Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

राज्य

शिवसेना- श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
भिवंडी, २८ जानेवारी/वार्ताहर

तालुक्यातील लाखिवली ग्रुप ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा त्वरित घेण्यास ग्रामसेवकास सांगितल्याने त्याचा राग येऊन त्याने उपसरपंचांसह इतर मंडळींना बोलावून श्रमजीवी संघटनेच्या विरोधात भडकावून जातीवाचक शिवीगाळ करीत दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.

महाराष्ट्र एम्प्लॉईज को-ऑप बँक्स असोसिएशनचे अधिवेशन
अलिबाग, २८ जानेवारी/ प्रतिनिधी

महाराष्ट्र एम्प्लॉईज को-ऑप. बँक्स असोसिएशनचे दहावे राज्यव्यापी अधिवेशन २९ ते ३१ जानेवारीदरम्यान चोंढी येथील हॉटेल साई इन येथे भरणार असून, उद्घाटन गुरुवारी दुपारी ४ वाजता नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते होणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष विजय आगटे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

‘राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका’
महाड, २८ जानेवारी/वार्ताहर : पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई शहरावर हल्ला केल्याने देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला असून, आज सर्वसामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित झाले आहे. याला सर्वस्वी कारण राज्यकर्ते असून, त्यांच्या नाकर्तेपणामुळेच देशाच्या सुरक्षिततेला आज धोका निर्माण झाला आहे. या राज्यकर्त्यांना सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाड येथील शिवसेनेच्या विराट सभेमध्ये केले.

‘प्रावीण्य संपादन करणाऱ्या क्रीडापटूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य’
खो-खो व हॉलीबॉल स्पर्धांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांची तरतूद
रोहे, २८ जानेवारी
रोहे तालुका विविध सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रम राबविण्यामध्ये सतत आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कलावंत व खेळाडूंना आपले कसब दाखविण्याची संधी मिळते. विविध खेळांमध्ये नैपुण्य दाखविणाऱ्या खेळाडूंची आजवर गांभीर्याने दखल घेतली जात नव्हती.

दहागाव आश्रमशाळेतील उपाशी विद्यार्थ्यांची विद्यार्थी सेनेने घेतली दखल
लोकसत्ता इफेक्ट
शहापूर, २८ जानेवारी/वार्ताहर
पोषक वातावरण, पुरेशा सुविदांचा अभाव, खिडक्यांना तावदाने नाहीत, सहा महिन्यांपासून वीज नाही अशा भयानक अवस्थेत शिकत असलेल्या दहागाव येथील खासगी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या उपासमारीची दखल विद्यार्थी सेनेने घेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. दोन दिवसांपासून उपाशी असलेल्या १८७ विद्यार्थ्यांनी शहापूर आदिवासी प्रकल्प कार्यालयावर काढलेल्या थाळी मोर्चाचे वृत्त लोकसत्तामघ्ये प्रसिद्ध होताच विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संजय मशिलकर यांनी दहागाव आश्रमशालेत भेट देऊन हलाखीत दिवस काढीत ज्ञानार्दन करीत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

उरण प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची दारूची पार्टी
उरण, २८ जानेवारी/वार्ताहर

कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गरीब रुग्णांची सेवा बाजूला ठेवून दारूची पार्टी झोडणाऱ्या चार डॉक्टरांविरुद्ध रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी व जिल्हा आरोग्य सभापतींकडे जि. प. सदस्या कलावती गावंड यांनी तक्रार दाखल करताच संबंधित डॉक्टरांचे रक्ताचे नमुने तपासून कारवाईचे आदेश दिल्याने परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
उरण तालुक्यातील ग्रामीण भागात कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील गरीब, गरजू रुग्ण या आरोग्य केंद्रात उपचारार्थ येतात. मात्र आरोग्य केंद्रातील गलथान कारभाराच्या रुग्णांच्या तक्रारी असतानाच मंगळवारी दोन-अडीच वाजताच्या सुमारास कोप्रोली आरोग्य केंद्रातील व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी आरोग्य केंद्रातच दारूची पार्टी झोडण्यास बसले होते. याची कुणकुण लागताच येथील जि. प. सदस्या कलावती गावंड यांनी संबंधितांना आरोग्य केंद्रात धाड टाकून रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कलावती गावंड यांनी घडला प्रकार जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, आरोग्य सभापती यांना कळविण्यात आल्या. नंतर संबंधित डॉक्टरांची रक्ताची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर कोप्रोली येथील दोन डॉक्टरांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. मात्र इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे टाळले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. रक्ताचे नमुने तपासणीच्या अहवालानंतरच दोषी आढळल्यास तक्रार नोंदविण्यात येईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट लढाई- गोपीनाथ मुंडे
भुसावळ, २८ जानेवारी/प्रतिनिधी

