Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

फी वाढीच्या निषेधार्थ विद्यार्थी सेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन
वार्ताहर / धुळे

किमान कौशल्य तसेच व्दिलक्षी अभ्यासक्रमाच्या शुल्कात अचानक वाढ करून विद्यार्थ्यांकडून एक हजार २०० रुपये याप्रमाणे संस्थेकडून विकास निधी वसूल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे ‘भीक माँगो’ आंदोलन करण्यात आले. तंत्रनिकेतन विभागाच्या उपसंचालकांनी या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दूरध्वनीवरून दिल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलनास तूर्त स्थगिती दिली. भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक धिरेंद्र पाटील यांनी या आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली.

अधिकाऱ्यांना बांगडय़ांचा आहेर देण्याचा हरसूल परिसरातील लाभार्थीचा इशारा
वार्ताहर / हरसूल

केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत विधवा, वृद्ध तसेच अपंगांना मिळणारे अनुदान व अन्य अनुषंगिक लाभ हरसूल परिसरातील गरजुंना मिळत नसल्याला त्र्यंबकेश्वर आणि पेठ तहसील कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. संबंधितांच्या या कामगिरीसाठी संबंधितांना बांगडय़ा भेट देण्यात येतील, असा इशारा लाभार्थ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आसिफभाई यांनी येथे आयोजित मेळाव्याप्रसंगी दिला.

कांदासम्राट!
कांद्याचे भाव चढले अथवा पडले की केंद्र सरकारपासून सर्वत्र प्रथम शोधाशोध सुरू होते ती लासलगावच्या चांगदेवराव होळकरांची ! भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी संघ (नाफेड) या केंद्रीय स्तरावरील संस्थेत तीन दशकांहून अधिक काळ संचालक असलेल्या चांगदेवरावांनी कांदा या विषयासाठी सारे जग पालथे घातले आहे आणि या विषयातील त्यांचा अभ्यास एवढा दांडगा आहे की साऱ्या जगातील मंडळी त्यासाठी सतत त्यांच्या संपर्कात असतात.

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
४० जागांसाठी ११६ उमेदवारी अर्ज
प्रतिनिधी / नाशिक
नाशिक जिल्हा नियोजन व विकास समितीच्या प्रथमच मतदान पध्दतीने होणाऱ्या निवडणुकीला एखाद्या राजकीय आखाडय़ासारखे स्वरूप प्राप्त झाले असून विविध प्रवर्गातील ४० जागांसाठी तब्बल ११६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे बुधवारी सर्वसाधारण, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला या तिन्ही गटातून अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. नाशिक जिल्हा नियोजन समितीतर्फे ग्रामीण, मोठय़ा नागरी (महानगरपालिका) आणि लहान मतदार संघासाठी निवडणुका घोषित झाल्या आहेत.

अंशकालीन परिचारिकांचा आज मोर्चा
वार्ताहर / धुळे

आरोग्य उपकेंद्रामध्ये काम करणाऱ्या मानसेवी अंशकालीन परिचारिकांना प्रवास भत्ता, वाढीव मानधन मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी २९ जानेवारी रोजी धुळे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्य़ातील अंशकालीन परिचारिकांनी सकाळी साडे दहाला संतोषी माता मंदिराजवळील कल्याण भवनाजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन धुळे जिल्हा सर्व श्रमिक संघातर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात लता शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत उपकेंद्रामध्ये मानसेवी परिचारिका काम करतात. केवळ अर्धवेळ परिचारिका म्हणून त्यांचा उल्लेख होत असला तरी त्या सर्व वस्तूत: पूर्ण वेळ काम करतात. या सर्व परिचारिकांना कामानिमित्त विनाभत्ता प्रवास करावा लागतो. महिन्याला केवळ ६०० रुपये मानधन मिळत असल्याने हा खर्च परवडत नाही. १ ऑक्टोबर २००८पासून मासिक ९०० रुपये मानधन वाढविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ते कागदोपत्रीच राहिले आहे. त्यामुळे शासनाने मासिक १२०० रुपये मानधन द्यावे, प्रवासभत्ता द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रावण शिंदे, रमेश पारोळकर, अ‍ॅड. मदन परदेशी, वसंत पाटील, सखुबाई अहिरे, जीजाबाई धिवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लहवित येथे एकाची हत्या
भगूर / वार्ताहर

लहवित येथे वाडीच्या मळ्याजवळ एका व्यक्तीच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला चढवून त्याची हत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येमागील कारणांचा छडा अद्याप पोलिसांना लागू शकलेला नाही. एअरफोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ ही घटना घडली. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील गिरीधर सखाराम साळवे (३०) यांची अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचे उघड झाले आहे. त्यात साळवेंचा मृत्यू झाला. मयत साळवे हे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती नातवाईकांकडून देण्यात आली. मारेक ऱ्यांनी कोणताही पुरावा ठेवला नसल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. गिरीधरने घराबाहेर पडताना भगूरला जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो पुन्हा घरी आलाच नाही. शेती व्यवसाय करणाऱ्या साळवे कुटुंबियांचे गावात याआधी काही वाद असले तरी ते एवढय़ा विकोपाला जाण्याची शक्यता नसल्याचे मत नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, साळवे यांची रस्त्यावर उभी असलेली मोटारसायकल पोलिसांना मिळून आली होती. संबंधित व्यक्ती गाडी अशीच सोडून गेली असावी किंवा अपघात झाला असावा असा अंदाज बांधून पोलिसांनी ही मोटारसायकल भगूर पोलीस चौकीत आणून ठेवली होती. ही गाडी ताब्यात घेतली, तेव्हा असा प्रकार घडला असेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. हत्येचा हा प्रकार पूर्वनियोजित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.