Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

महाकाय हिमालयाच्या कुशीत वसलेले, पश्चिमेस नेपाळ, उत्तरेला तिबेट, पूर्वेला भूतान आणि दक्षिणेला बंगाल असे चहूकडून बंदिस्त असलेले अंगठय़ाएवढे राज्य म्हणजे सिक्कीम. १६०० सालापर्यंत नामग्याल घराण्याची एकसत्ताक राज्यपद्धती चालू होती. शतकाच्या शेवटी तेननसिंग नामग्यालने राजधानी यूकसोम येथून राबदानसे येथे हलवली. नेपाळ व भूतान यांच्याकडून सतत होणाऱ्या आक्रमणापासून रबदानसेची नुसती वाताहात होऊन गेली. ब्रिटिश काळात इंडियाच्या मदतीने नेपाळशी युद्ध केले. त्या वेळी ब्रिटिश इंडिया व नेपाळशी अनुक्रमे सुगौली, तितालीया करार करून हस्तगत केलेला भाग परत मिळविला. पुढे भारताशी मदतीसाठी हस्तांदोलन केले. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. भारतातर्फे त्यांचे राजकीय व्यवहार पार पडू लागले. तर १९७५ मध्ये त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजवटीत भारतीय लष्कराने गंगटोक येथे घुसून आपल्या ताब्यात घेतले आणि सिक्कीम हे भारतातील एक राज्य म्हणून गणले जाऊ लागले. तीन बाजूंनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने हा भाग अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे भारतीय लष्कराचे तेथे वर्चस्व आहे.

 


डोंगराळ भाग असल्याने सतत दरड कोसळणे, पावसाने रस्ते वाहून जाणे वगैरे आपत्तींना तेथील रहिवाशांना सामोरे जावे लागते. त्यासाठी आपल्या सैन्याचीच शाखा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (इफड) आहेच. तेथील सर्व रस्त्यांची व्यवस्था पाहणे हे त्यांचेच काम. डोंगराळ भागामुळे रेल्वेची व्यवस्था होणे फारच कठीण. राजधानी गंगटोक येथून बागडोगरा, पश्चिम बंगालमध्ये कारने किंवा हेलिकॉप्टरने जाता येते. पण हेलिकॉप्टरची सेवा दिवसातून एकदाच शिवाय वेळेला फक्त चारच माणसे जाऊ शकतात. त्यामुळे खासगी टॅक्सीज, बसेस यांची भरपूर वर्दळ असते. सिलीगुडी व जलपायगुरी येथे रेल्वेने जाऊन आपण कोलकातापर्यंत पोहोचतो.
सिक्कीमची विभागणी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, अशी चार विभागात होऊन अनुक्रमे गंगटोक, गेझिंग, मंगन, नामची ही त्यांची प्रमुख शहरे आहेत. गंगटोक ही राजधानी असल्याने जास्त वहिवाटीची दाटीवाटीची, शिवाय प्रमुख कचेऱ्या, शाळा, कॉलेजेस इत्यादी आहेतच. डोंगराळ भागामुळे रस्ते खूपच अरुंद आणि चड-उताराचे. त्यामुळे वाहतुकीचे नियम अगदी कडक आहेत; पण आश्चर्य म्हणजे ते कसोशीने पाळले जातात. मोठय़ा अवजड वाहनांना शिवाय दुसऱ्या राज्यातील टुरिस्ट वाहनांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गंगटोकमध्ये अजिबात प्रवेश नसतो. उत्तर तिबेटमधील तिबेटी, शिवाय नेपाळी लोक फार पूर्वीपासून येथे वास्तव्यास आहेत. इंग्लिश, हिंदी, लेपचा, लिंबू नेपाळी, भूतिया या भाषा प्रामुख्याने व्यवहारात वापरल्या जातात. हिंदू व बुद्ध धर्म प्रामुख्याने अस्तित्वात आहे. ख्रिश्चन धर्म फारच थोडय़ा प्रमाणात आहे. तिथल्या मोनेस्ट्रीजमधून बुद्ध धर्माची शिकवण दिली जाते. तेथे लहान मुले लामा होण्यासाठी शिक्षण घेतात. शिक्षणाबरोबर त्यांची राहण्याची सोयही असते. पैकी रुमटेक ही सर्वात जुनी मोनेस्ट्री आहे. नव्या रुमटेकला सोन्याचा स्तूप आहे. पश्चिमेस पेमियांगत्से मोनेस्ट्री हीदेखील फार पूर्वीची मोनेस्ट्री आहे. येथील झाडाच्या ढोलीतून कोरलेले धर्मचक्र पाहण्यासारखे आहे.
