Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

विविध

चांद्रयान-१ च्या पेलोडने पाठविलेल्या माहितीचे उद्या विश्लेषण करणार
बंगलोर, २७ जानेवारी/पी.टी.आय.

चांद्रयान-१ या मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिक येत्या २९ जानेवारीला आतापर्यंत मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणार आहेत. भारताचे चांद्रयान-१ गेल्या २२ ऑक्टोबरला अवकाशात झेपावले होते. या अंतराळयानावरील उपकरणांनी (पेलोड) गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर त्याचे निष्कर्षही या वेळी स्पष्ट केले आहेत. इस्रो सॅटेलाईट सेंटर येथे एक दिवसाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून, त्यात भारतीय पेलोडने गोळा केलेल्या माहितीवर आधारित निष्कर्ष काढले जाणार आहेत.

काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय रूप देण्याचे प्रयत्न पाकनेही सोडले
मुंबईवरील हल्ल्याने चर्चेला खीळ बसल्याची कबुली
वॉशिंग्टन, २७ जानेवारी/पी.टी.आय.
काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय रूप देण्यास पाकिस्तानचाही विरोध असून हा प्रश्न भारताशी परस्पर सामंजस्याने सोडविण्याची इच्छा आहे, असे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव व भारतातील उच्चायुक्त रियाझ महम्मद खान यांनी आज येथे स्पष्ट केले. काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी उभय देशांत गेली तीन वर्षे अत्यंत वेगात व प्रामाणिकपणे सुरू असलेल्या प्रयत्नांना मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांनी खीळ बसल्याची कबुलीही त्यांनी दिली.

समझौता एक्सप्रेसमधील प्रवाशांजवळून चाळीस कोटींचे हेरॉईन जप्त
अट्टारी, २७ जानेवारी / पी.टी.आय.

पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या ‘समझौता एक्स्प्रेस’मधून कस्टम्स अधिकाऱ्यांनी १४ कि.ग्रॅ. हेरॉईन जप्त केले. बाजारात या हेरॉईनची किंमत तब्बल ७० कोटी रु. आहे. अट्टारी रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. समझौता एक्सप्रेस भारतातून पाकिस्तानात जाते. या रेल्वेगाडीतील दोन प्रवासी हेरॉईन बाळगून असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून काल रात्री दोघांनाही शिताफीने पकडले. त्यांची नावे सादिकखान (६२) आणि अख्तर अब्बास (२७) अशी असून दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. दोघांनीही लाहोर येथून गेल्या १९ जानेवारीला हा माल खरेदी केला होता. त्यांनी अंमली पदार्थाच्या तस्करीचे जाळे देशभरात कुठे कुठे विणलेले आहे, याची चौकशी केली जात आहे. समझौता एक्सप्रेसमधील प्रवाशांकडून अंमली पदार्थाची तस्कारी होत असल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात आल्या आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर समझौता एक्सप्रेस रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे एक्सप्रेसमधील प्रवाशांना जादा सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ही रेल्वे मंगळवारी आणि शुक्रवारी अट्टारीतून तर रविवारी आणि बुधवारी दिल्लीतून पाकिस्तानला जाते.

अमेरिकेतील अष्टपुत्रा माता!
लॉस एंजेलिस, २७ जानेवारी/पी.टी.आय.

‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव!’ असा आशीर्वाद आपल्याकडे दिला जातो. भरपूर पुत्रप्राप्ती होवो, असा या आशीर्वादामागील भाव असतो. एखाद्या मातेने तिळ्यांना जन्म दिला तरीही तो ‘बातमी’चा विषय होतो. परंतु अमेरिकेतील एका मातेने एकाचवेळी तीन नाही, चार नाही तब्बल आठ अपत्यांना जन्म दिला आहे. आठ जिवंत अपत्यांना जन्म देण्याचा हा प्रसंग अमेरिकी वैद्यकशास्त्राच्या इतिहासातील केवळ दुसराच प्रसंग आहे. या मातेचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र सर्व बाळे तसेच त्यांची आईसुद्धा ‘खुशाल’ आहेत. पाच मिनिटांच्या आत या सगळ्या बाळांचा ‘जन्म’ झाला. ६९० ग्रॅम ते १.४७ कि.ग्रॅ. या दरम्यान या सर्व बाळांची वजने आहेत. या मातेला सात बाळे होतील, अशी अपेक्षा डॉक्टर बाळगून होते. परंतु आठव्या बाळाचा जन्म झाल्यावर त्यांनाही धक्का बसला. ही सर्व बाळे अपेक्षित जन्मदिवसाच्या सुमारे नऊ आठवडे आधीच जन्मली आहेत. यापूर्वी अमेरिकेतच ह्यूस्टन, टेक्सास येथे एका मातेने एकाच वेळी आठ बाळांना जन्म दिला होता. परंतु आठवडाभरानंतर त्यातील एक बाळ दगावले. बाकी सर्व सात बाळे व्यवस्थित जगली. गेल्याच वर्षी या मातेने आपल्या सातही बाळांचा दहावा वाढदिवस उत्साहात साजरा केला होता.

पब हल्लाप्रकरणी आणखी आठजण अटकेत
मंगलोर, २७ जानेवारी / पी.टी.आय.

गेल्या शनिवारी येथील एका पबवर झालेल्या हल्लाप्रकरणी श्रीराम सेनेचा फरारी संस्थापक प्रमोद मुतालिक याच्यासह आणखी आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून अटक झालेल्यांची संख्या २५ झाली आहे. या पबवर हल्ला करून मुलींना बेदम मारहाण करण्यात आली होती. याचे व्हिडिओ चित्रण एका वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आल्यानंतर देशभर याचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे कर्नाटक सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित सर्व हल्लेखोरांच्या अटकेचे आदेश दिले होते. सामाजिक संघटनांचा दबाब वाढल्याने मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी गृहमंत्र्यांना हल्लेखोरांवर कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे रविवारी रात्रीपासून हल्लेखोरांची धरपकड सुरू झाली. एकूण ४० हल्लेखोरांनी पबवर हल्ला करून सर्व मुलामुलींना बाहेर काढले होते. मुलींना चांगलीच मारहाण केली होती. यात दोन मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अटक झालेल्यांमध्ये श्रीराम सेनेचा जिल्हा समन्वयक सुभाष पाडील, उप समन्वयक किशोरे, शहर समन्वयक गणेश यांचा समावेश आहे.
बालमट्टा माार्गावरील पबमध्ये अश्लील कृत्ये चालतात असा आरोप करून श्रीराम सेनेने हा हल्ला केला होता.

ऑस्करची सन्मानिका ‘ब्लॅक’मध्ये!
लॉस एंजेलिस, २७ जानेवारी/वृत्तसंस्था

हॉलीवूडच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका ‘एक्सपिरिअन्स सिक्स’ या कंपनीकडून बेकायदा विकल्या जात असून त्या विकत घेणाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाईल, असे ऑस्कर समितीने आज जाहीर केले.ऑस्कर नामांकने मिळालेल्यांना निमंत्रण असते पण इतर सन्मानिका या अधिकृतपणे विकल्या जातात. अर्थात त्यासाठी काटेकोर छाननी केली जाते. ज्यांना सन्मानिका दिल्या गेल्या त्यांची तपशीलवार नोंदही असते. त्यामुळे जे दुसऱ्याच्या सन्मानिका या कंपनीकडून विकत घेऊन कार्यक्रमाला येतील त्यांना प्रवेश तर दिला जाणार नाहीच पण कारवाईलाही सामोरे जावे लागेल, असे सांगण्यात आले. आम पब्लिकसाठी २० हजार तिकीटे विकली जातात पण त्यातील केवळ ३०० जणांनाच लॉटरी पद्धतीने आमंत्रण दिले जाते.

राऊल कॅस्ट्रो रशिया दौऱ्यावर
मॉस्को, २७ जानेवारी/पी.टी.आय.

