Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

नवनीत

भगवान महावीरांच्या प्रवचनात सम्राट श्रेणिक बिंबिसारने त्यांना विचारले,‘‘नाथ! आपल्यासारखं सर्वस्व त्यागून घोर तप करणं आम्हाला शक्य नाही, पण जीवन सार्थकी लागावं म्हणून आम्ही काय करावं?’’ महावीर म्हणाले की, श्रावक-धर्म आचरून तुम्हीही घरी राहून स्व-पर-कल्याण करू शकता. श्रावक म्हणजे श्रद्धाळू, विवेकी व क्रियावान. व्रताचरण करणाऱ्याला श्रावक म्हणतात. त्याने अहिंसा, सत्य, अचौर्य, अपरिग्रह व ब्रह्मचर्य (स्वदार संतोष) पाळावे व चौदा क्रिया पाळाव्यात. त्या ऐका-

 


अजीविकेसाठी (पोट भरण्यासाठी) धन संपादन करावे लागते ते न्याय मार्गाने मिळवा. त्यासाठी हिंसा, लबाडी, अन्याय करू नका. इंद्रियांवर ताबा ठेवा. इच्छा-गरजा कमीतकमी ठेवा.
आपला विकास व्हावा म्हणून गुणी, ज्ञानी, सदाचारी लोकांचा आदर करा. गुरूची पूजा करा. स्व-पर हित साधण्यासाठी सदाचार, सौजन्य, औदार्य, दानधर्म, नम्रता यांचं पालन करा. ही गुणपूजा होय.
प्रशस्त वचन- परनिंदा करू नका, कठोर शब्द उच्चारू नका, निर्दोष वाणी ठेवा, सत्यवचनी राहा.
निर्बाध त्रिवर्ग सेवन- धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थाचे प्रामाणिकपणे, संयमित पालन करा.
त्रिवर्गयोग्य स्त्री, ग्राम, भवन- त्रिवर्ग साधण्यात स्त्री, पत्नी सहायक असते. सुयोग्य भार्या, गाव आणि घर यांची निवड करा. अतिथी सेवा करा. संयमी जीवन जगा. उचित लज्जा- लज्जा मानवी जीवनाचं भूषण आहे. स्वाभिमानाने जगण्यासाठी कुठलेही कुकर्म करू नका. योग्य आहार विहार- निर्दोष, स्वास्थ्यकारक आहार ठेवा. जिभेवर ताबा ठेवा. भक्ष्य-अभक्ष्याचा विवेक पाळा. आर्य समिती- सज्जनांच्या, सदाचारी लोकांच्या सहवासात राहून आत्मगुणांचा विकास करा. विवेक- प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. तर्कवितर्क करून चांगलं काय, वाईट काय याचा निर्णय करा. उपकार- स्मृती वा कृतज्ञता- कृतज्ञता मनुष्याचा सद्गुण आहे. उपकाराची फेड उपकाराने करा. उपकाराची जाणीव ठेवा. मनात उपकारकर्त्यांविषयी कृतज्ञता बाळगा. जितेंद्रियता- इंद्रियांच्या विषयावर नियंत्रण ठेवा. वाईट विचारांवर लगाम ठेवा. धर्मविधी श्रवण- आत्मोद्धारासाठी धर्म आवश्यक आहे. धर्माचे श्रवण करून तीव्र राग-द्वेषापासून दूर राहा. दयालुता- दु:खी जिवांचं दु:ख दूर करा. मनात करुणा, कोमलता ठेवा. आपोआप धर्माचरण होईल. पापभीती- हिंसा, खोटे बोलणे, चोरी, कुविचार, अतिसंग्रह यापासून दूर राहा. पापाची भीती बाळगा.
लीला शहा

विविध ग्रहांच्या पृष्ठभागांचे तापमान किती आहे? दिवसा व रात्री त्यात किती फरक पडतो?
ग्रहांचे तापमान हे ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर, वातावरणातील संयुगे, तसेच वातावरणाची घनता अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. सूर्याच्या अतिशय जवळ असणाऱ्या बुधावर वातावरणाअभावी सर्वाधिक तापमान ४०० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान शून्याखाली १७० अंश सेल्सिअस असू शकते. पृथ्वीपेक्षा अतिशय दाट वातावरण असणाऱ्या शुक्राचा पृष्ठभाग ४८० अंश सेल्सिअस एवढा तापतो. शुक्राच्या बाबतीत दिवस व रात्र असा फरक पृष्ठभागावर ठळकपणे न दिसता तिथल्या वातावरणातील ढगांवर मात्र दिसतो. शुक्राच्या वातावरणातील तापमान दिवसाच्या तुलनेत रात्री निम्म्यापर्यंत खाली येऊ शकते. मंगळावरील दिवसाचे तापमान २० अंश सेल्सिअस, तर रात्रीचे शून्याखाली १४० अंश सेल्सिअस एवढे विषम असू शकते. गमतीची गोष्ट अशी की, मंगळाची जमीन ३० अंश सेल्सिअस असेल त्याच वेळी एक मीटर उंचीवरील हवेचे तापमान १० अंश सेल्सिअस किंवा कमी असू शकेल. (म्हणजेच पायमोजे घातले नाही तरी चालू शकेल, पण कानटोपी मात्र घालावीच लागेल!)
गुरूपासूनचे ग्रह हे वायुरूप ग्रह आहेत. या ग्रहांच्या बाबतीत तापमानाची एवढी विषमता दिसत नाही. गुरूचे सरासरी तापमान शून्याखाली ११० अंश सेल्सिअस, तर शनी, युरेनस व नेपच्यूनचे तापमान अनुक्रमे शून्याखाली १८०, शून्याखाली २१६ व शून्याखाली २१६ अंश सेल्सिअस एवढे आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, युरेनस व नेपच्यून या दोन जवळजवळ सारख्या आकाराच्या ग्रहांत नेपच्यून हा सूर्यापासून युरेनसपेक्षा दीडपट दूर असूनही त्याचे तापमान युरेनसच्या तापमानाएवढेच आहे.
अभय देशपांडे
मराठी विज्ञान परिषद , विज्ञान भवन , वि. ना. पुरव मार्ग , शीव-चुनाभट्टी (पूर्व) , मुंबई ४०००२२ दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