राज्यातील कापूस पिकविणाऱ्या तेरा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या कापसाची न होणारी खरेदी, एकाधिकार योजना मोडीत काढून शेतकऱ्यांना सावकारी पाशात लोटणाऱ्या, त्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारे धोरण राबविणाऱ्या, कर्जमाफीच्या योजना जाहीर करून शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करणाऱ्या, त्यांना नव्या कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या राज्य सरकारविरुद्ध प्रत्यक्ष लढाईला आरंभ होईल, असा इशारा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी दिला.वर्धा जिल्ह्यातील डोरली येथून सुरू झालेल्या शेतकरी संघर्ष अभियानाचा समारोप भुसावळ येथे झाला. त्यावेळी मुंडे बोलत होते. कापूस पणन महासंघाच्या कार्यालयांसमोर कापसाच्या चुकाऱ्यांसाठी धरणे देणे, कार्यालयांना कुलूप ठोकणे, कर्ज नाकारणाऱ्या बँकांना जाब विचारणे अशी टप्प्याटप्प्याने आंदोलने करण्यात येतील, असे मुंडे यांनी जाहीर केले. शेतकरी संघर्ष अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संपर्क झाला. जनजागृती झाली आता प्रत्यक्ष लढय़ाला प्रारंभ होईल, असेही ते म्हणाले.राज्यात सध्या मागणी व पुरवठा यातील फरकामुळे सात हजार मे.व्ॉ. विजेचा तुटवडा आहे. हा तुटवडा भरून काढण्याकरिता कुठलीही योजना सरकारकडे नाही, याकडे लक्ष वेधून मुंडे यांनी यापुढे राज्यातील वीज टंचाईबाबतही आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. स्वातंत्रोत्तर काळत अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या बारा बलुतेदार, अठरापगड जातीचे लोक, दलित, आदिवासी यांना दिलेले वैयक्तिक कर्ज माफ करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार मुंडे यांनी केला.

‘मनसेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी’
नाशिक, २८ जानेवारी / प्रतिनिधी

शहिदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला भ्याड स्वरूपाचा असल्याचे सांगून दोषींविरूध्द कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. प्रजासत्ताक दिनी सातपूर येथे झालेल्या कार्यक्रमात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून नागरिकांना मारहाण केली होती. या ठिकाणी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार होती. या सांस्कृतिक कार्यक्रमावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध नोंदविला. मनसेच्या कार्यकर्त्यांमागे असणारे मुंबईतील नेते, कट रचणारे पुढारी या सर्वावर कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी केली.

कापूसउत्पादक शेतकरी उंदरांच्या त्रासामुळे हैराण
सोयगाव, २८ जानेवारी/वार्ताहर

भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी घरात कापसाचा साठा करून ठेवला. पण हे शेतकरी आता त्रस्त झाले आहेत. त्याचे कारण आहे उंदीर. कापूस उत्पादकाला सध्या अनोख्या संकटाचा सामना करावा लागत आहे. कापसाचे भाव वाढतील म्हणून कापूस घरात ठेवला मात्र दोन ते तीन महिन्यांपासून पडलेल्या कापसात उंदरांनी धुमाकूळ घातला आहे. चांगला कापूस खराब करू लागले तसेच कापूस घराबाहेर नेऊन टाकल्याने कापसाच्या वजनातही घट होऊ लागली आहे.गेल्या काही दिवसांत उंदराची संख्या वाढली असून त्यांचा धुमाकूळ चालू आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामातील शेतात आलेल्या गव्हाचे नुकसान उंदीर करीत आहेत. गव्हाला आलेल्या ओंब्या खाण्याचे प्रमाण वाढल्याने गव्हाचे मोठे नुकसान होत आहे. उंदीर मारण्यासाठी टाकण्यात आलेल्या औषधाला उंदीर स्पर्श करीत नाही. उंदरासाठी लावलेल्या पिंजऱ्यातही उंदीर येत नाही. नुकसान मात्र मोठय़ा संख्येने होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.