Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

विशेष

देवच नाही.. त्यामुळे चिंता करणे सोडा!
नास्तिक, निरीश्वरवादी मंडळींचे अस्तित्व जगात खूप पूर्वीपासून आहे; पण अशा नास्तिक मंडळींचा प्रभाव समाजावर म्हणावा तसा पडला नसल्याचेही इतिहासाच्या अवलोकनावरून दिसून येते. असे असले तरी ईश्वराचे अस्तित्वच नसल्याचे ठासून सांगण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून चालूच असतात. अशीच एक मोहीम युरोपमधील काही देशांमध्ये नास्तिक मंडळींनी चालविली आहे आणि त्यांच्या मोहिमेस प्रतिसादही मिळत आहे. ‘‘देअर इज प्रॉबेबली नो गॉड. नाऊ स्टॉप वरीईंग अ‍ॅण्ड एन्जॉय युवर लाइफ’’ असा संदेश देणारे फलक ब्रिटनच्या रस्त्यांमधून दिसत आहेत. ब्रिटनमधील बसगाडय़ांवरही असा संदेश झळकला आहे. नास्तिक मंडळींच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, स्पेन, इटली, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांमध्येही ही मोहीम राबविण्याचा विचार चालला आहे.

रोपटं सहकाराचं
एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंच।’ या संतवचनाचा गेल्या शतकात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये झालेला आर्थिक आविष्कार म्हणजे सहकाराची चळवळ. तसा इतिहास पाहू गेलं तर इथे सहकाराचा कायदा ब्रिटिश राजवटीत १९१२ च्या सुमारास अस्तित्त्वात आला, पण त्याचा तितकासा प्रभावी उपयोग झाला नव्हता. स्वातंत्र्यानंतर ख्यातनाम अर्थतज्ज्ञ कै. धनंजयराव गाडगीळ यांनी राज्याच्या ग्रामीण भागातील उसावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगासाठी सहकारी तत्त्वाचा अंगीकार करण्याचा आग्रह धरला. त्यासाठी आवश्यक आर्थिक बळ मिळण्याच्या दृष्टीने शासनाच्या हस्तक्षेपाची (चांगल्या अर्थाने) जोड दिली. त्या काळातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी कै. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी त्याचं मर्म ओळखून खेडोपाडी ही चळवळ पसरविण्यासाठी पायाला भिंगरी बांधली आणि या दोघांच्या शक्तीतून जिल्ह्यातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला.

‘जिलेबी’ कुणामुळे बाद झाली?
चतुरंग प्रतिष्ठानच्या सवाई एकांकिका स्पर्धेत मिठीबाई ड्रामा टीमची ‘जिलेबी’ ही एकांकिका अंतिम फेरीत त्यातील प्रमुख कलावंत श्रेया बुगडे ही त्याच दिवशी नागपूरमध्ये असलेल्या तिच्या नाटय़प्रयोगाहून मुंबईत वेळेत येऊ न शकल्यानं बाद ठरवली गेली. प्राथमिक फेरीतले कलाकारच अंतिम फेरीतही असायला हवेत, या सवाईच्या नियमामुळे ‘जिलेबी’त श्रेयाची रिप्लेसमेंट तयार असूनही ही एकांकिका स्पर्धेतून बाहेर काढण्यात आली. परंतु आपल्याला प्रयोग तरी करू द्यावा, ही त्यांची विनंती मान्य करून संयोजकांनी ‘जिलेबी’चा रिप्लेसमेंटसहचा प्रयोग करू दिला. मात्र, या साऱ्या घोळाला नेमका जबाबदार कोण, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. श्रेयाला जर अंतिम फेरीत तिच्या बाहेरगावच्या प्रयोगामुळे पोहचता येणार नव्हतं, तर मिठीबाई ड्रामा टीमनं तिला प्राथमिक फेरीतच उतरवायला नको होतं. यासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी कानावर येतात. मिठीबाई कॉलेजचं व्यवस्थापन डिसेंबरनंतर कुठल्याही स्पर्धेत मुलांना अभ्यासाच्या कारणास्तव भाग घ्यायला परवानगी देत नाही, असा त्यांचा दंडक असल्याचं सांगितलं जातं. म्हणून मग ‘मिठीबाई ड्रामा टीम’ हा कॉलेजबाह्य ग्रुप स्थापन करून ही एकांकिका सादर करण्याचा आडमार्ग पत्करण्यात आला. मात्र, श्रेयानं ही एकांकिका वर्षभर गाजवलेली असल्यानं तिला अपवाद करून या एकांकिकेत सहभाग घेण्याची परवानगी कॉलेज व्यवस्थापनानं दिली होती, असं श्रेया सांगते. यासंदर्भात श्रेयाचं म्हणणं असं की, तिनं मिठीबाई ड्रामा टीमला सवाई स्पर्धेत भाग घेण्यासंबंधातील आपली अडचण (प्रयोगामुळे मुंबईत वेळेत पोहचू न शकण्याची!) आधीच सांगितली होती. पण तिला सांगण्यात आलं की, ‘तुझा नागपूरचा प्रयोग संपल्यावर तुला विमानानं मुंबईत आणण्याची व्यवस्था आम्ही करू.’ मात्र, २५ जानेवारीच्या संध्याकाळी तिचा नागपुरातील प्रयोग संपल्यावर तिची मुंबईत येण्याची व्यवस्थाच केली गेली नव्हती. तिच्या म्हणण्याप्रमाणे, तशी व्यवस्था केली न गेल्यानंच ती सवाईच्या अंतिम फेरीसाठी मुंबईत पोहचू शकली नाही. मात्र, तिच्या न येण्याचं खापर तिच्यावरच फोडण्यात आलं. यासंदर्भात चतुरंग प्रतिष्ठानला आपण आपली बाजू लेखी कळवणार आहोत, असं तिनं सांगितलं. श्रेयाला जाणीवपूर्वक मुंबईत पोहचू दिलं गेलं नाही, असं तिचं म्हणणं आहे. तिच्या या म्हणण्यात तथ्य असावं, असं सकृत्दर्शनी ज्या गोष्टी घडल्या त्यावरून तरी वाटतं. कारण ती मुंबईत वेळेत पोहचणारच नाही, याची पक्की खात्री असल्याशिवाय का तिची रिप्लेसमेंट तयार ठेवली गेली? तिला मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन ‘मिठीबाई ड्रामा टीम’नं तिला दिलं होतं, तर मग ते का पाळलं गेलं नाही? याचा अर्थ या सगळ्या प्रकरणात नक्कीच काहीतरी पाणी मुरतंय. यासंबंधात मिठीबाई ड्रामा टीमशी संबंधित कीर्तिकुमार नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण खूपदा प्रयत्न केला, परंतु त्यांचा मोबाइल कायम स्विच ऑफ असल्याचं आढळून आलं, असं श्रेया सांगते. या साऱ्या प्रकरणात आपल्याला हेतुत: डावलण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय श्रेयानं बोलून दाखविला. यासंदर्भात मिठीबाई ड्रामा टीमची बाजू समजून घेण्याकरिता कीर्तिकुमार नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल लागत नसल्यानं श्रेयाच्या म्हणण्यात तथ्यांश असावा, असं वाटल्यावाचून राहत नाही. ते काहीही असो, या सगळ्या प्रकरणात सवाईच्या अंतिम फेरीत येऊ शकणाऱ्या एका संभाव्य एकांकिकेवर अन्याय झालाय, हे नक्कीच.
प्रतिनिधी