Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

नेत्यांमधील वादामुळे सोनियांची सभा पुन्हा रद्द!
राजीव कुळकर्णी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेला तरुणाईने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या शनिवारी वसईनजीक सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्याचे मनसुबे काँग्रेस नेत्यांमधील मतभेदांमुळे उधळले गेले. मॅडमची सभा आपल्याच मतदारसंघात व्हावी, यासाठी दोन नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने हायकमांडने ही सभाच मग रद्द केली. गेल्या वर्षीही मार्चमध्ये पालघर तालुक्यात होणारी सोनियाजींची सभा अशाच वादामुळे होऊ शकली नव्हती . सलग दोन वेळा असे घडल्याने जनमानसात चुकीचा संदेश जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे/प्रतिनिधी
आयुष्यात वाटय़ाला आलेले दु:ख, अडचणी आणि संकटांचा सामना करीत मी सतत गात राहिले. त्या दु:खाचे भांडवल कधी केले नाही. मात्र अनेकांनी पाठीवर वार केले, ते समोरून केले असते तर एकदाच सोक्षमोक्ष झाला असता. मात्र तसे झाले नाही. जखमा झेलत मला हसत राहावे लागले. आता वयाची पंच्याहत्तरी पूर्ण होतेय. आयुष्याच्या या वळणावर आता फारच थोडावेळ उरलाय.

लय, मात्रा आणि नादाची बेरीज- वजाबाकी!
ठाणे/प्रतिनिधी

सृष्टीतल्या चराचरात भरून राहिलेले संगीत लय, मात्रा आणि नादाच्या बेरीज- वजाबाकीने अगदी सहजतेने उलगडून दाखवत पंडित बिरजू महाराजांनी डोंबिवलीत सावित्रीबाई फुले रंगमंदिरात रविवारी संध्याकाळी आयोजित एका शानदार मैफलीत उपस्थित रसिकांना साक्षात नटराजाचे दर्शन घडविले.
कल्याणमधील अनंत वझे संगीत कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात प्रथमच उस्ताद झाकीर हुसेन आणि पं. बिरजू महाराज हे दोन दिग्गज एकाच रंगमंचावर आले. ‘कैसी बजाऊ घनश्याम बसुरिया’ या ठुमरीने घुंगरू आणि तबल्याची ही अनोखा जुगलबंदी सुरू झाली.

महापालिका रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाययोजनांची वानवा
दिलीप शिंदे

गोरगरीब रुग्णांची सतत वर्दळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्यापपर्यंत अद्ययावत अशा आग प्रतिबंधक उपाययोजनांची वानवा आहे. केवळ एक्सटिंग्युशरच्या जोरावर रुग्णालयात ८०० रुग्ण व २०० कर्मचाऱ्यांच्या जीविताचे रक्षण विसंबून आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रोज ४५० बाह्यरुग्ण व ३५० आंतररुग्णांवर उपचार केले जाते.

दहशतवादाविरोधात कल्याण धावलं..
४० हजार पावलांची दहशतवाद्यांना चपराक

कल्याण/प्रतिनिधी - ४० हजार पावलांनी आज कल्याणमध्ये दहशतवाद्यांना चपराक लगावली. ही चपराक लगावण्यासाठी आबालवृद्ध, शिक्षक, वकील, डॉक्टर, उद्योगपती, आजी-आजोबा, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. निमित्त होते शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय आणि उपमहापौर नरेंद्र पवार यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धाचे. दहशतवाद्यांना आपल्यातील शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी या स्पर्धा आज सकाळी आयोजित केल्या होत्या. सुमारे २० हजार विविध वयोगटांतील नागरिक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

कोनगावच्या उपसरपंचपदी पांडुरंग कराळे
भिवंडी/वार्ताहर

जिल्ह्याच्या राजकारणातील माहेरघर असे गणल्या गेलेल्या तालुक्यातील कोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पांडुरंग कराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोनगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदाची नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जे.जी. वारघडे यांनी ग्रामपंचायत सरपंच दामिनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.यावेळी १७ सदस्यांनी उपसरपंचपदाच्या रिंगणात असलेल्या कराळे यांना आपला पाठिंबा दर्शविला, तर विरोधी पक्ष सदस्यांनी आपला उमेदवार उभा न केल्याने कराळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली.

घोडमाळ पाणीपुरवठा योजनेचा आदर्श घ्यावा
वाडा/वार्ताहर

जलस्वराज्य प्रकल्पातून राबविण्यात येणाऱ्या अनेक पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचारात अडकलेल्या असतानाच, तालुक्यातील घोडमाळ (वसुरी बु.) या गावाने जलस्वराज्य प्रकल्पातूनच आदर्शयुक्त अशी पाणीपुरवठा योजना यशस्वी राबविल्याने येथील ग्रामस्थांचा आदर्श अन्य गावांनी घ्यावा, असे मत जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी या गावास भेट देऊन व्यक्त केले.
तालुक्यातील घोडमाळ येथील जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत राबविलेल्या नळपाणी पुरवठा योजनेची व स्वच्छता मोहिमेची पाहणी नुकतीच जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी केली. या पाहणी अभ्यास दौऱ्यामध्ये केनिया, बांगलादेश, नेपाळ, आफ्रिका, नायझेरिया, जपान, फ्रान्स या सात देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आदर्शयुक्त अशी ही योजना पाहून त्यांनी पाणीपुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे, ग्रामस्थांचे कौतुक केले. या योजनेसाठी रोबोर्टचा वापर करण्यात आल्यामुळे पाणी वितरण करण्यासाठी मनुष्यबळ वाचविण्यात आल्याचे पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष कांतीकुमार शेलार यांनी सांगितले.

