Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

अखेर नागनाथअण्णाही गुरफटले सत्कार आणि जाहिरातींच्या वर्षांवात
सांगली, २८ जानेवारी / गणेश जोशी

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दुष्काळग्रस्तांना पाणी नाही.. धरणग्रस्तांच्या हाताला काम नाही.. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत.. दीनदलितांना सन्मान नाही.. अशा परिस्थितीत या पुरस्काराचा मला आनंद कसा वाटेल, अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त करताना क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी अत्यंत भावूक झाले होते व त्यांच्या नयनातूनही अश्रूही तरळले होते. मात्र अवघ्या २४ तासांतच ते सत्ताधारी व विविध राजकीय नेत्यांकडून सत्कार स्वीकारण्यात गर्क झाले आहेत.

डॉ. कोटणीस स्मारक पाहणीसाठी चीन वकिलातीचे प्रमुख आज सोलापूरला येणार
सोलापूर, २८ जानेवारी/प्रतिनिधी

थोर मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाच्या पाहणीसाठी मुंबई येथील चीनच्या वकिलातीतील प्रमुख झँग व्ॉग हे उद्यापासून दोन दिवस सोलापुरात येत आहेत. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेले डॉ. कोटणीस स्मारकाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी स्मारक समितीने जिल्ह्याचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन केली.

सांगलीत विकासकामे होत नसल्याने सत्ताधारी आघाडीचे सदस्यही नाराज
सांगली, २८ जानेवारी / प्रतिनिधी

सांगली महापालिकेत विरोधकांची मंजूर विकासकामे अडविण्याचा प्रकार एकीकडे सुरू असतानाच खुद्द सत्ताधारी विकास महाआघाडीतील सदस्यही विकासकामे होत नसल्याने आक्रमक झाले आहेत. प्रभाग समिती दोनच्या बैठकीत याचा प्रत्यय आला. सत्ताधारी गटातील सदस्यांनीच सभापती व अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

अण्णा हजारे यांना ‘रामशास्त्री’ पुरस्कार
सातारा, २८ जानेवारी/प्रतिनिधी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची या वर्षीच्या न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे सामाजिक न्याय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती क्षेत्रमाहुली येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेबराव जाधव यांनी दिली.या पुरस्काराचे वितरण विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या हस्ते शनिवार, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान खासदार श्रीनिवास पाटील भूषविणार आहेत. जलसंपदामंत्री रामराजे नाईक- निंबाळकर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी या पुरस्काराने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गं. बा. सरदार, बाबा आमटे, यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, नानाजी देशमुख, गोविंदभाई श्रॉफ, पांडुरंगशास्त्री आठवले, अप्पासाहेब पवार, बाळासाहेब भारदे, डॉ. बानू कोयाजी, डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग, मोहन धारिया, नसीमा हूरजूक, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. अनिल अवचट आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. पैलवान श्रीरंग जाधव क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने श्रीरंग गौरव क्रीडा पुरस्कार सुरु करण्यात आला असून, प्रथम पुरस्कारासाठी ज्येष्ठ क्रीडा संघटक येथील श्री शिवाजी उदय मंडळाचे उध्वर्यू गुरुवर्य बबनराव उथळे यांची निवड करण्यात आली आहे. ११ हजार १११ रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण न्या. रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार समारंभात करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे विश्वस्त अमर जाधव यांनी सांगितले.

अवजड वाहनांची वाहतूक नेहमीची
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर अनेक वळणे धोकादायक
शाहूवाडी, २८ जानेवारी / वार्ताहर

शाहूवाडी तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर या हमरस्त्यावरील अनेक वळणे जीवघेणी ठरत असून ही वळणे निघणार तरी कधी असा प्रश्न आहे. याच मार्गावर अवजड वाहनांची मोठी वाहतूक होत आहे. ही वळणे जीवघेणी ठरण्याबरोबरच वाहतुकीसही मोठे अडथळे ठरत आहेत.या हमरस्त्यावरील कोल्हापूरपासून शाहूवाडी तालुक्याची हद्द असलेल्या आंबा घाटापर्यंत अशी अनेक धोकादायक वळणे आहेत. यामध्ये बोरपाडळे येथील दोन वळणे, बांबवडे शेजारील भाडळे खिंड येथील वळणे, गागवे येथील वळण, जुळवाडी खिंड येथील वळण तर मलकापूरपासून आंब्यापर्यंत किमान चार-पाच धोकादायक वळणे आहेत. या मार्गावर अनेकदा गॅस टँकर पलटी होऊन गंभीर प्रसंगही उद्भवले, पण कोणाला याचे सोयरसुतक नाही. गेल्याच वर्षी एसटीचा अपघात होऊन १६ जणांचा बळी गेला. ही वळणे आणि संबंधित यंत्रणेची निष्क्रियता आणखी कितीजणांचा बळी घेणार हाच खरा प्रश्न आहे.जुळेवाडी येथील वळण तरी एवढे भयानक आहे की येथे एखादे वाहन खाली कोसळले, तर जीवित राहणे सोडाच, पण वाहनांचाही चेंदामेंदा होऊ शकतो. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या वळणावरचे संरक्षक खांबही मोडून पडले आहेत. कदाचित वळणच धोकादायक, सर्वात गंभीर म्हणून अनेकांनी सावधानतेने येथून प्रवास केला म्हणूनच सर्वात मोठे धोकादायक वळण असूनही येथे अजूनही अपघात झाला नाही. पण म्हणून दुर्दैवी घटनेची वाट पाहायची का, असा प्रश्न प्रवासी व वाहनचालकांतून उपस्थित केला जात आहे.

