Leading International Marathi News Daily                                गुरुवार, २९ जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुन्हा दिलासा!
नवी दिल्ली, २८ जानेवारी/पीटीआय

केंद्र सरकारने आज घरगुती वापराचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे २५ रुपये, पाच रुपये व दोन रुपयांची दरकपात जाहीर केली. गेल्या दोन महिन्यांतली ही दुसरी दरकपात आहे. ही दरकपात बुधवारी मध्यरात्रीपासूनच अंमलात येणार आहे, असे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज रात्री जाहीर केले. आज सायंकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घरगुती वापराचा गॅस, पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत दरकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली होती.
पत्रकारांशी बोलताना मुरली देवरा म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकी किती दरकपात करावयाची याचा निर्णय घेतला जाईल. पेट्रोलियमजन्य उत्पादनांवर लावलेल्या करात मात्र कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, असे देवरा यांनी स्पष्ट केले.आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या तेलाच्या किमती आणि तोंडावर आलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन केंद्राने लोकांची सहानुभूती मिळविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

इंडिया शाइनिंग!
भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी आजचा दिवस विजयाचा ठरला. केवळ क्रिकेटच नव्हे तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतही भारताने आज चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले. त्यामुळे एकाच दिवशी भारताच्या पदरी यशाचे दान पडल्याने क्रीडाचाहत्यांमध्ये उत्साह होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध सहा विकेट्सनी विजय मिळविला आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत इंग्लंडविरुद्धच्या ५-० अशा विजयानंतर सलग सहाव्या विजयाची नोंद केली. धोनीच्या नाबाद ६१ धावा, गौतम गंभीर (६२) व सुरेश रैना (५४) यांची अर्धशतके यामुळे भारताने हा विजय साकारला. ३९ वर्षीय जयसूर्याचे दमदार शतक ही श्रीलंकेच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. अखेर तोच सामन्यात सर्वोत्तम ठरला. भारतीय क्रिकेट संघाने एकीकडे मैदान मारले तर दुसरीकडे भारतीय टेनिसपटूंनी ऑस्ट्रेलियात कोर्ट जिंकले. लिएण्डर पेस व त्याचा सहकारी ड्लोही यांनी दुहेरीत बोलेल्ली व सेप्पी या इटलीच्या जोडीला नमवून उपान्त्य फेरीत धडक मारली तर मिश्र दुहेरीत सानिया व महेश भूपती यांनीही उपान्त्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. भारतीय नेमबाजी क्षेत्रातही आज एक आनंदाची बातमी मिळाली. आघाडीचा नेमबाज गगन नारंग याला एअर रायफलच्या जागतिक क्रमवारीत पाचवे स्थान मिळाले.

राष्ट्रवादी लोकसभेच्या ७० जागा लढविणार
पुणे, २८ जानेवारी / खास प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशभरात पन्नास ते सत्तर जागा लढविणार असल्याचे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह अन्य पक्षांशी राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याचे आपल्या पक्षाचे चित्र संसदेच्या येत्या अधिवेशनानंतर स्पष्ट होणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसशी राज्यात जागा वाटपाबाबत होणाऱ्या वाटाघाटी, लोकसभा की राज्यसभेत जाण्याची त्यांची भूमिका, पंतप्रधानपदासाठी ‘राष्ट्रवादी’कडून निर्माण केली जाणारी प्रतिमा, विविध राजकीय पक्षांशी आघाडी करण्याबाबतची बोलणी आणि पक्षाचे निवडणुकीतील धोरण यावरही पवार यांनी भाष्य केले. काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीतीत असलेल्या नारायण राणे यांनी घेतलेल्या भेटीबाबतही त्यांनी मतप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देशाचे भावी पंतप्रधान अशी पवार यांची प्रतिमा निर्माण केली जात आहे. ‘राष्ट्रवादी’ला मिळणाऱ्या जागांवर हे शक्य होईल का, या प्रश्नावर भाष्य करू इच्छित नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान व्हायचे असेल तर संसदेत चांगली संख्या लागते याची कल्पना आपल्याला आहे. देशात काही जागा लढविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे आणि साधारण पन्नास ते सत्तर जागा लढविण्याची तयारी आहे, असे त्यांनी नमूद केले.

ठाण्यातील बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी आता मुख्य सचिवांवर !
मुंबई, २८ जानेवारी/प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील चार महापालिका, १३ नगरपालिका आणि ‘सिडको’ यांच्याखेरीज जिल्हा परिषदेच्या हद्दीत उभी राहिलेली पाच लाखांहून अधिक बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याच्या बाबतीत याआधी दिलेली आश्वासने पाळण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी हतबलता व्यक्त केल्यानंतर या संदर्भात ठोस पावले उचलण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने आज राज्याच्या मुख्य सचिवांवर सोपविली. निधी, मनुष्यबळ, साधनसामुग्री आणि राजकीय इच्छाशक्ती याबाबतीत राज्य सरकारकडून पाठबळ मिळत नसल्याने संबंधित महापालिका, नगरपालिका व अन्य स्थानिक संस्थांनी हतबलता व्यक्त केली आहे.

