Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

पब्लिक इश्यूंचा पुन्हा सुकाळ!
भांडवली बाजारात गेल्या महिनाभरपासून दिसून आलेल्या स्थिरतेने कंपन्यांच्या आयपीओ अर्थात प्रारंभिक समभाग विक्रीच्या प्रयासांना पुन्हा चालना मिळाली असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून गुंतवणूकदारांपुढे खुल्या होत असलेले तीन पब्लिक इश्यू..

टाटा कॅपिटलचे ५०० कोटींचे अपरिवर्तनीय रोखे

 

व्यापार प्रतिनिधी: टाटा उद्योगसमूहातील बिगर-बँकिंग विविधांगी वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपनी टाटा कॅपिटल लिमिटेडने भांडवली बाजारात प्रवेश घोषित केला आहे. कंपनीने संपूर्णत: सामान्य गुंतवणूकदारांवर लक्ष्य केंद्रित करीत आपल्या एक लाख सुरक्षित अपरिवर्तनीय रोख्यांची खुली प्रारंभिक विक्री येत्या २ फेब्रुवारीपासून २४ फेब्रुवारीपर्यंत राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. या विक्रीतून ५०० कोटी रुपयांचे भांडवल उभे राहणे अपेक्षित असून, अधिकचा भरणा झाल्यास आणखी १००० कोटी रुपये उभे करण्याचा पर्यायही कंपनीकडे असेल.
गेली तब्बल आठ वर्षे रोखे विक्रीची बाजारपेठ अस्तित्वहीन बनली असताना टाटा कॅपिटलचा हा प्रयत्न धाडसी तसेच पथदर्शकही ठरेल, असा विश्वास टाटा कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कडले यांनी व्यक्त केला. कंपनी ऑक्टोबर २००७ रोजी अस्तित्त्वात आली आणि पहिल्या वर्षांतील कामगिरीतून जगभरात व्याप फैलावलेली भारतातील अग्रेसर वित्तीय सेवा कंपनी बनण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टापर्यंत कंपनीने झेप घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. रोखेविक्रीतून उभ्या राहणाऱ्या भांडवलाचा याच उद्दिष्टपूर्ती उपयोग केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
टाटा कॅपिटलच्या या रोखे विक्रीला इक्रा आणि केअर या नामांकित पतसंस्थांनी अनुक्रमे ‘एलएए+’ आणि ‘केअर एए+’ अशी उच्चतम मानांकने मिळाली आहेत. या रोखे विक्रीत वार्षिक किंवा संचयित १२ टक्के दराने व्याजरूपी परतावा मिळेल. तिमाही स्वरूपात व्याज परतावा मिळविण्याचाही पर्याय असून त्यावर वार्षिक ११.२५ टक्के दराने व्याज दिले जाईल. या दोन्ही पर्यायांसाठी किमान १० हजार रुपयांची तर त्यापुढे १००० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. मासिक ११ टक्के दराने व्याजरूपी परतावा मिळविण्याचाही पर्याय खुला असून त्यासाठी किमान गुंतवणुकीची मर्यादा मात्र १,००,००० रुपये ठेवण्यात आली आहे. त्यापुढे १,००,००० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. व्याजाचे उत्पन्न हे मूळ स्रोतातून करकपातीपासून मुक्त असेल तसेच या गुंतवणुकीतून बर्हिगमनाचे अनेक सुलभ पर्यायही उपलब्ध असल्याने गुंतवणूकदारांना आवश्यक रोख तरलताही प्राप्त होईल, असे कडले यांनी स्पष्ट केले. या रोख्यांना शेअर बाजारात सूचिबद्ध केले जाणार असल्यामुळे, त्यांची बाजारातील नियमित व्यवहारात विक्री करूनही गुंतवणूकदारांना बाहेर पडता येईल.

एडसव्‍‌र्ह सॉफ्टसिस्टीम्सची ५५ ते ६० रुपयांनी भागविक्री
जेमिनी इंजि-फॅबची भागविक्रीतून ४४ कोटींच्या भांडवल उभारणी

