Leading International Marathi News Daily

गुरुवार, २९ जानेवारी २००९

विविध

लष्करी विजयांपेक्षा राजकीय तोडगा काढा-मुखर्जी
कोलंबो/नवी दिल्ली, २८ जानेवारी/पीटीआय

श्रीलंकेतील वांशिक संघर्षांत केवळ लष्करी विजयांवर भर देण्यापेक्षा राजकीय तोडगा काढण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे भारताने सुनावले आहे. तामिळ नागरिकांच्या सुरक्षेच्या काळजीमुळे भारताने हा इशारा दिला आहे. परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी हे कोलंबोत पोहोचले असून त्यांनी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्याशी चर्चा करताना असे सांगितले, की श्रीलंकेतील वांशिक संघर्षांवर तातडीने तोडगा काढावा, तसेच उत्तरेकडील भागात शांतता निर्माण करावी.

‘मून इम्पॅक्टर’ पाठविण्याबाबत मतभेद होते- नरेंद्र भंडारी
नवी दिल्ली, २८ जानेवारी / पीटीआय

चांद्रयान-१ या इस्रोच्या अंतराळयानाबरोबर मून इम्पॅक्टर प्रोब हे उपकरण पाठवू नये असे मत काही वैज्ञानिकांनी व्यक्त केले होते पण प्रत्यक्षात या उपकरणाने अत्यंत चांगली कामगिरी केली असून चंद्राची उत्तम दर्जाची छायाचित्रे पाठवली आहेत. मुळात मून इम्पॅक्टर प्रोब हे उपकरण चांद्रयान-१ या अंतराळयानाबरोबर पाठवण्याची कल्पना माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी सर्वप्रथम मांडली होती. गेल्या १४ नोव्हेंबर रोजी मून इम्पॅक्टर प्रोब (एमआयपी) हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभूमीवर आदळवून कार्यान्वित करण्यात यश आले होते.

‘काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी होलब्रुक यांची भूमिका महत्त्वपूर्ण’
वॉशिंग्टन, २८ जानेवारी/पी.टी.आय.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान या तणावग्रस्त भागासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून निवड केलेले कुशल मुत्सद्दी रिचर्ड होलब्रुक यांच्यासाठी ‘काश्मीर प्रश्न’ हा मुद्दा अमेरिकेने बंधनकारक ठेवला नसला, तरी या प्रश्नावर योग्य असा तोडगा काढण्यासाठी होलब्रुक यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल,असा विश्वास आसिफ अली झरदारी यांनी व्यक्त केला.
होलब्रुक हे केवळ जम्मू आणि काश्मीर प्रश्नावर भारत- पाकिस्तानसोबत चर्चा करून तोडगाच सूचविणार नाहीत,

भारताच्या पुराव्यांवर लवकरच अहवाल-झरदारी
इस्लामाबाद, २८ जानेवारी/पी.टी.आय.

मुंबईवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भारताकडून देण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल येत्या दोन- तीन दिवसांत पाकिस्तानकडून दिला जाईल, असे पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी सांगितले. झरदारी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या विशेष मेजवानीच्या कार्यक्रमात फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इटली, पोर्तुगाल आणि रशियाच्या राजदूतांसमोर झरदारी यांनी ही माहिती दिल्याचे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे. यावेळी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी आणि अंतर्गत सुरक्षा खात्याचे प्रमुख रेहमान मलिक हेही उपस्थित होते. भारताकडून देण्यात आलेल्या पुराव्यांची पाकिस्तानकडून गांभीर्याने चौकशी केली जात असून विविध देशांच्या राजदूतांनी भारत आणि पाकिस्तान या उभय देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी सहभाग द्यावा, अशी अपेक्षा झरदारी यांनी व्यक्त केली. पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा खात्याला चौकशीसाठी देण्यात आलेली १० दिवसांची मुदत २७ तारखेला संपली . मात्र चौकशीत नव्याने मिळालेल्या धागेदोऱ्यांवर काम करण्यासाठी मलिक यांनी ही मुदत २९ जानेवारीपर्यंत वाढविल्याचे वृत्त येथील प्रसारमाध्यमांनी दिले. मुंबईवरील हल्ल्याला जबाबदार असणारे आरोपी हाती लागले तर त्यांना भारताच्या हवाली करण्याऐवजी त्यांच्यावर पाकिस्तानमध्येच खटले चालविले जातील हे मलिक यांनी १० दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. आता त्यांनी या आरोपींची चौकशी ‘कॅमेरा’ समोर आणि प्रसार माध्यमांच्या उपस्थितीत केली जाईल असे ‘डॉन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