पश्चिम भागात जगप्रसिद्ध कांग- झेन- झोंगा, ज्याला आपण कांचनजंगा म्हणून ओळखतो. ८४५० मी. उंचीचे हे शिखर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच गणले जाते. तिथले रहिवासी कांचनजंगाला पवित्र मानतात. सोने, चांदी विविध रत्ने शिवाय धान्य पवित्र ग्रंथ यांचा खजिना मानतात. क्वचितच गिर्यारोहणाची परवानगी दिली जाते. गंगटोक येथून त्याचे छान दर्शन होते, ती अवाढव्य बर्फाची भिंत भासते. पश्चिमेस पेलिंग गावापासून ते अवघ्या ५० कि.मी. अंतरावर असल्याने आपल्याला संपूर्ण पर्वताचे दर्शन दिवसभर घडते. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस बर्फाच्छादित पर्वतावर पडणारी कोवळी किरणे कांचनजोंगा हे नाव सार्थ ठरवतात. जर आकाश निरभ्र असेल तर अगदी दिवसभर आपल्याला कांचनजोंगाचे अनोखे सौंदर्य वेगवेगळ्या प्रकारे अनुभवता येते. कांचनजोंगाच्या आसपास काबू, सिमवो, कुंभकर्ण, पांडीम आदी शिखरे नजरेस पडतात.
पेलिंगपासून गंगटोकला जाताना वाटेत मार्तम हे छोटेसे गाव लागते. युनेस्कोने हे गाव दत्तक घेतले आहे. डोंगराळ भागामुळे उंच सखल जमिनीवर टेरेस फार्मिग म्हणजे डोंगर उतारावर थोडय़ा थोडय़ा अंतरावर पृष्ठभाग सपाट करून त्यात शेती केली जाते. गाईड आपल्याला संध्याकाळच्या वेळेस गावात फेरफटक्यासाठी घेऊन जातात. काही छोटय़ा छोटय़ा घरांमध्ये आजही पूर्वीचीच मांडणी असल्याचे दिसून येते. बटाटा, विविध प्रकारचे बांबू आणि आल्याच्या शेतीतून फिरताना बऱ्याच औषधी वनस्पतीची माहिती करून दिली जाते. वेलचीच्या लागवडीसाठी सिक्कीम फार प्रसिद्ध आहे. सकाळी सकाळी पक्ष्यांच्या मधुर गुंजारवाने सुरू झालेला दिवस वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजनी पार भरून गेलेला असतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तेथे विजेची सोय नव्हती; परंतु त्या रम्य आसमंतात आमचे चार दिवस टेलिफोन, टीव्ही, वर्तमानपत्र याशिवाय कसे गेले ते कळलेच नाही. पुढे उत्तरेकडे चुंगथान येथे रस्त्याचे दोन फाटे फुटतात. एक लाचेन येथे तर दुसरा लाचुंगला जातो. लाचेन येथूनच तिस्ता नदीचा उगम होतो. येथे गुरू दोंगमार हा पवित्र लेक आहे, शिवाय माऊंटेनिअरिंगसाठी देखील येथून जातात. अगदी कडक थंडीतही या लेकचा विशिष्ट भाग मुळीच गोठत नाही. १२,००० फूट उंचीवर हिमशिखरांनी वेढलेले आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रंगीबेरंगी ऱ्होडोडेंड्रान व पांढरे मॅगनोलिया (कवठी चाफा) यामुळे लातुंग हे नेहमीच नटलेले असते. तेथूनच पुढे आपण युमथान, ‘व्हॅली ऑफ फ्लावर्स’ येथे जातो. इथे वसंतात तर कित्येक प्रकारचे प्रीम्युला फ्लावर्स, ऱ्होडोडेंड्रान आणि वेगवेगळी ऑर्किडस् शिवाय अनेक प्रकारचे बांबू नजरेस पडतात. त्या वेळी सर्व आसमंत रंगीत, तर हिवाळ्यात बर्फाची दुलई पांघरुन असतो. त्यामुळे हा प्रवास म्हणजे डोळ्यांना सुखद मेजवानीच. जवळच औषधी गरम पाण्याचे झरे आहेत. या भागात हवा नेहमीच थंड, शिवाय थंडीत जरा जास्तच त्यामुळे व्हॅलीची सफर झाल्यावर या गरम कुंडात डुंबायची संधी सोडली जात नाही.
