Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

अधिकाऱ्यांची पदे रद्द झाल्याने सागरी गस्त सुस्तावली
मधुकर ठाकूर

राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने स्वतंत्र कार्यभार असलेल्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांची सर्वच पदे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याअगोदरच रद्द केली. यामुळेच राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने मत्स्य व्यवसाय विभागाकडून सुरू असलेल्या सागरी गस्तीमध्ये ढिलाई झाल्याने अतिरेकी कारवायांना एकप्रकारे मदतच झाली. शासनाच्या या आडमुठय़ा धोरणामुळे आता कार्यालयीन कामकाज सोडून मत्स्य व्यवसाय परवाना अधिकाऱ्यांवर राज्याच्या किनारपट्टीवरील सागरी गस्तीचे काम सोपविण्यात आले आहे.

सरकारी अनास्थेमुळे बंदर रखडले
शशिकांत कोठेकर

रायगड जिल्ह्यातील जमिनींना सध्या सोन्याचे दिवस आले आहेत. महामुंबई सेझ प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविल्याने एकेकाळी भाताचे कोठार असलेला हा जिल्हा आता औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध होणार आहे. शासकीय अनास्था नसती तर रायगड जिल्ह्याचे भाग्य २०१० सालीच खुलले असते. रेवस बंदरासारखा मोठा प्रकल्प वेळेवर सुरू झाला असता तर, रायगड जिल्ह्यातून एक लाख कुटुंबाना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असती.

‘महासत्तेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पाकिस्तानशी युद्ध नको’
पनवेल/प्रतिनिधी : २०२० सालापर्यंत जगातील एक महासत्ता होण्याचे उद्दिष्ट भारताने आखले आहे. नियोजित कालावधीत हे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर पाकिस्तानशी युद्ध करून चालणार नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार विनायक परब यांनी पनवेल येथे व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ‘जम्मू-काश्मीर प्रश्न- भारताने युद्ध करावे का?’ या विषयावर ते बोलत होते.

एनएमएमटी कर्मचाऱ्यांना मारहाण; बससेवा बंद
बेलापूर/वार्ताहर

खारघर परिसरात मिनी पाकिस्तान (भेंडी बाजार) परिसरातील १५ ते २० समाजकंटकांनी एनएमएमटीच्या आठ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून खारघरमधील पूर्ण बससेवा बंद करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत ही सेवा बंद होती. पोलीस आयुक्त रामराव वाघ यांच्याशी चर्चा केल्यावर आरोपींना अटक केली, तरच बससेवा सुरू करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मंगळवारी सायंकाळी हनीफ पटेल व त्याच्या सहकाऱ्यांनी बसचालक भाऊसाहेब सूर्यराव यांना मारहाण केली. दुचाकीस एनएमएमटीने ठोकर मारल्याचे आरोपींचे म्हणणे पूर्णत: खोटे असून, दुचाकीस्वार गाडी चालवत असताना भ्रमणध्वनीवर बोलत होता व अचानक समोर लहान मुले आल्याने दुचाकीवर नियंत्रण मिळवता न आल्याने ते खाली पडले. या घटनेत चालकाची कोणतीही चुकी नसताना त्यांना मारहाण केली. त्यानंतर तेथे आलेल्या १५-२० जणांच्या जमावाने चार बस गाडय़ा अडवून त्यातील चालक व वाहक यांना बेदम मारहाण केली, तसेच जलवायू विहार येथील एनएमएमटी नियंत्रण कक्षावर रात्री उपरोक्त जमावाने हल्ला करून तेथील नियंत्रकाला मारहाण केली. रात्री उशिरा खारघर पोलीस ठाण्यात एनएमएमटी कर्मचाऱ्यांची तक्रार घेण्याचे काम सुरू होते. यावेळी आरोपीही तेथे उपस्थित होते. मात्र पोलिसांनी त्यांना अटक न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली, त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी बुधवारीही खारघरमधील पूर्ण बससेवा बंद ठेवली होती.

पोलीस सुस्त, आरोपी मोकाट वाशीत चड्डी-बनियान टोळीचा धुडगूस
बेलापूर/वार्ताहर : वाशी परिसरात कुप्रसिद्ध चड्डी-बनियान टोळीने धुडगूस घालण्यास सुरुवात केली असून, या टोळीतील गुंडांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. मंगळवारी रात्री या टोळीच्या १५ ते २० जणांनी शस्त्रांनिशी वाशी, सेक्टर १२ मधील भूखंड क्रमांक १४२ व १२७ च्या इमारतीत हल्लाबोल केला. तेथील सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून संजय बिर्जे यांच्या घरातील किमती वस्तू चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, मात्र प्रसंगावधान राखून सर्व इमारतीतील रहिवाशांनी सर्व गुंडांना हाकलून लावले. हा धुडगूस तब्बल अर्धा तास सुरू होता, मात्र पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातील पोलीस या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. या घटनेवरून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजले असून, पोलिसांच्या अकार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनेची तक्रारवही पोलीस निरीक्षक संजय सुर्वेनी घेतल्याचे सांगून आता आम्ही माहिती देऊ शकत नसल्याचे सांगत, आणखी आपल्या पाटय़ा टाकण्याच्या वृत्तीचे दर्शन घडविले.

