Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९


‘शिन निअ‍ॅन ख्वाए ल’ अर्थात नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाचा भारतीय प्रजासत्ताकदिन भारतातील चिनी नागरिकांनीही साजरा केला. हा दिवस साजरा करण्याचे त्याचे कारण होते चिनी नववर्षांची सुरुवात. मुंबईत सुमारे ४०० चिनी कुटुंबे आहेत. या दिवशी त्यांच्या घरांमध्ये चिनी पक्वान्न तयार केली जातात. त्याचप्रमाणे भिंतीवर चिनी देवाची आणि क्वान कून या योध्याचे चित्रे लावले जाते. हा देव नववर्षांच्या शुभेच्छा देतो, अशी चिनी नागरिकांची श्रद्धा आहे.

सरकारी अनास्थेमुळे बंदर रखडले
शशिकांत कोठेकर

रायगड जिल्ह्यातील जमिनींना सध्या सोन्याचे दिवस आले आहेत. महामुंबई सेझ प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखविल्याने एकेकाळी भाताचे कोठार असलेला हा जिल्हा आता औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिध्द होणार आहे. शासकीय अनास्था नसती तर रायगड जिल्ह्याचे भाग्य २०१० सालीच खुलले असते. रेवस बंदरासारखा मोठा प्रकल्प वेळेवर सुरू झाला असता तर, रायगड जिल्ह्यातून एक लाख कुटुंबाना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असती.

पात्र अर्जदारांची यादी वेबसाइटवर टाकणार!
प्रतिनिधी

‘म्हाडा’च्या तीन हजार ८६३ घरांसाठी कितीही अर्ज आले तरी सोडतीआधी पात्रता यादी ‘म्हाडा’च्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी एच. के. जावळे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. या संदर्भात मंगळवारच्या ‘वृत्तान्त’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन घरांच्या सोडतीत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी हा मार्गही अनुसरला जाईल, असेही जावळे यांनी स्पष्ट केले.

वन्यजीव रक्षकांना ‘सँक्च्युरी’चा पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी

कोणी वाघांच्या रक्षणासाठी आपले आयुष्य वेचत आहे.. तर कोणी कासवांना वाचवण्याचा ध्यास घेतला आहे.. तर कोणी पत्रकार वन्यजीवन वाचवण्यासाठी हिरीरिने प्रयत्न करीत आहे.. वन्य प्राणी व पर्यावरण रक्षणासाठी स्वेच्छेने कार्य करीत असलेल्या ज्येष्ठ व तरुण पर्यावरणप्रेमींचा ‘सँक्च्युरी’ या वन्य प्राण्यांसाठी वाहून घेतलेल्या मासिकातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी फतेहसिंग राठोड, बहार दत्त, डॉ. वाय. व्ही. झाला व कुमार कुरेशी आदींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

बुजुर्ग हॉकीपटू पुरस्कारापासून वंचित!
प्रशांत मोरे

कृष्णा पी. निमल. वय वर्ष ९२. भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळातील एक महत्त्वाचा मोहरा. आता केवळ अख्यायिका बनून राहिलेल्या ध्यानचंदकालीन जादुई हॉकीचे मैदानातले साक्षीदार. कोणत्याही मैदानात कोणत्याही संघाविरुद्ध सहजरित्या गोल करण्याची धमक ऐन उमेदीत बाळगणारा एक अव्वल खेळाडू. निष्णांत प्रशिक्षक. दुर्दैवाने एवढी भरीव कामगिरी करूनही या बुजुर्ग खेळाडूला अद्याप एकही पुरस्काराचा ‘गोल’ मिळू शकलेला नाही. कृष्णा निमळ यांचे थोरले बंधू बाबू निमळ १९३६ च्या ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद्रसोबत सहभागी झाले होते.

‘बॉटकॅम्प’मधून उलगडणार ‘रोबोटिक्स’चे विश्व
प्रतिनिधी

यंत्रमानव अर्थात रोबोविषयी सर्वानाच आकर्षण असते. एक यंत्र माणसाप्रमाणे सर्व कामे करते. कधी हा रोबो घरकामात मदत करतो, कधी कारखान्यात एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी उपयोगी पडतो, काही वेळा युद्धातही त्याचा वापर केला जातो, तर अंतराळात किंवा समुद्राच्या तळाशी जाऊन शोध लावण्यासाठी रोबोचा वापर केला जातो. इंटरनेटच्या माध्यमातून याची माहिती घेणे शक्य असते. पण अनेक वेळा माहिती वाचून समाधान होत नाही. एखाद्या व्यक्तीने त्या विशिष्ट संकल्पनेबद्दल समजावून सांगितले तर ते जास्त कळते.