खेळात जात-पात नको- सिद्दिकी
भिवंडी/वार्ताहर

या देशामध्ये खेळाला प्रथम प्राधान्य दिले जाते. यामुळे सर्वधर्मीय एकत्र येत असतात. या देशातील कोणत्याही खेळामध्ये जात-पात पाहिली जात नाही, असे प्रतिपादन अल्पसंख्य आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्दिकी यांनी भिवंडी येथे एका पारितोषिक समारंभात केले.शहरातील कै. परशुराम टावरे क्रीडा संकुलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद गुड्डू यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी चषक २००९ टेनिस क्रिकेट सामन्यात काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या सनी स्पोर्टस् या टीमने विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आत्माराम गुळवी यांच्या क्रिकेट स्पोर्टस् क्लबचा पराभव केला. यावेळी विजेत्या टीमला ३३,३३३ रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या टीमला २५ हजार ५५५ रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या स्पर्धकांना युवानेते किरण देशमुख यांच्यातर्फे रंगीत टीव्ही, तर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कपिल पाटील यांच्यातर्फे हीरो होंडा मोटारसायकल व रोख रक्कम देण्यात आली.

भिवंडीत हातभट्टीच्या विरोधात धडक मोहीम
भिवंडी/वार्ताहर

उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी व गावठी दारू विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. दुर्गम भागातील खाडीकिनारी असलेल्या हातभट्टी दारूधंद्यावर धाडी टाकून गेल्यावर्षी सुमारे ९४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या मोहिमेत ७५ जणांना अटक करण्यात आली.जिल्ह्याचे अधीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. पी. नागरे व दुय्यम निरीक्षक अ. द. बादल आणि एस. आर. पाटील यांनी तालुक्यातील केवणी,कारिवली, कासणे अशा अतिदुर्गम भागांत असलेल्या खाडीत व जंगलात हातभट्टी व गावठी दारू निर्मिती करणाऱ्या भट्टय़ा नष्ट करून २२३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, तर बेकायदेशीररीत्या मद्यविक्री करणाऱ्यांवर छापे टाकून विदेशी मद्याचा साठा जप्त केला.

देहदान करणाऱ्यांना शववाहिनी देण्यास महापालिकांची टाळाटाळ
डोंबिवली/प्रतिनिधी

देहदान करणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीचा देह संबंधित पालिका प्रशासनाने आपल्या शववाहिन्यांमधून रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी आपण गेल्या काही वर्षांंपासून ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ पालिका प्रशासनाशी संपर्क साधत आहोत, पण आपल्याला कोणत्याही प्रकारचे सहकार्य प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून मिळत नसल्याची खंत दधिची देहदान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास तांबे यांनी व्यक्त केली आहे. ठाणे महापालिकेने २००५ मध्ये ठराव क्रमांक १४३ अन्वये ठाणे पालिका हद्दीतील ज्या व्यक्तीने देहदान केले आहे, अशा व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांचा देह कळवा किंवा अन्य रुग्णालयात नेण्यासाठी पालिका प्रशासन मोफत शववाहिनीची सेवा संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांना देईल. हा ठराव गेल्या तीन वर्षांंपासून पालिकेच्या लालफित कारभारात अडकून पडला आहे. या ठरावावरची धूळ काढावी म्हणून एकाही अधिकारी, लोकप्रतिनिधीला वाटत नाही. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेत्रपेढी सुरू करण्याचा विषय मंजूर करण्यात आला आहे, पण त्याचीही अंमलबजावणी होत नसल्याची खंत तांबे यांनी व्यक्त केली. पालिकेची शववाहिनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि शववाहिनी मिळाली तर त्या गाडीवर चालक नसतो, गाडीत पेट्रोल, डिझेल नसते, अशी कारणे देऊन नातेवाईकांना पिटाळून लावले जाते, असे खूप अनुभव येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जमाफीमधून विम्याची रक्कम कापून न घेण्याची मागणी
वाडा/वार्ताहर

नियमित कर्जफेड करणाऱ्या व केंद्र शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नवीन कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे.
या कर्जमाफीच्या रकमेतून विम्याची रक्कम वजा करून (कापून) घेऊ नये, अशी मागणी वाडा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष हरीभाऊ पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांनी २००२-०३ मध्ये कर्ज घेताना आपल्या कर्जातून विम्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली होती. सन २००२-०३ मध्ये दुष्काळी परिस्थिती उद्भवल्याने वाडा तालुक्यातील पीक आणेवारी ३० ते ३५ टक्के आली होती. महसूल खात्याने दिलेल्या आणेवारीचा निकष बघून विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा भरपाई दिली होती, मात्र शासनाने नव्याने कर्जमाफी करताना विमा कंपनीने दिलेली भरपाई वजा करून (कापून) घेण्याचे निश्चित केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.विमा हप्त्यापोटी मिळालेली भरपाई ही सरकारने दिली नसून, ती विमा कंपनीने दिली आहे. ही रक्कम सरकारने वजा करून घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय करू नये, अन्यथा शेतकरी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करतील, असा इशारा वाडा सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीभाऊ पाटील यांनी दिला आहे.