पुढे १४ हजार फूट उंचीवर नथुलापास येथे जाताना प्रथम आपल्याला हरभजनबाबाच्या मंदिरात जावेच लागते. हरभजन हा आपल्या सैन्यातला शिपाई होता. पण सीमेवर गस्त घालत असता तो अचानक नाहीसा झाला. थोडे दिवसांनी सहकाऱ्याच्या स्वप्नात येऊन आपले स्मारक बांधण्यास सांगितले. त्यावेळेसपासून आपले सैनिक तो अजून जिवंत असल्यासारखेच त्याच्या बाबतीत वागतात. जवळच हिवाळ्यात बर्फाने गोठला जाणारा सांगुलेक पवित्र मानला जातो. लहरी याकच्या पाठीवर बसून आसपास फिरताना तोल सांभाळतच बसावे लागते. पण मजा येते. उन्हाळ्यात रोपवेमधून लेक व आजुबाजूचा मनोहर परिसर न्याहाळता येतो. डोंगराला वळसा घालतच आपण पुढे नथुलापासला पोहोचतो. येथे इंडो-चायना बॉर्डर असल्या कारणाने लष्कर मोठय़ा प्रमाणात आहे. आपण सतत ऊठसूट तेथे जाऊ शकत नाही. इथे येण्यास आर्मी परमीट असणे जरुरीचे आहे. ठराविक वेळेला मोजूनच टुरिस्ट गाडय़ा सोडल्या जातात. परदेशी प्रवाशांना मात्र यासारख्या संवेदनशील भागाला भेट देता येत नाही. आम्ही असताना जवळच लावलेल्या सुरुंगाचा स्फोट होणार होता, त्यामुळे जवान आम्हाला लवकर आडोशाला जा म्हणून सांगत होते. पण इतक्यात स्फोट होऊन चांगल्यापैकी मोठा थोंडा आमच्यापासून जवळच येऊन पडला. तरी बरं, थोडं अंतर होतं म्हणून, नाहीतर आमचा कपाळमोक्षच झाला असता. गेल्या दोनेक वर्षांपासून येथून आपल्या व चायनामधील व्यापाराला सुरुवात झाली. हा रस्ता तिबेटमधील शिगास्ते येथे जातो. सदैव बर्फाच्छादित असलेल्या या मार्गावरील वाहतूक फक्त उन्हाळ्यात सुरू असते. सीमेवर आपण आपल्या तसेच चायनीज लष्कराशी हस्तांदोलन करू शकतो. त्यांना आपल्याविषयी फार कुतूहल असल्याचे त्यांच्या वागणुकीवरून दिसते. त्यांच्या मोडक्या तोडक्या इंग्लिश भाषेत आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. आम्ही चायनाला भेट देऊन आलो म्हणून सांगितले तर चेहऱ्यावर खुषी दिसली. तुमचे जेवण आम्हाला आवडतं म्हटल्यावर तर कळी आणखीनच खुलली. सीमेवर तैनात असलेल्या आपल्या जवानांचे मनोधैर्य कमालीचे वाखाणण्याजोगे आहे. आपण काय गंमत म्हणून तास दीडतास जातो, तरीसुद्धा कुणाला धाप लागते, कुणाला डोकेदुखी होते, तर जवळपास आपलं कुणी नसताना महिनोनमहिने अशा बर्फाळ भागात राहायचे म्हणजे काय गंमत आहे काय? ‘‘हॅटस् ऑफ टू देम’’.
सिक्कीमच्या भौगोलिक स्थानामुळे आपल्याला अति उंचावरील तुंद्रा ते अगदी खाली डोंगर उतरून येईपर्यंत ट्रॉपीकल हवामानाचा अनुभव येतो. त्या अनुसार आपल्याला उंचावर पांडा, जंगली मांजर, याक असे प्राणी तर रॉबीन, फ्लाय कॅचर, सँडपायपर असे पक्षी दिसतात. अति उंचावरील पाईन, जुनीपर, फर, सायप्रस वगैरे झाडे आढळतात.
