Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

व्यक्तिवेध

‘एक झुंज वाऱ्याशी’ या नाटकाचे कथासूत्र सत्ताधीशाविरोधातील एका सामान्य माणसाचा असामान्य असा लढा आहे. रुस्तम तिरंदाज या मुंबईकरांच्या सच्च्या लोकप्रतिनिधीने अशीच एक झुंज अखंड दिली. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात ज्या लोकप्रतिनिधींनी आपली नावे कर्तबगारीने कोरली आहेत त्या मोजक्या नगरसेवकांपैकी तिरंदाज एक होते. मुंबईचा सामाजिक आणि सांस्कृतिक ढाचा झपाटय़ाने बदलत असताना, नीतिमत्तेच्या संकल्पना मोडीत निघत असताना, आजुबाजूचे सारे प्रवाहपतित होत असताना तिरंदाज एका निष्ठेने सामान्य कष्टकऱ्यांचा, मुंबईकरांचा आवाज पालिकेत उठवत राहिले. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणाऱ्या तिरंदाजांनी पालिकेच्या

 

कायद्याचा सखोल अभ्यास केला होता आणि त्या जोरावर सत्ताधारी शिवसेनेला त्यांनी सातत्याने जेरीस आणले. पालिका सभागृहात त्या काळात शिवसेना विरुद्ध तिरंदाज असा सामना हमखास रंगत असे. कायम इंग्रजीत बोलणारे तिरंदाज विविध नियमांची आयुधे वापरून शिवसेनेसमोर अडचणी निर्माण करीत असत. तिरंदाजांचा हा प्रखर विरोध अखेर शिवसेनेला संख्याबळावर मोडून काढावा लागे. विरोधी पक्ष सदस्याने कसे सजग राहायला हवे आणि सत्ताधाऱ्यांवरचा अंकुश बनायला हवे याचे आदर्श उदाहरण तिरंदाज होते. या सजगतेतूनच तिरंदाज यांनी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ सदस्याचे तथाकथित भ्रष्टाचाराचे प्रकरण एका ध्वनिफितीद्वारे सभागृहात उपस्थित केले होते. पालिकेचा संपूर्ण कारभार मराठीत चालत असताना तिरंदाज मात्र इंग्रजीत बोलत असत. त्याबद्दल शिवसेनेचे तत्कालीन महापौर शरद आचार्य यांनी त्यांना हटकले असता त्यांनी ‘तुमचे इंग्लिश आणि माझे मराठी सारखेच आहे’, असे मार्मिक उत्तर दिले होते. तिरंदाज यांचा टोकाचा शिवसेनाविरोध सहन न झाल्याने शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य दिवाकर रावते यांनी पालिका सभागृहातच तिरंदाजांना धक्काबुक्की केली होती. तिरंदाज यांचा मनस्वीपणाही आगळाच होता. पुष्पकांत म्हात्रे यांच्या विरोधात जेव्हा शिवसेनेचे मिलिंद वैद्य महापौरपदी निवडून आले तेव्हा काँग्रेसच्या नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत, असे फर्मान मुंबई प्रदेश काँग्रेसकडून निघाले होते. दुसऱ्या दिवशी तिरंदाज पालिका चिटणीसांकडे गेले आणि राजीनामा पत्रावरील सही आपली नसल्याने तो स्वीकारला जाऊ नये, असे पत्र त्यांनी सादर केले. तिरंदाज यांच्या पत्रानंतर काँग्रेसच्या उर्वरित नगरसेवकांनीही राजीनामा पत्रावर आपल्या सह्या नसल्याचे स्पष्ट केले होते आणि आपोआपच या नगरसेवकांचा एक वेगळा गट निर्माण झाला होता. तिरंदाज यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्टय़ त्यांच्या कमालीच्या साध्या राहणीत होते. नगरसेवक झाल्यानंतरच्या पहिल्याच दोन-तीन वर्षांत नव्या कोऱ्या गाडय़ा, दोन-चार फ्लॅटचे मालक होणाऱ्या भ्रष्ट नगरसेवकांचा तिरंदाज यांना तिटकारा होता. सामान्य माणसांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, त्यांचा तुम्ही विश्वासघात करीत आहात, अशी कळकळ तिरंदाज या नगरसेवकांबाबत आक्रमकपणे बोलून दाखवायचे. पालिकेत कायम स्कूटरवरून येणारे तिरंदाज एखाद्या प्रश्नाविषयी नेहमीच आवेशपूर्ण बोलायचे. पण हा आवेश त्यांच्या कर्तव्यनिष्ठेपोटीचा आणि सात्विकतेचा होता. म्हणूनच सामान्यांचा प्रतिनिधी अशी आपली ओळख तिरंदाजांनी निर्माण केली. कामगारविरोधी, सामान्यांच्या धोरणाविरोधात कोणतेही आंदोलन असो, त्यात म्हणूनच तिरंदाजांचा सहभाग तितकाच उत्कट असायचा. ज्या पाच उद्यानजवळील पारसी कॉलनी विभागाचे प्रतिनिधित्व तिरंदाज यांनी केले तेथील घराघरांत तिरंदाज यांचा संपर्क होता. छोटय़ातील छोटय़ा नागरी समस्येची सोडवणूक तिरंदाज आत्मीयतेने करायचे आणि आपल्या समस्या मला सातत्याने कळवत राहा, असे नागरिकांना सांगायचे. नगरसेवक या शब्दाच्या अर्थाला कायम जागलेल्या तिरंदाज यांच्या निधनाने हे शहर एका धर्मनिरपेक्ष समाजसेवकाला मुकले आहे.