अतिदक्षता विभागातून पंतप्रधान बाहेर
नवी दिल्ली, २८ जानेवारी/पी.टी.आय.

हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असून एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागातून त्यांना आता बाहेर काढण्यात आले आहे. पंतप्रधानांनी नंतर आपल्या सहकाऱ्यांसमवेत सल्लामसलतही केल्याचे समजते. त्यांच्या तब्येतीवर नियंत्रण ठेवणारी सर्व उपकरणे आता हटविण्यात आली असून त्यांना आता अतिदक्षता विभागाच्या नजीकच्या खोलीत हलविण्यात आले आहे. आज सकाळी सिंग यांनी वर्तमानपत्रे चाळली तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांच्या अन्त्यसंस्कारांसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली याची माहितीही त्यांनी सहकाऱ्यांकडून घेतली. दरम्यान, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज एम्स रुग्णालयाला भेट देऊन पंतप्रधानांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्या २० मिनिटे तिथे होत्या. हृदयशस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान सिंग यांची लवकरात लवकर नियमित कामाला सुरुवात करण्याची इच्छा असून त्यांच्या प्रकृतीत चांगली व लवकर सुधारणा होत असल्याने त्यांना हे सहजशक्य आहे असा विश्वास एम्समधील डॉक्टरांच्या पथकाने व्यक्त केला आहे.

मणिपूर चकमकीत तीन दहशतवादी ठार
इंफाळ, २८ जानेवारी / पी.टी.आय.

मणिपुरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. पूर्व इंफाळ जिल्ह्य़ातील खुमल लांपाकच्या घनदाट जंगलात झालेली चकमक १० मिनिटे सुरू होती. दहशतवाद्यांजवळ अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती. त्यांनी पोलिसांच्या दिशेने हातबॉम्बही फेकले. मात्र, पोलिसांची कोणतीही प्राणहानी झाली नाही. दोन दहशतवादी ठार झाल्यानंतर त्यांच्या साथीदारांनी जंगलात पलायन केले.

राजू बंधू आणि श्रीनिवास यांचा जामीन अर्ज फेटाळला
हैदराबाद, २८ जानेवारी/पी.टी.आय.

सत्यम कंपनीचा वादग्रस्त संस्थापक रामलिंग राजू, माजी व्यवस्थापकीय संचालक राम राजू आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी वडलामणी श्रीनिवास या तिघांसाठी करण्यात आलेला जामीन अर्ज येथील शहर न्यायालयाने फेटाळला.एसआरएसआर होल्डिंग या कंपनीचा महाव्यवस्थापक गोपाळकृष्ण राजू याची पोलीस कोठडी आणि जामिनाबाबत करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सहावे अतिरिक्त मुख्य कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी गुरुवापर्यंत तहकूब केली आहे. रामलिंग राजूसह तिघांना ३१ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. रामलिंग राजू याच्या कुटुंबियांनी एसआरएसआर होल्डिंग ही कंपनी स्थापन केली होती व कंपनीमार्फत सत्यममध्ये राजू यांनी मालकीचा मोठा हिस्सा ठेवला होता, अशी माहिती उघडकीस आली आहे.