Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

क्रीडा

पहिल्या एकदिवसीय लढतीने भारत-श्रीलंका मालिकेला प्रारंभ
दम्बुला, २७ जानेवारी / पीटीआय

गेल्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेतच ३-२ ने मिळवलेल्या एकदिवसीय मालिका विजयाच्या स्मृती भारतीय खेळाडूंच्या मनात अगदी ताज्या असताना उद्या होणाऱ्या सलामीच्या लढतीने सुरू होणाऱ्या पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत तेच वर्चस्व राखण्यास भारतीय संघ उत्सुक असतानाच श्रीलंकेचे खेळाडू मात्र, त्या पराभवाची सव्याज परतफेड करण्यास सज्ज झाले आहेत. याच पाश्र्वभूमीवर उभय देशात होणाऱ्या पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे.

सुशीलकुमार, विजेंदर नाराज; पद्म पुरस्कारासाठी विचार नाही
नवी दिल्ली, २७ जानेवारी / वृत्तसंस्था

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्राला पद्मभूषण किताब देऊन गौरविण्यात आले असले तरी याच ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सुशीलकुमार व विजेंदरसिंग यांना मात्र पद्म पुरस्काराचा बहुमान मिळालेला नाही. त्यामुळे हे दोन्हीही खेळाडू नाराज झाले आहेत. कुस्तीतील कांस्यविजेता सुशीलकुमार म्हणतो की, माझे प्रशिक्षक रामफल मान यांचा पद्म पुरस्कारविजेत्या व्यक्तींमध्ये समावेश आहे. पण आमचा मात्र समावेश करण्यात आलेला नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकाविणाऱ्या खेळाडूंना सरकारने दुर्लक्षित केले आहे.

पुरुष दुहेरीत भूपती-नोएल्स उपान्त्य फेरीत
मेलबर्न, २७ जानेवारी / पीटीआय

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी संमिश्र यश देणारा ठरला. महेश भूपती व मार्क नोएल्स यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित लिएंडर पेस व कॅरा ब्लॅक यांना मिश्र दुहेरीत दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला.तिसऱ्या मानांकित भूपती-नोएल्स यांनी स्पेनची जोडी फेलिसिनो लोपेझ व फर्नान्डो व्हेरडास्को यांची झुंज ६-१, २-६, ६-४ गुणांनी मोडून काढली. भूपती-नोएल्स यांना उपांत्य फेरीत पोलंडच्या लुकाझ कुबोट व ऑस्ट्रियाच्या ओलिव्हर मराच या जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागले.

बॅडमिंटन: सई पित्रे, विघ्नेश देवळेकर यांना अजिंक्यपद
मुंबई, २७ जानेवारी/क्री.प्र.

आर्य क्रीडा मंडळ, ठाणे यांनी ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या दुसऱ्या कै. काकासाहेब वालावलकर स्मृती बॅडमिंटन स्पर्धेत १३ वर्षीय (मिडजेट) मुला-मुलींच्या गटात अनुक्रमे विघ्नेश देवळेकर व सई पित्रे यांनी अजिंक्यपदे पटकावली.

कबड्डी: शीतल मारणे, मयुरी पवार यांचा अप्रतिम खेळ
रोहा, २७ जानेवारी/क्री. प्र.

पुणे जिल्हा संघाने दुबळ्या बीड जिल्हा संघाचा ६९ विरुद्ध २१ गुणांनी पराभव केला व छत्रपती शिवाजी चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत आपल्या पहिल्या मोठय़ा विजयाची नोंद केली. पुणे संघाची अष्टपैलू खेळाडू शेीतल मारणे या एकतर्फी सामन्यात भलतीच प्रभावी ठरली.

अमित रॉय महाराष्ट्र श्री
मुंबई, २७ जानेवारी/क्री.प्र.

हळदणकर्सच्या अमित रॉय याने मुंबई श्री पाठोपाठ महाड येथे झालेल्या महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे विजेतेपद पटकावून आकर्षक ट्रॉफीसह ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिकही पटकावले. रायगडचा स्थानिक खेळाडू असणारा सुनिल भोईर हाच अमितचा प्रमुख प्रतिस्पर्धी होता. अखेर अमितनेच बाजी मारली. मधुकर तळवलकर यांच्यातर्फे विजेत्या रॉयला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. माजी केंद्रीय ऊर्जामंत्री अनंत गीते, संयोजक भरतशेठ गोगावले, विकी गोरक्ष, तळवलकर व पपी पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या तळवलकर यांचा अनंत गिते यांच्या हस्ते स्पर्धेदरम्यान हृद्य सत्कार करण्यात आला. गटनिहाय निकाल : ५५ किलो- १) संतोष भरणकर २) जगदीश कदम, ३) अरुण पाटील. ६० किलो- १) दिनेश कांबळे, २) श्रीकांत बंगेरा, ३) मंगेश कदम, ६५ किलो- १) जयेंद्र मयेकर, २) विजय जाधव, ३) मनोज भगत, ७० किलो- १) अमित रॉय, २) सुनील भोईर, ३) पी. एम. निजेश, ७५ किलो- १) अनिल कुमार, २) मनोहर पाटील, ३) मिलिंद सालियन, ८० किलो- १) सुमीत जाधव, २) सागर जाधव, ३) स्वप्नील अथाईत, ८० किलोवरील- १) सचिन बारबोज, २) प्रवीण नायडू, ३) किशोर डांगे.