राणेंचा विलासरावांवरील राग निवळला
नवी दिल्ली, २८ जानेवारी/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्यावरील निलंबनाची कारवाई लवकरच रद्द करण्याचे संकेत काँग्रेसश्रेष्ठींनी दिले आहेत. राणे यांनी आज सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी, संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्या भेटी घेत काँग्रेस पक्षातच राहण्याची इच्छा व्यक्त केली, एवढेच नव्हे तर छत्तीसचा आकडा असलेल्या राज्यातील काँग्रेस नेत्यांशी सौजन्य व मित्रत्वाने वागण्याची ग्वाहीही दिली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह पक्षांतर्गत विरोधकांवरील ‘राग’ मावळल्याचे सांगताना त्यांच्यावर ‘लोभ’ कायम आहे, असे राणे म्हणाले.

एचआयव्हीबाधित मुलांच्या पोषणाकरिता पैशांची मागणी करणारे ‘बाजीराव’
संदीप प्रधान
मुंबई, २८ जानेवारी

एचआयव्हीबाधित मुलांकरिता अकोला येथे निवासी शाळा व केअर सेंटर उभारण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्याकरिता प्रत्येक मुलामागे दोन हजार रुपये देण्याची मागणी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील बडय़ा नेत्यांचे अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यास ‘सरकारी बाजीराव’ विलंब लावत असल्याने या प्रकल्पाकरिता दत्तक घेतलेल्या चार एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांचा गेल्या दोन महिन्यांत मृत्यू झाला आहे.

बीडलगत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट
सात मजूर मुली ठार; पंधरा जखमी
बीड, २८ जानेवारी/वार्ताहर
शोभेची दारू व तोफा तयार करणाऱ्या जिल्ह्य़ातील नेकनूर येथील कारखान्यात दुपारी अचानक आग लागून महाभयंकर स्फोट झाला. कारखान्यात काम करणाऱ्या सात मुलींच्या देहाच्या या स्फोटामुळे अक्षरश: चिंधडय़ा उडाल्या. या सर्व मुली १५ ते २० वयोगटातील आहेत. एकूण पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, मृत मुलींच्या शरीराचे तुकडे बाजूच्या झाडावर व शेतात जाऊन पडले. या स्फोटात १० फूट रुंदीची व १५ फूट लांबीची खोली भिंतीसह जमीनदोस्त झाली.

निवडणूक तारखांची घोषणा करणाऱ्या कुरेशींना ‘चपराक’
नवी दिल्ली, २८ जानेवारी/खास प्रतिनिधी

आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा न करता देशातील लोकसभा निवडणुकांच्या तारखांची लंडनमध्ये जाऊन घोषणा करण्याचा अतिउत्साही निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्या अंगलट आला. लोकसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नसल्याचे जाहीर करून आज निवडणूक आयोगाने औचित्याचा भंग करणाऱ्या कुरेशींना तत्परतेने वेसण घातली.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निश्चित झाल्या नसल्या तरी निवडणुका ८ एप्रिल ते १५ मे दरम्यान होतील, असे लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये कुरेशी यांनी जाहीर केले. पण निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाची अजून कोणतीही बैठक झाली नसल्याचे आज आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी आणि ज्येष्ठ निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना विश्वासात न घेता कुरेशी यांनी उत्साहाच्या भरात औचित्याचा भंग केला आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांची घोषणा लंडनमध्ये कुरेशी यांनी केल्याचे वृत्त प्रसारित होताच आज दिल्लीत कुरेशी यांच्या या कृतीविषयी नोकरशहा आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत होते. हा सरळसरळ औचित्यभंग असल्याची टीका अनेक वर्तुळातून कुरेशी यांच्यावर करण्यात येत होती. स्वत सनदी अधिकारी राहिलेले कुरेशी यांना आपल्या मर्यादांचे भान कसे राहिले नाही, अशीही टिप्पणी राजकीय वर्तुळात होत होती. परिणामी दुपारी लोकसभा निवडणुकांच्या अशा कोणत्याही तारखा ठरल्या नसल्याचे निवडणूक आयोगाला जाहीर करणे भाग पडले. मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनाही कुरेशी यांचे हे वर्तन अजिबात रुचले नसल्याची चर्चा सुरु होती.

मुख्यमंत्र्यांची दिल्लीला धावती भेट, काँग्रेसश्रेष्ठींशी चर्चा
नवी दिल्ली, २८ जानेवारी/खास प्रतिनिधी

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सायंकाळी अकस्मात दिल्ली गाठले आणि काँग्रेसश्रेष्ठींशी सल्लामसलत केली. बायपास सर्जरीनंतर एम्समध्ये विश्रांती घेत असलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन त्यांनी मनमोहन सिंग यांना दीर्घायुरोग्य चिंतिले. माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या पुनर्वसनासाठी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग येत असतानाच मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज आपल्या विमानाने दिल्लीत दाखल झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही आकस्मिक व धावती भेट केवळ मनमोहन सिंग यांना शुभेच्छा देण्यापुरती नव्हती हे स्पष्ट झाले. पंतप्रधानांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांनी अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस, खासदार राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे समजते. त्यानंतर काँग्रेस मुख्यालयात दाखल होऊन त्यांनी पक्षाचे कोषाध्यक्ष मोतीलाल वोरा, संघटन सरचिटणीस जनार्दन द्विवेदी आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची भेट घेतली. काँग्रेस मुख्यालयात त्यांच्यासोबत पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी होते. मुंबईला परतण्यासाठी विमानतळाकडे निघताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याशीही चर्चा केली. कुठल्याही विशेष मोहीमेसाठी आपण दिल्लीत आलो नव्हतो, असे चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८