Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, २९ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राणेंचा विलासरावांवरील राग निवळला
नवी दिल्ली, २८ जानेवारी/खास प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्यावरील निलंबनाची कारवाई लवकरच रद्द करण्याचे संकेत काँग्रेसश्रेष्ठींनी दिले आहेत. राणे यांनी आज सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी, संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्या भेटी घेत काँग्रेस पक्षातच राहण्याची इच्छा व्यक्त केली, एवढेच नव्हे तर छत्तीसचा आकडा असलेल्या राज्यातील काँग्रेस नेत्यांशी सौजन्य व मित्रत्वाने वागण्याची ग्वाहीही दिली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह पक्षांतर्गत विरोधकांवरील ‘राग’ मावळल्याचे सांगताना त्यांच्यावर ‘लोभ’ कायम आहे, असे राणे म्हणाले.
डिसेंबर महिन्यात ज्यांच्यावर आरोपांच्या तोफा डागल्या, त्यांच्याचविषयी आज राणे सबुरीने बोलत होते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्थिरस्थावर व्हायला वेळ लागणारच, येणाऱ्या दिवसात कट्टर प्रतिस्पर्धी विलासराव देशमुख यांच्याशी झालेले वाद आणि ‘गैरसमज’ दूर होतील, अशी सामंजस्याची भूमिका ते मांडत होते. लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षातील बेदिली संपुष्टात आणण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या धोरणाशी ते सहमत असल्याचे दिसत होते.
आज दुपारी साऊथ ब्लॉक येथे राणे यांनी अँटनी यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. त्यांचा प्रतिसाद सकारात्मक होता, असे राणे म्हणाले. पटेल यांच्यासोबत आपली ४०-५० मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही भेटींच्या वेळी आपल्यासोबत कन्हैयालाल गिडवाणी होते, असे राणे यांनी सांगितले.
आपण काँग्रेस पक्षातच राहू इच्छितो, असे स्पष्ट करताना निवडणुकीच्या काळात पक्ष देईल ती जबाबदारी १०० टक्के पार पाडण्याची तयारी त्यांनी दर्शविली. पुढच्या चार-पाच दिवसात पक्षश्रेष्ठी आपल्याविषयी निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षातच राहण्यामागची कारणे कोणती आहेत, असे विचारले असता त्यावर आपण आताच बोलू इच्छिणार नाही, असे राणे म्हणाले. आपल्याविषयीचा निर्णय झाल्यानंतर सोनिया गांधींची भेट घेऊ, असे ते म्हणाले. पुण्यात कुटुंबियांसोबत दोन दिवस मुक्कामाला असताना आपण केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट गुप्त स्वरुपाची नव्हती. पवार पुण्यात आहेत आणि ते भेटू शकतात, असे ऊर्जा मंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे आपण त्यांना भेटलो. काँग्रेस पक्षावर दबाव आणण्याच्या हेतूने आपण पवार यांना भेटलो नाही. काँग्रेसश्रेष्ठी आपल्याविषयी कधी निर्णय घेणार अशी विचारणा पवार यांनीही केल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणूक लढण्याविषयी आपल्याला कोणीही विचारलेले नाही. या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर कोणीही निवडून येईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.