Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

लोकमानस

.. तरच बुद्धिजीवी सक्रिय होतील!

 

‘बुद्धिजीवी’ सक्रिय होतील काय? हे सुधाकर कस्तुरे यांचे पत्र (१५ डिसेंबर) वाचले. सद्य परिस्थितीत होणाऱ्या निवडणुका व त्या लढविणारे उमेदवार यांना अनुसरून आहे व कस्तुरे यांनी सुचविलेले उपायही अगदी योग्य वाटतात.
मात्र आपल्या देशाच्या निवडणूक ही कायद्यांशी थेट निगडित असल्याने कस्तुरे यांनी सुचविलेले उपाय प्रत्यक्षात उतरविण्यासाठी निवडणूकविषयक धोरणात अमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. त्याकरिता सरकारने पुढाकार घ्यायला हवा. निवडणूक लढविण्यास पात्र ठरण्यासाठी, स्त्री-पुरुष उमेदवारांना खालीलप्रमाणे अटी घालणे आवश्यक आहे-
स्त्री अथवा पुरुष उमेदवाराचा सुमारे दहा वर्षांचा समाजकार्याचा अनुभव गृहीत धरून निवडणुकीस उभे राहताना उमेदवाराचे वय किमान ३० वर्षे असावे.
सदर वयोमर्यादा ही त्याची कार्यक्षमता ओळखून ५० ते जास्तीत जास्त ५५ वर्षेपर्यंतच ठेवावी म्हणजेच हे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
उमेदवाराचे शिक्षण किमान पदवीपर्यंत झालेले असले पाहिजे.
उमेदवाराचे वास्तव्य तो/ती निवडणूक लढवीत असलेल्या भागातच असावे.
उमेदवार प्रामाणिक, निव्र्यसनी, सृदृढ, चारित्र्यवान, सधन, समाजाभिमुख व सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा असावा.
आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, उमेदवार स्वव्यवसाय दूर सारून, केवळ समाजकारण व राजकारण यात स्वत:ला पूर्णवेळ वाहून घेऊ शकणारा असावा. डॉक्टर, इंजिनीयर, आर्किटेक्ट, बिल्डर, कलावंत, वकील अगर नोकरदार असल्यास तो व्यवसाय व राजकारण एकाच वेळी करण्याची मुभा नसावी. कारण असे व्यवसाय सचोटीने करूनही समाजकार्य साधते. त्यासाठी निवडणूक लढविण्याची गरज नाही!
निवडणुकीला असे स्वरूप दिले तर बुद्धिजीवी सक्रिय का होणार नाहीत?
जयंत गाडगीळ, दहिसर, मुंबई

मॉलच्या निर्मितीमुळे सहकारक्षेत्राला धोका
हल्ली शहरांतून-गावागावांतून मोठमोठे मॉल निर्माण होऊ लागले आहेत. या मॉलमध्ये जीवनावश्यक सर्व वस्तू व किराणा माल उपलब्ध होऊ लागले आहे. तसेच हे मॉलवाले ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी युक्त्या- प्रयुक्त्या करून निरनिराळी आमिषे दाखवून आपल्याकडे ओढीत आहेत.
आपले नेते एकीकडे सहकार चळवळ जोपासली पाहिजे व प्रसार झाला पाहिजे म्हणून सांगतात आणि हेच नेते मॉल काढण्यास प्रोत्साहन देतात व त्याचे उदात्तीकरण करतात. अशा परिस्थितीत सहकार चळवळ टिकणार कशी? मॉलच्या झगमगाटाने ग्राहक जनता मॉलकडे धावत आहे. आपल्याकडे सहकार चळवळीचा उगम अंदाजे दुसऱ्या महायुद्धानंतर झाल्याचे सांगितले जाते. आज जी रेशन दुकाने ठिकठिकाणी दिसताहेत ती सुमारे १९४४ सालच्या सुमारास निर्माण झाली व थोडय़ा अवधीत ती लोकप्रिय होऊन जनतेच्या गळ्यातील ताईत बनली.
परंतु आज म्हणजे काही वर्षांपासून मोठमोठे मॉल उभे राहत आहेत. त्यामुळे सहकारी सोसायटय़ांची जी दुकाने आहेत त्यांच्याकडे ग्राहक जाण्याचे टाळतात व मॉलकडे आकर्षित होताहेत. परिणामी सहकारी संस्थांची दुकाने ओस पडण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणजेच सहकार क्षेत्राला हे मॉल मारक ठरणार आहेत. म्हणजेच या मॉल संस्कृतीमुळे सहकार क्षेत्राला धोका आहे. याचा विचार राज्यकर्ते व सहकारी क्षेत्रातील विचारवंतांनी गांभीर्याने करावा. सहकारी संस्थांची दुकाने ही लोकांना आवश्यक आहेत-ती टिकायलाच हवीत. कारण ती काळाची गरज आहे, याचा गांभीर्याने विचार करावा. मॉलच्या निर्मितीवर नियंत्रण असावे!
हिराजी पाटील, वडवली, वसई