होंडेडेंड्रान हा ‘स्टेट ट्री’ मानला जातो. खास त्या भागातील जंगलात मिळणारे विशिष्ट प्रकारचे कोवळे फर्नचे कोंब ‘फिड्ल हेडेड फर्न’ यांची याकचे चीज घालून केलेली अतिशय चवदार असते. मध्यावर कॉटन ट्री, वेलची, विविध बांबू, बटाटे, आलं यांची लागवड दिसते. तर खाली रंगीबेरंगी ऑर्कीडस, गुलाब, झेंडु, हिरव्यागार भाज्यांचे मळे दरवर्षी येथे ऑर्कीडसचे प्रदर्शन भरते. येथील तापमान शक्यतो २८ अंश सेल्सी.पेक्षा जास्त किंवा शून्य अंशाच्या खाली उतरत नसल्याने हवा नेहमीच छान अर्थातच लोकं तब्येतीने चांगले दिसतात.
तिस्ता नदी म्हणजे सिक्कीमची ‘लाईफ लाईन’ मानली जाते. बहुतेक रस्ते नदीच्या साथीनेच जातात. डोंगराळ भागातल्या लहान लहान नद्या मिळून ‘रंगीत’ नदी बनते व तिस्तामध्ये सामावते. पुढे ती दार्जिलिंगपर्यंत जाते. पावसात नदीला पूर येतात. दरड कोसळतात. त्यामुळे रस्त्यांची अवस्था वाईट असते, पण (इफड) ही आर्मीची शाखा मदतीला आहे. सिक्कीममध्ये दसरा-दिवाळीसारखे हिंदू सण तर तिबेटीयन लोसार, लुसांगशिवाय फेब्रुवारीत येणारे नवीन वर्ष जोमाने साजरे केले जाते. त्यादिवशी तिबेटी लोक रंगीत पोशाखात ‘ताशी डिलेक’ अशी आरोळी देत याक डान्स करतात. कांचन जोंगाची ही पूजा केली जाते. जसे वेगवेगळे सण तसेच वेगवेगळ्या खाद्य पदार्थासाठीदेखील सिक्कीम प्रसिद्ध आहे. तेथे मोमो, थेटुक, ठुपका शिवाय विविध लोणची, मासे यांची चव नक्कीच घेतली पाहिजे. रिव्हर रािफ्टग, ट्रेकिंग, रॅपलिंग असे वेगवेगळे स्पोर्टस्चा अनुभव घेऊ शकतो. पण सिक्कीमला भेट दिल्याविना हे सर्व कळणार कसे?
गौरी बोरकर
gauri@borkar.net

पुण्याच्या दक्षिणेकडून सिंहगडची डोंगररांग खालीवर होत पूर्वेला अगदी यवतजवळच्या भूलेश्वपर्यंत धावली आहे. चढ-उतारांच्या या देखाव्यात दिवे घाटाजवळ एक शिखर थोडेसे मान उंचावून बसले आहे. त्याच्या या डोक्यावर एक पांढऱ्या रंगाची टोपीही आहे. लक्षात आले असेल ना, आपण बोलतो आहे ते बोपदेव आणि दिवे घाटादरम्यानच्या कानिफनाथ डोंगराबद्दल!
महाराष्ट्रात शैव आणि शक्ती देवतेखालोखाल दत्तसंप्रदायाचा सर्वत्र प्रसार झालेला आहे. डोंगर दऱ्या, शिखरांच्या टोकांवर अनेक ठिकाणी अशा नाथपंथीय स्थानांची निर्मिती झाली आहे. दिवे घाटाजवळच्या डोंगरावर थाटलेले हे स्थानही यापैकी एक! कानिफनाथ पुण्याहून साधारण तीस किलोमीटरवर. पुण्याहून सासवडमार्गे हा रस्ता; पण थोडी वेगळी वाट चोखाळण्यासाठी कोंढव्याच्या डोक्यावर असलेला बोपदेव घाट चढावा आणि बोपदेव, चांबळी गावातून कानिफनाथचा डोंगर गाठावा. डोंगरावरील या स्थानापर्यंत थेट रस्ता केला आहे. या स्थळापर्यंत स्वारगेटहून दररोज सकाळी एक एसटी बसही धावते. पण याशिवाय थोडे डोंगर चढण्याची सवय असणाऱ्यांनी दिवे घाटाच्या पायथ्याशी वडकी गावात उतरावे किंवा स्वत:चे वाहन असेल, तर डोंगराचा पायथा गाठावा आणि मग थेट समोरच्या कानिफनाथ डोंगराला भिडावे. एखाद्या गडावर जाते तशी ही वाट वर गेली आहे. या पैकी कुठल्याही वाटेने आलो तरी डोंगरावरचे ते पांढऱ्या रंगातील राऊळ आपल्याला वाट दाखवत असते.
