Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

विशेष लेख

‘एक्स्प्रेस वे’: मृत्यूचा सापळा

१८ सप्टेंबर २००८ ला कोरियन एअरवेजच्या विमानाने रात्री बारा वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून बाहेर आलो. त्वरित थेट पुण्याला येण्याचे ठरवल्यामुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास सुरू केला. अमेरिकेत वॉशिंग्टन-नायगारा-हर्शिल-बोस्टन-न्यूयॉर्क-फिलाडेल्फिया आणि बाल्टीमोर असा बसचा प्रवास करून चार-पाच राज्यांचे अंतरंग पाहिले होते आणि तेथील ‘फ्री वे’ (म्हणजे आपल्याकडील एक्स्प्रेस वे) चा अभ्यास केला होता. अमेरिकेचे अंतरंग नीट पाहता यावे यासाठीच विमानाऐवजी बसने प्रवासाचा बेत आखला होता.

 


अमेरिकेच्या रस्त्यावरील शिस्तबद्ध रहदारीच्या आठवणी ताज्या असतानाच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून रात्रीचा प्रवास करताना येथे वाहने कशी चालतात, हे लगेच लक्षात आले आणि या मार्गावर नेहमीच का अपघात घडत असतात याचीही कल्पना आली.
‘एक्स्प्रेस वे’वर जागोजागी ८० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गाडय़ा चालवू नका, एक्स्प्रेस वेवर थांबू नका, लेन बदलू नका आणि आपल्या लेनमध्येच राहा, अशा सूचनांचे बोर्डस् लावलेले असले तरी ते वाहनचालक वाचतच नाहीत का? असा प्रश्न पडेल अशी वाहनांची वर्दळ चालूच असते. डाव्या बाजूने ओव्हरटेक करू नका, असा वाहतुकीचा नियम जरी सांगत असला तरी प्रत्यक्षात एक्स्प्रेस वेवर मात्र बेधडकपणे डाव्या बाजूनेच ओव्हर टेक करण्याचे प्रकार सातत्याने दिसून येत होते.
ट्रक, ट्रेलर आणि बसेस यांनी डावीकडील लेनमध्ये चला असा नियम असताना ही सर्व ‘जडच’ नाही तर ‘अवजड’ वाहने ‘जलद’ लेनस्वरून लहान कारच्या मानाने कमी वेगाने आणि मागच्या गाडय़ांना लेन बदलून जागा न देता जात असतात हे निदर्शनास आले. ग्बऱ्याच बसेस, ट्रेलर्स आणि ट्रक्सचे मागचे टेल लॅम्प्स् (लाल रंगाचे) लावलेलेच नसतात. याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, हे लक्षात आले.
हल्ली पुण्याला आयटी क्षेत्राची चलती तीन-चार वर्षांपासून झालेली आहे आणि पुण्याच्या या कंपन्यांचे कर्मचारी वारंवार परदेशवाऱ्या करीत असतात. त्यांचे हे परदेशगमन मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होत असते. म्हणून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजकाल ‘इंडिका’, ‘तवेरा’ आणि ‘सुमो’ अशा टॅक्सीज् भरधाव प्रमाणात जात असतात आणि यांचे गाडी चालवणे धोकादायक असते तरी या बेफाम वाहतुकीवर लगाम का लावला जात नाही?
अमेरिकेतदेखील अपघात होतात, परंतु ते अपवादाने घडणारे अपघातच असतात. कारण आपला वेग, आपली लेन याचे कटाक्षाने पालन होते आणि केले नाही तर लगेचच ‘मार्शल’ (अमेरिकेचे पोलीस) आपल्या ‘इम्पाला’मधून येऊन चुकीच्या पद्धतीने गाडी हाकणाऱ्याला अटक करतात. लेन बदल हा अभ्यासपूर्ण रीतीने करणे या एका साध्या शिस्तीने अमेरिकेत अपघातांचे प्रमाण हे पन्नास टक्क्यांनी कमी होईल अशी परिस्थिती आहे. अमेरिकेतील प्रवासाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, तेथे रस्त्यांवरील खुणा इतक्या कल्पकतेने केलेल्या आहेत की, वाहनचालकांना जणू ‘चित्राने’च मार्गदर्शन होत असते. लेन बदल किंवा ‘ओव्हरटेक’ कोठे करणे ‘परमिटेड’ आहे हे रस्त्यावरील आखलेल्या पांढऱ्या किंवा पिवळ्या रेघाच दर्शवतात. गाडी चालवणाऱ्याचे मुख्य लक्ष हे रस्त्यावरच असते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बोर्डस्वर नाही हा साधा अभ्यास अमेरिकेने कल्पकतेने केलेला आहे.