क्युबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो हे उद्यापासून आठवडाभर रशियाच्या दौऱ्यावर येत आहेत. रशियाला भेट देणारे ते क्युबाचे पहिले नेते आहेत.कॅस्ट्रो व रशियाचे अध्यक्ष मेदवेदोव्ह यांच्यात उद्या अनौपचारिक चर्चा होणार असून शुक्रवारी अधिकृत बैठक होईल. मेदवेदोव्ह हे नोव्हेंबरमध्ये क्युबाच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी कॅस्ट्रो यांना रशिया भेटीचे आमंत्रण दिले होते. सोविएत युनियनच्या विघटनानंतर उभय देशांतील संबंध संपल्यात जमा होते. मात्र २००० साली ब्लादिमिर पुतीन यांच्या भेटीनंतर उभय देशांत पुन्हा जवळीक निर्माण झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे क्युबाचे नेतृत्व सोडलेले फिडेल कॅस्ट्रो यांचे राऊल हे बंधू होत.

दोन दशकांनंतर जम्मूत झाला गारांचा पाऊस
जम्मू, २७ जानेवारी/पी.टी.आय.

दोन दशकांच्या खंडानंतर जम्मू शहराला आज गारांच्या पावसाने झोडपून काढले. हा वर्षांव इतका मोठा होता की सर्वत्र सहा ते नऊ इंचांचा थर जमा झाला. तलाब तिल्लो, बक्षी नगर, शिवसागर आणि रहारी ते बंतलब या भागामध्ये मंगळवारी पहाटे साडे पाच ते साडे सहा या वेळेत हा गारांचा पाऊस झाला.

‘शॉटगन’ सिन्हा भाजपशीच एकनिष्ठ
सुरत, २७ जानेवारी/पी.टी.आय.

तिकीट नाकारले तरी भाजप सोडणार नाही, असे स्पष्ट करीत प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली जन्मभूमी पटना साहेब येथूनच लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.पटना साहेब ही निवडणूक लढविण्यासाठी आपली पहिली व शेवटची पसंती असून,भाजपने येथे लढू न देण्यास कोणतेही कारण उरत नाही. मात्र तरीही तेथून निवडणूक लढण्यास पक्षाने आपल्याला अनुमती न दिल्यास मी निवृत्ती पसंती करीन, असे सिन्हा यांनी म्हटले. सिन्हा यांनी निवडलेल्या मतदारसंघातील तिकीट पक्षाकडून नाकारले गेल्यास काँग्रेस, समाजवादी किंवा इतर कुठल्याही पक्षात ते दाखल होतील,या गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या चर्चेला त्यांनी आज पूर्णविराम दिला.अटल बिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मी भाजपमध्ये पूर्ण क्षमतेने काम केले आहे. विरोधी पक्षात माझे अनेक मित्र व हितचिंतक असून त्यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. पण म्हणून भाजपमधून बाहेर पडण्याचा माझा कोणताही विचार नाही, असे सिन्हा यांनी सांगितले. समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग यांनी मात्र शत्रुघ्न सिन्हा यांच्यासाठी आपल्या पक्षाचे दरवाजे कायम उघडे असल्याचे म्हटले आहे.

‘पाकला कृतीने उत्तर देण्याची वेळ’
बंगलोर, २७ जानेवारी / पी.टी.आय.

गेल्या वर्षीच्या २६ नोव्हेंबरला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे पाकिस्तानने भारताविरुद्ध पुकारलेले खुले युद्ध असल्याने त्याला त्याच पद्धतीने भारताने उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी येथे सांगितले. मुंबईवरील हल्ला फक्त दहशतवाद्यांनी केलेला नव्हता. ते तर खुले युद्ध होते. एवढे होऊनही भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध ठोस कारवाई केलेली नाही. जबाबदार मंत्र्यांकडूनच जनतेला संभ्रमित करणारी विधाने केली जात आहेत, असा आरोपही राजनाथ सिंह यांनी केला. शब्दांनी इशारे देण्याची वेळ संपली आहे आणि प्रत्यक्ष कृती झाली पाहिजे, असेही राजनाथ म्हणाले. अर्थात बेळगावच्या मराठी जनतेवरील गळचेपीबाबत मात्र राजनाथ सिंग यांनी मौन बाळगले. मराठीच्या प्रश्नावर महाराष्ट्रात शिवसेनेने युती तोडण्याचाही इशारा दिला आहे.