अस्मिता पोतदार यांच्या भरतकाम लाकृतीला राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार
कोल्हापूर, २८ जानेवारी / प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या २००७ च्या राष्ट्रीय हस्तकला पुरस्कारासाठी अस्मिता अरुणकुमार पोतदार यांच्या ‘राजस्थानी शेतकरी’ या भरतकाम कलाकृतीची निवड झाली आहे.
राजस्थानी शेतकरी या व्यक्तिचित्र कलाकृतीस हा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला असून, महाराष्ट्रास प्रथमच भरतकामासाठी देण्यात आला आहे. सोने, चांदी, लाकूड, दगड, मेटल, बांबू, टेराकोटा, साडीवर्क अशा विविध माध्यमांमध्ये नाजूक कलाकुसर करणाऱ्या हस्तशिल्प कारागिरांना हस्तकलांचा विकास व त्याचा प्रसार करण्याच्या कामाबद्दल हे पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतात. देशभरातून सादर होणाऱ्या कारागिरीतून अत्यंत काटेकोरपणे परीक्षण करून निवड केली जाते. सौ.अस्मिता पोतदार यांनी १९९८ पासून भारतीय शेतकरी, वृध्द स्त्री, नववधू, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, नेपाळी शेतकरी अशी विविध व्यक्तीचित्रे तसेच निसर्गचित्रे, नवग्रह व दशावतार यांची चित्रमालिका सादर केली होती. सौ.अस्मिता पोतदार या जी.डी.आर्ट, ए.एम.असून येथील भक्तीसेवा विद्यापीठ सोसायटीच्या महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये गेली १३ वर्षे कला शिक्षिका म्हणून सेवेत कार्यरत आहेत. एक लाख रुपये, ताम्रपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून राष्ट्रपती सौ. प्रतिभा देवीसिंग पाटील यांच्या हस्ते तो देण्यात येणार आहे.

मोहोळजवळ दलित महिलेच्या घरावर हल्ला; नांगर फिरविला
सोलापूर, २८ जानेवारी/प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथे एका दलित महिलेच्या घरावर सशस्त्र हल्ला करुन ट्रॅक्टरचे नांगर फिरवून घर भुईसपाट केल्याची घटना घडली. याप्रकरणी अकराजणांविरुध्द मोहोळ पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेमुळे सौ. बाई ज्ञानोबा कांबळे (वय ६०) या वृध्द दलित महिलेचे कुटुंबीय उघडय़ावर आले आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार गावच्या शिवारात तिच्या मालकीच्या शेतजमिनीत वस्ती करुन कांबळे कुटुंबीय राहत होते. परंतु पूर्व वैमनस्यावरुन गावातील संजय हरिबा माने, कुमार नारायण माने, लहू नारायण माने यांच्यासह अकराजणांनी कांबळे यांच्या घरावर काठय़ा-दगडांनी हल्ला केला. यात बाई कांबळे हिच्यासह दीपक कांबळे, मंदाबाई कांबळे व अन्य दोघे असे पाचजण जखमी झाले. हल्लेखोरांनी घराची तोडफोड करुन त्यावर ट्रॅक्टरच्या साह्य़ाने नांगर फिरविला. या घटनेमुळे कांबळे कुटुंबीय दहशतीच्या छायेखाली असून पोलिसांनीही याबाबत गंभीर दखल घेऊन संबंधितांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने हाताळला; गुन्हा दाखल
आटपाडी, २८ जानेवारी / वार्ताहर

खरसुंडी येथे प्रजासत्ताकदिनी ग्रामसेवक व सरपंचांकडून राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने हाताळण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी ग्रामसेवक सुभाष बाड याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खरसुंडी ग्रामसचिवालयाच्या आवारात ध्वजवंदन कार्यक्रमावेळी चुकीच्या पद्धतीचे नियोजन झाल्याने ध्वज फडकला नाही. त्यामुळे पुन्हा सरपंच राम हरी इंगवले यांनी ध्वज उतरवून पुन्हा फडकाविण्याचा प्रयत्न केला. पण ध्वज फाटला. मात्र राष्ट्रध्वज तसाच ठेवून अन्य कार्यक्रम उरकण्यात आले. त्यानंतर या विषयावरून वादावादी झाली. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. शेवटी दुपारी गटविकास अधिकारी शरच्चंद्र माळी यांनी खरसुंडीला भेट दिली. ध्वज उतरवून पुन्हा नवीन ध्वजासह ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रध्वजाच्या या अवमानाबद्दल खरसुंडी येथे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.