‘प्रत्येकाला सैनिकी प्रशिक्षणाची गरज’
बेलापूर/वार्ताहर : देशातील वाढत्या दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक नागरिकाला सैनिकी प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी कोपरखैरणे येथे केले. नवी मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते सर्वश्री सुभाष देसाई, दत्ताजी नलावडे, खासदार आनंद परांजपे, आमदार एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख विजय चौगुले आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, इस्त्रायलच्या चोहोबाजूंनी मुसलमान देश असताना प्रखर राष्ट्रभक्तीने प्रत्येकाला सैनिकी प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याची कुणाची हिंमत होत नाही. तशाच प्रकारे भारतातील भयोत्पादकतेला आळा घालण्यासाठी येथील प्रत्येक गावागावातून सैनिकी शाळा सुरू करून प्रत्येक नागरिकाने हातात बंदूक घेतल्याशिवाय देशाचे संरक्षण होणार नाही. नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले म्हणाले की, महापालिकेतील ५० टक्के नगरसेवक ठेकेदार आहेत. कर वाढविण्याची भाषा करणारे छुप्या पद्धतीने कर लादू पाहात आहेत. त्याविरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. राज्यात व महापालिकेत शिवसेनेची सत्ता येताच मनपातील सर्व कंत्राटी कामगारांना त्वरित कायम केले जाईल. सिडकोच्या अधिकाऱ्याने पत्रकारांना केलेल्या धक्काबुक्कीचा शिवसेनेने निषेध केला असून, त्यांच्या कार्यक्रमाचे इंग्रजीतील होर्डिग मराठीत लावण्यास शिवसेनेने भाग पाडले आहे. येथून पुढे सिडकोने एक जरी परिपत्रक इंग्रजीतून काढले, तर त्याची होळी केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. याप्रसंगी एकनाथ शिंदे, आनंद परांजपे, दत्ताजी नलावडे आदींची भाषणे झाली.

जेएनपीटी कामगार वसाहतीच्या मैदानावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा
उरण/वार्ताहर : श्रीराज पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जेएनपीटी कामगार वसाहतीच्या मैदानात भरविण्यात आली आहे. १ फेब्रुवारी रोजी आयोजित स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून टीम इंडियाचे माजी कर्णधार अजित वाडेकर, सुप्रसिद्ध संगीतकार, गायक अवधूत गुप्ते, राज्याचे कामगारमंत्री नवाब मलिक, आमदार विवेक पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख बबन पाटील, भाविसे अध्यक्ष अभिजीत पानसे, मनसे संघटक अमेय खोपकर, आयपीएस व्यवस्थापक शरद शेलार, जेएनपीटी मुख्य व्यवस्थापक शिबेन कौल, आ. जयंत पाटील, उरणचे नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. १ फेब्रुवारी २००८ रोजी नाशिक येथे झालेल्या वाहन अपघातात उरणचे भूषण ठाकूर, विक्रम भोईर, अशोक राव व श्रीराज पाटील यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेला १ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याने श्रीराज पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने समीधा स्पोर्टस्ने ‘श्रीराज चषक’ या मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्हास्तरीय आयोजित स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. सहा षटकांच्या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी एक लाख, तर दुसऱ्या क्रमांकासाठी ५० हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच व मॅन ऑफ द सिरीजसाठीही पारितोषिके दिली जाणार आहेत. श्रीराज पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आदिवासींना आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप व मतिमंद मुलांना भेटवस्तूंचे वाटप केले जाणार आहे. तसेच येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना नगराध्यक्ष करंगुटकर यांच्या हस्ते फळे वाटपाचाही कार्यक्रम होणार असल्याची माहिती काका पाटील यांनी दिली.

‘झोपडय़ा पाडण्याच्या कारवाईमध्ये पक्षपात’
पनवेल/प्रतिनिधी : पनवेल नगरपालिका प्रशासनातर्फे काही दिवसांपूर्वी अनधिकृत झोपडय़ांविरोधात झालेल्या कारवाईत पक्षपात झाल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक व पालिकेतील शेकापचे गटनेते श्रीकांत ठाकूर यांनी केला आहे. पनवेल पालिकेतर्फे १५ झोपडय़ांना अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस देण्यात आली होती, परंतु त्यातील केवळ १० झोपडय़ांवर पालिकेने कारवाई केली, असे ठाकूर यांनी म्हटले आहे. पालिकेने ज्या १५ झोपडीधारकांना नोटीस पाठवली होती, त्यातील पाच झोपडय़ांना अभय का देण्यात आले, तसेच नोटीस बजावली नसताना झोपडपट्टी कायद्याचा भंग करून शोभा मोरे यांची झोपडी का तोडली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या कारवाईत पालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. तसेच ही कारवाई सरसकट न झाल्याने काहींना झुकते माप मिळाले आहे, असे ते म्हणाले. झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन केल्यानंतर झोपडय़ा पाडाव्यात, असे शेकाप, शिवसेना व भाजपचे धोरण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता यासंदर्भात खुलासा करण्यात येईल, असे ते म्हणाले.