आगळा मार्ग!
कानिफनाथ नवनाथांपैकी एक, त्यांचेच इथे मंदिर आहे. याशिवाय उर्वरित नाथांची मंदिरे, दत्त, विठ्ठल - रुक्मिणी, काळभैरवनाथ यांचीही इथे छोटीमोठी मंदिरे आहेत. पण या साऱ्यांत खरे आकर्षण आहे ते कानिफनाथ मंदिराचे आणि त्याच्या छोटय़ाशा दरवाजाचे! या मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी असलेला प्रवेश मार्ग म्हणजे एक खिडकीवजा भुयारी मार्ग आहे. अवघ्या एक ते दीड फूट लांबी-रुंदीच्या या जागेतून आत जायचे. या कल्पनेनेच सुरवातीला घाम फुटतो. पण आपल्या समोर वेगवेगळ्या वयोगटातील, जाडी उंचीची माणसे स्वत:ला त्या एवढय़ाशा अरुंद मार्गातून आत लोटत असतात. विशिष्ट कोनात तिरके होत, आपले शरीर आत घालायचे. आत-बाहेर होतानाही कटाक्षाने देवाकडे डोके ठेवायचे. देवाकडे डोके करणारा सुटतो पण पाय करणारा बरोबर अडकतो असा इथला समज. आपली पहिली वेळ येते त्या वेळी थोडेसे अवघड वाटते पण विश्वास आणि श्रद्धेवर आपल्यालाही जमून जाते आणि आतल्या कानिफनाथाचे दर्शन घडते. या वेळी इथे भिंतीवर लिहिलेला संदेश स्वागत करत असतो, ‘‘असेल श्रद्धा ज्याचे उरी, त्याला दिसे कानिफनाथ मुरारी!’’
कानिफनाथाच्या या अद्भुत दर्शनातून बाहेर यावे, तो बाहेरच्या निसर्ग देखाव्यात अडकायला होते. उत्तरेकडे पुण्याचा विस्तार त्याच्या सीमा शोधा म्हणून सांगतो तर तेच दक्षिणेकडे पुरंदर-वज्रगड, सूर्य पर्वत आदी डोंगर अनंताचा पसारा घेऊन उभे राहतात. सिंहगड, कात्रज, दिवे घाट या साऱ्या ओळखीच्या खाणाखुणा दिसू लागतात. पावसाळ्यात तर या साऱ्या भूमीवर हिरवाईची दाट मखमल पसरते. मग अशावेळी वरच्याच खाणाखुणा घेत भटक्यांच्या कात्रज-कानिफनाथ, कानिफनाथ-मस्तानी तलाव, मल्हारगड-दिवेघाट-कानिफनाथ अशा डोंगरयात्रा धावू लागतात. भक्तांसाठी देव आहे, तर भटक्यांसाठी डोंगर! नीरव शांतता आहे, हिरवा निसर्ग आहे. सकाळ-संध्याकाळी पोहोचलात तर कधी-कधी मोरांचे बागडणेही दिसते. पुण्याजवळ एक दिवसाच्या सहलीसाठी कुठे जावे असा अनेकांना नेहमी प्रश्न पडतो. पण अशांनी आपल्या अवतीभोवतीच थोडीशी अशी नजर फिरवली आणि शुद्ध हेतूने भरारी घेतली तर असे अनेक ‘कानिफनाथ’ सहज दर्शन देऊन जातात!
अभिजित बेल्हेकर
abhibelhekar@gmail.com