Leading International Marathi News Daily

गुरुवार , २९ जानेवारी २००९

किल्ली
विराज :
आई, अगं, माझी स्कूटरची किल्ली पाहिलीस का?
वैशाली : मी? नाही बाबा. काल आल्यानंतर कुठे ठेवलीस? नेहेमीच्या जागी बघ.
वेदा : किल्ली ठेवायची एक जागा आहे का त्याची?
विराज : वेदा, Please. Mind your own business, ok?
वेदा : महिन्यातून किती वेळा हा किल्ली हरवणे प्रोग्रॅम होतो, ते बघ आणि फक्त किल्लीच नाही अनेक गोष्टी हरवत असतात. कधी जर्नल, कधी पुस्तक, कधी वॉलेट..

 


विराज : ए, नुसतं टीकास्त्र सोडण्यापेक्षा जरा किल्ली शोध. उशीर होतोय मला.
वेदा : तुला उशीर होतोय, हा जसा काही आमचाच दोष, अशा थाटात बोलतो आहेस.
विराज : ए, सक्काळी सक्काळी, पकवू नकोस हं. शोधायची असेल किल्ली शोध. उद्या तुझी एखादी गोष्ट हरवू देत. मग बघ.
वेदा : माझी गोष्ट हरवण्याचा प्रश्नच येत नाही. माझं सगळं कसं व्यवस्थित असतं. तुझ्यासारखं नाही. नुसता पसारा.
विजय : वेदा म्हणत्येय ते अगदी खरंय हं. विराज, वेदाबाईंचं काम अगदी व्यविस्थत.
वैशाली : हो नं. अगदी अंधारातसुद्धा तिला तिच्या गोष्टी सापडतात. त्या उलट तुझं आहे विराज. ते टेबल बघ एकदा. उकिरडा तरी बरा रे! टेबल आवर, टेबल आवर म्हणून किती वेळा सांगितलंय तुला..
विराज : आई, अगं वेळ तरी असतो का मला?
वेदा : आ हा हा हा! जसा काही तू एक फक्त कामाचा आणि आम्ही सगळे रिकामटेकडे. नाही का?
विराज : ए, वाकडय़ात शिरू नको. असं म्हटलं का मी?
वेदा : हं, म्हणजे शब्दात म्हणाला नसशील. पण अर्थ तोच निघतो ना. पण मुळात सारखं आवरत राहिलं ना की, वेळ काढून आवरायची गरज पडतच नाही किंवा आवरण्यासाठी मुद्दाम वेळही काढावा लागत नाही.
विजय : वेदा, ते काय आहे नां. हा वाद organised sector आणि unorganised sector मधला आहे. त्यांच्यात कधीच पटत नाही.
विराज : म्हणजे आपण Unorganised sector मधले आणि या organised sector मधल्या. right?
वेदा :Yes dear. Unorganised sector can't compete with unorganised sector.
विराज : Yes dear. You are simply great! खरंच किती व्यवस्थित असतं गं तुझं सगळं. काश! हम भी ऐसे होते! क्या जिंदगी होती! पण आता मला पटलंय हं की, माझा फारच गोंधळ असतो. माझं टेबल म्हणजे तर.. जाऊ दे. त्याबद्दल आपण बोलूयात नको.ut now I promise, I also will be part of organised sector. ठरलं. अगदी ठरलं. I will follow your footsteps. तेव्हा वेदा, आता व्यवस्थितपणाच्या बाबतीत तू माझी गुरू आणि मी तुझा शिष्य. आताच गंडा का काय ते बांधून टाकतो. तेव्हा गुरुमाऊली, या शिष्यावर एक कृपा करा. आपल्या वाहनाची किल्ली आम्हाला द्या.
वेदा : अच्छा. म्हणून ही लाडीगोडी होय. तरीच म्हटलं, सक्काळी सक्काळी तुझी एवढी कशी काय सटकली? पण प्रिय शिष्या, आम्ही आमच्या वाहनाची किल्ली आपल्याला दिली, तर आम्ही काय करावे बरे?
विराज : आज आम्हास उशीर झाला आहे..
वेदा : नेहमीप्रमाणे..
विराज : आपण आमच्या गुरुमाऊली आहात. तेव्हा आपले बोलणे आम्ही मनावर घेत नाही आणि पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो की, आपल्याला वेळ आहे, तेव्हा आपण आमच्या वाहनाची किल्ली शोधून ते आपण घेऊन जावे.
