Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

प्रादेशिक

खात्याचे सचिव बदला
आदिवासी मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
संदीप आचार्य
मुंबई, २८ जानेवारी

आदिवासी विकास विभागाचे सचिव पी. एस. मीना यांच्या विक्षिप्त वागण्यामुळे आदिवासी विभागातील क्षेत्रीय अधिकारी तसेच मंत्रालयातील अधिकारी अत्यंत तणावाखाली आहेत. त्यांच्या लहरी वागण्यामुळे गेले काही महिने आदिवासी विकास आयुक्तपदावर काम करण्यास कोणताही आयएएस अधिकारी तयार होत नाही. विभागातील अनेक अधिकारी एकतर बदलीसाठी प्रयत्न करत आहेत अथवा रजेवर जात आहेत.

अर्भकाच्या अपहरण प्रकरणी डॉक्टर, परिचारिका निलंबित
मुंबई, २८ जानेवारी/प्रतिनिधी

शीव येथील लोकमान्य टिळक इस्पितळातून एक नवजात अर्भक पळवून नेल्याच्या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी संबंधित वॉर्डचे प्रमुख डॉ. नंदनवार आणि त्या वेळी तेथे डय़ुटीवर असलेल्या प्रभारी परिचारिका शोभा परब यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करावी आणि ही चौकशी पूर्ण होऊन त्यासंबंधी पुढील आदेश होईपर्यंत या दोघांना सेवेतून निलंबित करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला.

जूनअखेपर्यंत उपनगरी लोकल डहाणूपर्यंत ?

मुंबई, २८ जानेवारी / प्रतिनिधी

दररोज मुंबईला अप-डाऊन करण्यासाठी सध्या पालघर-डहाणूवासीयांना विरारला गाडय़ा बदलण्याची कसरत करावी लागते. कोणताही अडथळा न आल्यास येत्या जुलैपासून या साऱ्या कटकटींपासून प्रवाशांची सुटका होऊन, त्यांना थेट लोकलने डहाणूपर्यंत जाणे शक्य होणार आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) पहिल्या टप्प्यांतर्गत पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा विरार पुढे डहाणूपर्यंत विस्तारित करण्याचे काम सध्या जोरात काम सुरू आहे.

ओरबाडणारी भांडवलाशाही नको, हवी मानवी चेहऱ्याची अर्थव्यवस्था
‘चार दिवस मौजेचे’मध्ये अर्थतज्ज्ञांचा सूर
मुंबई, २८ जानेवारी / प्रतिनिधी
अमेरिकेत आलेले आर्थिक आरिष्ट हे भयंकर असून त्यातून निर्माण झालेल्या मंदीचा फटका भारतालाही झळ पोहोचवणार आहे. मात्र अमेरिकेच्या मागोमाग फरफटत न जाता भारताने मोकाट भांडवलशाही ऐवजी मानवी चेहरा असलेल्या अर्थव्यवस्थेचा अंगीकार करावा, असा सूर विविध अर्थतज्ज्ञांनी नुकताच गोरेगाव येथे व्यक्त केला. मौज प्रकाशन गृह आणि प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘चार दिवस मौजेचे’ या कार्यक्रमात जागतिक आर्थिक संकट आणि भारत या परिसंवादात हा सूर व्यक्त करण्यात आला.

८६५ किलोमीटर अंतर कापून विनोदचा चितोडगडमध्ये प्रवेश
मुंबई, २८ जानेवारी/प्रतिनिधी

मिशन 'व्हील टू हिल'वर निघालेला विनोद पुनमिया बुधवारी संध्याकाळी ८६५ किलोमीटरचे अंतर पार करून वेळेवर व सुखरुप राजस्थानमधील चितोडगड येथे पोहोचला. सोमवारी सकाळी मुंबईहून निघाल्यानंतर वाटेत दहिसर चेकनाक्यावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार गोपाळ शेट्टी यांनी पुनमियाचे व त्याच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. दुपारी वापीत विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळी योजलेल्या वेळेनुसार विनोदने सुरत गाठले. मंगळवारी सकाळी सुरतेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास वाटेत जागोजागच्या नागरिकांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताचा स्वीकार करत संध्याकाळी हिम्मतनगरला आटोपला. मंगळवारची रात्रीची विश्रांती हिम्मतनगरमध्ये घेतल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरु केला. उदयपूरमार्गे प्रवास करीत संध्याकाळी विनोद व त्याचे सहकारी चितोडगडला पोचले. बुधवारच्या प्रवासात दोघा जर्मन प्रवाशांनी सायकलवरून विनोद पुनमियांना काही वेळ साथही केली. आज २९ रोजी विनोद चितोडगडहून जयपूरला रवाना होत असून उद्या ३० रोजी तो व त्याचे सहकारी दुपापर्यंत दिल्लीत पोहोचणार आहेत.

