Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

व्यक्तिवेध

सुंदरलाल बहुगुणा हे नाव उच्चारले की पांढरीशुभ्र दाढी आणि डोक्याला रुमाल बांधलेले गृहस्थ, असा चेहरा डोळ्यासमोर समोर येतो. ‘चिपको’ आंदोलनाशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. हिमालयाच्या कुशीतल्या वाडय़ा वस्त्यांमध्ये, जंगलांमध्ये ठेकेदारांकडून होणारी वृक्षतोड थोपवण्यासाठी बहुगुणांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केला. विशेषत: महिलांना त्यांनी या मार्गाची शिकवण दिली आणि सांगितले की वृक्षतोडीसाठी जे कुणी येतील, त्यांच्याशी वाद न घालता झाडांना घट्ट मिठी मारून उभे राहायचे. हे ठेकेदार पोलिसांमध्ये जातील, तक्रार करतील आणि शेवटी तुम्हाला ते अटक करायला भाग पाडतील, पण तेवढय़ाने आपले अहिंसक मार्गाने

 

चाललेले आंदोलन सोडायचे नाही. उपनिषदात एक झाड हे दहा मुलांएवढे सामथ्र्यवान असते, असा दाखला असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिले. चिपको आंदोलनापूर्वी त्यांनी ग्रामीण भागात वाढलेला दारूचा प्रसार पाहिला आणि दारूबंदी साठीची चळवळ हाती घेतली. घरेदारे त्यांनी उद्ध्वस्त होताना पाहिली. घराघरात महिलावर्गाच्या आणि लहान मुलांच्या हालअपेष्टा त्यांनी पाहिल्या होत्या. भारत-चीन सरहद्दीवरून दारूची आयात होत असल्याचे पाहून त्यांनी त्याविरुद्ध चळवळ उभी केली. याच सुमारास हिमालयातली उत्तम वनसंपदा नष्ट करायचा चंग सरकार आणि ठेकेदार या दोघांनी मिळून केला. उत्तमोत्तम वृक्षांची कत्तल झाली तर हिमालय जागेवर राहील का, या शंकेने त्यांना अस्वस्थ करून सोडले. १९७२ मध्ये टेहरी धरणाच्या कामाला प्रारंभ झाला. त्यांनी सरकारला आवाहन केले, की हे धरण विनाशाला निमंत्रण देणार असल्याने ते उभे करू नका. पर्यावरणाला खो बसू नये, या उद्देशाने त्यांनी उपोषणास बसायचा निर्णय घेतला. वयाच्या १७ व्या वर्षी गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन समाजकार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. गावागावातून छोटे गट तयार केले. गांधीजींनी खेडय़ात जा, असे सांगितले होते. बहुगुणांची गांधीजींवर श्रद्धा असल्याने त्यांनी ग्रामीण भाग कधी सोडलाच नाही. गांधीजींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर १९४९ रोजी त्यांनी रात्रशाळेचा उपक्रम हाती घेतला. दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्यांना रात्री अक्षर ओळख करून दिली. ज्या घरात अजूनही अस्पृश्यता पाळली जात होती, तिथे जाऊन त्यांचे दुष्परिणाम पटवून द्यायचा प्रयत्नही त्यांनी केला. सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी ठक्कर बाप्पा वसतिगृह बांधले. या वसतिगृहाच्या बांधकामात त्यांनी स्वत: मजुराप्रमाणे काम केले. गांधीजींच्या ब्रिटिश शिष्या मीराबहेन यांनी हृषिकेशमध्ये ‘पशुलोक’ हा पांजरपोळ सुरू केला. १९४९ मध्ये गंगेला आलेल्या पुरात ‘पशुलोका’ची सर्वाधिक हानी झाली. मीराबहेन यांच्या लक्षात आले की जंगलतोडीमुळेच केवळ गंगेला पूर आला. त्यांनी टेहरी गढवाल या दारिद्रय़ाने पिडलेल्या जिल्ह्य़ात वास्तव्य करायचे ठरवले. हरतऱ्हेच्या वृक्षराजींना खुलवायचा प्रयत्न मीराबहेन यांनी केला. पंडित नेहरूंचा पूर्ण पाठिंबा असूनही, नोकरशाहीच्या आडमुठय़ा धोरणाने टेहरी गढवाल सोडून त्यांना काश्मीरमध्ये स्थायिक होणे भाग पडले. गांधीजींच्या दुसऱ्या शिष्या सरलाबहेन यांच्या सहकारी विमला यांच्याशी सुंदरलाल यांचा विवाह झाला आणि कुमाऊँ टेकडय़ांमध्ये दोघांनी मिळून समाजकार्याला वाहून घ्यायचा निश्चय केला. १९६० मध्ये आचार्य विनोबा भावे पदयात्रेने आग्य़्रात आले असताना विनोबाजींनी सुंदरलालना तिथे बोलावून घेतले. त्या वेळी त्यांनी दारिद्रय़ नष्ट करायचे तत्वज्ञान चीन जगतो आहे, अशावेळी तुम्ही ग्रामस्वराज्याला बांधून घ्या, असे सांगितले. त्या दिवसापासून सुंदरलाल दुप्पट उमेदीने कामाला लागले. दारूबंदीचे आंदोलन त्यांनी उभे केले. दारूगुत्त्यांसमोर ते विष्णू सहस्रनाम म्हणत बसायचे. आजूबाजूचे बघे हसायचे, पण काहींना त्यांच्या समोरून दारूगुत्त्याची पायरी चढताना लाजही वाटायची. १९८० मध्ये जंगलतोडीच्या विरोधातले उपोषण त्यांनी मागे घ्यावे म्हणून तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षे वृक्षतोडीवर हिमालयाच्या परिसरात पूर्ण बंदी घातली जाईल, असे त्यांना लेखी आश्वासन दिले. अशाच एका उपोषणाच्या काळात समाजवादी नेते जॉर्ज फर्नाडिस यांनी लोकसभेच्या सभापतींच्या वतीने येऊन उपोषण सोडायचे त्यांना आवाहन केले. त्या वेळी धरण परिसरात सुरूंग न लावायचे आश्वासन दिले गेले. ग्रामस्वराज्य, वनराई, पर्यावरण रक्षण यासाठी संघर्ष करणारे सुंदरलाल बहुगुणा यांना राष्ट्रपतींनी पद्मविभूषण किताब जाहीर करून त्यांच्या कार्याचा योग्य तो गौरव केला आहे.