Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

क्रीडा

विजयाचा षटकार
दम्बुला, २८ जानेवारी/ पीटीआय

रैना आणि गंभीर या जोडीने रचलेल्या पायावर भारताचा विजयाचा कळस उभारला गेला. शतकी भागीदारी करणारे रैना, गंभीर सुदैवीही ठरले. गंभीर सुरुवातीला कुलसेकराकडून झेलचीत झाल्याचे अपील फेटाळण्यात आले. कुलसेकराने झेप घेऊन गंभीरने मारलेला चेंडू झेलल्यानंतर पंचांनी संशयाचा फायदा गंभीरला दिला. रैनादेखील अवघ्या सात धावांवर असताना दिलशानकडून झेल सुटल्यामुळे बचावला. पण या जीवदानानंतर त्यांनी खेळपट्टीवर जम बसविला. विशेषत: गंभीरने विनादडपण फलंदाजी करून आपले अर्धशतक साजरे केले.

पश्चिम विभागाचे पारडे जड
दुलीप करंडक
मुंबई, २८ जानेवारी/ क्री. प्र.

रणजी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे उद्यापासून ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होणाऱ्या दुलीप करंडकाच्या पहिल्या उपान्त्य सामन्यात पूर्व विभागापेक्षा पश्चिम विभागाचे पारडे जड दिसत आहे. ३८ व्यांदा रणजी चषक जिंकवून देणारा मुंबईचा कर्णधार वसीम जाफर हा पश्चिम विभागाचे नेतृत्व करणार असून पूर्व विभागाची धुरा भारताचा माजी सलामीवीर शिव सुंदर दास वाहणार आहे.

पेस-ड्लोही, सानिया-भूपती उपान्त्य फेरीत
नदालची उपान्त्य फेरीत धडक

ऑस्ट्रेलियन ओपन
मेलबर्न, २८ जानेवारी / पीटीआय

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आज भारतीय टेनिसपटूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करताना पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीत उपान्त्य फेरीत धडक मारली. पुरुष दुहेरीत लिएण्डर पेस आणि त्याचा सहकारी ल्युकास ड्लोही यांनी इटलीच्या सायमन बोलेल्ली व आंद्रेस सेप्पी यांना ६-१, ७-६ (५) असे पराभूत करीत उपान्त्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. तर मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा व महेश भूपती यांनी अलेक्झांड्रा वोझनियाक व डॅनियल नेस्टर जोडीला नमवून उपान्त्य फेरी गाठली.

कबड्डी: रायगड महिला संघाचा रत्नागिरीला हादरा
रोहा, २८ जानेवारी/क्री.प्र.

प्रवीण नेवाळे या हुरहुन्नरी खेळाडूने आज अकराव्या छत्रपती चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेतील दुसरा दिवस आपल्या चतुरस्र चढायांनी गाजविला. त्याच्या सवरेत्कृष्ट खेळाच्या बळावर महिंद्र आणि महिंद्र संघाने साखळीतील दुसऱ्या सामन्यात रायगड पोलीस संघाला २०-११ अशा गुणांनी चकविले. पोलिस संघाचा लागोपाठ झालेला हा दुसरा पराभव. या दोन पराभवांमुळे त्यांचे बाद फेरीत प्रवेश करण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. रायगड महिला संघाने मात्र एका चुरशीच्या झुंजीत रत्नागिरी जिल्हा संघाला ३१-२२ असे नमविले.

माजी बास्केटबॉलपटू आणि क्रीडा पत्रकार जावेद अख्तर यांचे निधन
मुंबई, २८ जानेवारी/क्री.प्र.

महाराष्ट्राचे आणि भारतीय रेल्वे संघाचे माजी बास्केटबॉलपटू आणि ख्यातनाम क्रीडापत्रकार जावेद अख्तर यांचे बुधवारी कर्करोगामुळे निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. १९६० च्या सुमारास सलग ३ वर्षे विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धाजिंकणाऱ्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संघाचे ते सदस्य होते.
मुंबईच्या बास्केटबॉल पंढरीच्या नागपाडा नेबरहूड हाऊस या विभागातील अनेक मान्यवरांसह जावेद यांचा खेळ बहरला होता. त्याचे एकेकाळचे रेल्वे संघाचे सहकारी सिराज अहमद यांनी सांगितले, गेल्याच आठवडय़ात त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. वेस्टर्न रेल्वेत खेळण्याआधी जावेद अख्तर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. पत्रकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मिड डे या इंग्रजी सायंदैनिकाद्वारे क्रीडा पत्रकारितेत प्रवेश करणाऱ्या जावेद अख्तर यांनी आपल्या फोटोग्राफीच्या कलेचेही वारंवार दर्शन घडविले होते. पाकिस्तान संघाचे ‘मीडिया मॅनेजर’ म्हणून काम करताना त्यांनी अनेक भारतीय पत्रकारांना गेल्या पाकिस्तान दौऱ्याच्यावेळी मदत केली होती. अशा विविध भूमिकांद्वारे लोकांमध्ये प्रसिद्धी पावलेल्या जावेद अख्तर यांना अखिल भारतीय क्रीडापत्रकार महासंघाच्या वतीने अध्यक्ष एस. सभानायकन यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

इथोओपिया आणि केनियाच्या धावपटूंमध्ये चुरस
नागपूर, २८ जानेवारी / क्री. प्र.

लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय धावपटूंचे शहर, अशी ओळख निर्माण करणाऱ्या नागपूरने आता आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यत आयोजित करणारे शहर म्हणून ओळख निर्माण करण्याचे रंगवलेले स्वप्न येत्या ३० जानेवारीला पूर्ण होणार आहे. शारीरिक क्षमता आणि कणखरतेची कसोटी पाहणाऱ्या ४२.१९५ किलोमीटर अंतराच्या पूर्ण मॅरेथॉनसह होणाऱ्या महिलांच्या हाफ मॅरेथॉन(२१ किलोमीटर) शर्यतींमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी केनिया आणि इथिओपियाचे धावपटू सहभागी होणार असल्यामुळे या शर्यतीबाबतची उत्सुकता शिगेला गेली आहे. या शर्यतीत सहभागी होणाऱ्या २७ विदेशी धावपटूंमध्ये इथोओपियाचे १० पुरुष व ५ महिला तर केनियाचे ३ पुरुष व ३ महिला धावपटू आहेत. अवघे दोन दिवस शिल्लक असलेल्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी २७ आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लिट शहरात दाखल झाले असून तेच या स्पर्धेचे प्रमुख आकर्षणही मानले जात आहे.

एक लाख डॉलसर्चा ‘अभिषेक’
मुंबई, २८ जानेवारी/ क्री. प्र.

रणजी सामन्यांत अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबईच्या विजयात हातभर लावणाऱ्या अभिषेक नायरचा भाव चांगलाच वाढला असून इंडियन प्रीमिअर लीगच्या मुंबई इंडियन्सच्या करारातील रक्कमेत दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी जवळपास चाळीस हजार डॉलर्स कमाविणाऱ्या नायरला यावर्षांसाठी मुंबई इंडियन्सने एक लाख डॉलर्स देऊन करारबद्ध केले आहे.चार रणजी सामन्यांमध्ये अभिषेकने ५८. २५ च्या सरासरीने २३३ धावा फटकाविल्या होत्या, ज्यामध्ये अंतिम सामन्यातील ९९ धावांच्या खेळीचा समावेश आहे. तर गोलंदाजीमध्ये हिमाचल प्रदेशविरूद्ध त्याने ४५ धावांमध्ये ६ विकेट्स घेण्याचीही किमया त्याने केली होती. अभिषेकला त्याच्या गेल्या वर्षीच्या उत्तम कामगिरीमुळेच हे पॅकेज मिळाले आहे, असे मुंबईचा कर्णधार वसीम जाफरने सांगितले आहे.गेल्या वर्षी धवल कुलकर्णी, योगेश ताकवले आणि रोहन राजे यांनाही मुंबई इंडियन्सने चाळीस हजार डॉलर्स देऊन करारबद्ध केले होते, पण यावर्षी त्यांना मात्र अभिषेक एवढी रक्कम देण्यात आलेली नाही. रणजीमध्ये सर्वाधिक ४२ विकेट्स घेणाऱ्या धवल कुलकर्णीला ७० हजार डॉलर्स देऊन तर महाराष्ट्रचा यष्टीरक्षक योगेश ताकवले आणि रोहन राजे यांना अनुक्रमे ७५ हजार डॉलर्स व ५० हजार डॉलर्स देऊन करारबद्ध करण्यात आलेल आहे.

संक्षिप्त क्रीडावृत्त
मियाँदाद यांचा राजीनामा

कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शोएब मलिकची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर जावेद मियाँदाद यांनीही क्रिकेट मंडळाच्या व्यवस्थापकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मलिकला कर्णधारपदावरुन हटवल्याने मियाँदाद यांनी राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली आहे. मात्र मंडळाच्या सूत्रांनी राजीनामा स्वीकारला अथवा नाही हे सांगण्याचे टाळले. तीनवेळा संघाचे प्रशिक्षक राहिलेले मियाँदाद यांनी नोव्हेंबरमध्ये व्यवस्थापकपदाची सूत्रे हाती घेतली होती.

ललीत मोदी यांच्याविरोधात एफआयआर
जयपूर: राजस्थानमधील नागापूर तालुक्यातील जमीन खरेदी करताना भारतीय नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि इंडियन प्रीमिअर लीगचे कमिशनर यांनी खोटय़ा सह्या आणि छायाचित्रे दाखवली असल्याचे त्यांच्या विरोधातल्या प्रथम दर्शनी अहवालात ( एफआयआर) रूपा राम यांनी पोलिसांना सांगितले आहे.

कुस्ती पंच प्रशिक्षण वर्गाला ५४ महिलांची उपस्थिती
मुंबई: भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे मुंबई शहर तालीम संघाने नुकत्याच आयोजित केलेल्या पंच प्रशिक्षण वर्गात मुंबईतील खासगी शाळा, महानगरपालिका शाळातील क्रीडा शिक्षक तसेच कुस्ती चाहते, वडाळा शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी अशा एकूण १३७ प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतले. यामध्ये५४ महिलांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक उत्तमराव पाटील, राष्ट्रीय पंच अंकुश वलखाडे यांनी मार्गदर्शन केले.