जव्हार जिल्हानिर्मितीची राज्यपालांकडे मागणी
मुंबई, २८ जानेवारी / प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जव्हार जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी आज राज्यपाल एस. सी. जमीर यांची राजभवनावर भेट घेऊन त्यांच्याकडे केली.माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले की, सध्या अस्तित्वात असलेल्या अनुसूचित जमातींच्या यादीत यापुढे बिगर आदिवासी समाजाचा समावेश करण्यात येऊ नये. ज्या बिगर आदिवासींनी जातीची बोगस प्रमाणपत्रे सादर करून शासकीय नोकरी मिळवली असेल त्यांना सेवामुक्त करावे आणि त्यांच्या जागेवर आदिवासींची नियुक्ती करावी, अशी मागणीही पिचड यांनी केली आहे. दरम्यान, जव्हार आदिवासी जिल्हा संघर्ष समितीचे निमंत्रक अ‍ॅड. राजाराम मुकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानेही राज्यपालांची भेट घेऊन जव्हार जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी केली.
ठाणे जिल्ह्याचे आकारमान मोठे असल्याने प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे स्वतंत्र जव्हार जिल्हा निर्माण केल्यास या आदिवासी विभागाचा विकास करणे अधिक सुलभ होईल, असे शिष्टमंडळाने निवेदनात नमूद केले आहे.

‘पवार लगेचच पंतप्रधान होण्याचा प्रश्नच नाही’
मुंबई, २८ जानेवारी / खास प्रतिनिधी

शिवसेना आणि भाजपा यांत युती असल्याने पंतप्रधानपदी कोण येणार याबाबत चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी गैरसमजातून आपल्याबाबत उद्गार काढले असावेत, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आपल्याला शरद पवार पंतप्रधान झाल्यास तुम्हाला आवडेल का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर आपण आपली प्रतिक्रिया दिली होती. मात्र तिचे प्रसारण हे काही भाग वगळून झाले असून त्यामुळे मुंडे यांचा गैरसमज झालेला असावा, असे जोशी म्हणाले. पवार पंतप्रधान झालेले आपल्याला आवडतील, असे जरी आपण म्हटले असले तरी ते या लोकसभा निवडणुकीनंतर होतील, असा त्याचा अर्थ होत नाही, असेही जोशी म्हणाले.

‘स्लमडॉग..’वरील टीका अनाठायी - शाहरूख
मुंबई, २८ जानेवारी / प्रतिनिधी

ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळालेल्या ‘स्लमडॉग मिलियनेअर’ या चित्रपटावर टीका करणाऱ्यांविषयी शाहरूख खानने रोष व्यक्त केला. काही जण एखाद्या चांगल्या गोष्टीचा बाऊ का करतात तेच कळत नाही. भारतात गरीबी आहे, ही वस्तुस्थिती आहे ना? असा सवालही त्याने विचारला. एखाद्याला ‘स्लमडॉग’ या शब्दाबद्दल राग असेल तर त्याने त्यापुढील मिलियनेअर किंवा करोडपती हा शब्दसुद्धा पाहावा, अशी सूचनाही त्याने केली. ‘रेड चिली इडियट बॉक्स’ या कंपनीची निर्मिती असलेल्या ‘घर की बात है’ या एनडीटीव्ही इमॅजिनवर दाखविल्या जाणाऱ्या मालिकेच्या घोषणेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तो बोलत होता.भारतातील गरीबी ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न ‘स्लमडॉग..’मधून करण्यात आला आहे, अशी टीका काही जणांनी केली होती.

ठाण्याचे न्यायाधीश बच्छाव निलंबित
मुंबई, २८ जानेवारी / प्रतिनिधी

ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. सी. बच्छाव यांना निलंबित करण्यात आले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या महाप्रबंधक मृदुला भाटकर यांनी न्यायाधीश बच्छाव यांच्या निलंबनाला दुजोरा दिला. मात्र निलंबनाचे कारण सांगण्यास भाटकर यांनी नकार दिला.

माजी राष्ट्रपती आणि तिरंदाज यांना पालिकेत श्रद्धांजली
मुंबई, २८ जानेवारी / प्रतिनिधी

माजी राष्ट्रपती आर. व्यकंटरमन आणि माजी नगरसेवक रुस्तम तिरंदाज यांना पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. अनेक नगरसेवकांनी माजी राष्ट्रपतींच्या देश उभारणीच्या कार्यातील योगदानाचा उल्लेख केला. रुस्तम तिरंदाज यांच्याविषयीही अनेक नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आकाशवाणीवरील ‘आठवणींच्या गंधकोषी’मध्ये मंगेश पाडगावकर
मुंबई, २८ जानेवारी / प्रतिनिधी

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरील ‘वनिता मंडळ’ या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची मुलाखत फेब्रुवारी महिन्यातील चार रविवारी प्रसारित करण्यात येणार आहे. वनिता मंडळ या कार्यक्रमात ‘आठवणींच्या गंधकोषी’ही मुलाखत घेण्यात आली असून ती चार भागात आहे.
दर रविवारी दुपारी १२.०५ वाजता ही मुलाखत श्रोत्यांना ऐकता येऊ शकेल. अस्मिता वाहिनीचे निवेदक दिनेश अडावदकर यांनी ही मुलाखत घेतली असून कार्यक्रमाची निर्मिती उमा दीक्षित यांची आहे.

