Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

पुढील वर्षी संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त होणार
संजय बापट

मार्च २०१० पूर्वी संपूर्ण ठाणे जिल्हा पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध योजना हाती घेतल्या असून, आजमितीस २०४ योजना पूर्ण झाल्या आहेत, तर एक हजार ४७ योजना प्रगतिपथावर आहेत. मार्च २००९ पासून ४४७ नवीन पाणीपुरवठा योजना हाती घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे केलेला संकल्प सिद्धीस जाईल, असा दावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष हजारे यांनी केला आहे.

अभिजात महागायकीवर थिरकली ‘प्रेरणा’ दायी पावले
ठाणे/प्रतिनिधी

स्थळ-गडकरी रंगायतन, वेळ- रात्री आठची. सुमारे ७५हून अधिक मुलांचे अगदी शिस्तबद्ध आगमन होताच अनेकांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. भिरभिरत्या नजरेने रंगायतनचे विलोभनीय दृश्य पाहताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पदोपदी जाणवतो. त्यातील अनेकांनी पहिल्यांदाच या वास्तूत प्रवेश केलेला असतो. काय पाहू अन् काय नको अशी त्या चिमुरडय़ांची अवस्था झालेली असते. ही मुले येऊर येथील विवेकानंद बालआश्रमातील आणि त्यांना अगदी खास आमंत्रित केले होते ते येथील प्रेरणा प्रतिष्ठानने दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून.

ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे विविध क्रीडा स्पर्धा
ठाणे/प्रतिनिधी

दि ठाणे जनता सहकारी बँक लि. तर्फे ठाणे जनता स्पोर्टस् आणि रिक्रिएशन्स क्लब आयोजित आंतर बँक कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबलटेनिस, क्रिकेट स्पर्धा २४ ते २६ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध सर्व स्पर्धांचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन व संचालक दिलीप सोमण यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कर्वे, सरव्यवस्थापक विद्याधर नामजोशी, श्रीकृष्ण म्हसकर व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

शहिदांना शहापूरकरांची रांगोळीद्वारे सलामी
शहापूर/वार्ताहर

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या शूरांना शहापुरातील युवकांनी अनोखी अशी भव्यदिव्य रांगोळी काढून सलामी दिली आहे. प्रजासत्ताक दिनी असलेली ही रांगोळी बघण्यासाठी शहापूरकरांनी एकच गर्दी केली होती.शहापुरातील वारघडेनगर येथील जाणता राजा मित्रमंडळाचे मिलिंद बडगुजर, अमेय तांडेल, सूर्यकांत चौगुले, आशीष कदम या कलंदर कलावंतांनी शहापूर तहसील कार्यालयासमोर शहीद विजय साळसकर, अशोक कामटे, हेमंत करकरे या तिघांची रांगोळी काढली होती. या तिघा शहिदांची व ताज हॉटेलमधील हल्ला याची प्रतिकृती हुबेहूब रांगोळीद्वारे काढल्याने संपूर्ण शहापूर ही रांगोळी पाहण्यासाठी आले होते. जनकल्याण विद्यालय, महिला मंडळ शाळा, ग.वि. खाडे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रांगा ही रांगोळी पाहण्यासाठी लागल्या होत्या.