व्यापार प्रतिनिधी: भांडवली बाजारात गेल्या महिन्याभरातील स्थिरतेने कंपन्यांच्या आयपीओ अर्थात प्रारंभिक समभाग विक्रीच्या प्रयासांना पुन्हा चालना मिळाली असून, जेमिनी इंजि-फॅब लिमिटेड ही उंबरगाव, गुजरातस्थित कंपनी येत्या ३ फेब्रुवारीपासून तब्बल ४४ कोटी रुपयांच्या भांडवली उभारणी सुरू करीत आहे. कंपनीच्या १०० टक्के बुक-बिल्डिंग प्रक्रियेच्या भागविक्रीतून १० रु. दर्शनी मूल्याच्या ५५ लाख समभागांची किमान ७५ रुपये तर कमाल ८० रुपये या किंमत बोलीवर विक्री केली जाणार आहे.
केअर या पतमानांकन संस्थेने या भागविक्रीला ‘केअर आयपीओ ग्रेड २’ अशी श्रेणी बहाल केली असून आल्मंड ग्लोबल सिक्युरिटीज लि. ही कंपनी या भागविक्रीची बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. ही भागविक्री ६ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येईल. भागविक्रीतून उभ्या राहणाऱ्या भांडवलाचा जेमिनी इंजि-फॅबच्या गुजरातमधील उंबरगाव येथील नवीन उत्पादनक्षमता विस्तारासाठी आवश्यक वर्कशॉप उभारण्याकरिता केला जाईल. या एकंदर ४९.८४ कोटी रुपयांच्या विस्तार प्रकल्पासाठी बार्कलेज बँक पीएलसीने १० कोटी रुपयांचे मुदत कर्ज मंजूर केले आहे. तर कंपनीने यापूर्वीच त्यासाठी ५४,९८१ चौरस फुटाची जमीन संपादित केली आहे. सीमेंट, डेअरी, रिफायनरी, औषध, पेट्रोकेमिकल्स, वीज आणि रसायने या उद्योगक्षेत्रांकरिता फॅब्रिकेटेड उत्पादने व प्रक्रिया साधनांची निर्मिती करणाऱ्या जेमिनी इंजि-फॅबकडे सध्या १७.७० कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स आहेत. कंपनीने ३० सप्टेंबर २००८ पर्यंतच्या सहामाहीत १६.४४ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर ४.३० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्या आधीच्या २००८ या आर्थिक वर्षांत कंपनीचे उत्पन्न व निव्वळ नफ्याचे प्रमाण अनुक्रमे २३.२६ कोटी आणि ३.८४ कोटी रुपये असे होते.

एडसव्‍‌र्ह सॉफ्टसिस्टीम्सची ५५ ते ६० रुपयांनी भागविक्री
व्यापार प्रतिनिधी: वेब-लर्निग त्याचप्रमाणे आय.टी. आणि प्लेसमेंट कन्सल्टिंग क्षेत्रातील चेन्नईस्थित कंपनी एडसव्‍‌र्ह सॉफ्टसिस्टीम्स लिमिटेडने बुक-बिल्डिंग प्रक्रियेने १० रु. दर्शनी मूल्याच्या ३९.७३ लाख समभागांच्या विक्रीला प्रस्तावित केले आहे. येत्या ५ फेब्रुवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या भागविक्रीसाठी प्रत्येक समभागाला रु. ५५ ते रु. ६० या दरम्यान बोली लावता येईल.
एडसव्‍‌र्हने ‘हेड्स’ या नावाने अद्ययावत तंत्रज्ञानाधारित अध्ययनाची प्रणाली सुरू केली असून, या वेबआधारीत ई-लर्निग प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योगांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाच्या पुरवठय़ाची निकडही पूर्ण केली जाते. या माध्यमातून केवळ आय.टी. क्षेत्रातच नव्हे तर बिगर-आय.टी. क्षेत्रात उमदे करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत अल्पमोबदल्यात सुसंधीचे दालन खुले झाले आहे. शिवाय कंपनीद्वारे ‘एल्मॅक’ हे फ्रँचाइझी मॉडेलवर आधारीत आय.टी. प्रशिक्षणाचे बॅ्रण्ड सुरू झाले आहे. सध्या दक्षिण भारतात कंपनीने फ्रँचाइझी तत्त्वावर ३५ एडसेंटर्स केंद्रे सुरू केली असून, देशव्यापी विस्ताराचे उद्दिष्ट ठेवून कंपनीने देशभरात २०० एड्सेंटर्स सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. भागविक्रीतून उभ्या राहणाऱ्या भांडवलाचा प्रामुख्याने याच कारणासाठी उपयोग केला जाईल, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष व सीईओ एस. गिरीधरन यांनी दिली.
कंपनीने आर्थिक वर्ष २००८ मध्ये एकंदर ३.९४ कोटी रुपयांच्या विक्री उत्पन्नावर रु. २.५३ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. तर सप्टेंबर २००८ पर्यंतच्या सहामाहीसाठी ४.१९ कोटींची एकंदर विक्री आणि १.८२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.