आपल्या एक्स्प्रेस-वेवरदेखील प्रत्येक दिशेच्या रहदारीसाठी तीन तीन लेन्स आहेत, परंतु या लेन्स दर्शविणारे रस्त्यावरील पांढरे पट्टे हे मात्र एकाच रेषेने लेन्सचे विभाजन दर्शवत असतात. दोन पट्टय़ांच्या मधोमध गाडय़ा न चालवता बसेस, ट्रेलर्स आणि ट्रक्स हे पांढऱ्या रेषेवरूनच ‘टायर’ जाईल, अशा तऱ्हेने गाडय़ा चालवत असतात आणि परिणामी दोन लेनमधील संरक्षक अंतर हे कमी होते. अपघाताचे हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. अमेरिकेत गाडय़ा अगदी मधोमध चालवून दोन्ही बाजूंच्या पांढऱ्या रेषा (पट्टे) हे नेहमी मागच्या वाहनांना दिसतील, अशा रीतीने रहदारी सुरू असते.
अमेरिकेत काही ठिकाणी तर रेषेच्या बरोबरीने रेषेच्या चार-चार इंच रस्त्याचा भाग हा ‘खडबडीत’ ठेवलेला असतो. जेणेकरून पांढऱ्या पट्टय़ावर गाडीचे टायर आले तर वाहनचालकाला ते त्वरित लक्षात यावे. आपल्या ‘एक्स्प्रेस- वे’वर तरी हा प्रयोग नक्कीच संरक्षक असा ठरू शकेल. ‘लेन बदलणे’ किंवा ‘ओव्हरटेक करणे’ यासाठी महामार्गावर अंतरा-अंतराने अमेरिकेप्रमाणे ‘झोन्स’ ठेवून इतरत्र लेन बदलणे किंवा ‘ओव्हरटेक करणे’ हे संपूर्णपणे बंद केले तरी अपघाताचे प्रमाण हे निम्म्याने तरी कमी होईल.
नुसते नियम करून किंवा रस्त्यावर रंगरंगोटय़ाने लगेचच ‘शिस्त’ येईल अशी अवास्तव आशा बाळगता येणार नाही. ‘एक्स्प्रेस वे’ किंवा ‘महामार्गावर’ पोलिसांची ‘गस्त’ अशी दिसूनच येत नाही. पोलीस खात्यातील उच्च पदस्थांनी काही गस्तीची उपाययोजना करून ‘सरप्राईज चेक’ केले तर गस्त उत्तम होईल आणि वाहनचालकांना वचक बसेल. नाही तर आज आपला एक्स्प्रेस वे नाही तर महामार्ग हे ‘बेशिस्तपणे’ धावणाऱ्या वाहनांमुळे मृत्यूचे सापळेच झालेले आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात जीवितहानी होऊन आपण जर ‘स्वस्थ’ बसत असलो तर कोणती कमतरता आहे हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
‘एक्स्प्रेस- वे’वर किंवा महामार्गावर आणखी एक उणीव अशी आहे की, रस्त्यात वाहने उभी करण्याची वेळच येणार नाही, असे ‘रेस्ट एरिया’ अंतरा-अंतरावर राखून ठेवलेले नाहीत. म्हणून सर्वच कार्स आणि बसेस, ट्रक्स हे एक्स्प्रेस-वेवर मॉल्स्मध्ये तर इतरत्र कडेच्या धाब्यांवर किंवा धाब्याजवळील रस्त्यांच्या कडेला अगदी बेशिस्त रीतीने ठेवलेले असतात. अशानेदेखील अपघात झाल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत; परंतु मोठय़ा अपघातात मृतांच्या सगेसोयऱ्यांना ‘सानुग्रह’ अनुदाने देण्याच्या घोषणेने सर्वच अपघातांच्या घटना विसरल्या जातात. मृतांच्या ‘पोस्टमॉर्टेम्स’पेक्षा अपघाताच्या घटनांचे ‘पोस्टमॉर्टेम’ करून कारणे शोधून, त्यांचा समूळ नाश करण्याचे प्रयत्न मात्र होत नसतात. आपली विचारसरणी कशी त्रयस्थाची आहे, याचा एक अनुभव सांगतो. मी तपासनीस म्हणून काम करीत असताना मध्य प्रदेशात एक घटना घडून एका अपघातात एक बँक अधिकारी ‘अपघातग्रस्त’ झाला होता. याची माहिती त्या विभागाच्या रिजनल मॅनेजरला द्यावी या सद्हेतूने मी त्याला साधारणत: रात्री अकरा वाजता फोन केला. हा महाभाग कोणत्या तरी पार्टीत ‘गर्क’ होता आणि त्याने अपघाताबद्दल कोणतीही आस्था न दाखवता उद्धटासारखे सांगितले की, इन्शुरन्स असेल तर त्याचा ‘क्लेम’ करा. खरे तर या रिजनल मॅनेजरने अपघाताच्या ठिकाणी स्वत: हजेरी लावून मार्गदर्शन करणे हे त्याचे कर्तव्य होते; परंतु तोच जर त्रयस्थाच्या नजरेने बघत असला तर केवळ अपघातग्रस्तांना ‘देव तारील’ असेच म्हणावे लागले होते. अपघातांबाबत गंभीरतेने बघणे ही गरज आहे आणि ‘एक्स्प्रेस वे’ आणि ‘महामार्गावर’ आता ज्यांच्या हाती अधिकार आहेत, अशा अधिकारी वर्गाने सक्रिय व्हावयास हवे आहे.
विवेक मुसळे
musalevivek@rediffmail.com