वातानुकूलित प्रवासाचे वास्तव
मुंबई शहरातील हवामान दमट आहे. त्यामुळे अवघ्या ३५-३७ अंश सेल्सियस तापमानातही मुंबईकर उकाडय़ाने हैराण होतात. अंगातून घामाच्या धारा वाहत असतात. दुपारच्या वेळी रस्त्यांवरुन चालणे मुश्किल होऊन जाते. वाहनांतून प्रवास करतानाही जीव नकोसा होतो. अशावेळी खचाखच गर्दी असलेल्या लोकल अथवा बसचा प्रवास एखाद्या जबरी शिक्षेसमान वाटतो. दरवाजा-खिडकीतून येणारी एखादी वाऱ्याची झुळूकसुद्धा त्यावेळी सुखद अनुभूती देऊन जाते. गाडीमध्ये एसी असता तर किती बरे झाले असते, असेही काही क्षण वाटून जाते.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवाकाळ’चे पारितोषिक
प्रतिनिधी : दहावीच्या परीक्षेत मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्ये मराठी विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रत्येकी दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्याचा निर्णय दै. ‘नवाकाळ’चे संपादक नीळकंठ खाडीलकर यांनी घेतला आहे. खाडिलकर यांनी यासाठी मंडळाला २ लाख २५ हजार रुपये निधी दिला आहे. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या नावे १० हजार रुपयांचे तर इंग्रजी माध्यमात मराठी भाषेत सर्वात जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला नीळकंठ खाडीलकर यांच्या नावे १० हजाराचे पोरितोषिक देण्यात येणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही पारितोषिक देण्यात येणार आहे. यंदापासून ही पारितोषिके सुरू होत आहेत. मंडळाच्या निकाल सांराश पुस्तिकेत विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

‘मुंगी उडाली आकाशी’ व ‘अजिंक्य मी’ पुस्तकांना पुरस्कार
प्रतिनिधी : आजऱ्याच्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर या वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारे दोन पुरस्कार यंदा बोरिवलीच्या नवचैतन्य प्रकाशनाच्या ‘मुंगी उडाली आकाशी’ आणि ‘अजिंक्य मी’ या पुस्तकांना मिळाले आहेत. प्रा. माधुरी शानभाग आणि प्रा. प्रवीण दवणे हे या पुस्तकांचे लेखक आहेत. या पुरस्काराचे वितरण फेब्रुवारीत प्रसिद्ध इतिहासकार निनाद बेडेकर यांच्या हस्ते करण्यात येईल, असे वाचनालयाचे कार्यवाह सु. शं. विभूते यांनी कळविले आहे. सुप्रिया शरद मराठे यांच्या नवचैतन्य प्रकाशनाला २००८ सालात पाच पुरस्कार मिळाले आहेत. गंगामाई वाचन मंदिराच्या वतीने अन्य दोन पुस्तकांनाही पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यात डॉ. करुणा जमदाडे यांच्या ‘यशोधरा’ आणि प्रा. द. ता. भोसले यांच्या ‘परिघावरची माणसं’ या पुस्तकांचा समावेश आहे.

मुलुंड येथील अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई
प्रतिनिधी : मुलुंड पूर्वेकडील एका भूखंडावर झालेल्या अनधिकृत झोपडपट्टीवरून भाजप आमदार तारासिंग आणि शिवसेनेचे स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्यात संघर्ष निर्माण झाला असून शिंदे यांच्या सातत्याच्या तक्रारींनंतर आज पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बेकायदा झोपडपट्टी उद्ध्वस्त केली. मुलुंड पूर्वेकडील सचिन सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळ असलेल्या १०९७ क्रमांकाच्या भूखंडावर प्राथमिक शाळेचे आरक्षण असून त्यावर सुमारे सव्वाशे झोपडय़ा उभ्या राहिल्या होत्या त्या पाडून टाकण्यात याव्या, अशी आसपासच्या रहिवाशांची मागणी होती. मुलुंडला आयुक्त डॉ. जयराज फाटक यांनी अलीकडेच दिलेल्या भेटीप्रसंगीही शिंदे यांनी या बेकायदा झोपडपट्टीबाबतची तक्रार केली होती. पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक झोपडपट्टी पाडण्यास गेले असता तारासिंग यांनी या कारवाईला विरोध केला. मात्र आसपासच्या रहिवाशांनी कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतल्यानंतर तारासिंग यांना माघार घ्यावी लागली.