२९ जानेवारीला जन्मलेला अ‍ॅटन चेकॉव्ह युरेपातील प्रतिभावंत साहित्यिक म्हणून गाजला.. वडिलांची गुलामगिरी, घरी अठरा विश्वे दारिद्रय़ अशा स्थितीत निव्वळ पोट भरण्यासाठी म्हणूनच चेकॉव्हने लेखन सुरू केले. पुश्किन-टॉलस्टॉय यांच्या पारंपरिक चौकटीतून चेकॉव्हने रशियन साहित्याला बाहेर काढले.. त्याच्या कथांनी तर इतिहास घडवलाच, पण त्याची नाटकेही 'मैलाचे दगड' ठरावी अशी गणली गेली.. १९०१ साली त्याचे ओल्गा निपट या अभिनेत्रीशी लग्न झाले, पण वैवाहिक जीवनही त्याच्या नशीबी नसावे, त्याला १९०४ साली देवाज्ञा झाली.
संजय शा. वझरेकर

फार दु:खी होऊन मुक्ता शाळेतून घरी आली. डोळे सुजले होते. चेहरा रडवेला. तिने घरात पाऊल टाकल्या टाकल्या बाबांनी विचारले, ‘‘मुक्ताताई, आज तुम्हाला ‘नेचर वॉक’च्या कार्यक्रमाला न्यायचं कबूल केलं म्हणून ऑफिसमधून लवकर येऊन वाट बघत बसलोय. आईने शिरा केलाय. तो खा. कपडे बदला. तयार व्हा आणि चला.’’ मुक्ताचे बाबांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. दप्तर ठेवून चपला काढून ती खुर्चीवर बसली. ‘‘काय ग? अशी का बसलीस? काही झालं का शाळेत आज?’’ बाबांनी काळजीने विचारले. तसे इतका वेळ आवरून धरलेले रडू धो धो वाहू लागले. ‘अगं बाळे, काय झाले. रडू नकोस. पूस डोळे,’ बाबा तिची समजूत काढायला लागले. बराच वेळ रडून झाल्यावर मुक्ता शांत झाली. बाबा तिच्याजवळ बसून होते. मुक्ता म्हणाली, ‘‘बाबा, गार्गी माझी किती जवळची मैत्रीण आहे. पण आज फार दुष्टपणे वागली. मी वर्गात शिल्पाला एक विनोद सांगितला. आम्ही हसत होतो. बाईंनी काही पाहिले नव्हते. त्या फळय़ावर लिहित होत्या. त्यांनी विचारले, ‘कोण बोलत, हसत होतं?’ दुष्ट गार्गीनं माझं नाव सांगितलं. मला मुख्याध्यापिकांकडे नेलं बाईंनी.’’ झालेल्या अपमानाने, शिक्षेने आणि शरमेने पुन्हा मुक्ताला रडू कोसळलं. ‘मी जन्मात तिच्याशी बोलणार नाही. तिचं तोंड पाहणार नाही..! मैत्रीण म्हटल्यावर असं करतात का हो बाबा, तुम्हीच सांगा,’ मुक्ताला वाटलं आपले हे डोंगराएवढे दु:ख कधीच नाहीसे होणार नाही.
बाबांनी मुक्ताला शिरा मायक्रोवेव्हमध्ये गरम करून दिला. दूध दिलं. मग ते शांतपणे म्हणाले, ‘‘मुक्ताराणी, बाई शिकवत असताना आपण वर्गात गप्पा मारायच्या असतात का? आपण शिकण्यासाठी वर्गात बसतो ना? अशी रागावू नकोस गार्गीवर. ती तुझी चांगली मैत्रीण आहे. तू दुखावली गेलीस, तुला खूप संताप आला. मैत्रिणीने आपला विश्वासघात केला, असे तुला वाटणे स्वाभाविक आहे. पण आपलं काय चुकलं याचा विचार केलास तर तू गार्गीला नक्कीच माफ करशील आणि जिवाभावाच्या मैत्रिणीशी असलेली मैत्री तोडणार नाहीस. अगं! तिच्यावाचून तुला तरी करमेल का? हे बघ, माझ्याकडे एक जास्त तिकीट आहे. गार्गीला फोन कर. तिलाही घेऊन जाऊ कार्यक्रमाला!’’
आपण दुखावले गेलो तरी दुसऱ्याचे चांगले चिंतणे ही माणुसकी आहे. तुम्ही हे करू शकलात तर प्रेमाचे आणि क्षमेचे महत्त्व तुम्हालाही कळेल. तुम्ही आनंदी व्हाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
आजचा संकल्प : माझ्याशी वाईट वागलेल्या व्यक्तीला मी माफ करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com