पुंडलिक म्हात्रे यांचा आज शिवसेना-प्रवेश
कल्याण, २८ जानेवारी/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी व माजी महापौर पुंडलिक म्हात्रे हे उद्या आपल्या स्पर्धकांसह मातोश्री येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून म्हात्रे हे शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन सेनेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक व पदाधिकारी म्हात्रे यांच्यासमवेत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दक्ष नागरिकांच्या कर्तबगारीला पोलिसांनी केला सलाम
ठाणे, २८ जानेवारी/प्रतिनिधी

कोपरीतील सराफ व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील एकास दक्ष नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. दक्ष नागरिकांच्या या कर्तृत्वाला आज पोलिसांनीही सलाम ठोकला. मंगळवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास कोपरीतील सराफ व्यापाऱ्यावर हल्ला करून त्याला लुटण्याचा प्रयत्न झाला. गुरुद्वारा समोरील शिव सोसायटीत राहणारे केवलरमाणी यांचे एम.के. जेमस् नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. रात्री दुकान बंद झाल्यावर केवलरमाणी, त्यांची पत्नी मीरा, दुकानात काम करणारा पुरुषोत्तम राजपाल आणि चालक रामअवध यादव हे चौघे घरी आले. केवलरमाणी घरी गाडीतून खाली उतरताच अगोदरच तेथे दबा धरून बसलेल्या लुटारूंनी चालक यादव याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली व सोन्याच्या दागिन्यांची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाने जिवाची पर्वा न करता लुटारूंवर झडप घालून त्यांचे रिव्हॉल्व्हर खाली पाडले. हा गोंधळ ऐकून त्याच भागातील संतोष ऊर्फ बंडू पिंगळे, तुळशीराम हरजन यांनी पळून जाणाऱ्या मुजफर गुलाम हसन याला शिताफीने पकडले.

दहशतवादी हल्ल्याविषयी भावना व्यक्त करण्यासाठी मानवी इ-साखळी
मुंबई, २८ जानेवारी / प्रतिनिधी

दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात भीतीबरोबरच प्रचंड चीडही उत्पन्न झाली. कोणाला सुरक्षायंत्रणेवर रोष होता तर कोणी राजकीय नेत्यांच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत होते. दोन महिने सरून गेल्यानंतर जनतेच्या मनातील रागाची धार बोथट होते. प्रत्येक जण आपापल्या कामाला लागतो. मनात केवळ आठवणी साठून राहतात. भावनाही स्वत:पुरत्याच मर्यादित राहितात. जनतेच्या भावनांना योग्य वाट मिळावी यासाठी अनिल चव्हाण, डॉ. दीपक पाटील, नितीन राव, प्रवीण शास्त्री, श्रीनिवास भट आणि सी. जी. थिरुमलेश प्रसाद यांनी एकत्रितपणे www.whatfailed.comहे संकेतस्थळ तयार केले आहे. प्रजासत्ताकदिनी हे संकेतस्थळ सुरू झाले असून दहशतवादी हल्ल्यांविषयी आपली मते या संकेतस्थळावर नोंदवता येऊ शकतात. जनतेच्या प्रतिक्रिया केवळ संकेतस्थळापुरत्या मर्यादित न राहता त्या प्रतिक्रिया संकलित करून राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येणार आहेत. याला त्यांनी मानवी ई-साखळी असे म्हटले आहे.

पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी भागवत दहिसरकर यांचे निधन
मुंबई, २८ जानेवारी / प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी भागवत दहिसरकर यांचे आज सकाळी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.
मीरा रोड येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांना हृद्यविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी उपचार करेपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती. संध्याकाळी मीरा रोड येथील शांतीनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी एस. एस. गुप्ता यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी, पत्रकार व जाहिरात क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. दांडगा जनसंपर्क असलेले भागवत दहिसरकर गेल्या १९ वर्षांपासून पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागात कार्यरत होते. जून १९४९ मध्ये जन्मलेल्या आणि १९६९ पासून रेल्वेच्या सेवेत दाखल झालेल्या दहिसरकर यांनी विविध पदांवर काम केले होते. ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेकदा गौरविण्यात आले होते. २००१ साली रेल्वे सप्ताहादरम्यान दहिसरकर यांना महाव्यवस्थापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.