Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, २९ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

बीडलगत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट
सात मजूर मुली ठार; पंधरा जखमी
बीड, २८ जानेवारी/वार्ताहर

 

शोभेची दारू व तोफा तयार करणाऱ्या जिल्ह्य़ातील नेकनूर येथील कारखान्यात दुपारी अचानक आग लागून महाभयंकर स्फोट झाला. कारखान्यात काम करणाऱ्या सात मुलींच्या देहाच्या या स्फोटामुळे अक्षरश: चिंधडय़ा उडाल्या. या सर्व मुली १५ ते २० वयोगटातील आहेत. एकूण पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, मृत मुलींच्या शरीराचे तुकडे बाजूच्या झाडावर व शेतात जाऊन पडले. या स्फोटात १० फूट रुंदीची व १५ फूट लांबीची खोली भिंतीसह जमीनदोस्त झाली. आग कशी लागली, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. मृतांमध्ये दोन-दोन बहिणींचा समावेश आहे. जखमींमध्ये एक आई व तिच्या पाच वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. सर्व मृत मुली अविवाहित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कामावर असलेल्या एकूण चौदा मजुरांपैकी आठ मुली स्फोटात ठार झाल्या. त्यांची नावे अशी : शेख रुक्सार शेख रफीक (वय १९), शेख राणी शेख सत्तार (१७), रेश्मा सुधाकर इंगोले (९), पूजा सुधाकर इंगोले (१६), राजश्री संतोष सोनवणे (१७), भाग्यश्री संतोष सोनवणे (१५) व कांचन संभाजी गायकवाड (वय १८). या सर्व मुली नेकनूर व मांजरसुंबा येथील राहणाऱ्या आहेत.
जखमींची नावे अशी : शाहिस्ता बेगम महंमद रफीक (वय १५), अक्का रघुनाथ सुरवसे (१८), अरुणा इंगोले (३५), नंदा लाड (३०), शिवशंकर लाड (५), राजूबाई कोकाटे (४०), तस्लिमा शेख (२४), सय्यद शहानवाज (३५), रबानी शेख (३०), शेख शबाना (१८), अलीमा शेख (२५), शेख अस्लमा (२०), शेख मुजब्बी (३५), शेख जुबेदा (३५), सय्यद सुलेमा (२२). हे सर्व नेकनूर व मांजरसुंबा येथील राहणारे आहेत. गंभीर जखमी असलेल्या अक्का सुरवसे हिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. अन्य जखमींवर नेकनूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आमदार उषा दराडे, जिल्हाधिकारी पंकजकुमार यांनी संध्याकाळी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
नेकनूर गावालगत रत्नागिरी फाटय़ाच्या बाजूला शेख शहानवाज यांच्या मालकीचा शोभेची दारू आणि तोफा बनवण्याचा कारखाना आहे. दीडशे चौरस फुटांच्या तीन खोल्यांमध्ये हा कारखाना मागील अनेक दिवसांपासून चालू आहे. येथे नेकनूर आणि मांजरसुंबा येथील मजूर कामावर असतात. मजुरांमध्ये प्रामुख्याने मुली आहेत. आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास या कारखान्यात अचानक आग लागून भयंकर स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाच्या दिशेने लोकांनी धाव घेतली तेव्हा कारखाना पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. मजुरांच्या किंकाळ्या व आक्रोश गगनभेदी होता. घटनास्थळावरील इतर मृतदेहांची अवस्था मात्र सुन्न करणारी होती. त्यांचे अवयव एक हजार फुटावर असलेल्या ज्वारीच्या शेतात, तर कारखान्याच्या शेजारी असलेल्यावर झाडावर व इतर ठिकाणी इतस्तत: पडले होते. गावकऱ्यांनी शरीराचा एक एक भाग एकत्र करून गाठोडे बांधले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. पवार यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, घटनास्थळी मृतदेह अत्यंत छिन्नविच्छिन्न असल्यामुळे मृतांची संख्या अधिकृतपणे निश्चित करता आली नाही. नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. अग्निशामक दलाच्या बंबांनी लागलेली आग विझविली. या घटनेने नेकनूर व मांजरसुंबा परिसरात थरकाप उडाला असून दारू बनवणाऱ्या कारखान्यात वीजपुरवठा नसतो. मग आग लागून स्फोट झाला कसा, याबाबत तर्कवितर्क लावले जात असले तरी स्फोटाचे कारण मात्र समजू शकले नाही.