Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

मी फक्त कॉमेडियन नाही, तर मी एक चांगला अभिनेताही आहे. लाफ्टर चॅम्पियनमध्ये जिंकलो नाही हे माझ्या दृष्टीने चांगले झाले. कारण त्यामुळेच मला माझी कारकीर्द हवी तशी घडविता आली. मॅनेजमेन्ट आणि कॉर्पोरेट क्षेत्राची ताकद मी सात वर्षांपूर्वीच ओळखली होती आणि त्यामुळेच मी नेहमी नवीन राहिलो..
कधी स्टँड अप कॉमेडी करतो तर कधी चित्रपटांमध्ये अभिनय.. कधी मोठमोठय़ा अ‍ॅवॉर्ड सोहळ्याचे निवेदन करतो तर कधी व्हॉईस ओव्हर देतो. मध्येच तो आपला अल्बम काढतो तर कधी मिमिक्री असोसिएशनच्या कामात स्वत:ला झोकून देतो. ‘स्टार वन’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘हॅलो.. पैचान कोन’ कार्यक्रमात ज्याप्रकारे तो आपला गेट-अप बदलतो त्याप्रमाणे त्याने आपल्या आयुष्यात वेगवेगळे गेट-अप बदलले आहेत आणि म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळा ठरतो. ‘पैचान कोन’ ही त्याच्या आयुष्याची आता कॅचलाईनच झाली आहे.

आजघडीला दूरचित्रवाहिन्या, ऑनलाईन चित्रपट दाखविणे यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे विविध विषयांवरील अनेक प्रकारचे लघुपट, माहितीपट, चित्रपट दाखविण्याचे प्रमाणही वाढते आहे. त्यासाठी नव्या दमाचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, संगीतकार यांची नितांत गरज आहे. ही गरज पूर्ण व्हावी आणि ज्यांना चित्रपट क्षेत्रात काही करून दाखविण्याची उर्मी आहे अशा नवोदितांना संधी मिळावी या हेतूने वनटेक मीडिया चित्रपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती वनटेक मीडिया वेबसाइटचे व्यवस्थापकीय संचालक तेजश शहा यांनी दिली. या स्पर्धेत तीन गटांत चित्रपट पाठविता येतील. पहिल्या गटांत एक ते १० मिनिटे कालावधीचे चित्रपट, दुसऱ्या गटात १० ते ३० मिनिटे कालावधीचे चित्रपट आणि तिसऱ्या गटात ३० ते ६० मिनिटांचे चित्रपट स्पर्धकांना पाठविता येतील. पहिल्या गटातील विजेत्याला ५० हजार रुपये तर दुसऱ्या व तिसऱ्या गटातील विजेत्याला प्रत्येकी एक लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

हरमन बावेजा व्हिक्टरीच्या प्रतीक्षेत
‘लव्ह स्टोरी २०५०’ला अजूनही कोणी विसरलेले नाही. हृतिक रोशनसारखा चेहरा घेऊन आलेला हरमन बावेजा अजूनही बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करू शकलेला नाही. ‘व्हिक्टरी’मध्ये तो एका फलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिकेट हा खेळ भारतीयांसाठी धर्म असला तरी क्रिकेटवरील चित्रपटांकडे मात्र भारतीय प्रेक्षक क्वचितच फिरकतात. ‘अव्वल नंबर’, ‘हॅटट्रिक’, ‘मीराबाई नॉट आऊट’, ‘चेन कुली की मेन कुली’ ही ठसठसशीत उदाहरणे आहेत. ‘इक्बाल’चा अपवाद वगळला तर बाकीचे चित्रपट साफ आपटले होते. हा इतिहास समोर असतानाही अजितपाल मंगत या लेखकाने क्रिकेट आणि क्रिकेटपटूचे आयुष्य या विषयाला वाहिलेली कथा लिहिली आहे. दिग्दर्शन आणि निर्मितीही त्यांचीच आहे. कलाकारांची यादीही भलतीच मोठी आहे. हरमन बावेजा आणि अमृता रावबरोबरच ब्रेट ली, जयसूर्या, मुरलीधरन, संघकारा, हरभजन सिंग, दिनेश कार्तिक इत्यादी क्रिकेटपटूंनीही या चित्रपटात फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे. या चित्रपटासाठी जमेच्या बाजू तशा काहीच नाहीत. पण या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक क्रिकेटपटूचे चाहते असतीलच. तेच बहुधा या चित्रपटाच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहायला जातील. बाकी निर्णय तुमच्या हाती.