संक्षिप्त क्रीडावृत्त
पाक कर्णधारपदी युनूस खान

नवी दिल्ली-: जवळपास वर्षभरानंतर पाकिस्तानात क्रिकेट खेळवण्यात आले आणि त्यामध्ये त्यांना श्रीलंकेपुढे शरणागती पत्करावी लागल्याने हा पराभव त्यांच्या चांगल्याच जिव्हारी लागलेला दिसतेय. या पराभवाची गाज पाकिस्तानी कर्णधार शोएब मलिकवर आज पडली असून त्याच्याजागी कर्णधारपदासाठी युनूस खानची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यांपासून युनूस त्याच्या नव्या ईनिंगची सुरूवात करणार आहे.गडाफी स्टेडियमवर कैद-ए-आझम चषकामध्ये खेळत असताना पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एजाझ बट्ट यांनी युनूसला तातडीने बोलवून घेतले आणि त्यांच्यामध्ये जवळपास पंधरा मिनीटे चर्चा झाली. या चर्चेमध्ये बट्ट यांनी युनूसपुढे कर्णधारपदाचा प्रस्ताव ठेवला होता. पण युनूसच्या जवळच्यांनी, त्याने हा प्रस्ताव स्वीकारला नसल्याचे सांगितले होते. पण काही वेळाने अचानकपणे युनूसने कर्णधारपद स्वीकारणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

अ‍ॅडलेडचा पराभव निराशाजनक -पॉन्टिंग
मेलबर्न-: या मोसमात ऑस्ट्रेलिया संघाला अनेक पराभव स्वीकारावे लागले पण, सोमवारी अ‍ॅडिलेड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठ गडय़ांनी स्वीकारावा लागलेला पराभव सर्वात निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि त्यानंतर सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात आम्ही प्रत्येकवेळी चांगली लढत दिली, असे पॉन्टिंगने म्हटले आहे.

विक्रमादित्य कांबळे चेस चॅम्प
मुंबई-: गतविजेत्या आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कांबळेने आपले सारे बुद्धिबळ कौशल्य पणाला लावून सलग दुसऱ्या वर्षीही टाटा स्काय चेस चॅम्प जलद बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा करिश्मा करून दाखविला. अमरदीप बारटक्केला पुन्हा एकदा दुसऱ्याच स्थानावर समाधान मानावे लागले. शिवाजी पार्क येथील राज्य कबड्डी संघटनेच्या सभागृहात आसमंत फाऊंडेशन आणि सौरभ मित्र मंडळ आयोजित बुद्धिबळ स्पर्धेला शेकडो खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाचव्या फेरीअखेर आघाडीवर असलेल्या विक्रमादित्य कांबळेने आपल्या आघाडी नवव्या फेरीअखेरही कायम ठेवत जेतेपदाला पुन्हा गवसणी घातली.

क्रिकेट : मुरकरच्या शतकाने वेंगसरकर संघाला सावरले
मुंबई-: वैदिक मुरकरच्या नाबाद (११४) शतकी खेळीमुळे एल.आय.सी. चषक (१४ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेच्या केडन्स विरुद्धच्या निर्णायक साखळी लढतीत वेंगसरकर संघाला सावरले. एका टोकाकडून फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतत असताना मुरकरने दुसऱ्या टोकाकडून खंबीरपणे फलंदाजी केली. त्याने सहाव्या विकेटसाठी सूरज सिंगसह (१४) ६३ धावांची तर नंतर आठव्या विकेटसाठी विकास सिंगसह (२१) ५८ धावांची भर टाकली. सागरिक मुखर्जीने तीन तर करण जाधवने दोन बळी मिळवले. दुसऱ्या लढतीत तेंडुलकर संघाने पाहुण्या बडोदा संघाला ९३ धावांतच गुंडाळले व पहिल्या दिवसअखेर २ बाद ८६ धावा केल्या आहेत.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ वार्षिक कुस्ती स्पर्धा
मुंबई-: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वार्षिक कुस्ती स्पर्धा २९ ते ३१ जानेवारी रोजी सायं. ५ ते ८ या वेळेत होणार असून कुस्तीगीरांची वजने २८ जाने. रोजी सकाळी ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत ना. म. जोशी मार्ग, कल्याण केंद्रात घेण्यात येणार आहेत. स्पर्धा कुमार गट ३५ किलो, ४० किलो, ४४ किलो, ४८ किलो, प्रौढ गट ५५ किलो, ६० किलो, ६६ किलो, ७४ किलो व ७४ किलोचे वर या वजनगटामध्ये होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या कुस्तीगीरांना रोख इनाम व प्रशस्तीपत्र महाराष्ट्र कामगार मंडळातर्फे देण्यात येणार आहे.