी क्रीडा व्यावसायिक म्हणून मोबदला मिळेल.
प्रवीण प्रधान
०२६५-२४२०५७७