ठाणे येथे नवीन उपनगरीय गाडय़ांचे जल्लोषात स्वागत
ठाणे/प्रतिनिधी

ऐन गर्दीच्या वेळी मुंबई आणि कर्जतकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने दोन नव्या गाडय़ा ठाणे स्थानकातून सोडल्या असून, काल नव्या गाडय़ांचे प्रवाशांनी जल्लोषात स्वागत केले.
ठाण्याहून सकाळी मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असते, तर संध्याकाळी कर्जतकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही गर्दीचा सामना करावा लागत होता. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन खासदार आनंद परांजपे यांनी सातत्याने रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत रेल्वेने कालपासून ठाण्याहून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी सकाळी ९.३५ वाजता, तर कर्जतसाठी सायंकाळी ७.५९ मिनिटांनी अशा दोन नवीन गाडय़ा सुरू केल्या आहेत. खासदार परांजपे, आमदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या दोन्ही गाडय़ांचा शुभारंभ झाला. यावेळी दोन्ही गाडय़ा फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आल्या होत्या.यावेळी सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोपरीतील स्कायवॉकला स्थानिकांचा विरोध
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे पूर्व स्टेशन भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएतर्फे बांधण्यात येणाऱ्या स्कायवॉकला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. ठाणे पूर्व भागातील वाहतूक कोंडी दूर व्हावी, पादचाऱ्यांना विनाअडथळा लवकर स्टेशन अथवा घरी पोहोचता यावे, यासाठी एमएमआरडीएतर्फे कोपरीत दोन स्कायवॉक बांधण्यात येत आहेत. एक स्कायवॉक आनंद सिनेमा ते बाराबंगला- आनंदसागर असा जाणार असून, दुसरा ठाणे स्टेशन ते अष्टविनायक चौक व लोकमान्य टिळक पथ असा जाणार आहे. या दोन्ही स्कायवॉकसाठी सुमारे १२ ते १५ कोटी रुपये खर्च केले जाणार असून, दोन्ही स्कायवॉकचे कामही सुरू झाले आहे.परंतु, अष्टविनायक चौकात येणारा स्कायवॉक अनाठायी असल्याचा आरोप करीत या भागातील नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला आहे. रविवारी स्थानिक नागरिकांनी या स्कायवॉकला विरोध दर्शवीत काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला.भाजपचे महासचिव संदीप लेले, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी अमित खोत, सागर सुर्वे, अमोल माने आदींच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस स्थानिक रहिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सदर विभाग मर्यादित लोकवस्तीचा असून पुढे खाडी असल्याने रस्ताही संपला आहे. तसेच पुढील परिसर सीआरझेड झोनमध्ये येत असल्याने तेथे विकासही होणार नाही. तसेच हा परिसर स्टेशनपासून पाच ते सात मिनिटांवर असल्याने येथे स्कायवॉकची गरज नाही, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे. तसेच या प्रकल्पास विरोध करण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.

अक्षरधाराचे आजपासून डोंबिवलीत प्रदर्शन
डोंबिवली/प्रतिनिधी

डोंबिवलीत अक्षरधाराचे पुस्तक प्रदर्शन सुरू होत आहे. ‘एक पुस्तक विकत घ्या, त्याचबरोबर एक पुस्तक फुकट घ्या’ या योजनेतून प्रदर्शनात पुस्तकांची विक्री केली जाणार आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.पालिकेच्या डोंबिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखक द.मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. कथाकथनाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. प्रभाग अधिकारी सुभाष भुजबळ, लक्ष्मण राठिवडेकर उपस्थित राहणार आहेत. ६० ते ७० हजार मराठी, हिंदी, इंग्रजी व अन्य भाषिक पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रदर्शनात दर्जेदार लेखक, साहित्यिकांची पुस्तके, कथा, कादंबऱ्या मांडण्यात आल्या आहेत. धार्मिक, ज्योतिष, विज्ञान, संगीत, चित्रकला, नाटक, कविता, शेती, शब्दकोश आदी विषयांची पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. ४० टक्के सूट असलेली पुस्तके स्वतंत्र विभागात मांडण्यात आली आहेत, असे व्यवस्थापक लक्ष्मण राठिवडेकर यांनी सांगितले.