वेदा : आणि आपल्या वाहनाची किल्ली सापडली नाही तर..
विराज : तर काय करावे? या प्रश्नाचे उत्तर आपणच शोधावे, ही नम्र विनंती.
वेदा : हे बरंय. म्हणजे माझी किल्ली घेऊन तू तुझा प्रश्न सोडवून मोकळा होणार आणि मला अडकवणार. प्रिय शिष्या, हे आम्हाला परवडणारं नाही..
वैशाली : अरे, पण मग तू यांची स्कूटर घेऊन जा.
विजय : छे! माझी स्कूटर आहेच कुठे? ती सव्‍‌र्हिसिंगला गेलीये.
विराज : छान! म्हणजे तीही शक्यता बारगळली.
वेदा : याचसाठी आदल्या दिवशीच सगळी तयारी करून ठेवावी. म्हणजे असा गोंधळ होत नाही.
विराज : घे! घे! घे बोलून. या निमित्तानं अक्कल पाजळायला तुला चांगलं निमित्त मिळालंय..
वेदा : त्यात विशेष काय? असं निमित्त तू वारंवार देतच असतोस.
वैशाली : ए, आता शब्दांनी शब्द वाढवू नका. बास आता. विराज, चल तू नीघ आता. आजच्या दिवस रिक्षानं जा. तुम्ही सगळे बाहेर पडलात की मी शांतपणे किल्ली शोधून ठेवते.
आजी : अगं वैशाली, बाहेरच्या कुंडीत ही किल्ली कुणाची आहे गं?
वैशाली/ विजय/ वेदा/ विराज : किल्ली? बघू.. बघू..
आजी : ही काय! आता फिरून आले तर दारापाशी कुंडीत किल्ली दिसली.
विराज : अरे, ही तर माझीच किल्ली. हीच तर शोधतोय मगाचपासून.
वेदा : मग ती कुंडीत कशी काय गेली? चालत चालत? का पळत पळत?
विराज : हां. आठवलं. अगं, काल रात्री क्लासहून आलो ना, तेव्हा राहुलनं हाक मारली. काहीतरी र्अजट बोलायचंय- पटकन् ये म्हणाला म्हणून मग सॅक दाराशी ठेवली आणि किल्ली कुंडीत ठेवली..
विजय : .. आणि राहुलशी गप्पा मारून घरात आलो तर सॅक घेऊन घरात आलास आणि किल्ली कुंडीतच राहिली. बरोबर ना?
विराज : परफेक्ट. बाबा, काय व्हिज्युअलाझेशन आहे तुमचं!
वैशाली : म्हणजे? रात्रभर ही किल्ली त्या कुंडीत होती?
विराज : ..
वैशाली : विराज, बेजबाबदारपणाची हद्द झाली हं आता मात्र. आधीच आपल्या भागात चोऱ्यामाऱ्यांचं प्रमाण वाढतंय. अशा वेळेला आपण अधिक काळजी घ्यायला नको का? आणि तू चक्क कुंडीत किल्ली विसरलास?
विजय : विराजबाबू, हे जरा अतीच झालंय हं. आणि इतक्या कसल्या तंद्रीत असता तुम्ही मुलं? की, स्वत:च्या गोष्टीचं भान नसतं.
आजी : आणि इतकं काय त्या राहुलचं महत्त्वाचं काम होतं की, तुला सॅक आणि किल्ली घरात आणून ठेवायला पण वेळ नव्हता.
वेदा : आणि गेली असतीच स्कूटर तर? मागं एकदा रस्त्यावर क्रिकेट खेळताना घडय़ाळ काढून ठेवलं होतंस आठवतय ना! पुरंदरेकाकांना दिसलं म्हणून मिळालं परत..
विराज : यालाच म्हणतात, जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे. असो. तर मंडळी हो, मला आधीच उशीर झालाय, तेव्हा मी निघतो. टाटा. बाय बाय- सी यू.
वेदा : आणि हो! स्कूटर लावलीस की, किल्ली काढायला विसरू नकोस. नाहीतर किल्ली तशीच ठेवशील आणि क्लासला जाशील.
विराज : बरं.. बरं.. आज बोलून घे. मलाही कधीतरी संधी मिळेलच. तेव्हा बघून घेईन.
वैशाली : पुरे रे आता. किती भांडता. आणि नीट जा रे. उगीच उशीर झालाय म्हणून जोरात जाऊ नकोस.
shubhadey@gmail.com