Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

अग्रलेख

ग्लॅमरच्या मिठीत!

 

आर्थिक विकासाचा रस्ता मनोरंजनाच्या राज्यातून जातो, असा निष्कर्ष काढण्याची वेळ आली आहे. काही वर्षांत मध्यमवर्गीयांची संख्या वाढली आणि आधीच्या मध्यमवर्गाचे प्रमोशन होऊन त्यातील अनेक जण उच्च ‘मध्यमवर्गीय’ झाले. या आर्थिक सुबत्तेनंतर आणि उन्नतीनंतर मनोरंजन क्षेत्राला अक्षरश: भरती आलेली आहे. माध्यमक्रांती होऊन मनोरंजनाच्या साधनांचा सुळसुळाटही नेमका याच सुमारास झाला. दूरचित्रवाणी आणि चित्रपट यांत जे काही पाहतो, तो सगळा आविष्कार ‘कला’ या सदरात मोडतो; परंतु या माध्यमांचे आपण स्वत:च एवढे अवमूल्यन करून टाकले आहे, की त्यांचा उल्लेख सरसकट ‘मनोरंजन’ या शब्दानेच करतो. यातून या माध्यमांकडे पाहण्याची आपली संकुचित दृष्टी तर दिसून येतेच, शिवाय आपल्या अपेक्षांची धाव किती मर्यादित आणि आखूड आहे याचीही प्रचिती येते. अचानक श्रीमंत झालेला आणि सांस्कृतिक संस्कारांपासून वंचित राहिलेला समुदाय कायम सुलभ मनोरंजनाच्या आहारी जात असतो आणि सध्या वृत्तपत्रे, वाहिन्या, चित्रपट ही सर्व माध्यमे अशा सोप्या मनोरंजनाची पूर्ती करण्याच्या मागे लागली आहेत. यातून ‘ग्लॅमर’चे महत्त्व अचानक अवाजवीरीत्या वाढले असून, राजकारणातही त्याचे प्रतिबिंब उमटू लागले आहे. त्याही पुढची पायरी म्हणजे या वर्षी तर ‘पद्म पुरस्कारा’तही ‘ग्लॅमर’ जगताचा वरचष्मा दिसून आला. क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून आणि इतरही सर्व क्षेत्रांकडे कानाडोळा करून या वर्षीच्या पुरस्कारात चित्रपट क्षेत्राला झुकते माप देण्यात आले आहे. राजकारणापासून तर सरकारी सन्मानापर्यंत सर्वत्रच, योग्यतेपेक्षा लोकप्रियतेचे निकष लावण्याची झिरपत चाललेली ही वृत्ती दीर्घकालीन विचार करता चिंताजनक आहे. राजकारणात चित्रपट कलावंतांचे येणे अथवा प्रभाव पडणे काही आपल्याला नवे नाही. तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथील राजकारणात चित्रपट तारे महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावत आले आहेत. चित्रपटसृष्टीतूनच राजकीय नेतृत्व उदयाला येण्याची परंपराही तिकडे आहे. परंतु राजबब्बर, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, राजेश खन्ना, धर्मेन्द्र, हेमामालिनी, जयाप्रदा अशा कलावंतांना खासदारकी मिळणे आणि एन. टी. रामाराव, जयललिता, करुणानिधी, रामचंद्रन यांनी राजकारण करणे यात मोठी तफावत आहे. दक्षिणेतील अभिनेत्यांनी चित्रपटातील लोकप्रियतेचा आधार घेऊन प्रादेशिक अस्मितेचा अंगार फुलवला आणि स्वत:ची एक राजकीय भूमिका लोकांपुढे मांडली. त्यामुळेच कावेरी पाणीवाटपाच्या प्रश्नावरून तिकडे अभिनेते आपली मते जाहीर करून हिरीरीने वादात उडी मारतात. महाराष्ट्रात, राजस्थानात किंवा उत्तर प्रदेशात चित्रपटातील कलावंतांना निवडणुकीत उभे केले जाते, त्यामागे अशी कोणतीही वैचारिक भूमिका नसते. धर्मेन्द्र हा भाजपचा खासदार असला तरी अणुकराराविषयी भाजपची भूमिका काय आहे याच्याशी त्याला देणे-घेणे नसते. धर्मेन्द्र किंवा गोविंदा यांना मुळात अणुकरार काय आहे याचीच माहिती असण्याची शक्यता उणे शून्य आहे. त्यामुळे या कलावंतांना असलेले ग्लॅमर हीच त्यांची एकमेव जमेची बाजू होती. आपल्या पक्षाची वैचारिक भूमिका मांडणाऱ्या एखाद्या स्थानिक कार्यकर्त्यांपेक्षा राजकीय पक्षांना हे कलावंत ‘निवडून’ येण्याच्या दृष्टीने अधिक लायक वाटले. यात राजकीय पक्षांची दिवाळखोरी जरी दिसून येत असली तरी लोकांचा कलही ‘ग्लॅमर’कडे वाढतो आहे हेही लक्षात येते. संजय दत्तसारख्या कलाकाराला निवडणुकीत उभे करणे आणि त्याची मिरवणूक काढणे हे तर विकृतीकडे जाणारे आहे. आयुष्याची चार दशके लोकांचे मनोरंजन केल्यानंतर मग जनसेवेचे निमित्त करून खासदारकी पदरात पाडून घेणारे कलावंत त्यामानाने निरुपद्रवी वाटू लागतात. संजय दत्तचा सगळा इतिहास ताजा आहे. गंभीर आरोप, बदमाष लोकांची संगत असल्याच्या बातम्या, बदनाम लोकांशी संबंध असल्याची चर्चा आणि बेधुंद जीवनशैली हीच त्याची ओळख झालेली आहे. अशा पद्धतीने प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या