सुभाष महाजन यांची केंद्रीय समितीवर नियुक्ती
ठाणे/प्रतिनिधी

डोंबिवली येथील सामाजिक कार्यकर्ते व स्टेट बँक कर्मचारी सेना महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष महाजन यांच्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेऊन त्यांची केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘टास्क फोर्स’च्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. सुबोधकांत सहाय हे या खात्याचे मंत्री असून, अन्न भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना केली जाते, त्यामुळे हे पद महत्त्वाचे समजले जाते. गेली ३० वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या कार्यकर्त्यांची केंद्र शासनाने दखल घेतल्याबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. सुभाष महाजन हे स्टेट बँकेच्या ठाणे मुख्य शाखेत वरिष्ठ लिपिक आहेत. डोंबिवलीतील अनेक सामाजिक संस्थांशी ते निगडित असून, आतापर्यंत विविध संस्थांचे त्यांना २२ पुरस्कार मिळाले आहेत. त्यात आदर्श गुणवंत कामगार, समाजरत्न पुरस्कार, भारतीय दिल्ली साहित्य दलित अकादमीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप आदी पुरस्कारांचा समावेश आहे. मुंबई उपनगरी रेल्वे प्रवासी संघ, पोलीस शांतता कमिटी आदी संघटनांवर ते पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. महाजन यांना पत्रकारितेचीही आवड असून, अनेक नियतकालिकांमध्येही त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहे.

धरमसी मोरारजी टाळेबंदी; तोडगा काढण्याचे आश्वासन
बदलापूर/वार्ताहर

अंबरनाथ येथील धरमसी मोरारजी कंपनीमध्ये व्यवस्थापनाने अचानक लागू केलेली टाळेबंदी अन्यायकारक असून, कंपनीतील कामगारांना न्याय मिळावा यासाठी त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन कामगारमंत्री नबाब मलिक यांनी दिले. मलिक यांनी डीएमसी कंपनीच्या टाळेबंदीबाबत माहिती जाणून घेतली आणि याबाबत तोडगा काढण्यात येईल, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कंपनी व्यवस्थापनाने टाळेबंदी करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेतली नव्हती. कंपनी व्यवस्थापन, तसेच कामगार संघटना यांच्याशी पुढील आठवडय़ात चर्चा करून यशस्वी तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मलिक यांनी दिली. या कंपनीत २३ जानेवारीपासून अचानक टाळेबंदी लागू केल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
ठाणे/प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत विविध गटांतील ४० पैकी सर्वाधिक जागा जिंकून राष्ट्रवादीने या समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
जिल्हा नियोजन समितीसाठी मोठे नागरी निर्वाचन क्षेत्रात बिनविरोध निवड झाली. मात्र वसई विकास मंडळाच्या आग्रही भूमिकेमुळे लहान नागरी निर्वाचन क्षेत्र (नगरपालिका) आणि ग्रामीण निर्वाचन क्षेत्र (जिल्हा परिषद) गटात निवडणुका झाल्या. त्यात सेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आपापसात समझोता करीत वसई विकास मंडळाला वेगळे पाडले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेत १२ जागांपैकी राष्ट्रवादी, सेनेला प्रत्येकी चार जागा मिळाल्या. विनायक धानके, कपिल पाटील, प्रमोद हिंदुराव, विजय म्हात्रे हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले, तर हर्षदा तरे, शारदा म्हात्रे, प्रकाश म्हात्रे हे सेनेचे सदस्य निवडून आले. याशिवाय काँग्रेसच्या डॉमनिका डाबरे, समीर वर्तक, भावना विचारे, वसई विकास आघाडीचे मनोहर पाटील आदी निवडून आले आहेत. नगरपालिका गटातून अजीव पाटील, उमेश नाईक, दिनेश भट, सुषमा दिवेकर विजयी झाले.

भाग्यश्री औताडे सवरेत्कृष्ट वीरबाला
ठाणे/प्रतिनिधी: मुंबई महापालिकेच्या स्काऊट गाईडच्या अंतिम स्पर्धेत मुलुंड येथील गोशाळा मार्ग, मनपा शाळा क्र. २ची विद्यार्थिनी भाग्यश्री उद्धव औताडे हिची सवरेत्कृष्ट वीरबाला म्हणून निवड करण्यात आली. शाळेच्या प्रशिक्षिका गाईड कॅप्टन स्मिता विजयकुमार पाटील यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिला प्रत्येकी एक सुवर्ण व रौप्यपदक तसेच दोन प्रशस्तीपत्रके महापालिका शिक्षणाधिकारी पी. आर. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. स्काऊट गाईड विभागीय स्पर्धेत ११ सुवर्ण, चार रौप्य व दोन रौप्य मिळून एकूण १८ पैकी १७ पदके मिळवून या पथकाने उच्चांक प्राप्त केला.