Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

लोकसभा निवडणुकीत ‘पुणे पॅटर्न’चा अडथळा नाही- पवार
पुणे, २८ जानेवारी / खास प्रतिनिधी

महापालिकेतील ‘पुणे पॅटर्न’ ही स्थानिक पातळीवरील राजकीय तडजोड असल्याने त्याचा पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोणताही अडथळा येणार नाही. पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिरूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भारतीय जनता पक्ष असा ‘पुणे पॅटर्न’ करण्यात आला.

पाप कुणाचे, पुण्य कुणा ?..
मुकुंद संगोराम

पुणे महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षांना अर्थसंकल्प मांडू न देण्याचा जो राजकीय डाव राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांनी खेळला आहे, त्यामुळे पुणे पॅटर्न नावाच्या एका नव्या कल्पनेला तडा गेला आहे, असे सगळय़ांना वाटते आहे. मुळात काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीने शिवसेनेचा हात मागितला, तेव्हाच शिवसेनेला याची कल्पना यायला हवी होती. महापालिका निवडणुकीत सेनेने भाजपबरोबर युती केली होती. निकालानंतर सेनेने भाजपबरोबरची युती न तोडता राष्ट्रवादीबरोबर समझोता करणे आणि भाजपने त्याला पाठिंबा देणे हा सगळाच ओंगळवाणा प्रकार होता.

उच्चशिक्षण संचालनालयातील पदांचा वनवास संपुष्टात!
तब्बल १४ वर्षांनंतर दीडशे पदांना मंजुरी!
पुणे, २८ जानेवारी/खास प्रतिनिधी
राज्याच्या उच्चशिक्षण संचालनालयामध्ये तब्बल १४ वर्षांनंतर नव्या दीडशे पदांना मंजुरी देण्यात आली असून, विद्यापीठे-महाविद्यालयांचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी या अतिरिक्त मनुष्यबळाची मदत होईल. राज्याच्या उच्चशिक्षण क्षेत्राचे कामकाज पुण्यातील संचालनालयाकडून पाहिले जाते. त्यांच्या मदतीसाठी आठ ठिकाणी सहायक संचालकांची कार्यालये कार्यरत आहेत. राज्यभरातील विद्यापीठे-महाविद्यालयांची वेतन-वेतनेतर प्रकरणांबाबतची प्रशासकीय कार्यवाही या संचालनालयाच्या माध्यमातून केली जाते.

येरवडय़ातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत लकी ड्रॉच्या तिकीट विक्रीसाठी विद्यार्थी वेठीस
पुणे, २८ जानेवारी/प्रतिनिधी

शाळेचे मैदान विकसित करण्यासाठी येरवडा भागातील इंग्रजी माध्यमाच्या एका नामांकित शाळेने विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही वेठीस धरले आहे. शाळेने निधी उभारणीसाठी लकी ड्रॉ आयोजित केला असून लकी ड्रॉच्या तिकिटांच्या विक्रीचे काम विद्यार्थ्यांवर लादण्यात आले आहे. शाळेला लागणाऱ्या निधीसाठी आमच्या मुलांना घरोघरी व रस्त्यावर फिरावे लागत असून आम्हालाही या लकी ड्रॉचा त्रास होत आहे, अशी तक्रार या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.

उमेदवारीच्या गाजराने भाजप आमदार पाचर्णे ‘राष्ट्रवादी’त?
आज सकाळी पवार यांची पुन्हा भेट
पुणे, २८ जानेवारी / खास प्रतिनिधी
शिरूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या आश्वासनावर भारतीय जनता पक्षाचे आमदार बाबुराव पाचर्णे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश निश्चित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. पाचर्णे यांनी आज सकाळी पुन्हा ‘राष्ट्रवादी’चे नेते शरद पवार यांची शिरूरमध्ये भेट घेतल्याने यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

भंडारा डोंगरावर साकारणार संत तुकाराममहाराजांचे भव्य मंदिर
संत-महंतांच्या उपस्थितीत आज भूमिपूजन
पिंपरी, २८ जानेवारी/ प्रतिनिधी
संत तुकाराममहाराजांचे चिंतन स्थळ असलेल्या मावळ तालुक्यातील भंडारा डोंगरावर भक्तांच्या मदतीने संत तुकाराम व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर लवकरच साकारणार आहे. या भव्य दिव्य प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ मान्यवर संतमहंतांच्या उपस्थितीत उद्या (गुरुवार)होणार असल्याचे भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी सांगितले. देहूपासून उत्तरेला चाकण-तळेगाव रस्त्यालगत निसर्गरम्य भंडारा डोंगर आहे.

कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार मृत्युमुखी;
संतप्त जमावाकडून रास्ता रोको
हडपसर, २८ जानेवारी / वार्ताहर

सासवड रस्त्यावर महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. भेकराईनगर येथील जकात नाक्याजवळ आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर कंटेनरचा चालक फरार झाला. त्यानंतर संतप्त जमावाने कंटेनरवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडल्या व काही काळ रास्ता रोको केले.मुलीला शाळेत सोडवून दुचाकीवरून हडपसर येथील आपल्या घरी परतणाऱ्या राजशेखर आंगडी (वय ३५, रा. गणेश नगर, फुरसुंगी, मूळ रा. सोलापूर) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. कचरा वाहून नेणाऱ्या कंटेनरने मागून धडक दिल्याने आंगडी दुचाकीवरून पडले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालक या घटनेनंतर पसार झाला. लोणी पोलीस ठाण्याचे अधिकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केल्यामुळे सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली.जमावाने रास्ता रोको केल्यामुळे विविध पक्षांचे नेते व कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले. कंटेनरची वाहतूक बंद न केल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने यावेळी देण्यात आला. सासवड रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण मोठे असल्याने हा रस्ता सहा पदरी करण्यात यावा तसेच पादचारी मार्गही करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने याप्रसंगी केली. ग्रामपंचायत सदस्य रणजीत रासकर, शंकर हरपळे, राजाभाऊ होले, खंडू हरपळे, नाना हरपळे, कैलास ढोरे आदी यावेळी उपस्थित होते.