संजयला तिकीट देण्यात समाजवादी पक्ष आणि अमरसिंग यांची संस्कृती तर दिसतेच, शिवाय ‘प्रसिद्ध’ आणि ‘कर्तृत्ववान’ या दोन शब्दांत फरक करण्याची कुवत आपण गमावून बसलो आहोत की काय अशीही शंका येते. कोणत्याही समारंभाला ‘वलय’ प्राप्त करून द्यायचे असेल, गर्दी खेचायची असेल तर टी. व्ही. किंवा चित्रपट क्षेत्रातील एखाद्याला ‘योग्य मानधन’ देऊन निमंत्रित करायचे अशी प्रथा पडत चालली आहे. व्यावसायिक चित्रपटांमधील कलावंतांना तसे जागतिक चित्रपट आणि जागतिक चित्रपट प्रवाहांशी काहीही देणे-घेणे नसते. परंतु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना प्रमुख पाहुणे म्हणून भारतात या कलावंतांना आवर्जुन बोलाविले जाते. कारण महोत्सवाचे उद्घाटन जर एखादा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा नामवंत दिग्दर्शक करणार असेल तर ‘मीडिया’ला त्यात स्वारस्य नसते. अशा नामवंत दिग्दर्शकापेक्षा दीपप्रज्वलनाची थाळी घेऊन उभी असलेली प्रियंका चोपडा अधिक ‘फोटोजेनिक’ ठरते. ‘ग्लॅमर’च्या वलयाचा हा प्रभाव ‘पद्म पुरस्कारां’वरही पडू लागला आहे, की काय अशी शंका या वर्षीच्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींची यादी पाहून येते. अक्षयकुमार, उदित नारायण, ऐश्वर्या राय, कुमार सानू यांच्या विरोधात कुणी असण्याचे काही कारण नाही, परंतु ‘पद्मश्री’ प्राप्त झालेल्या या चारही कलावंतांची कारकीर्द अजून मधल्या टप्प्यातच आहे. एका बाजूला अमीन सयानी, हृदयनाथ मंगेशकर, शमशाद बेगम अशी नावे आहेत. रेडिओवरील निवेदन आणि कार्यक्रम सादरीकरणाच्या क्षेत्रात अमीन सयानी यांनी इतिहास रचला आहे. त्यांचा स्वर हा चित्रपट संगीताएवढाच जीवलग होऊन चार दशके रसिकांची साथसंगत करीत आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी तर मराठी भावसंगीताच्या क्षेत्रात अभिजात कामगिरी केली आहे. त्यांनी संगीत दिलेले एक-एक गाणे हे रत्नजडीत अलंकाराप्रमाणे मोलाचे आणि कलाकुसरीचे आहे. पाश्र्वसंगीताच्या प्रारंभीच्या काळात आपल्या खणखणीत स्वरात चित्रपट क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या शमशाद बेगम आपल्या गाण्यांमुळे आजही ‘तरोताजा’ आहेत. चार दशके त्यांनी स्वत:ला प्रसिद्धीपासूनही दूर ठेवले होते. नृत्यांगना हेलन यांची काही नृत्येही काळावर मात करून जनमनात शिल्लक राहिलेली आहेत. आयुष्यात आपल्या क्षेत्रात एक विशिष्ट उंची गाठून स्वत:ला सिद्ध केलेल्या या कलावंतांचा सन्मान आणि अद्याप कर्तृत्वाची पहिलीच पायरी गाठलेल्यांचा सन्मान एकाच वेळी व्हावा हे अगम्य आहे. चित्रपटाच्या क्षेत्रात विविध प्रयोग होऊन त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असेल आणि त्या क्षेत्राने कलात्मक उंची गाठली असेल तर पुरस्कारांवर ‘ग्लॅमर’चा ठसा उमटणे खटकले नसते, परंतु केवळ ‘वलयाला’ आलेले महत्त्व आणि त्यातून पुरस्कारांनाच वलय मिळवून देण्याची धडपड यातून हे पुरस्कार दिले जात आहेत, की काय असा प्रश्न पडतो. अभिनेता अक्षयकुमार याने तर ‘या पुरस्काराची माहिती मला बातम्यांमधूनच प्राप्त झाली’ असे एका वाहिनीला सांगितले. प्रत्यक्षात ‘पद्म पुरस्कार’ जाहीर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची सहमती घेतली जाते आणि आणखीही काही औपचारीकता पूर्ण केल्या जातात. तेव्हा अक्षयकुमारच्या वक्तव्यात खरोखरच तथ्य आहे का याची चौकशी केली गेली पाहिजे आणि तथ्य नसेल तर त्याला त्याचा जाब विचारला गेला पाहिजे. ‘प्रसिद्धी’ मिळणे आणि मिळविणे याला आज अवाजवी आणि अनाठायी महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच प्रसिद्ध व्यक्तींविषयीचे आकर्षण वाढू लागले आहे. माणसांचे मूल्यमापन कर्तृत्वात न करता प्रसिद्धीत करण्याची नवी मानसिकता, नवश्रीमंत वर्गाने स्वीकारलेली आहे. त्यामुळेच राजकीय पक्ष कलावंतांना तिकिटाचे वाटप करीत आहेत. सरकारी पुरस्कारांवर सत्ताधारी पक्षाच्या राजकीय विचारसरणीचा प्रभाव असणे एक वेळ समजू शकते. पटणारा, न पटणारा असला तरी त्यात विचार असतो. ‘ग्लॅमर’चा दिखाऊपणा जर पुरस्कारांमध्ये डोकावू लागला तर त्यांचे माहात्म्य आणि महत्त्व झपाटय़ाने ओसरू लागेल, यात शंका नाही.