रेल्वे नफ्यात आहे?
रेल्वे नफ्यात असल्याचा दावा रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना करतात, पण मोटरमनची भरती करत नाहीत. त्यामुळे कांदिवली यार्डात पाच नवीन रेल्वेगाडय़ा दाखल होऊनही त्या प्रवाशांच्या सेवेत येऊ शकत नाहीत. बोरिवली-विरार मार्गाचे चौपदरीकरण होऊनही या मार्गावरून लोकल गाडय़ा धावत नाहीत. त्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना दिलासा मिळत नाही. रेल्वे नफ्यात आहे तर त्याचा फायदा प्रवाशांना सुविधा देण्यासाठी का होत नाही?
मुंबईतल्या प्रवाशांना सुविधा न देता प्रत्येक अर्थसंकल्पात परप्रांतीयांसाठी स्वस्त एअरकंडिशनची सुविधा असलेल्या ‘गरीब रथा’ची मात्र सातत्याने भर पडत असते. रेल्वेला होणाऱ्या नफ्यात मुंबईतील लोकलचा काहीच सहभाग नाही?
संगीता जांभळे, मीरा रोड

अमीन सयानी : आठवणींना उजाळा
ज्येष्ठ वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांच्या माहितीपूर्ण लेखावरून ज्येष्ठ कार्यक्रम सादरकर्ते अमिन सयानी यांचा जाहीर सत्कार होणार असल्याचे कळून अत्यंत आनंद झाला.
अमीन सयानी यांच्या सत्काराच्या निमित्ताने ‘बिनाका गीतमाला’ या लोकप्रिय कार्यक्रमाबरोबरच रेडिओ सिलोनच्या आठवणी जाग्या झाल्या. रेडिओ सिलोनवरील तत्कालीन श्रोतेप्रिय कार्यक्रम आणि ते सादर करणारे उद्घोषक यांच्याविषयी काही अप्रसिद्ध माहिती प्रसिद्ध झाल्यास त्या आठवणींना उजाळा मिळेल. तसेच काही वर्षांपूर्वीपासून रेडिओ-सिलोनचं कार्यक्रम स्पष्टपणे ऐकू येत नसल्याने माझ्यासारख्यांनी ते ऐकण्याचा नाद सोडला असला तरी ते पुन्हा ऐकण्यासाठी जाणकारांनी काही उपाय सांगितल्यास मी त्यांचा आभारी होईन.
शांताराम परब, चुनाभट्टी, मुंबई

‘ज्योतीने तेजाची आरती’
शनिवार, २५ जानेवारी रोजी झी मराठी वाहिनीवरून पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाचा आढावा घेणारा कार्यक्रम बघितला. खुद्द पंडितजींच्या आवाजातली गाणी व चित्रफिती, तसेच त्यांच्या समकालिनांच्या मुलाखती व आठवणी वगळता हा कार्यक्रम मनाला फारसा भिडणारा झाला नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे यासाठी निवडलेली गायक मंडळी! शंकर महादेवनचा काहीसा अपवाद वगळता बाकीच्यांचं गाणं म्हणजे ‘ज्योतीने तेजाची आरती’ असलाच प्रकार होता.
अनेक वर्षे पंडितजींच्या मागे साथ केलेल्या वयस्कर गायकांचं गाणं पंडितजींच्या जवळपासही जाणारं नव्हतं. त्यांच्यासारखं गायचा प्रयत्न करणाऱ्या तरुण मंडळींना अजून किती लांबचा पल्ला गाठायचाय व त्यासाठी किती मेहनत करावी लागणार आहे हे त्यांचं गाणं ऐकूनच लक्षात येत होतं! आपल्या जोरकस गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गायिकेचा यातला सहभाग कशासाठी ते काही समजलं नाही. त्याऐवजी पंडितजींची काहीशी आठवण करून देणाऱ्या जयतीर्थ मेवुंडींचा समावेश शोभून दिसला असता. पुरुष निवेदकाचं एकसुरी संहितावाचन तर कंटाळा आणणारं होतं.
कार्यक्रम पाहात असताना झी मराठीनं यापूर्वी सादर केलेल्या कितीतरी उत्तमोत्तम कार्यक्रमांची आठवण आली. काहीशा विश्रांतीनंतर पुनरागमन झालेल्या ‘नक्षत्रांचे देणे’ या मालिकेतील पंडितजींवरील कार्यक्रम दमदार झाला नाही हे मात्र खरे!
डॉ. सुरेश चांदवणकर, कुलाबा, मुंबई